"शोध": खूपसं कौतुक आणि मोजक्या तक्रारी

आदूबाळ's picture
आदूबाळ in जनातलं, मनातलं
21 Nov 2015 - 3:29 pm

इंग्रजीमध्ये "थ्रिलर" प्रकारच्या पुस्तकांचं बरंच समृद्ध कपाट आहे. डॅन ब्राऊन, मायकेल कॉनेली, जेम्स पॅटरसन वगैरे मंडळींच्या कृपेने. त्यात डॅन ब्राऊन कंठमणी शोभावा असा. कोणतातरी रहस्यभेद करायच्या ध्येयाने प्रेरित झालेला नायक, त्याला साथ देणारी नायिका, खलनायक किंवा खलनायकांची संघटना, नायकाला साथ देणारी चांगली माणसं / त्यांची संघटना, चोवीस ते छत्तीस तासांत घडणारं वेगवान कथानक असा थ्रिलर्सचा एकंदर ढाचा असतो. डॅन ब्राऊनने त्यात पुराणं, इतिहास, दंतकथा, गुप्त संघटना, कॉन्स्पिरसी थियरीजची जोड दिली, आणि द रेस्ट इज हिस्टरी.

मराठी थ्रिलर्सचा प्रांत तसा दुष्काळीच आहे[१]. पटकन आठवलेली थ्रिलर्स म्हणजे सुशिंच्या "दारा बुलंद" कथा. थोडं मागे जायचं तर डोक्याला पुष्कळ ताण देऊन आठवलेली नाथमाधवांची "रायक्लब उर्फ सोनेरी टोळी". नव्यापैकी नाहीच.

फेसबुकवर "शोध" या मुरलीधर खैरनार लिखित "डॅन ब्राऊन स्टाईल शिवकालीन मराठी थ्रिलर" विषयी वाचलं आणि उत्सुकता चाळवली.

a
(छायाचित्र सौजन्यः अ‍ॅमेझॉन)

"जगात गाजलेल्या कशाच्यातरी स्टाईल काहीतरी आता मराठीतसुद्धा!" वगैरे झैरात वाचली की उगाचच न्यूनगंडाची भावना येते. "च्यायला आम्ही काही नवीन बनवूच शकत नाही की काय!" वगैरे अडगे विचार डोक्यात येतात, आणि असं रुपांतरित/धर्मांतरित काहीतरी वाचायची इच्छा कमी होते.

अपवाद असतात. सरळसरळ रुपांतरित आहे हे दिसत असूनही गो० ना० दातारांचं "चतुर माधवराव" सुखद धक्का देऊन गेलं होतं. असंच होवो म्हणून सावधपणे कानोसा घेत होतो. फेसबुकवर "शोध"विषयी चांगलं वाचलं. वृत्तपत्रांतही. मग मागवलीच.

काही परीक्षणं इथे: मटा, दिव्य मराठी, सकाळ

शिवाजीराजांनी दोनदा सुरत लुटली. एकदा इ. स. १६६४ साली (शाहिस्तेखानाच्या स्वारीनंतर), आणि एकदा इ. स. १६७० साली (आग्र्याहून सुटकेनंतर). मोगली परचक्रांमुळे स्वराज्याची झालेली आर्थिक हानी भरून काढणे हा तात्कालिक हेतू दोन्ही स्वार्‍यांच्या मागे होता. पण महाराजांच्या मनातला दूरगामी आडाखा निराळाच होता. सुरत ही मुघल साम्राज्याची आर्थिक राजधानी खिळखिळी करण्याची महाराजांची योजना होती.

सुरतेची दुसरी लूट जास्त योजनाबद्ध होती. महाराजांच्या गुप्तहेर खात्याने पैशाचे स्रोत आणि सावकारांच्या/व्यापार्‍यांच्या धन दडवायच्या जागा हेरून ठेवल्या होत्या. अवघ्या तीन दिवसांत महाराजांनी सुरत साफसूफ केली, आणि हजारो बैलांवर लूट लादून स्वराज्याच्या दिशेने वाटचाल सुरू केली. पण वाटेत मोगली सैन्य पाठी लागलं, म्हणून महाराजांनी सैन्याचे तीन भाग केले. दोन भागांबरोबर लुटलेला खजिना स्वराज्याच्या दिशेने रवाना केला, आणि तिसरा भाग घेऊन मोगल सैन्याला तीन दिवस झुलवत ठेवलं. खजिन्याचे दोन भाग आता स्वराज्याकडे वेगवेगळ्या मार्गांनी वाटचाल करत होते. त्यातला एक स्वराज्यात पोचला, पण निम्म्याहून अधिक भाग नाशिक जिल्ह्यात कुठेतरी गडप झाला! तो घेऊन येणारं सैन्य कधी पोचलंच नाही. त्या खजिन्याचं काय झालं हे एक न उलगडलेलं रहस्य आहे[२].

