म्हण

आनंद कांबीकर's picture
आनंद कांबीकर in जनातलं, मनातलं
6 Dec 2015 - 1:18 am

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साहेबांचा पुढचा पुर्ण आठवडा धावपळीतच गेलेला. कसली कसली उदघाटनं, सत्कार समारंभ, मिरवणुका. नुसती पळापळ. आता आख्ख पोलिस खातं त्यांच्या हातात आलेलं म्हटल्यावर या गोष्टी कायम असनारच. पण पुढच्या पाच वर्षाची गणितं मांडुन त्यांना ते खातं त्यांच्याच पध्दतीनं चालवायचं होतं. मागच्या मंत्री साहेबांनी पाडलेले वळणं बुजवुन त्यांना ती नव्यानं टाकायची होती. त्यासाठी संध्याकाळी त्यांनी पत्रकार परिषद आयोजीत केलेली. राज्यातल्या सर्व प्रमुख वृत्तपत्र तसेच वृत्तवाहिन्यांचे पत्रकार साहेबांच्या बंगल्यावर जमा झाले.
साहेब पत्रकारांसमोर बोलायला उभे राहिले तेव्हा त्यांना शाळेतले मसलेकर गुरूजी आठवले. चौथीत असताना एकदा गुरूजी म्हणी शिकवत होते. सात आठ म्हणी शिकवुन झाल्यावर इयत्ता चौथीत शिकनारे चुनचुनित साहेब उभा राहिले.
"म्हण मजी काय ओ गुरूजी?" साहेब.
"म्हण म्हणजे शब्दसमुह. वर वर पाहता ते फ़क्त शब्दच असतात पण मागे एक अर्थ दडलेला असतो आणि तो अर्थ फ़क्त जानकारांनाच समजतो. म्हणुन शहाणी मानसं कमी बोलतात आणि बोलताना नेहमी म्हणींचा उपयोग करतात" गुरूजी सांगत होते आणि साहेब शांतपणे ऐकत होते. गुरूजी पुढे म्हणाले:
"थोडक्यात सांगायचे झाले तर, म्हणीचे दाखवायचे वेगळे आणि खायचे दात वेगळे असतात. "
चुनचुनित साहेब तेवढीच शाळा शिकले पण तो तास त्यांच्या कायम धेनात राहिला. इयत्ता चौथीपासून ते इथपर्यंत ते 'म्हणी'प्रमानेच वागले. आजही त्यांनी "लकड़ी शिवाय मकड़ी वठनिवर येत नाही. पोलिस खाते हाताशी धरून पुढच्या सहा महिन्यात मी राज्यातील सर्व अवैध धंदे बंद करणार आहे" एवढेच बोलुन परिषद संपवली.
पण परिणाम बरोबर साधला. साहेबांचे शब्द सर्व वृत्तपत्रांच्या आणि वाहिन्यांच्या टेबलावर जाऊन आदळले. तिथून थेट वेशितल्या वडाखाली, मारुतिच्या पारावार, टपरिवर, बसस्टेंडवरच्या हाटेलित नुसते घुमत राहिले. सगळ्यांची हवा टाईट झाली. मटका अड्डे ओस पडले, मावा विक्री थांबली, पत्ता क्लब बंद पडले, हातभट्टीची भट्टी विजली, वाळुचे ट्रक गुडुप झाले. पोलिस हप्ते घेइनात तेव्हा त्यांच्या पगारी वाढल्या असा समज करुण घेत ज्यांनी धंदे चालु ठेवले त्यांच्यावर धाडी पडल्या, लाठ्या पडल्या, जेलची वारी घडली. जिकडे तिकडे पोलिसांच्या गाड्या फिरू लागल्या. महिनाभरात सगळया अवैधवाल्यांचे धाबे दनानाले. पोलिसांची त्यांच्यावर चांगलीच दहशत बसली.
भाऊ म्हणजे झामनीचे प्रसिध्द व्यक्तिमत्व. पन्नाशीतले पण गड़ी एकदम पैलवान, त्यांचा अवैध वाळु विक्रीचा धंदा. भाऊंचा मागचा पुर्ण महीना धवपळीतच गेलेला. एकुलत्या एक लेकीचे लग्न. भाऊंनी पस्तिस लाख आणि दहा तोळे सोन्यात चांगला सोन्यासारखा जावई मिळावला होता. शांत डोक्याने त्यांनी आपले दोन्ही ट्रक मळयात उभा केलेले. त्यांना कसल्याच प्रकारचे विघ्न नको होते. पोरगी येतीजातिला येऊन गेली आणि मग त्यांनी आपला मोर्चा धंद्याकडे वळवला. सुरुवातीला त्यांनी पंचक्रोशितल्या सर्वच दोन नंबर धंद्यावाल्यांना घरी बोलावाले आणि मगच आपली स्कॉर्पीओ गावाबाहेर काढली. त्यांनी सोबत फ़क्त काच्चुन भरलेल्या दोन थैल्या आणि चौथीपर्यंतच्या शिक्षणाची शिदोरी घेतली. चौथीतल्या म्हणन्या ऐवजी फ़क्त मसलेकर गुरुजींच्या त्या एका तासाची म्हणणे योग्य होईल. त्या तासाला मसलेकर गुरूजी म्हणी शिकवत होते तेव्हां कुठल्यातरी एका शेकड्या पोराने गुरुजींना 'म्हण' चा अर्थ विचारला. गुरुजींनी म्हण म्हणजे 'खायचे वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे' असे सांगितले. वरतुन शहानी माणसे 'म्हणी' सारखेच बोलतात, आपल्याला ते ओळखता यायला हवे असेही सांगितले. याचाच विचार करत भाऊ बंगल्यावर पोहचले, तेव्हां मंत्री साहेब पुजा करत होते. भाऊंनी थेट देवघरातच थैली नेउन मांडली. साहेबांचा खुललेला चेहरा पाहुन भाऊ म्हणाले:
"देवा, आमच्यावर कृपा असु दया! प्रसादाचि काळजी करु नका! तो वेळेवर चढवाला जाईल!"
त्यावर, मोठ्याने हसत मंत्रीसाहेब म्हणाले:
"देव बदलला आहे. पहिल्यापेक्षा जास्तच कृपा होईल पर असा थोडा थोडा प्रसाद आणुन देवाला नाराज करु नका"
भाऊ हसले, स्कोर्पीओ कड़े गेले आणि काच्चुन भरलेली दुसरी थैली साहेबांसमोर आणुन मांडली. साहेब खुश होऊन "तथास्तु" म्हणाले. भाऊ स्कोर्पीओ घेऊन गावांत आले.
काळीभंगार रात्र आणि तिला भगदाड पाडत निघालेली, वाळुने खच्चुन भरलेली भाऊंची ट्रक. झामनीच्या शिवारात दूसरे कुठलेच वाहन नव्हते.
"भौ नी लए फसकास काम केलं बॉस! सालं म्हैनाभर खायचे वांधे झालते!" ट्रक चा क्लीनर ड्रायवरला म्हणाला.
"अरं! हे तं कैच नै! भौ नी कालच् दोन वाळु काढाच्या बोटी बुक केल्यात. आपली तं चांदीच् है आता!" म्हणत ड्रायवरने ट्रकचे लाइटं अप्पर डिप्पर केले आणि समोरून येणाऱ्या मोटारसायकलला रोडच्या खाली घालत ट्रक तुफान पळवला.

