वेंगुर्ले या शब्दाचा अर्थ
"वेंगेत मारून उरले ते वेंगुर्ले".
वेंग म्हण्जे "कंबर".म्हणजेच "कंबरेवर ठेऊन उरले ते"
प्रेक्षणीय स्थळं पहाण्याची ज्याना आवड आहे त्यानी वेंगुर्ल्याला अवश्य भेट द्यावी. रामेश्वर,दत्त,पुर्वस,ताम्बळेशवर,रवाळनाथ अशा देवांच्या नावाची सुंदर मंदीरं बघायला मिळतील.तांबळेशवर मंदीर डोंगराच्या माथ्यावर आहे.खानोली गावाला जाताना घाटी चढून पाचशे ते सातशे फूट उंचीवर जावं लागतं.वाटेत दोनशे ते तिनशे फूटावर तांबळेश्वर मंदीर आहे.
ह्या देवळाची ख्याती अशी की या देवळा जवळच गावाचं स्मशान भूमी आहे.त्यामुळे बहूतकरून दिवसा ह्या देवळात दर्शनाला लोक येतात.रात्री हे देवूळ जरा भयभयीत वाटतं.आजुबाजुचा देखावा तसा रमणीय आहे.
एव्हढ्या उंचीवरून खाली पाहिल्यास वेंगुर्ल्याचा समुद्र आणि फेसाळ लाटा,काळे मोठाले खडक,कोळ्यांची जहाजे,गलबते(मोठ्या होड्या),केव्हांतरी मुंबई ते गोवा जाणारी आगबोट आणि तिच्या नळकांड्यातून कोळशाचा धूर पाहिल्यावर,
"अरे नांखवा,रे नांखवा! कितें रें? गोमू माहेरला जाते रे नाखवा! हिच्या घोवाला कोकण दाखवा!"
हे जितेन्द्र अभिषेकीनी दिलेलं सिनेमातलं गाणं आठवून मन त्रुप्त होतं.कधी कधी ही बोट वेंगुर्ल्याच्या बंदरावर पण थांबते.
तसा बंदराला धक्का नाही.दोन तिन मैलावर समुद्रात बोट थांबते.धक्यावरून पडाव किवा खपाटे (छोट्या होड्या)प्रवाशाना घेऊन जातात किवा घेऊन येतात.त्यात मुम्बई वरून आलेले प्रवासी किवा गोव्याला जाणारे प्रवासी असतात.बोट लागून लागून ओकारया येऊन हैराण झालेल्या आमच्या सारख्या प्रवाशाना केव्हां एकदा धक्यावर येऊन पडतो असं होतं.
दुपारी घरी पोहचल्यावर उकड्या तांदळांचा गरम गरम भात,त्यावर सरंग्याची आंबट, तीखट आंमटी,आणि वालीच्या भाजीवर आडवा तिडवा हात मारल्यावर जीवात जीव यायचा.
ताम्ब्ळेश्वर देवाची आख्याईका अशी की तो देव नसून देवचार म्हणजे अर्धा देव आणि अर्ध भूत आहे अशी लोकांची समजूत असायची.आणि रात्री बारा नंतर तो वेंगुर्ल्या गावात फेरफटका मारतो अशी एक आख्याईका होती.त्यावेळी वीज नव्हती तेव्हां काळोख झाल्यावर लोक मिणमिणते दिवे विजवून लवकरच झोपी जायचे.शान्त वेळी भूत देवचार आठवले नाहीत तर नवलच म्हाणावं लागेल.
वेंगुर्ल्या बन्दराच्या ऊंच टेकडीवर एक सुंदर गेस्टहाउस आहे.झूळ झूळ वारा,समोर अथांग सागर,आणि नजरेला न भिडणारं क्षितीज अशा वातावरणात विनोदी लेखन व उत्तम नाटकं लिहीण्याचा मूड पु.ल.देशपांडयाना आला नाही तर नवलच म्हणावं लागेल.ते ह्या गेस्टहाउस मधे मुक्कामाला असत असं त्यानीच एका त्यांच्या लेखात लिहून ठेवलं आहे ते आठवलं.
वेंगुर्ल्याच्या उत्तरेला क्यांप नावाचं खूप मोठं मैदान आहे.तुळस, मठ आणि वेंगुर्ले या तीन गावांच्या विळख्यामधे आहे.माझ्या लहानपणापासून इथे एखादं विमानतळ येणार म्हाणून बातम्या यायच्या पण अजून पर्यन्त बातम्याच आहेत.ह्या मैदानावर उन्हाळ्यात बरेच लोक संध्याकाळी फिरायला म्हणून यायचे.घरी परत्ताना वाटेत "बाब्ल्याचे कोल्द्रिन्क हाऊस " नावाच्या एका दुकानात, थंड थंड दूधात आइस्क्रिम घालून रंगी बेरंगी पेय घेण्यास चुरस लागायची.