हा झाला इतिहास. लेखक मुरलीधर खैरनारांनी त्यावर आपल्या कल्पनाशक्तीचा साज चढवला आहे. तो खजिना शोधणारे तीन वेगवेगळे गट, त्यांच्या गुप्त संघटना, वेगवेगळी ध्येयं, आणि त्यासाठी वाट्टेल त्या थराला जायला न कचरणारी पात्रं, असं खास डॅन ब्राऊनी पान जमवलं आहे.

या प्रकारच्या कादंबर्‍यांची भट्टी जमणं खरोखर कठीण गोष्ट आहे. फक्त उत्तम कल्पनाशक्ती असून भागत नाही. पहिलं म्हणजे इतिहासावर मजबूत पकड लागते. इथे बाहुबली किंवा हॅरी पॉटरसारखं स्वतंत्र विश्व उभारायचं नसून ज्ञात इतिहासाच्या कंगोर्‍यांत आपली कथा फिट्ट बसवायची असते. त्यामुळे इतिहास आणि कथानकाचा अचूक सांधा जुळवावा लागतो. कथानकात कच्चे दुवे राहणार नाहीत याची काळजी घ्यावी लागते, आणि काही अपरिहार्य कारणाने ते ठेवावे लागले तर कौशल्याने झाकता यावे लागतात. इतिहासाच्या मार्‍याखाली कथानक गुदमरू न द्यायची काळजी घ्यावी लागते. किचकट इतिहास वाचकाला सहज पटेल अशा पद्धतीने मांडावा लागतो.

इतक्या डगरींवर एकत्र पाय ठेवून मग वाचकाला कथानक "शक्यतेच्या कोटीतलं" (plausible) वाटायला पाहिजे. वाचकाचा "सस्पेंशन ऑफ डिसबिलीफ" जास्त ताणता कामा नये. (आयुष्यभर रेशनिंग ऑफिसात खर्डेघाशी करणारा कारकून थ्रिलरचा नायक झाल्यावर अचानक सिंघमसारखी मारामारी करतो हे वाचकाला कसं पटेल?) त्यातून थ्रिलर्सची कथानकं वेगवान असतात. त्या चोवीस/छत्तीस/बहात्तर तासांच्या काळात पात्रं खोलवर रंगवता येत नाहीत. बर्‍याच प्रमाणावर सरसकटीकरण / क्लीशेकरण करावं लागतं. त्याप्रकारात कोणाच्यातरी शेपटीवर पाय पडण्याची शक्यता असते.

आणि सगळ्यांत शेवटी "आपलं" - म्हणजे भारतीय / मराठी समाजवास्तव. या ना त्या कारणाने शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं राजकीय भांडवल केलं गेलेलं आहे. या द्रष्ट्या महापुरुषाचा काल्पनिक (अ)झेंडा खांद्यावर घेऊन परस्परद्वेषाचा बाजार मांडला जात आहे. या खातेर्‍यात पाय न घालता शिवकालावर कादंबरी लिहिणे हे मध्यरात्री लालमहालात घुसून शाहिस्तेखानाची बोटं तोडण्याइतकं अवघड असावं. ;)

खैरनारांना यातल्या बहुतांश गोष्टी झक्क जमल्या आहेत. इतिहास संशोधनाचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यासाठी त्यांना अनेकांचं सहाय्य झालं, आणि त्यांनी खुल्या दिलाने ते ऋण मान्य केलं आहे. ऋणनिर्देशामध्ये बॅटमॅन आणि बिपिन कार्यकर्ते या मिपाकरांचे आभार मानलेले सापडले, आणि भारी वाटलं!

