अहिराणीच्या निमित्ताने बोलींचे भवितव्य

डॉ. सुधीर राजाराम देवरे's picture
डॉ. सुधीर राजार... in जनातलं, मनातलं
15 Dec 2015 - 6:07 pm

- डॉ. सुधीर रा. देवरे

जगातील प्रत्येक कोपरा बोलीभाषेने व्यापलेला आहे. प्रत्येक कानाकोपर्‍यात ती बोलली जाते. मात्र यापैकी काही बोलीभाषा आज नामशेष झाल्या आहेत, तर काही बोलीभाषांचा विकास होऊन त्या आज प्रमाणभाषा झालेल्या दिसून येतात, हा बदल आपल्याला ज्ञातच आहे. आज व्यवहारात वापरली जाणारी हिन्दी भाषादेखील एकेकाळी केवळ बोलीभाषा म्हणूनच वापरली जात होती. परंतु आज तीच भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणून मान्यता पावलेली दिसून येते. त्याचप्रमाणे सिंधी, गुजराती, मराठी सारख्या अनेक भाषा ह्या सुद्धा एके काळी केवळ बोलीभाषेच्या स्वरूपातच अस्तित्वात होत्या.
संपूर्ण भारतात आढळून येणार्‍या बोलीभाषांची संख्या जवळजवळ अठराशे इतकी आहे. त्यापैकी अनेक बोलीभाषा पूर्वीच नष्ट झालेल्या आहेत. तर अनेक बोलीभाषा आजही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. अशीच एक बोलीभाषा म्हणून ‘अहिराणी’ भाषेचा नामोल्लेख करावा लागतो. अहिराणी महाराष्ट्राच्या नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार ह्या चार जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोलली जात असूनही तिला आजपर्यंत प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त झालेला नाही. भाषाशास्त्राने तर ‘अहिराणी’ला मराठी भाषेची एक पोटभाषा म्हणून तिची उपेक्षाच केलेली दिसून येते.
प्राचीन काळी ‘अहिराणी’ अभिर लोकांची भाषा होती. म्हणून तिला ‘अभिराणी’ असं संबोधलं जात असे. कालांतराने अभिरांचा अहिर अपभ्रंश झाला म्हणून अभिराणीचाही अहिराणी अपभ्रंश झाला. आज या विशिष्ट बोलीभाषेला ‘अहिराणी’ म्हणूनच संबोधण्यात येतं. अभिर लोकांचा अपभ्रंश अहिर आणि अहिर लोकांची भाषा ती अहिराणी. अभिर लोकांचे संदर्भ रामायण, महाभारत कालखंडातही आढळून येतात. भरताच्या नाट्यशास्त्र ह्या ग्रंथात अहिराणीचा उल्लेख बोलीभाषा असाच केलेला आहे. ह्या भाषेचा उदयकाल साधारणत: इसवी सनाच्या तिसर्‍या-चौथ्या शतकात झालेला असावा, असे मानले जाते. प्रदेशाच्या नावाने अहिराणीला ‘खानदेशी’ तर राजवटीच्या नावाने तिला ‘बागलाणी’ संबोधले जाते. मराठी, हिन्दी, गुजराती, राजस्थानी, बंगाली ह्या भाषेतील काही शब्दही अहिराणी भाषेत आढळून येतात. म्हणूनच अहिराणीला कोणत्याही एका विशिष्ट भाषेची पोटभाषा संबोधणे सर्वस्वी चुकीचे ठरते.
बोलीभाषांच्या संदर्भात काही अपवाद वगळता बेजबाबदार लेखनच अधिक प्रकाशित झालेले दिसून येते, जे बोलीभाषेच्या विकासासाठी मारक ठरते. बोलीभाषेतून संवाद साधण्यासाठी लोकांना प्रेरणा मिळेल, त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन मिळेल अशा हेतूने बोलीभाषेतील बलस्थानांचा अधिक अभ्यास व्हायला हवा. दुय्यम प्रतीचे लेखन, उदाहरणांचा अभाव, ढोबळ पुराव्यांच्या आधारावर केली गेलेली निश्चित विधाने, हितसंबंध, सामाजिक प्रतिष्ठेच्या आततायी कल्पना, दुसर्‍या भाषेच्या संदर्भातील अज्ञान, पूर्वग्रह, दुराग्रही वृत्ती, ठोस पुराव्यांचा अभाव, ऋण मान्य करण्याचा अभाव, पाहताक्षणी लक्षात न येणारी जोडतोड करून लिखाण करणे ह्या प्रकारांमुळेच बोलीभाषेचा विकास खुंटलेला दिसून येतो.
