पाश - कथा - भाग २

सिरुसेरि's picture
सिरुसेरि in जनातलं, मनातलं
15 Nov 2015 - 1:27 am

पाश - कथा - भाग १ --भाग १
पाश - कथा - भाग २
----------------------------
-- सदुला यायला अजुन निदान दीड तास तरी लागेल हे ऐकुन राजाभाउंना चांगलाच घाम फुटला .---

राजाभाउ संचित होऊन डोक्याला हात लावुन बसले. तेवढयात त्यांच्या कानावर एक अपरिचित घोगरा आवाज ऐकू आला .
" नमस्कार साहेब , या टुरिंग टॉकीजचे मालक आपणच आहात ना ? आपल्याशी थोडं कामाचं बोलायचं होतं "
राजाभाऊंनी चमकुन प्रश्नार्थक मुद्रेने मान वर करुन पाहिले . त्यांच्यासमोर एक डार्क शेडचा सुट, बुट , ओव्हरकोट आणि हॅट असा पुर्ण साहेबी पोषाख केलेला एक अनोळखी मनुष्य उभा होता . चेहरयावर खालपर्यंत ओढलेली हॅट आणि ओव्हरकोटाची चेहरयावर वरपर्यंत आलेली कॉलर यामुळे त्याचा चेहरा बराच झाकला गेला होता. पुर्ण दिसत नव्हता . त्याच्या हातात एक काळी सूटकेस होती . त्या माणसाने पुढे बोलायला सुरुवात केली . तो आपल्या येण्याचा उद्देश सांगु लागला .

"मी एका फिल्म प्रॉडक्शन कंपनीच्या नव्या फिल्मच्या वितरणासाठी काम करतो आहे . हि एक अ‍ॅक्शन फिल्म आहे . हि नवी फिल्म रिलीज करण्यापुर्वी एक सर्व्हे म्हणुन आम्ही काहि ठराविक शहरी, निमशहरी आणि ग्रामिण भागांमध्ये एक , दोन खेळ मोफत दाखविणार आहोत. त्यामुळे चित्रपटामध्ये काही सुधारणा आवश्यक आहेत का याचा लोकांच्या प्रतिक्रियांमधुन आम्हाला आधीच अंदाज येईल आणि आम्ही त्याप्रमाणे शक्य ते बदल करु शकू.
मी याबद्दलच तुमच्याशी बोलायला आलो होतो . आत्ताच मला बाहेर समजलं की तुमचा रात्रीच्या खेळाची फिल्म घेउन येणारा माणुस ट्रॅफीकजाममध्ये अडकला आहे .त्याला किमान दिड तास तरी लागणार आहे . तुम्ही हवं असेल तर तोपर्यंत आमची फिल्म दाखवु शकता .म्हणजे तुमचा माणुस येईपर्यंत पब्लिक गुंतून राहिल . एकदा तुमचा माणुस आला की तुम्ही तुमचा मुख्य शो चालु करा . आमचाही सर्व्हे या निमित्ताने होऊन जाईल ."

एवढे बोलुन त्या माणसाने आपल्या काळ्या सूटकेसमधुन त्या फिल्मची रिळे , त्याच्या प्रॉडक्शन कंपनीचे , त्या फिल्मचे माहितीपत्रक आणी दोन , चार फोटो काढले . हे सर्व त्याने राजाभाऊंसमोर ठेवले .

राजाभाऊंनी त्या माहितीपत्रकांवर एक नजर टाकली . ती फिल्म म्हणजे एक टिपीकल अ‍ॅक्शनपट दिसत होता . त्यांनी यावर एक , दोन मिनीटे विचार केला . त्या माणसाच्या काही अटीही दिसत नव्हता . आणि राजाभाऊंनाही आता अशा मदतीची गरज होतीच . निदान दिड तास तरी . तेव्हा त्यांनी हा प्रस्ताव लगेच मान्य केला . ते त्वरेने उठुन तंबुमध्ये गेले .त्यांनी प्रेक्षकांना झाल्या प्रकाराची कल्पना दिली .

" आत्ताच्या खेळाची फिल्म घेउन येणारा आमचा माणुस ट्रॅफीकजाममध्ये अडकला आहे .त्याला किमान दिड तास तरी लागणार आहे . तुमच्या मनोरंजनासाठी तोपर्यंत आम्ही एक दुसरा चित्रपट दाखवत आहोत. आमचा माणुस आला कि लगेच आम्ही मेन फिल्म चालु करु . तरी सर्वांनी कृपया सहकार्य करावे हि विनंती."

एकाच तिकिटात दोन खेळ बघायला मिळणार म्हणल्यावर बहुतांशी प्रेक्षक खुश झाले . आणी थोडे शांतही झाले .
राजाभाऊंच्या मदतनीसांनी फार वेळ न घालविता तो चित्रपट चालु केला . प्रेक्षक कुतुहलाने तो चित्रपट पाहु लागले .