वेंगुर्ल्याचं मार्केट ज्याला क्राफ़र्ड मार्केट म्हणून उल्लेखतात ते मुंबईला ज्या क्राफ़र्ड साहेबाने बांधलं त्यानेच हे पण मार्केट बांधलं आहे.मार्केटच्या आतल्या भागात काही दुकानं आसायची ती फक्त बेळगावाहून (घाटावरून) आलेली भाजी म्हणजे बटाटे, टोम्याटो असला माल ठेवायचे.आणि बाहेरच्या उघड्या जागेत जवळपासच्या लहान लहान गांवातून येणारा माल, ताज्या भाज्या, फळं फुलं विकायला ठेवायचे.
मार्केटच्या बाजूच्या इमारतीत मासळी बाजार भरायचा.तर्हेतर्हेचे मासे वेंगुर्ल्याच्या समुद्रातून किवा मांडवी वरच्या खाडीतून सरंगे, इस्वण,बांगडे,कोलंबी,मोरी, (शार्क मासा),पेडवे असे निरनीराळे मासे विकायला येत असत.मुंबईच्या समुद्रात मिळणारे
पापलेट आणि बोंबील कोकणात मुळीच मिळत नाहीत.
खानोली घाटी चार पांच मैलांची आहे.चढून नंतर उतार लागल्यावर खाली चौपाटी (बीच) दिसतो.फेसाळ लाटांचा बीच आता कसा असेल कुणास ठावूक.कुडाळदेशकर ज्ञातीचे लोक खानोलीला दर वर्षी रवाळनाथाचा उत्सव करायला येतात.घाटी चढताना करवन्दं, जांभळं, बोंडु, लहान लहान आंबे झुडपात जाऊन यथेच्छ खायाला मिळायचे.
क्यांपच्या बाबतीत एक सांगावयाचं राहिलं.तिथे एक हॊस्पिटल आहे.
त्याला बाट्याचे हॊस्पिटल म्हणतात.इ.स.सतराशे पंचवीसच्या दरम्यान अमेरिकन मिशनरी लोकानी ते बाधलं.जन सेवेबरोबर ते गरीब लोकांचं धर्मांतर करीत.सांगायचं म्हणजे १९३६ साली नुकतेच देशात रडिओ आले होते.ह्या होस्पिटलात एक रडिओ होता.दुसरा रतनागिरीच्या कलेक्टरकडे होता.आणि तिसरा आमच्या घरी होता. हे रडिओ कार ब्यॅट्रीवर चालत.गम्मत म्हणजे प्रोग्राम फक्त रात्रीचेच ऐकाला येत.रडिओ ऐकायला आजुबाजुचे लोक येत.त्यांच्या बरोबर लहान मुले पण येत.
वेंगुर्ल्याचे लाल मातीचे रस्ते धुळ खूप निर्माण करीत.आता बरेच़से डांबरी झाले आहेत.पावसाळ्यात पाऊस अतोनात पडतो.ह्या तांबड्या रस्त्यावरची धूळ शेजारच्या गटारातून धुवून जात असायची.ही गटारं वाहताना पाहून कदाचीत मुंबईतल्या इराण्याने
आपला हजारो कप चहा ह्या गटारात तर ओतला नसेल ना?अशी खूळी शंका मनात यायची.
वेंगुर्ल्यात सर्रास मालवणीतून बोललं जातं.सगळे व्यवहार,बाजाररहाट ह्याच भाषेतून होते.त्यामुळे शुद्ध मराठीत बोलणारा कोणी दिसला की कुजबुजत,
"मुंबईहून चाकरमानी इलोलो दिसतां!"
मुळात इकडूनच गेलेला पण दोन चार वर्ष मुंबईला राहून थोडे दिवस इकडे आल्यावर त्याच्या प्रत्येक वाक्यात,
"आमच्या मुंबईला हे मिळतं,आमच्या मुंबईला ते मिळतं"
असले संवाद ऐकल्यावर लोकल लोकांचा तो टिंगलीचा विषय व्हायचा.आता अमेरिकेला जावून आल्यावर,
"ब्यॅक ओव्हर देअर" किंवा "ओ जीजस"
म्हटल्यावर जसा टिंगलीचा विषय होतो तसाच व्हायचा.
आता कोकणात आगगाडी आली.ज्याच्या त्याच्याकडे मोटारी झाल्याने आणि वाहतूक खूपच सुखकर झाल्याने वेगुर्ल्यात पण खूप सुधारणा झाली असावी.मी फक्त माझ्या जुन्या आठवणीना उजाळा देत होतो.
तरी पण मी म्हणेन,
"जीवन मे एक बार आना वेगुर्ला."