कथासमाज

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

6 Dec 2015 - 3:45 am | उगा काहितरीच

आवडली "कथा" !

मितान's picture

6 Dec 2015 - 6:48 am | मितान

छान कथा.

जव्हेरगंज's picture

6 Dec 2015 - 10:05 am | जव्हेरगंज

ड्रायवरने ट्रकचे लाइटं अप्पर डिप्पर केले आणि समोरून येणाऱ्या मोटारसायकलला रोडच्या खाली घालत ट्रक तुफान पळवला.>>>>>>>
हे समजलं नाही. मोटरसायकल कोणाची होती?
बाकी छान.

आनंद कांबीकर's picture

6 Dec 2015 - 10:31 am | आनंद कांबीकर

ड्रायवरच्या डोक्यावर भाऊंचा हात आणि त्यांच्यावर मंत्रिसाहेबांचा म्हणून तो समोरून येणाऱ्या वाहनांना रोडच्या खाली घालत बेदरकारपने ट्रक चलावतो या अर्थाने. रात्री निघणाऱ्या अश्या ट्रकचा मोटरसायकलला जास्त त्रास होतो.

चांदणे संदीप's picture

6 Dec 2015 - 10:13 am | चांदणे संदीप

एक नंबर कथा! आवडेश!

Sandy

टवाळ कार्टा's picture

6 Dec 2015 - 12:52 pm | टवाळ कार्टा

चांगली आहे

दमामि's picture

6 Dec 2015 - 12:58 pm | दमामि

आवडली.

जातवेद's picture

6 Dec 2015 - 12:59 pm | जातवेद

...

आनंद कांबीकर's picture

7 Dec 2015 - 12:56 pm | आनंद कांबीकर

धन्यवाद

शलभ's picture

7 Dec 2015 - 8:36 pm | शलभ

मस्तच..आवडली.