इतिहास संशोधनाबरोबर एकविसाव्या शतकातल्या टेक्नॉलॉजीचाही (उदा० ग्राऊंड पेनिट्रेटिंग रडार) त्यांनी कथेच्या दृष्टीने व्यवस्थित अभ्यास केला आहे. त्यामागचं विज्ञानही ठिकठिकाणी लिहिलेलं आहे. कथानक हे तांत्रिकदृष्ट्याही निर्दोष व्हावं हा खैरनारांचा कटाक्ष खरोखर आवडला. "इतने पैसे में इतनाहिच मिलेगा" किंवा "मराठीत चालतंय थोडंफार उन्नीसबीस" अशी पडेल वृत्ती नाही याचं कौतुक!

कादंबरीत आवडलेली दुसरी गोष्ट म्हणजे परिसराचं तपशीलवार वर्णन. नाशिकच्या गल्लीबोळांचं वर्णन तर फार उत्तम जमलं आहे. (काही वर्षांपूर्वी कामानिमित्त नाशिकला जाणं होत असे, तेव्हा "नाशिक पाहून झालेलं आहे" असा माझा एक समज होता. "शोध" वाचून तो समज पोकळ होता हे लक्षात आलं!) नाशिक जिल्ह्यांतले आदिवासी पाडे, तिथलं समाजजीवनही कादंबरीत फार समर्पक रीतीने येतं. त्यात कुठेही "कसं दाखवलं आदिवासी समाजजीवन, यू पुणेमुंबै लोक्स!" असा अभिनिवेश नाही. कथेच्या ओघात ते येतं, किंबहुना कथानकाचा महत्त्वाचा भाग तिथे घडतो, त्यामुळे ते नैसर्गिकरीत्या आलं आहे.

कथानक वेगवान आहे. बहात्तर तासांत पाचशे पानांची संपूर्ण कादंबरी घडते. वेगावरची मांड कुठेही ढिली पडलेली नाही. "हिरोहिर्वीन जिंकनारैत" हा आडाखा अगोदरच बांधता आला, तरी "कसे जिंकणार" या उत्सुकतेने आपण पुढे वाचत राहतो. थरार कादंबरीभर टिकून राहिला आहे.

नाही म्हणायला【स्पॉयलर अलर्ट सुरु】रहस्य थोडं विसविशीत आहे - डॅन ब्राऊन स्टाईल उलटेपालटे धक्के नाहीत. हिरोचा व्हिलन आणि व्हिलनचा हिरो होत नाही. (आठवा: दा विंची कोड) (एक फार गुणाचं पात्र पुढे व्हिलन निघेल अशी मला शेवटपर्यंत आशा होती. पण असं काही झालं नाही.)【स्पॉयलर अलर्ट बंद】पण हा काही मोठा दोष नव्हे.

आणखी एक बारीकशी तक्रार संवादांच्या भाषेबद्दल. जवळपास सगळे संवाद प्रमाणभाषेत आहेत. आदिवासी पाड्यातल्या मनुष्याने प्रमाणभाषेत बोलणं पटत नाही. इतिहासाचा प्राध्यापक, पोलिस इन्स्पेक्टर, उद्योजक, सचिवालयातला अधिकारी हे सगळे एकाच, सपाट भाषेत बोलतील हे शक्य नाही. भाषेच्या, बोलण्याच्या बारकाव्यातून पात्र जास्त प्रभावीपणे रंगवता येतं. ते "थ्रीडी" होतं, प्रत्यक्ष हाडामासाच्या माणसाच्या जवळपास पोचतं. संवादांना प्रमाणभाषेत ठेवल्यामुळे लेखकाच्या भात्यातलं हे एक हत्यार निकामी पडलं आहे.

तसंच भाषाबाह्य संवादांचं (non-verbal communication). पुस्तक वाचताना वाचक आपल्या मनात ते पात्र रेखाटत असतो, तो प्रसंग पाहत असतो. पात्रांचं दिसणं, लकबी, सवयी वगैरेही त्या पात्राच्या "उभं राहण्यात" भर घालतात. मग कथानकाच्या दृष्टीने ते तपशील बिनकामाचे का असेनात. उदा० रॉबर्ट लँग्डन मिकी माऊसचं घड्याळ वापरतो, रॉन वीझलीला कोळ्यांचं भय वाटतं वगैरे. या बाबतीत "शोध" थोडं कमी पडतं.