चित्रपटाच्या वेगवान , थरारक कथेने आणि उत्कॄष्ट चित्रीकरणाने पाच , दहा मिनीटातच प्रेक्षकांच्या मनाची पकड घेतली . हजारो वर्षांपुर्वी अनेक डोंगर दरयांनी आणी घनदाट जंगलांनी वेढलेल्या दुर्गम प्रदेशात वसलेली एक संस्कॄती . काळाच्या ओघात हि संस्कॄती गडप होते व उरतात ते फक्त तिचे अवशेष . या घनदाट जंगलांमध्येच एका अज्ञात ठिकाणी दडलेला प्राचीन , मौल्यवान खजिना . त्या दुर्गम ठिकाणी या खजिन्याच्या शोधात गेलेले आणि आपले प्राण गमावलेले अनेक परकिय राजे , महाराजे , सरदार , सैन्य , आक्रमक ,चोर , लुटारु टोळ्या आणी इतिहास संशोधक .

हे खजिन्याचे ठिकाण हे केवळ त्या संस्कॄतीचा एकनिष्ठ भाग असलेल्या राजपुरोहिताच्या वारसदारालाच माहित असते. हे रहस्य शतकानु शतके ,पिढया न पिढया राजपुरोहिताच्या एका वंशाकडुन पुढील वंशाला सांगितले गेले असते. या निष्ठावान वंशाकडुन प्राणपणाने हे रहस्य जपले गेले असते .

पाच धाडसी तरुण या खजिन्याच्या शोधात निघतात . जिवावर खेळुन ,अनेक संकटांना धैर्याने तोंड देत ते डोंगर दरयांना आणी घनदाट जंगलांना पार करतात .पर्वतराजींमधील अजस्त्र साप , महाकाय जंगली हिंस्त्र श्वापदे , नरभक्षक रानटी टोळ्या अशा आव्हानांचा ते शौर्याने , एकजुटीने मुकाबला करतात . या धामधुमीमध्ये त्यांच्यातील एकाचा बळी जातो.

अखेर बाकीचे चार तरुण एका काळोख्या गुहेच्या तोंडाशी त्या राजपुरोहिताला घेरतात . आजपर्यंत प्राणपणाने जपलेले रहस्य उघड होणार या भीतीने राजपुरोहित काळजीत पडतो . अखेरचा उपाय म्हणुन तो आकाशाकडे हात करुन आपल्या प्राचिन भाषेमध्ये काही अगम्य गुढ मंत्र उच्चारु लागतो . ते मंत्र म्हणजे निसर्गात असलेल्या सुप्त शक्तींना केलेले आवाहन असते .मंत्रांच्या सामर्थ्यामुळे या सुप्त शक्ती जागॄत होतात . अचानक आकाशामध्ये ढगांची दाटी होते . जोरदार वारा वाहु लागतो . पाऊस पडु लागतो . विजा कोसळु लागतात .

तंबुतले प्रेक्षक डोळे फाडफाडुन , रंगुन हा प्रसंग बघत होते . अचानक एका प्रेक्षकाला हातावर टपकन काहितरी पडल्याचे जाणवले . तो एक पाण्याचा थेंब होता . त्याने चमकुन वर आकाशाकडे पाहिले . तर आकाशामध्ये ढगांची दाटी झाली होती. बारिक पाऊस पडु लागला होता . आता सर्वांनाच पावसाची जाणीव झाली .सभोवताली जोरदार वारा वाहु लागला . त्यातच भरीला विजांचा गडगडाट चालु झाला . आता प्रेक्षकांमध्ये एकच गडबड ऊडाली . जणु सिनेमाच्या पडद्यातले जग आणि पडद्याबाहेरचे जग यांतला फरकच नाहिसा झाला होता . जसजसा पडद्यावर मंत्रोच्चारांचा जोर वाढत गेला तसतसा पडद्यावर आणि पडद्याबाहेर विजांचा गडगडाट वाढु लागला . पावसाच्या भरीला तंबुवर विजाही कोसळु लागल्या . तंबुच्या कापडी भिंतींवर विजा पडल्याने तंबुला चारही बाजुने आग लागली .

आगीच्या ज्वाळा यमदुताच्या मॄत्युपाशाप्रमाणे चारही बाजुंनी प्रेक्षकांच्या अंगावर येऊ लागल्या. ज्यांचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती अशांनी धावाधाव करुन तंबुतुन सुटका करुन घेतली आणी आपले आणी शक्य होईल तेवढ्या इतरांचे प्राण वाचवले . बरीच लोकं तंबुबाहेर जमली .

राजाभाऊंना हा सर्व प्रकार बघुन धक्काच बसला होता. तंबुबाहेर पडुन तेही ईतरांना मदत करीत होते . अचानक दुरवर एका झाडाखाली त्यांना तो काळा सुट ,हॅट घातलेला माणुस दिसला . त्या माणसाच्या फिल्मनेच हि गडबड केली होती. राजाभाऊंनी आपल्या मदतनीसांना आणी जमलेल्या लोकांना जोराने ओरडुन या प्रकाराची कल्पना दिली .
"त्या हॅटवाल्याला पकडा . त्यानेच हि भानगडबाज फिल्म दिली होती ."