सर जॉर्ज ग्रियर्सन (1851 - 1946) यांनी भारतातील संपूर्ण भाषांचा सखोल अभ्यास केलेला आहे. क्षेत्रीय व्यापकता, भाषांची संख्या आणि विविधतेच्या दृष्टीतून बघितले तर त्यांचे भाषाविषयक कार्य निश्चितच महत्वाचे आहे. ह्या संदर्भातील सर्व महत्वाची माहिती ‘‘Linguistic Survey of India’’ ह्या नावाने ग्रंथित करण्यात आलेली आहे. ह्या ग्रंथाच्या नवव्या भागात त्यांनी अहिराणीच्या संदर्भात आपले मत व्यक्‍त केले आहे. त्यांनी ‘अहिराणी’ ला भिलांची भाषा म्हटले आहे. परंतु अहिराणी ही सुद्धा हिन्दीप्रमाणे एक लोकभाषा आहे. केवळ अहिराणीचाच असे नव्हे तर कोणत्याही भाषेचा संबंध कोणत्याही जाती-जमातीशी लावणे, हे मानवतेच्या दृष्टीकोणातून अयोग्य आहे. भाषेने जर व्यक्‍तिवर विशिष्ट जातीचा शिक्का मारला जात असेल वा भाषेवर विशिष्ट जात लादली जात असेल तर ही गोष्ट बोलीभाषेच्या विकासाला मारक ठरते.
लोकांच्या वर्तनातून लोकसंस्कृती संक्रमित होत असते- प्रवाहित होत असते. म्हणूनच कोणत्याही बोलीभाषेचा अभ्यास हा त्या बोलीभाषेतील लोकवाड्.मयाच्या अभ्यासाशिवाय अपूर्णच ठरत असतो. लोकवाड्.मयाच्या माध्यमातूनच आदिवासी बंधू-भगिनींच्या श्रद्धा, रितीरिवाज, पूजा-अर्चना, संस्कृती, आशा-आकांक्षा, शेती, व्यवहार, नातेसंबंध, सण-उत्सव इत्यादींवर प्रकाश पडत असतो.
‘ऋषिंचे कुळ आणि नदीचे मूळ’ जसे विचारले जात नाही तसे भाषांचे कुळही विचारू नये. कारण भाषा ही केवळ भाषा असते आणि ती स्थानिक संस्कृतीतून उगम पावलेली असते. मग ती कोणतीही भाषा असो. अगदी इंग्रजी असली तरीसुध्दा.
आदिवासी बोलींचे डाक्युमेंटेशन होणे आज आवश्यक झाले आहे. जी माणसं निरक्षर राहिलेली आहेत, तीच केवळ बोलीभाषेतून व्यवहार करताना दिसतात. पंरतु साक्षर झालेली माणसं मात्र लिखाणासाठी आणि व्यवहारासाठी प्रमाणभाषेचाच वापर करताना दिसून येतात. मग ते ‘अहिराणी’ भाषिक असोत की अजून कोणी इतर बोलीभाषक. ते मराठी, हिन्दी किंवा इंग्रजीतच लिहिण्याचा अट्टहास दाखवतात. मातृभाषेतून संवाद साधण्यातही जिथे त्यांना संकोच वाटू लागतो तिथे मातृभाषेतून लिखाण तर दूरची गोष्ट आहे. हा संकोच दूर करण्यासाठीचा प्रयत्न भाषा केंद्र बडोदा या आमच्या एनजीओ कडून सुरू आहे. जिथे जिथे बोली-भाषेसाठी न्यूनगंड दिसून येतो, तिथे ह्या बोलीभाषांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत.
आपल्या भारतीय संविधानाच्या आठव्या परिशिष्टात भाषिक स्वायत्ततेच्या संदर्भात मार्गदर्शन केलेले आहे. त्या अन्वये कोणत्याही भारतीय व्यक्‍तीला आपली भाषा बोलण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य देण्यात आलेले आहे. तरीही शाळा-महाविद्यालयांमध्ये बोलीभाषेतून शिकविण्यासाठी रूची दाखवली जात नाही. लोकांना आपल्या भाषेपासून दूर ठेवणे म्हणजे त्यांची जिव्हा- जिभ कापण्यासारखेच आहे. म्हणूनच लोकांना आपल्या भाषेपासून वंचित करणे हे लोक अधिकारांचे उल्लंघन ठरते.
भाषा कोणतीही असो, जर ती व्यवहारभाषा, वाड्.मयभाषा आणि ज्ञानभाषा होत असेल तर ती प्रमाणभाषेचा दर्जा प्राप्त करू शकते. बोलीभाषांचे संवर्धन करणे आज आवश्यक झाले आहे. भाषा हे संस्कृतीचे माध्यम आणि वाहन सुध्दा असते. आपण सर्वच बोलीभाषांबाबत जागृत असू तर भारतीय बोलीभाषांचे भवितव्य निश्चितच उज्ज्वल आहे. पण त्यासाठी अहिराणी वा ती ती भाषा बोलणार्‍या लोकांनी आपला न्यूनगंड झटकून आपली बोलीभाषा बोलत- लिहित राहणे नितांत गरजेचे आहे.
(सदर लेख दिनांक 12-12-2015 च्या महाराष्ट्र टाइम्स (नाशिक विभाग) मध्ये प्रका‍शित झाला आहे. लेखातील मजकुराचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.)