याचं थोडं आश्चर्य वाटलं. पुस्तकापाठी दिलेल्या परिचयातून मुरलीधर खैरनार नाशिकमधल्या प्रायोगिक रंगभूमीवर कार्यरत आहेत, त्यांनी पन्नासहून अधिक एकांकिकांचं दिग्दर्शन केलं आहे वगैरे माहिती मिळाली. नाट्यक्षेत्रात मुरलेल्या लेखकाकडून जास्त अपेक्षा होत्या. असो.

आणि काही बारक्या शंका "थ्रिलर" हा वाङ्मयप्रकाराबद्दल मला नेहेमी असतात. माझा संशयी, चिकित्सक स्वभाव काही ठिकाणी "सस्पेन्शन ऑफ डिसबिलीफ"वर मात करतो, आणि नाही ते प्रश्न पडतात. उदा० चाकोरीबद्ध काम करणार्‍या नायकाला बहात्तर तासाची अचानक धावपळ कशी झेपते? रोमहर्षक पाठलागाच्या मध्ये अचानक शू लागली तर ती सिचुएशन कशी ह्यांडल करणार? वगैरे. पण ते जाऊदे.

काही असो, पूर्णांशाने बघता "शोध"ची जमेची बाजू नक्कीच जास्त जड आहे. अगदी नक्की, आवर्जून वाचण्यासारखी, संग्रही ठेवण्यासारखी ही कादंबरी आहे.

कादंबरीच्या शेवटी, रहस्य उकलताना दोन ठिकाणी लेखकाने मुद्दाम मोकळे धागे सोडले आहेत. ती बहुदा दोन सीक्वल्सची तयारी असावी. खैरनारांचा पूर्णवेळ व्यवसाय काय आहे माहीत नाही, पण मराठी कादंबर्‍या लिहिणे नक्की नसावा. पण त्यांना पुढच्या दोन कादंबर्या लिहिण्यासाठी सवड मिळो, आणि तीही लवकर, ही सदिच्छा!

[इतिहासाचा प्रचंड अभ्यास असलेले प्रचेतसही सध्या "शोध" वाचत आहेत. त्यांना या कादंबरीविषयी काय वाटतं याची मला खूप उत्सुकता होती, म्हणून "आपण एकत्र पुस्तक परिचय लिहू" अशी गळ घातली होती. पण सध्या त्यांच्यावर हपीसच्या कामाचा बोजा पडल्याने "शोध"चं वाचन अर्ध्यात अडकलं आहे. त्यांचं वाचून झालं की याच धाग्यात ते भर घालतील.]

----------------
[१]इंग्रजीमधली "भारतीय" थ्रिलर्स हा एक वेगळा उप-प्रांत आहे. अश्विन सांघीचं "द कृष्णा की" किंवा विकास स्वरूपचं "सिक्स सस्पेक्ट्स" वगैरे.

[२]लेखकाने शिवकालातल्या तीन रहस्यांचा उल्लेख केला आहे. सुरतेची लूट हे त्यातलं एक. इतर दोन रहस्यं म्हणजे
(१) आग्र्याहून सुटका करवून घेऊन महाराज कोणत्या मार्गाने स्वराज्यात परतले?
(२) शिवाजी महाराजांचा मृत्यू हा घातपाताचा प्रकार होता का?

वाङ्मयआस्वाद

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

21 Nov 2015 - 3:43 pm | सस्नेह

मस्त पुस्तक-परिचय !
आवडेल वाचायला .

पुस्तक मिळाल आहे.वाचायला वेळ नाही मिळाला.आता वाचतो..

बाकी लेख आवडला.

प्रचेतस's picture

21 Nov 2015 - 4:02 pm | प्रचेतस

उत्कृष्ट परिचय.

'शोध' उत्तम कादंबरी आहे. अगदी पहिल्या पानापासूनच कादंबरीत गुंतायला होते. त्यात नाशिक परिसर आणि तिथल्या किल्ल्यांची इत्यंभूत माहिती. ही माहितीसुद्धा कथेच्या ओघाओघातच येते. कुठेही भौगोलिक रूक्ष वर्णन जाणवत नाही हा ह्या कादंबरीचा विशेष. नासिकच्या उत्तरेकडची अजिंठा-सातमाळा आणि सेलबारी डोलबारी रांग ह्या प्रदेशात हे कथानक मुख्यतः घडते. हा सगळा परिसर थोडाफार माहित असल्याने कथानक थेट मनाला भिडते.
अजून पुस्तकात अर्ध्यावरच अडकलोय पण पुस्तक भयानक आवडतंय. वाचून झाले की अधिक काही लिहिनंच.