चिडलेला जमाव त्या हॅटवाल्याच्या दिशेने धावत गेला . सर्वांनी मिळुन त्याला पकडले आणी बेदम चोप दिला .
" काय रे , आमच्याशी अय्यारी करतोस काय ? " , " लोकांच्या जीवाशी खेळतोस काय रे ? "
असे बोलत जमाव त्या हॅटवाल्याला तंबुपाशी घेउन आला . तंबुमध्ये आग अजुनही धडधडत होती .

"अरे बघता काय , या हॅटवाल्याला शिक्षा झालीच पाहिजे . ढकला त्याला आतमध्ये ." काहिजण ओरडले .
चिडलेल्या लोकांनी हॅटवाल्याला तंबुमध्ये ढकलुन दिले . आग खुप वेळ धडधडत राहिली . धुमसत राहिली .

----- दोन महिन्यांनंतर --------

राजस्थानमधील जेसलमेर जवळचे वाळवंटात वसलेले एक लहानसे खेडेगाव . संध्याकाळची वेळ होऊन गेली होती. हळुहळु अंधार पडु लागला होता . या छोट्याशा खेड्यातील गावकरी आज खुशीत होते . त्यांच्या रोजच्या रुक्ष , वाळवंटी जीवनात आज थोडे विरंगुळ्याचे क्षण फुलले होते . आज संध्याकाळी सहा वाजता गावामध्ये एक सुट , बुट , हॅट घातलेला साहेब शहरामधुन आला होता . त्याने गावातील चौकामध्ये एक मोठा पडदा उभारला होता . आज रात्री तो सर्व गावकरयांना मोफत सिनेमा दाखवणार होता . गावातील सर्वजण मोठ्या आतुरतेने रात्रीची वाट बघत होते .

--------------- समाप्त ----------- काल्पनिक ---------------------------------

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

एस's picture

15 Nov 2015 - 2:02 am | एस

छान कथा आहे. आवडली!

पद्मावति's picture

15 Nov 2015 - 2:59 am | पद्मावति

मस्तं. आवडली कथा.

सस्नेह's picture

15 Nov 2015 - 4:52 pm | सस्नेह

रोचक कथा ! भयकथा .

पैसा's picture

15 Nov 2015 - 5:43 pm | पैसा

तो आत्मा असेल तर मार कसा खातो?

DEADPOOL's picture

15 Nov 2015 - 8:15 pm | DEADPOOL

अतिशय वेगळी भयकथा

मांत्रिक's picture

15 Nov 2015 - 8:18 pm | मांत्रिक

जबरदस्त!

एक एकटा एकटाच's picture

15 Nov 2015 - 9:29 pm | एक एकटा एकटाच

कथा नाही पोहचली.

खरतर तुमची सुरुवात चांगली झाली होती.
मध्येच त्या अज्ञात इसमाने ने सुरु केलेला सिनेमा
त्यांची रहस्य कथा एक चांगला प्लॉट गुंफ़ायला घेते.

पण............

कथा काहीतरी सॉल्लिड गेम करत असतानाच संपते

तो इसम कोण
त्या खाजिन्याच गुपीत काय
त्या टोपीवाल्याच नेमका काय उद्देश

हे प्रश्न तुमच्या कथेच्या अखेरीस अनुत्तरीतच रहातात.

कृपया राग नका मानू

पण तुमच्या ह्या कथेचा प्लॉट चांगलाय. अजुन फुलवता आली असती.
म्हणुन ही आगाऊ सुचना करतोय

चुकभुल द्यावी घ्यावी

पुढिल लिखाणास मनपुर्वक शुभेच्छा

सिरुसेरि's picture

16 Nov 2015 - 9:20 am | सिरुसेरि

आपणा सर्वांचे आपल्या प्रतिसादांबद्दल खुप धन्यवाद .

एक एकटा एकटाच , पैसा - आपल्या शंकांचे माझ्या परीने समाधान करतो . आशा आहे , तुमचे समाधान होईल .

तो इसम कोण , तो आत्मा असेल तर मार कसा खातो -> तो इसम म्हणजे कोणी आत्मा , भुत किंवा मंत्र तंत्रवाला बाबा नाही. प्रत्यक्ष काळ / मॄत्यू / यमदूत हा त्या इसमाचे रुप धारण करुन आला आहे . त्यामुळेच त्याच्यावर मारहाणीचा , आगीत फेकले जाण्याचा काही परिणाम होत नाही.

त्या टोपीवाल्याचा नेमका काय उद्देश -> नियतीने त्या त्या दिवसाचे आखुन दिलेले कार्य पार पाडणे हा त्या यमदुताचा उद्देश आहे .

त्या खजिन्याचे गुपीत काय -> ती फिल्म , त्यामधली खजिन्याच्या शोधाची कथा , मंत्रोच्चारांचा प्रसंग ,विजांचा गडगडाट ,आगीच्या ज्वाळा हे त्या यमदुताने आपल्या कार्यपुर्तीसाठी रचलेले पाश आहेत .