– डॉ. सुधीर रा. देवरे
इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

साहित्यिकलेख

प्रतिक्रिया

भीमराव's picture

15 Dec 2015 - 6:58 pm | भीमराव

डॉक्टर,
हाच लेख जसा चा तसा अहिराणी मधे टाईप करुन प्रकाशित करा की, खाली प्रतिसादामधे टाकला तरी चालेल, आम्हालाही प्रमाण भाषेतील ब-याच शब्दांचे खाण्देशी/ अहिराणी प्रतीरुप माहीत होईल

उगा काहितरीच's picture

17 Dec 2015 - 4:58 pm | उगा काहितरीच

+१

विशाखा पाटील's picture

15 Dec 2015 - 8:42 pm | विशाखा पाटील

आजच्या काळात असा आग्रह धरणं कितपत व्यवहार्य ठरेल ? पूर्वी एका विशिष्ट प्रांतातच व्यवहार होत असत, आता तसे राहिलेले नाही. भाषा आणि अर्थकारण यांचाही जवळचा संबंध असतो. ज्या भाषेत बोलून/लिहून /अभ्यास करून पोट भरण्याची शक्यता असेल, तिच्याकडे लोकांनी वळणं साहजिक आहे. बोलीभाषेचा अभ्यास होणं, संस्कृतीतले तिचे स्थान हे मान्य असलं तरी लेखाच्या शेवटच्या परिच्छेदात बोलीभाषेतून व्यवहार करा, असा जो आग्रह दिसतोये ते शक्य होणार नाही.

सौन्दर्य's picture

16 Dec 2015 - 7:44 am | सौन्दर्य

लेख चांगला आहे पण काही ठिकाणी थोडासा दुराग्रह जाणवतो. कित्येक बोली भाषा ऐकायला फारच छान वाटतात, लोकं ती भाषा मनापासून बोलताना देखील आढळतात, असे असताना अमुक एका भाषेला "बोलीभाषा न म्हणता प्रमाणभाषा म्हणा" असा आग्रह धरण्याची गरजच काय ? कोळ्यांची भाषा कानाला गोड लागते, मालवणी भाषेत तर कित्येक नाटके आहेत, असं असताना त्यांना नुसते बोलीभाषा म्हंटल्याने काही फरक पडत असेल असं मला वाटत नाही.

