स्पर्श.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
16 Nov 2015 - 8:09 am

“जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.”

आज प्रो.देसाई बरेच उदास दिसले.माझ्या आतापर्यंतच्या अनुभवावरून मी ताडलंय, की अशा परिस्थितीत जेव्हा मी त्यांना तळ्यावर भेटतो तेव्हा ते बराच वेळ माझ्याशी बोलत नाहीत.
आता इकडे शरद ऋतू चालू झाला आहे.झाडांची पानं रंगीबेरंगी व्ह्यायला लागली आहेत.प्रत्येक झाडांच्या पानांचा एक एक रंग पाहून निसर्गाच्या कुंचल्याची आणि त्याच्या रंग मिश्रणाच्या तबकडीची वाहवा करावी तेव्हडी थोडीच आहे असं वाटतं.
लवकरच ही रंगीबेरंगी पानं,येणार्‍या वार्‍याच्या झुळकीबरोबर,देठापासून तुटून खाली पडणार आहेत.सर्व झाडांच्या फांद्या नंग्या-बोडक्या होणार आहेत.थंडी जशी वाढत जाईल तशी वातावरणात एक प्रकारचा कूंदपणा येणार आहे.
खुपच थंडी पडली की मग आम्ही तळ्यावर फिरायला येत नाही.ह्या वयात तेव्हडी थंडी सोसत नाही.बरेच वेळा मग आम्ही दोघं घरीच भेटतो.

मीच भाऊसाहेबांशी विषय काढून त्यांना बोलकं केलं .
मी म्हणालो,
“भाऊसाहेब, इकडचा शरद ऋतू, निसर्गाला उदास करतो. झाडांची हिरवीगार पानं गेल्यानंतर झाडांकडे बघवत नाही.पक्षीपण दूर कुठेतरी निघून जातात. सर्व वातावरण सुनंसुनं दिसतं.म्हणून मी निसर्गच उदास झाला असं म्हणतो. आपणही काहीसे ह्या दिवसात उदासच असतो.बाहेरची कामं ठप्प होतात. कुठे जावंसं वाटत नाही.”

“खरं आहे तुमचं म्हणणं”
असं बोलून प्रो.देसायांनी आपलं मौन सोडलं.
आणि म्हणाले,
“मी बोललो नाही,कारण मी बराच वेळ ह्या शरद ऋतूवर विचार करीत होतो.माझ्या मनात एक कल्पना आली.आता पर्यंत ही झाडांची पानं हिरवी गार होती.वार्‍याच्या स्पर्शावर ती हलायची. आता हळू हळू वार्‍याचा वेगही वाढणार आहे. तो वार्‍याचा स्पर्श त्या पानाना सहन होणार नाही.ती पानं रंगीबेरंगी होत होत काही दिवसानी पडणार आहेत. म्हणूनच ह्या मोसमाला फॉल असं म्हणतात.तुम्हाला आठवत असेल कदाचीत,पण मला नक्कीच आठवतं मी लहानपणी कोकणात रात्रीच्या वेळी पिंपळाच्या झाडावरची पानं वार्‍याच्या स्पर्शाने सळसळली की घाबरायचो.तसं इथे पिंपळाचं झाड माझ्या पहाण्यात नाही. कदाचीत पिंपळाला इकडची थंडी सोसवली नसती.पण आता ह्या ऋतुत वारा एव्हडा सोसाट्याने वहाणार आहे की,पिंपळाचं झाड असतं तर वार्‍याच्या स्पर्शाने प्रचंड सळसळ ऐकायला मिळाली असती.”

मी म्हणालो,
“भाऊसाहेब,मला आठवतं,कोकणात आमच्या अगदी लहानपणी आमची आजी ,रात्री आम्ही लवकर झोपावं म्हणून आम्हाला थोपटत असताना पिंपळाच्या झाडाच्या पानांच्या सळसळीकडे आमचं लक्ष वेधून त्या शांत वातावरणातल्या गांभीर्याची भीती घालून म्हणायची,
“मुंजा पिंपळाचं झाड हलवतोय.लवकर झोपला नाहीत तर तो घरात येईल.”
खरं सांगायचं तर,त्या भीतीपेक्षा आजीच्या थोपटणार्‍या हाताच्या स्पर्शाने आम्हाला झोप यायची.”
“का कुणास ठाऊक,ह्या स्पर्शावरून माझ्या डोक्यात एक विचार सुचला.”
.

