आर्किटेक्ट बाप साईटवर कामात गुंग आहे. पदवीधर होऊन नुकतीच इंटर्नशिप संपलेल्या मोठ्या मुलीचा फोन येतो.
"बाबा, तुम्हाला आठवतंय का मी पुण्याच्या त्या मल्टीनॅशनल कंपनीत अॅप्लाय केलं होतं?"
"हो, हो," गवंड्याच्या हातातल्या ओळंब्याकडे काळजीपूर्वक लक्ष ठेवत बाबा, "त्याचं काय झालं?"
"बाबा, त्यांचं कॉल लेटर आलंय इंटरव्ह्यूसाठी, उघडून पाहिलं तर इंटरव्ह्यू उद्याच सकाळी आहे!"
"अरे वा! काँग्रॅट्स! पण बेटा आज तर मी दिवसभर साईटवर अडकलेलो असेन आणि आई तर उद्या रात्रीपर्यंत परत येणार नाहीये नागपूरहून! आज रात्री उशीरा निघुयात आपण दोघे?"
"नाही. तेच सांगायला फोन केला होता, काळजी करू नका, रात्रीचा प्रवास करून मी फ्रेश रहाणार नाही म्हणून मी आताच निघालेय बॅग आणि फाईल घेऊन, एशियाडमध्ये बसले आहे. संध्याकाळी काकाकडे पोहोचले की लगेच फोन करते. आईलाही कळवलंय. आणि काकालाही कल्पना दिलीय मी किती वाजता पोहोचेन त्याची."
आता गवंड्याकडचं लक्ष निघून पूर्णपणे फोनवर, "तू एकटी निघालीस! अगं तू एकटी कधी...."
"बा S बा S, रिलॅक्स! There is always a first time! Don't worry!"
बाबा विचार करते झाले......
************************
दोन वर्षांनंतरची गोष्टः
धाकटी कन्यका आता शिक्षणासाठी नाशिकहून पुण्यात.
एव्हाना काका पुण्याहून स्थलांतरित झाल्याने आणि ताई पुण्यातच पण तिच्या नव्या सासरी राहत असल्याने मैत्रिणींबरोबर शेअर्ड अपार्टमेंटमध्ये धाकटीच्या राहण्याची सोय लावून द्यायला आई-बाबा दोघेही आले होते.
तिच्या घरापासून कॉलेज लांब पडतं म्हणून नाशिकच्या घरातली तिची स्कूटी बाबांनी ट्रकने तिला पाठवली. ट्रकमध्ये ठेवण्याआधी पेट्रोल काढून घ्यावं लागलं.
ती स्कूटी पुण्याबाहेर भोसरीच्या जकातनाक्यावर उतरून घ्यायची होती, म्हणुन लेकीला फोन केला, "हे बघ, दुपारी साडेचारच्या सुमारास ती ट्रक स्कूटी उतरवेल. आता मी साईटवर जायला निघतो आहे, पण तिथे पोहोचलो की लगेच अनिलकाकाला फोन करेन," अनिलकाका बाबांचा आत्तेभाऊ, पौडला स्टेशनरीचं दुकान होतं त्याचं, "त्याला सांगतो तुझ्याबरोबर यायला, म्हणजे तो करेल ते जकात क्लिअर करणं वगैरे, आणि त्यालाच चालवू दे स्कूटी त्या गर्दीच्या मुंबई-पुणे रस्त्यावर. आणि हो, पेट्रोल टाकायची आठवण कर त्याला आधी."
"ओके बाबा."
नंतर कामाच्या धबडग्यात पाच केंव्हा वाजले ते बाबांना कळलंच नाही! अनिलला फोन करायचंही राहून गेलं होतं! फोन पाहिला तर दोन तासांपूर्वी धाकटीचा मिस्ड कॉल! त्यांनी घाई-घाईने लेकीला फोन केला. मोबाईल उचलला गेला पण प्रचंड ट्रॅफिकच्या आवाजात "एक मिनिट, गाडी बाजूला घेते" इत़कंच ऐकू आलं आणि फोन कट झाला.
दोनच मिनिटांत तिचा फोन आला.
"अगं, सो सॉरी बेटा! अनिलकाका भेटला का? माझं फोन करायचंच राहून गेलं...तुम्ही निघालात का?"
"बाबा, अहो, मलाही उशीर झाला लेक्चर्स संपता-संपता तीन वाजले, आणि मलाही जमलं नाही काकाला फोन करायला. तुम्हाला केला तर लाईन बिझी होती. त्याच्यापुढे काकाला फोन करून तो स्टोअर कुणावर सोपवून निघणार कधी आणि मी त्याला भेटून इथपर्यंत वेळेत पोहोचणार कधी? म्हणून मी तशीच सरळ रिक्शाने पोहोचले भोसरीला, स्कूटी ताब्यात घेतली, पेट्रोल भरलं आणि आता निघालेय, सिमला ऑफिसपर्यंत पोहोचले देखील!"