प्रचेतस's picture

16 Dec 2015 - 9:33 am | प्रचेतस

ह्या निमित्ताने नाशिकच्या पांडवलेणीतील ईश्वरसेन अभीराच्या ४थ्या शतकातल्या शिलालेखाची आठवण झाली. ह लेख क्र. १० येथील नहपान विहाराच्या व्हरांड्याच्या डाव्या बाजूचे भिंतीवर कोरलेला आहे. हा लेख संस्कृत-प्राकृत अशा मिश्र भाषेत असून ब्राह्मी लिपीत आहे. हा माढरीपुत्र ईश्वरसेन म्हणजे अभीर शिवदत्त ह्याचा पुत्र.
ह्या लेखात विण्हूदत्ता शकनिका हिने त्रिरश्मी पर्वतावरील (पांडवलेणीचा डोंगर) विहारात वास्तव्य करण्यार्‍या चतुर्दिशांच्या भिख्खूसंघाला काही द्रव्य देणगी ह्या स्वरुपात दिले होते. हे द्रव्य तिने कुलरिक (कुंभार), तिलपिषक (तेली) व ओदयंत्रिक (जलयंत्री- पाणक्या) अशा श्रेण्यांमध्ये विभाजीत केले होते.

सुनील's picture

16 Dec 2015 - 9:58 am | सुनील

एखादा धुळ्याचा मनुष्य आणि दुसरा एखादा कुडाळचा मनुष्य, ह्यांनी एकमेकांशी कोणत्या भाषेत संवाद साधावा? जर ते आपापल्या (अहिराणी आणि मालवणी) भाषांवर अडून बसले तर त्यांच्यात संवाद व्हावा तरी कसा?

प्रमाण भाषेची गरज असते ते ह्यासाठी. लिखाणासाठी तर हे अधिकच प्रकर्षाने जाणवते.

प्रमाण भाषादेखिल मूळची बोलीच असते. कोणतीही भाषा जेव्हा विस्तृत प्रदेशात बोलली जाते तेव्हा स्थानपरत्वे त्यांच्यात भेद होऊन विविध बोली निर्माण होणे स्वाभाविकच आहे.

पुढे काही ऐतिहासिक, सामाजिक वा राजकीय कारणांमुळे त्यांच्यातील एखाद्या बोलीस प्रमाण भाषेचा दर्जा प्राप्त होतो आणि ती त्या सर्व बोली भाषकांची समाईक भाषा बनते. लिखापढीही तिच्यात होते. आणि त्याचवेळेस बोली म्हणून ती आपले चैतन्य हरवून बसते.

अशा वेळेस, अधिक चैतन्यशील असलेल्या बोलींकडून शब्दसंपत्ती घेऊन तिने समृद्ध व्हायला हवे. आणि हे काम प्रामुख्याने विविध बोली भाषकांचे आहे.

मराठी, हिन्दी, गुजराती, राजस्थानी, बंगाली ह्या भाषेतील काही शब्दही अहिराणी भाषेत आढळून येतात. म्हणूनच अहिराणीला कोणत्याही एका विशिष्ट भाषेची पोटभाषा संबोधणे सर्वस्वी चुकीचे ठरते.

कोणतीही भाषा दुसर्‍या कोणत्या भाषेची पोटभाषा आहे किंवा नाही हे ठरवण्यासाठी "शब्द्संपत्तीचे साधर्म्य" हा निकष दुय्यम समजला जातो.

खेरीज, ग्रियर्सनने अहिराणीचा समावेश गुजरातीची पोटभाषा असा केला होता.