प्रोफेसर जरा मुड मधे येऊन मला सांगायला लागले.
“एखादं लहान मुल रडत असलं तर त्याला नुसता स्पर्श केल्यावर ते ताबडतोब रडायचं थांबतं.एखादी व्यक्ति अगदी शेवटच्या प्रवासात असताना, केलेला स्पर्श तिला किती सांन्तवन दे्तो?,किती दिलासा देतो?,एखाद्याशी नवीन नातं जुळवत असताना केलेला स्पर्श ते नातं अधिक खंबीर व्हायला किती उपयोगी होतं? हे मी अनुभवलं आहे.ह्या स्पर्शाची क्षमता मी जाणली आहे.
कुणालाही आपला हात पुढे करणं किंवा आलिंगन देणं आणि हलो किंवा गुडबाय म्हणणं ह्यावर माझा विश्वास आहे. एखादा जीवश्च-कंटश्च मित्र सोफ्यावर जवळ बसून आम्ही एकमेकाशी बोलत असताना त्याच्या खांद्याभोवती हात टाकून बसायला मला बरं वाटतं.रस्त्यावरून चालत असताना कुणी चुकून मला धक्का दिला तर “हरकत” नाही म्हणायला मला बरं वाटतं.”

मी भाऊसाहेबांना म्हणालो,
“मला नेहमीच असं वाटतं की स्पर्शाने आपण शाबूत रहातो.
मला असं नेहमीच वाटत असतं की दुसर्‍याशी स्पर्श झाल्याने ती व्यक्ती आपल्याशी व्यक्तीगत दुवा सांधते,आणि आपण त्या व्यक्तीबरोबर व्यक्तीगत दुवा सांधतो,मानवतेशी दुवा सांधला जातो.
मी पाहिलंय की,स्पर्शाने आपात स्थितीत काम करणार्‍या व्यक्तीना समाधान मिळतं.साधं हस्तांदोलन केल्याने एकमेकाशी विरोध करणार्‍या राजकारण्यात समझोत्याच्या सजीवतेची ठिणगी पडून अनेक वर्षाचे तंटे-बखेडे समाप्त होतात.”

माझं हे स्पर्शाबद्दलच मत ऐकून गप्प बसतील तर ते प्रो.देसाई कसे होतील.
मला म्हणाले,
“तुम्ही सांगता ते मला पटतंय.
मी पाहिलंय की स्पर्शाने माझ्याच स्वाभाविक बुद्धिमत्तेचा आणि माझ्या मेंदुतल्या तर्कसंगत हिशोबाचा दुवा सांधला जातो.माझ्या नजरेतून चुकलेलं नाही की,स्पर्शाने माझ्याच संवेदना जागृत होतात. ज्या मी पुर्णपणे हिरावून बसलो असं वाटून घेत असे.
माझी खात्री झाली आहे की,स्पर्शामुळे प्रत्येकात सुधारणा होते, प्रत्येकाच्या संबंधात सुधारणा होते,आणि सरतेशेवटी प्रत्येकाच्या भोवतालच्या जगात सुधारणा होते.
माझी खात्री झाली आहे की प्रत्येकाला जर का सकारात्मक स्पर्शाची जाणीव झाली तर,जाती-भेदाची, मुलांवर होणार्‍या अत्याचाराची,स्त्रीयांवर होणार्‍या अत्याचाराची आणि दुसर्‍यावर दोष ठेवण्याच्या संवयीची समाप्ती होईल.
स्पर्शाचा विचार केल्यावर माझ्या लक्षात येतं की,स्पर्श माणसाला त्याच्या मनात चांगलं वाटावं,वाईट वाटून घेऊ नये, अशी आठवण करून देतो. आत्मीयतेची भीति मनात असल्याने स्पर्श अनाथ असल्यासारखा आपल्या जीवनात भासतो.माझी खात्री आहे की “तू” आणि “मी” चं “आम्ही” त परिवर्तन करण्यात स्पर्शात ताकद आहे.”

विषय निघाला शरद ऋतूचा.वार्‍याच्या स्पर्शाचा.पिंपळाच्या पानांच्या सळसळीचा.असं होत होत स्पर्शावर चर्चा वाढत गेली.
काळोख बराच होत आला होता.बोलत बसलो तर हा विषय संपायला बराच वेळ जाईल.म्हणून मी आवरतं घेत म्हणालो,
“शेवटी मी एव्हडंच सांगीन की,जोपर्यंत आपण कुणाला कसा स्पर्श करावा आणि कसा स्पर्श करून घ्यावा हे शिकत नाही तोपर्यंत आपण आपल्यावर आणि एकमेकावर प्रेम कसं करावं हे शिकणार नाही.
माझा स्पर्शावर भरवंसा आहे.”
श्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)

राहणीलेख

प्रतिक्रिया

उगा काहितरीच's picture

16 Nov 2015 - 9:09 am | उगा काहितरीच

छान , सुंदर लेख !