बाबांच्या गळ्यात आवंढा, "नीट चालव गं पिलू! आणि पोहोचलीस की फोन कर मला."
"हो, नक्की करते, बाबा. रिलॅक्स! Don't worry!"
**************
बाबा आज पुन्हा एकदा विचार करते झाले, कोष सोडून ही फुलपाखरं किती सहज मुक्त झाली! पंख जेधवा फुटतील तेंव्हा....
प्रतिक्रिया
20 Nov 2015 - 9:54 pm | पैसा
किती सुंदर लिहिलंत! खरंच कळत नाही, मुलं मोठी होऊन आत्मविश्वासाने आपले आपण कधी मॅनेज करायला लागतात! आपण काळजी करत बसतो उगीच! गाणंही खूप छान, समर्पक आहे अगदी.
20 Nov 2015 - 9:57 pm | कविता१९७८
छान लेखन, आवडले
20 Nov 2015 - 10:23 pm | स्रुजा
वाह ! सुरेख लिहिलंय.. बाबांना फोन केला तुमचा लेख वाचुन आणि मग आले प्रतिसाद द्यायला :)
20 Nov 2015 - 10:56 pm | आतिवास
खास 'बहुगुणी टच' असणारं लेखन.
आवडलं.
20 Nov 2015 - 11:16 pm | डॉ सुहास म्हात्रे
लेखन आवडलं ! पित्याचं काळीज, दुसरं काय ? :)
आईवडील म्हणून काळजी आणि ममत्व वाटणारच. पण त्या भावना म्हणजे सतत पंखाखाली ठेऊन पिलांना अवलंबित करणे व्हायला नको. किंबहुना, पक्षांसारखे मन घट्ट करून आपल्या पिलांना आपल्या नजरेखाली जरासा धक्का देऊन स्वतंत्र उडायला भाग पाडण्यानेच त्यांना मदत केल्यासारखे होईल... आणि वेळ आली की त्यांना हव्या त्या आकाशात स्वातंत्र्याने भरारी मारायला प्रोत्साहनच देणेच त्यांच्या भवितव्याची काऴजी घेतल्यासारखे होईल.
कवितेतल्या भावनांशी सहमत !
20 Nov 2015 - 11:45 pm | शिव कन्या
बाप लोकांची इतकी हळवी बाजू समोर येत नाही..... खूप सुरेख लिहीलेत!
मन हेलावले.
गाणे अर्थपूर्ण.
20 Nov 2015 - 11:59 pm | रातराणी
खूप सुंदर लिहले आहे!
21 Nov 2015 - 12:07 am | रेवती
लेखन आवडले.
21 Nov 2015 - 12:15 am | एस
मुलीच्या बाबतीत बाप जरा जास्तच हळवा होत असतो. हे हळवेपण फार छान उतरवलंय तुम्ही शब्दांमध्ये.
21 Nov 2015 - 12:43 am | यशोधरा
मस्त लिहिलंय.
माझ्या बाबाची आठवण झाली.
21 Nov 2015 - 8:07 am | मारवा
सुंदर असतात तुमचे लेख नेहमीच
आवडलं
21 Nov 2015 - 9:04 am | चतुरंग
आपल्याला वाटत असतं त्यापेक्षा मुलं प्रगल्भ असतात आणि व्यवहारी जगात वावरायला तयार झालेली असतात असं जाणवतं.
आपल्यातला बाप त्यांना अजून लहानच समजत असतो..
फारच सुरेख लेखन. कविताही अर्थगर्भ आहे.
किंचित अवांतर - कोणाची आहे कविता? कारण तिथे नाव आढळले नाही. गदिमा असावेत असा अंदाज.
21 Nov 2015 - 11:19 am | नाखु
माझ्यासाठी "बहुगुणी" गोळी ठरावी इतकी मस्त आहे.
कोष फुलपाखरु लेकीचा बाप नाखुस
21 Nov 2015 - 3:38 pm | बहुगुणी
चतुरंगः कवि मलाही गदिमाच वाटले, पण नक्की माहिती नाही. आवाज आणि संगीत सी. रामचंद्र यांचं असावं असा अंदाज.
21 Nov 2015 - 3:56 pm | पद्मावति
खूप सुंदर लिहिलंय.
...खरंय.
21 Nov 2015 - 6:39 pm | सस्नेह
बापाची लेक म्हणून भावलं आणि लेकाची आई म्हणूनपण !
21 Nov 2015 - 6:45 pm | स्मिता_१३
सुंदर !
21 Nov 2015 - 8:53 pm | स्वाती२
लेख आवडला!