ओल्ड मोन्क's picture

16 Dec 2015 - 10:40 am | ओल्ड मोन्क

मना गाव…मना देश…शे खान्देश…

पिवळा डांबिस's picture

16 Dec 2015 - 10:47 am | पिवळा डांबिस

बाबारे, तू हंयसर नेहमी नुसतो लेख टाकून जातंय, कधी दुसर्‍यांच्या लेखावर प्रतिक्रिया देतांना दिसणय नाय!
काय तू काय हिते तुझ्या ब्लॉगची जाहिरात करूकंच येतय काय?
तुकां जर अहिराणीबद्दल इतक्या प्रेम असतां तर तुझो लेख तू अहिराणीतच टाकलो असतंंस. पण तां नाय!
तुका फक्त हंय तुझ्या ब्लॉगची जाहिरातच करूची दिसतां!
बोलीभाषेचां भवितव्य ठरवता मेलो!
आधी हंयसर रेग्युलर मेंबर हो, दुसर्‍यांच्या लिखाणावर चार प्रतिक्रिया दे आणि मगे धागे काढ!
मागच्या वेळेंक गप रवंलंय, ' जावंदे, पहिलो डाव देवाचो!' म्हणान!
पण अशेच चाळे करशीत तर मेल्या तुकां मिपाकर उभे आडवे हाणतीत!
मिपा म्हणजे काय अन्य ठिकाणांसारख्या न्हय!!!
माझां काय नाय पण एक फेलो बोलीभाषिक म्हणान, आणि मिपावरचो जुनो आणि अजाणतो मेंबर म्हणान, मित्रत्वाचो एक आपलो सल्लो दिलो.
आता यापुढे तू आणि तुझां नशीब!!!
अश्या कित्येक लोकांचो बाजार यापूर्वी उठवलेलो आसां ह्या शिंदळीच्या मिपाकरांनी!!!

प्रचेतस's picture

16 Dec 2015 - 11:14 am | प्रचेतस

_/\_

सहमत आहे. आपल्या बोली भाषेचा अभिमान असलेले बोली जिवंत ठेवतात.ती प्रमाण भाषा झाली काय किंवा नाही काय ,त्यामुळे काहीच फरक पडत नाही.बोली भाषेची शैली, बाज , ही वैशिष्ट्ये जपणे जास्त महत्वाचे आहे असे मला वाटते. प्रमाण भाषेखेरीज दोन तीन बोली भाषा बोलता आल्या तर फारच चांगले.
हा लेख चांगला आहे पण एका बाजूने झुकला आहे. lopsided आहे.
लोकसत्तामधील याच विषयावरचा एक लेख संदर्भ देत आहे.
http://www.loksatta.com/lokrang-news/ahirani-language-118662/

पिवळा डांबिस's picture

16 Dec 2015 - 11:14 am | पिवळा डांबिस

काय बोलीभाषा काय्येक मरणंत नाय!
सहमत आहे. आपल्या बोली भाषेचा अभिमान असलेले बोली जिवंत ठेवतात.

आता मी मात्र मरूंक मोकळो झालंय, स्वामी!!!
:)

रामदास's picture

16 Dec 2015 - 11:20 am | रामदास

तुमच्या चार ओळी या निमित्ताने वाचायला मिळाल्या.

आज उत्तम सुदीन
झाले दर्शन संतांचे
पाप ताप दैन्य गेले
संत पाउले पाहता..

तुमचे लिखाण आग्रही स्वरुपाचे वाटत नाही.परंतू तोच आशय मटा मधे जुजबी बदल करून टाकण्याचे आणि तो संदर्भ पुन्हा एकदा मिपावर टाकण्याचे प्रयोजन काय ते निटसे समजले नाही. खेरीज लेख टाकल्यावर त्यावरील चर्चेकप्नतुम्ही वळून बघत नाहे असेही वाटते. असो.

आदूबाळ's picture

16 Dec 2015 - 11:24 am | आदूबाळ

डॉ० साहेब - गेल्या वेळची चर्चा पेंडिंग आहे बर्का...

मारवाडी भाषेचा हिंदीची बोली भाषा असा उल्लेख झालेला असल्याने राजस्थानची भाषा ही हिंदी ठरते.
हिंदी भाषेने अशाच पद्धतीने अंगिका , भोजपुरी ,माळवी राठवी इत्यादी भाषा गिळंकृत केलेल्या आहेत.
प्रत्येक बोलीभाषेचे स्वतःचे साहित्य असते. सौंदर्य असते. संस्कृती असते. भाषा मेली तर संस्कृती मरते.
१९५० मधे केल्या गेलेल्या सर्वे नुसार भारतात २००० पेक्षा जास्त बोली भाषा आस्तित्वात होत्या ( ती भाषा बोलणारी लोकसंख्या ) १९९१ मधे केल्या गेलेल्या सर्वे नुसार ती संख्या १५०० च्या आसपास होती.
याचाच अर्थ चाळीस वर्षात पाचशेहून अधीक भाषा या मृत झाल्या.
यात अहिराणी , कोकणी सारखी मोठा जनाधार असलेली भाषा टिकल्या मात्र "वाडवली" सारख्या लहान जनाधार असलेल्या भाषा कितपत तग धरतील ही शंका आहे.
मराठी सारखी खूप मोठा जनाधार असलेली भाषा देखील हिंदी च्या रेट्यापुढे हळुहळू का होईना पण मागे पडत चालली आहे.
तळोज्या सारख्या अगदी छोट्या खेडेगावात देखील इथे दहा वर्षे राहूनदेखील मराठी येत नाही म्हणणारे लोक भेटतात.ते फक्त हिंदीच बोलतात आणि आपणही हिंदीतुनच त्यांच्याशी बोलावे असा आग्रह धरतात.
आपल्याला हिंदी येत नाही असे म्हंटले तर ते आश्चर्य व्यक्त करतात. पण त्याना मराठी येत नाही याचे काहिही वैषम्य वाटत नाही.