बाकी मराठी थ्रिलर्सचा विचार करता सुशिंच्या कथा आहेतच, ह्याशिवाय वसंत लिमये यांची 'लॉक ग्रिफिन' ही एक कादंबरी आठवते. बाकी फारश्या अशा नाहीतच.

संदीप डांगे's picture

21 Nov 2015 - 4:06 pm | संदीप डांगे

पुस्तकं वाचायचं आहे. चांगले परिक्षण आहे.

फार छान परिचय करून दिलात 'शोध' चा. कादंबरी वाचण्याची उत्सुकता अजूनच वाढली आहे.

तुषार काळभोर's picture

21 Nov 2015 - 4:23 pm | तुषार काळभोर

मी तीन महिन्यापूर्वी वाचली ही.सर्व मुद्द्यांशी सहमत. शेवट किंचित लांबलेला वाटला. शेवटाची ३०-४० पाने कमी असायला हवी होती असं उगाच वाटतंय.
विशेष कौतुकः भूगोल व सद्यकालीन आधुनिक तंत्रज्ञानाचा अभ्यास व त्या अभ्यासाचं चपखल अ‍ॅप्लिकेशन. (खजिन्याच्या जडपणामुळे ३००+ वर्षात काय बदल झाला असेल, याचाही विचार केलाय).

बोका-ए-आझम's picture

21 Nov 2015 - 4:32 pm | बोका-ए-आझम

वाचायला हवं. इंग्रजीत केन फाॅलेटने अशा प्रकारचं लिखाण केलळं आहे. मराठीत थ्रिलर्स दुर्मिळ, त्यात परत ऐतिहासिक थ्रिलर म्हणजे गुलबकावलीचं फूल. वाचणार! धन्यवाद आदूबाळ!

प्रचेतस's picture

21 Nov 2015 - 4:34 pm | प्रचेतस

केन फॉलेटपेक्षाही हे लिखाण डॅन ब्राऊनशी खूपच जवळीक साधतं. तरीही अस्सल मराठी वाटत राहतं.

सतिश गावडे's picture

21 Nov 2015 - 4:43 pm | सतिश गावडे

प्रचेतसजी, तुमचं वाचून झालं की मला दयाल का वाचायला ही कादंबरी?

परिक्षण छान जमलंय. त्या "दारा बुलंद" कथांच्या उल्लेखामुळे कितीतरी वर्षांनी "सलोनी"ची आठवण आली. :)

प्रचेतस's picture

21 Nov 2015 - 4:47 pm | प्रचेतस

आनंदाने देऊ.
पण तुम्ही हल्ली फिक्शन वाचणं बंद केलंय ना?

सतिश गावडे's picture

21 Nov 2015 - 5:02 pm | सतिश गावडे

आदूबाळने इतकं भारी परिक्षण लिहिलं आहे की ही कादंबरी वाचण्याची उत्कट ईच्छा झाली आहे. :)

बोका-ए-आझम's picture

21 Nov 2015 - 8:50 pm | बोका-ए-आझम

अशा प्रकारची ही पहिलीच कादंबरी असेल मराठीमध्ये!

स्वाती दिनेश's picture

21 Nov 2015 - 4:39 pm | स्वाती दिनेश

आवडली. पुस्तक वाचायला आवडेल.
स्वाती

चांगला उत्कंठावर्धक पुस्तक परिचय.

भारती समाजाची मानसिक वाटचाल: दहा खंड होतील.
लहान मुल धावत पुढे गेलं तर दोन रपाटे घालून आया मागे ओढतात.पुढे थ्रिलर वगैरे राहू द्या.
बॅटमॅन आणि बिका लय भारी.

मृत्युन्जय's picture

21 Nov 2015 - 5:36 pm | मृत्युन्जय

उत्तम परिचय.