श्रीकृष्ण सामंत
प्रतिक्रिया
9 Sep 2008 - 11:22 pm | नंदन
>>>जीवन मे एक बार आना वेंगुर्ला
-- अगदी. बंदराजवळचे 'सागर' गेस्टहाऊस अप्रतिम जागी आहे. डावीकडे दिसणारी अर्धवर्तुळाकार हिरवीगार वेळ आणि उजवीकडे टेकडी आणि समुद्र. दोन फोटोज टाकायचा मोह आवरत नाही :)
हे त्या बंगल्यातून दिसणारं समोरचं दृश्य -
आणि हे पश्चिमेकडचं -
खानोली घाटी अजूनही हिरवीगार आहे. कँपात सुनील गावस्करने क्रिकेट स्टेडियम बांधू असे आश्वासन वीस-एक वर्षांपूर्वी दिले होते, ते काही अजून पूर्ण झालेले नाही :). फक्त त्यामुळे 'काय मेलो स्टेडियम बांधता आसा', म्हणायला गजालीला एक विषय मिळाला आहे. नाही म्हणायला एक बाग, घसरगुंडी, झोपाळे इ. तिथे उभे राहिले आहे.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
10 Sep 2008 - 9:39 pm | श्रीकृष्ण सामंत
नंदनजी,
इतके सुंदर फोटो दाखवल्या बद्दल मनःपुर्वक आभार
किती अप्रतिम फोटो आहेत ते.
खरंच दहा हजार मैलावरून ते फोटो पाहून मला मनात येतं
"कोकणा प्राण तळमळला"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
9 Sep 2008 - 11:32 pm | संदीप चित्रे
>> पापलेट आणि बोंबील कोकणात मुळीच मिळत नाहीत.
हे माहितीच नव्हतं.
नंदन -- मस्त फोटो रे.
10 Sep 2008 - 12:25 am | प्राजु
नंदन फोटो अतिशय सुंदर आहेत.
लेख आवडला.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Sep 2008 - 9:42 pm | श्रीकृष्ण सामंत
प्राजुजी,
नंदनजीच्या त्या फोटोने माझ्या लेखाला "चंदेरी कडा" लागली.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
10 Sep 2008 - 6:32 am | शितल
वेंगुर्लाल्याला मी राहिले आहे सागर हॉटेल मध्ये.
पण ते हॉटेल समुद्राच्या अगदी जवळ असल्याने रात्री त्या समुद्राच्या लाटांच्या आवाजाने झोपच लागत नाही.
पण सुंदर आहे वेंगुर्ला.
10 Sep 2008 - 9:53 pm | श्रीकृष्ण सामंत
शितलजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपल्याला वेंगुर्ले आवडले हे वाचून बरं वाटलं.
"आवाजाने झोपच लागत नाही."
ह्यावर एक मला किस्सा आठवला.माझे एक स्नेही गिरगावरोडवर ठाकूरद्वारच्या नाक्यावर राहायचे.
पुर्वी गिरगावांत ट्राम्स असायच्या.
नंतर ट्राम्स बंद झाल्या.त्यामुळे त्याना नंतर झोप लागत नसायची.कारण उघडच आहे.ट्रामच्या आवाजाने त्यांना झोप यायची.
थोडक्यात हा संवयीचा परिणाम असावा.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
10 Sep 2008 - 9:50 am | वरद
वेंर्गूल्यापासून थोडेसे पुढे असणारा सागरेश्वर आणि मोचेमाड किनारा सुद्धा सुरेख आहे.
10 Sep 2008 - 9:58 pm | श्रीकृष्ण सामंत
वरदजी,
आपलं ऑबझर्वेशन अगदी बरोबर आहे.मला तिथली सौंदर्य सृष्टी खूप आवडते.
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
10 Sep 2008 - 11:09 am | शिप्रा
वेंगुर्लाल्याला आम्हि राहिलो आहोत्...काका पण त्याहि पेक्षा आवड्ले ते तुमचे अजगाव्...खुप्प्प सुंदर गाव आहे...त्यांची भाषा, त्यांचे जेवण ,त्यांची घर , सगळेच मस्त.....तिथुन निघावेसे वाटत नव्हते..:(
बाकि वरिल लेख नेहमी सारखाच छान आहे...आणि फोटो सुद्धा....
जिथे कमी तिथे आम्ही ..:)
10 Sep 2008 - 10:04 pm | श्रीकृष्ण सामंत
चिंटीजी,
खरं आहे आपलं म्हणणं.वेगुर्ले त्यामानाने शहरी आहे.आजगांव खरंच आवडण्यासारखं आहे.आणि त्यातून मला पण ते जास्त आवडायचं कारण माझं ते आजोळ होतं.
"आजी आजोबा तु-म-ची आ-ठ-व-ण येते."
प्रतिक्रिये बद्दल आभार.
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
10 Sep 2008 - 12:16 pm | स्वाती दिनेश
सामंतकाका,लेख आवडला आणि नंदन फोटो क्लासच!
स्वाती
10 Sep 2008 - 10:09 pm | श्रीकृष्ण सामंत
स्वाती दिनेशजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
11 Sep 2008 - 1:34 am | चित्रा
छान, आवडले वेंगुर्ला!
खूप वर्षे झाली, वेंगुर्ल्याला येऊन - आईवडिलांबरोबर आले होते. गोव्याला पणजीपासून सुरूवात करून तेरेखोल, वेंगुर्ला, असे करीत करीत छान सफर झाली होती ते आठवले.
11 Sep 2008 - 7:08 am | श्रीकृष्ण सामंत
चित्राजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
11 Sep 2008 - 8:58 am | बेसनलाडू
लेखन वाचून आणि त्यावरील प्रतिक्रिया,चित्रे पाहून जावेसे वाटते आहे.
(प्रवासी)बेसनलाडू