बोका-ए-आझम's picture

16 Dec 2015 - 1:23 pm | बोका-ए-आझम

प्रमाणभाषा - बोलीभाषा ही लेबल्स आहेत, बाकी काही नाही. लोकाश्रय अशाच भाषांना मिळतो, ज्यांच्यामुळे लोकांना त्यांचे सगळे व्यवहार, विशेषतः आर्थिक - करता येतात. जर एखादी भाषा शिकून किंवा वापरुन लोकांचा आर्थिक फायदा होत नसेल तर लोक ती भाषा वापरणं सोडून देतील. मी मुंबईमधील जयहिंद महाविद्यालयात शिकवत होतो तेव्हा अनेक सिंधी विद्यार्थी भेटायचे, जे अगदी जुजबी सिंधी बोलू शकायचे किंवा मग त्यांना अजिबात सिंधी यायची नाही पण जयहिंद हे भाषिक अल्पसंख्यांक समाजासाठी (इथे सिंधी) असल्यामुळे आणि त्यांच्यासाठी जयहिंदसारख्या चांगल्या काॅलेजमध्ये प्रवेश मिळणं महत्त्वाचं असल्यामुळे ते जुजबी सिंधी शिकत.

इरसाल's picture

16 Dec 2015 - 1:54 pm | इरसाल

जग मासला हरेक कोना बोलीभाषानी व्यापेल शे. हरेक कानाकोपरामां ती बोलाइ र्‍हायनी. तरीबी येनामासल्या काही बोलीभाषा आज नामशेष हुइ र्‍हायन्यात् नी बाकीन्या बोलीभाषांस्ना विकास हुइसन त्या आज प्रमाण हुइसन त्या प्रमाणभाषा व्हयेल दिखी र्‍हायन्यात.हावु बदल आपले मालुम शेच.आज येव्हारमां वापरायेल हिन्दी भाषा कव्हय एक वखतमां कोल्ली बोलीभाषा म्हणीसनच वापराय र्र्‍हायंती पन आते तीच भाषा आपली राष्ट्रभाषा म्हणीसन मान्यतामां येल दिखी र्र्‍हायनी. तेन्हासारख्याच्यं सिंधी, गुजराती, मराठी सारख्या गैर्‍ह्या भाषा एक वखतमां कोल्ल्या बोलीभाषा म्हणीसनच व्हत्यात.

सुमीत भातखंडे's picture

16 Dec 2015 - 2:39 pm | सुमीत भातखंडे

सगळेच जर आपापल्या बोली भाषेत बोलत राहिले तर कठीण होईल संवाद साधणं.
कुठलीतरी एक प्रमाण भाषा हवीच.

शशिकान्त पवार's picture

16 Dec 2015 - 3:19 pm | शशिकान्त पवार

भौ तो सर जॉर्ज ग्रियर्सन ग्या खड्डा मा, तेले काय माहित शे अहिरनि अनि भिलाउ भाषा न्यारी आस, डॉ. सुधीर रा. देवरे बाकि चालु द्या जोर मा जय अहिरानि जय खानदेश.

शशिकान्त पवार's picture

16 Dec 2015 - 3:21 pm | शशिकान्त पवार

मना गाव मना देश, जय खान्देश.