प्णः

नाही म्हणायला रहस्य थोडं विसविशीत आहे - डॅन ब्राऊन स्टाईल उलटेपालटे धक्के नाहीत. हिरोचा व्हिलन आणि व्हिलनचा हिरो होत नाही. (आठवा: दा विंची कोड) (एक फार गुणाचं पात्र पुढे व्हिलन निघेल अशी मला शेवटपर्यंत आशा होती. पण असं काही झालं नाही.) पण हा काही मोठा दोष नव्हे.

हा परिच्छेद घात करुन गेला. आता मी जेव्हा हे पुस्तक वाचेन तेव्हा "ते" पात्र मला लगेच कळेल आणि मग माझ्या डोक्यात जर असा विचार घोळायला लागला की "हा कदाचित खलनायक असु शकतो बरं का" तर मी तो डोक्यातुन लगेच काढुन टाकेन. थोडक्यात थ्रिलर मधला संशयाचा फॅक्टर तुमाच्या या परीक्षणच्या वाचकाच्या डोक्यातुन निघुन जातो. त्यामुळे हा परिच्छेद काढुन टाकावा अशी सूचना करेन.

बाकी इतक्यातच हे पुस्तक घेतले आहे. सध्या हिटलिस्टवर नाही. २ एक महिन्यांनी वाचेन कदाचित.

पॉईंट आहे. पांढरा ठसा टाकतो.

पांढरा ठसा टाकलात पण वरच्या प्रतिसादात ते तसेच आहे. ते पण संपादित व्हायला हवं.

त्यांच्या प्रतिसादात ढवळाढवळ करायची आम्हाला पावर नाय.

परिकथेतील राजकुमार's picture

21 Nov 2015 - 5:48 pm | परिकथेतील राजकुमार

मोजक्या शब्दात पुस्तकाचा आराखडाच समोर उभा केलात. वेळ मिळाल्यास नक्की वाचेन हे पुस्तक.

बाकी, येवढ्या चांगल्या मेहनतीने पुस्तक तयार केले असता त्यात बिका आणि बॅट्याची नावे घालून अपशकून का करून घेतला असावा हा प्रश्न पडला होता. पण तेवढ्यात घराखाली लावलेल्या एका दुचाकीकडे लक्ष गेले आणि लिंबू-मिर्ची दिसताच उलगडा झाला.

पैसा's picture

21 Nov 2015 - 7:40 pm | पैसा

वाचायच्या यादीत टाकते. आग्र्याहून सुटकेवर असेच थ्रिलर लिहून लोकप्रिय होऊ शकेल, मात्र शिवाजी महाराजांचा मृत्यू या विषयावर असे काही थ्रिलर लिहिणे हे आत्मघाताचा सर्वात जवळचा मार्ग ठरू शकेल.

चाणक्य's picture

21 Nov 2015 - 8:31 pm | चाणक्य

जोरदार पुस्तक परिचय. नक्की वाचेन.

पद्मावति's picture

21 Nov 2015 - 10:10 pm | पद्मावति

खूपच छान ओळख.
पुस्तक नक्कीच वाचीन.

मांत्रिक's picture

22 Nov 2015 - 11:08 am | मांत्रिक

आदुबाळ साहेब परीक्षण तर झक्कासच आहे. पण जरासं त्रोटक वाटलं.
लेखन कसं असावं किंवा लेखन करताना कोणती काळजी घ्यावी लागते हा विषय एका शास्त्राच्या स्वरुपात देखील छान मांडलाय तुम्ही.

प्रतिक्रिया वाचतानासुद्धा जीव मुठीत धरून वाचत होतो....कुणी चुकून रहस्य सांगणारा प्रतिसाद दिला असला तर वाचल्यावरच कळलं असतं...

परीक्षण फारच सुंदर!!
धन्यवाद!

खेडूत's picture

22 Nov 2015 - 12:37 pm | खेडूत

पुस्तक परिचय आवडला.
आता मिळवून वाचणार...

नाव आडनाव's picture

22 Nov 2015 - 12:53 pm | नाव आडनाव

परिक्षण चांगलं लिहिलंय.

मुक्त विहारि's picture

22 Nov 2015 - 5:14 pm | मुक्त विहारि

पुस्तक नक्कीच वाचणार....

अभिजीत अवलिया's picture

22 Nov 2015 - 6:45 pm | अभिजीत अवलिया

उत्तम परिचय. नक्कीच वाचणार.

मारवा's picture

22 Nov 2015 - 7:08 pm | मारवा

नक्कीच वाचणार म्हणजे वाचणारच.

भाऊंचे भाऊ's picture

22 Nov 2015 - 9:10 pm | भाऊंचे भाऊ

नक्किच वाचणार. बॅट्मॅन अन बिकांच्या उल्लेखाने अजुन रोचकता निर्माण झाली आहे. लुकिंग फारवड टु रीड इट.

अभ्या..'s picture

22 Nov 2015 - 10:33 pm | अभ्या..

मी पुस्तकावर बॅट्या आणी बिकांची सही घेऊन मगच वाचणारे.
परीक्षण आवडले. कव्हर डिझाईन पण आवडले. प्रिंट क्वालिटी जरा सुपिरिअर हवी होती.

प्रिंट क्वालिटी उत्कृष्टच आहे. इथे डकवलेल्या चित्राला रिझोल्युशनचा काहीतरी प्रॉब्लेम झाला असावा.
आतमधली छपाई पण उत्तम आणि राजहंसच्या दर्जाला साजेशीच.

डॅन ब्राउनची सुरवातीची सगळी पुस्तके वाचली आहेत. त्यामुळे ह्या पुस्तकाबद्दलची उत्सुकता वाढली आहे. ऑनलाईन उपलब्ध असेल तर घेण्याचा विचार करता येईल. सखोल परिक्षणाबद्दल धन्यवाद!

कवितानागेश's picture

23 Nov 2015 - 12:00 am | कवितानागेश

मस्त ओळख. नक्की वाचणार

नाखु's picture

23 Nov 2015 - 9:28 am | नाखु

चांगला परिचय करून दिलाय.

वाचनालयीन नाखु

सिरुसेरि's picture

23 Nov 2015 - 10:22 am | सिरुसेरि

छान परिचय .
--"मराठी थ्रिलर्सचा प्रांत तसा दुष्काळीच आहे[१]. पटकन आठवलेली थ्रिलर्स म्हणजे सुशिंच्या "दारा बुलंद" कथा. थोडं मागे जायचं तर डोक्याला पुष्कळ ताण देऊन आठवलेली नाथमाधवांची "रायक्लब उर्फ सोनेरी टोळी"---
-- यांमध्ये अजुन आठवणारी नावे म्हणजे - भा. रा. भागवत यांनी लिहिलेली "भुताळी जहाज" आणि "ब्रम्हदेशातला खजिना" . या कथा अनुवादित नसुन स्वतंत्र लिखाण आहे . तसेच , गो. नी. दांडेकर लिखित - "रुमाली रहस्य" . या कथांचा मुख्य वाचकवर्ग जरी कुमारवयीन असला , तरी या कथा इतरांनांही आवडल्या आहेत .

विशाखा पाटील's picture

23 Nov 2015 - 11:18 am | विशाखा पाटील

छान परिचय. मुरलीधर खैरनार कादंबरी लिहिताना फेसबुकवर 'शोध' या पानावर डायरीसारखी नोंद करत होते. त्या पोस्ट वाचून आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानने फेलोशिप दिलीये हे कळल्यापासून उत्सुकता वाढली. त्यात राजहंसचं पुस्तक. वाचण्याच्या यादीत आहे.

आतिवास's picture

23 Nov 2015 - 11:22 am | आतिवास

परिचय आवडला.

DEADPOOL's picture

25 Nov 2015 - 9:41 pm | DEADPOOL

मला या प्रकारातील दातारशास्त्री यांची पुस्तके आवडतात.

भानिम's picture

26 Nov 2015 - 3:32 am | भानिम

परिक्षण आवडले. वाचलंच पाहिजे.

प्रचेतस's picture

14 Dec 2015 - 9:36 am | प्रचेतस

'शोध' वाचून झाली. कादंबरी वाचन सुरु असतानाच खैरनारांचे दुःखद निधन झाले. कादंबरीचा पुढचा भाग अवश्य यावाच असे वाटत असताना लेखकाचे असे अकाली जाणे मराठी साहित्यासाठी दुर्दैवी आहे.

कादंबरी मला आवडली. क्लायमेक्स जरा लांबल्यासारखा वाटत असला तरी निर्दोष भौगोलिक वर्णनाने अगदी खुलून आलाय. कथा ज्या ठिकाणी घडते तो नाशिक आणि त्यापलीकडील अजिंठा सातमाळा रांगेचा परिसर बऱ्यापैकी परिचित असल्याने पुस्तकाशी चांगलेच रिलेट होता आले. लेखकाने कादंबरी लिहिताना इतिहास, भूगोल आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा अतिशय उत्तम अभ्यास केलाय हे ठायीठायी जाणवते.

जेपी's picture

12 Jan 2016 - 9:03 pm | जेपी

आवडल..
काय खटकल सांगता येत नाही पण मी फारतर पाचपैकी साडेतीन देईन.

कालच वाचून झालं. मस्त आहे. खूप आवडलं. ५-६ वर्षापुर्वी सप्तश्रुंग ते चांदवड ट्रेक केलेला. तो आठवला.
लेखकांनी शेवटी लिहीलय की ३ पात्रांची नावं खरी आहेत. ती कोणती?

जव्हेरगंज's picture

7 Jun 2016 - 6:31 pm | जव्हेरगंज

मस्त ओळख!

जव्हेरगंज's picture

7 Jun 2016 - 8:26 pm | जव्हेरगंज

कादंबरीची सुरुवात इथे वाचली!

जाम इंटरेस्टींग आहे!!!

बेकार तरुण's picture

28 Jun 2016 - 10:58 am | बेकार तरुण

मस्त परिक्षण. हे वाचुन पुस्तक घेतल आणी प्रचंड आवडलं.
आभारी आहे आदूबाळ, ओळख करुन दिल्याबद्दल.

समीरसूर's picture

28 Jun 2016 - 11:35 am | समीरसूर

अतिशय सुंदर ओळख! 'शोध'चं परीक्षण महाराष्ट्र टाईम्समध्ये साधारण वर्षभरापूर्वी आलं होतं तेव्हाच ही कादंबरी वाचण्याची जबर खुमखुमी आली होती पण अजून तरी योग्य आलेला नाहीये. पण वाचणार नक्कीच!

श्री. बेटमन आणि श्री. बिपीन कार्यकर्ते यांचं खास अभिनंदन! 'शोध' ही खूप नावाजलेली कादंबरी आहे असे ऐकून आहे. त्याकामी हातभार असणे ही खरंच कौतुकास्पद कामगिरी आहे.

खैरनारसाहेब गेले हे माहीत नव्हतं. खूप वाईट झालं. साहित्यविश्वाला त्यांची ओळख व्हायला नुकतीच सुरुवात झाली होती.

राजाभाउ's picture

28 Jun 2016 - 1:08 pm | राजाभाउ

पुस्तकाची ओळख करुन दिल्या बद्दल मनापासुन धन्यवाद, हा लेख वाचुन उत्सुकता ताणली आणि पुस्तक आणुन वाचलेच. मस्त आहे. डिटेलींग जबरदस्त केलय, वेग ही खुप छान राखला आहे. इतिहासाच्या कडेकडेने जात इतिहास आणि फ्रीकश्न याची मस्त गुंफण केली आहे.

मला न पटलेल्या/समजलेल्या एक दोन गोष्टी
१) खजिन्याची ढोबळ जागाच फक्त क्लु मधुन मिळते, आता नक्की जागा नायक/नायीकेला सापडते. पण असा अर्धवट क्लु महराजांसाठी सोडला असेल हे काय पटत नाही.
२) उध्दारक समाज त्यांचे काम आणि ती कागदपत्र यांचा फारच त्रोटक उल्लेख आला आहे. दुसर्या भागा साठी ते लटकत ठेवल असेल कदाचीत पण आता लेखकच गेले त्यामुळे ते आता समजायची शक्यता कमीच.

विजुभाऊ's picture

28 Jun 2016 - 3:40 pm | विजुभाऊ

स्वराज्यातले आणखी एक गूढ. संभाजी महाराज दिलेर खानाच्या कैदेत होते. महाराजानी त्यांचे सुटका कशी केली हे गुपीतच राहिले आहे.

एकदम छान पुस्तक करुन दिला आहे. पुस्तक एका दमात झपाटल्यासारखे वाचले.