लवंगी काव्यचोर

खटासि खट's picture
खटासि खट in जे न देखे रवी...
10 Nov 2015 - 9:06 pm

काव्यचोर
========

वृत्त : चौर्यकर्म
चाल : बिघडलेली
सदर कविता चोरीला जाऊ नये या उद्देशाने लिहीलेली असल्याने तीत आशय पाहण्याचे करू नये. नवीन वाहनचालक वाहन चोरीला गेल्यावर ज्याप्रमाने काळजी घेईल तशीच ही कविता समजावी. सज्जन आनि सभ्य वाचकांना दिवाळीच्या हार्दीक शुभेच्छा !
( कविता कुणी स्वतःवर ओढवून घेतली तर सदर कवी त्यास जबाबदार राहणार नाही )

घराघरातून आगी लावून चोर एक पळाला
कुणी म्हणे घातकी, विकृत धरा त्या चोराला
चोराच्या अंगात भरलेले कवितेचे वारे
पेटवू लागला चोरूनि तो चुलीतले निखारे

या फांदीवर त्या फांदीवर शेपटाने लटकून
खिडक्या खिडक्यातील कागद चोरूनिया वाचून
तयार झाली कविता एक कटून नि पेस्टून
हळूच टाकली अनुदिनीवरती शुभमुहूर्त पाहून

दिवसामागुनी दिवस गेले, चौर्यकर्म ते साफ विसरले
चोर म्हणे हे काव्य आपलेच असे वाटुनी शेपूट फुगले
तिकडे मालक अनभिद्न्य गेला दुस-या गावाकडे
चौकामधे बसल्या बसल्या जुने काव्य त्यास स्फुरले

काव्यचोर तो फांदीवरती झोके घेत होता
खुशाल मालकास तो प्रेरणा पुसता झाला
मालकाच्या गावामधे कविता गाऊ लागता
मालकाचा हात मजबूत कानफाटी पडला

चोराची चोरी पकडता शिरजोर तो आणिक झाला
ज्याची केली चोरी त्याला शिव्या देऊनिया आला
रस्त्यामधे बालक अजाण काव्यचोर शब्द बोलता
अजाण त्या बाळावरती चोर पिसाळुनी धावून गेला

तेव्हां कळले गावालाही, चोर का पिसाळला
खाई त्याला खवखवे हा न्याय लागू पडला

इशाराऔषधोपचार

प्रतिक्रिया

सागरकदम's picture

10 Nov 2015 - 9:27 pm | सागरकदम

ते stove वाली कविता का ?

खटासि खट's picture

11 Nov 2015 - 8:25 am | खटासि खट

होय. तीच कविता.

जव्हेरगंज's picture

10 Nov 2015 - 9:40 pm | जव्हेरगंज

ओरीजनल कविता तुमचीच आहे असा मला विश्वास आहे :):):):)

खटासि खट's picture

11 Nov 2015 - 8:25 am | खटासि खट

धन्यवाद जव्हेरगंज. तुमचा विश्वास योग्यच आहे.

या संस्थळावरच्या कवितेची तारीख आणि त्यांच्या ब्लॉगवरची तारीख सर्व काही सांगून जाते. शिवाय या आयडीने दुस-या संस्थळावर ही कविता पोस्ट केलीये तिथे ही कविता प्रेरित आहे का असं विचारण्याचा निर्लज्जपणा केलेला आहे. त्यामुळे या चोराला कसं मोकळं सोडावं आता ?

तिथे केलेल्या शिवीगाळीमुळे निर्णय पक्का झालेला आहे. नाहीतर लक्ष देण्यात रस नव्हता. पण हा माज उतरवला पाहीजे असं वाटतंय.

खटासि खट's picture

11 Nov 2015 - 8:26 am | खटासि खट

तिथे वापरलेल्या भाषेसहीत संस्थळाच्या प्रशासनाकडे तक्रार करण्यात येईल. पण सणासुदीच्या दिवशी नको असं वाट्तं.

पैसा's picture

13 Nov 2015 - 1:53 pm | पैसा

ढिस्क्लेमरः पुढे लिहिलेले माझे वैयक्तिक मत आहे. मिपाचे किंवा संपादक मंडळाचे नाही.

दिलेल्या तारखा पाहता तुमच्या कवितेवरून प्रेरित होऊन ती कविता लिहिली आहे हे सरळ दिसते. तुमच्या कवितेचे शब्द जसेच्या तसे उचलून स्वतःच्या नावे पोस्ट केले असते तर ती चोरी आहे असे म्हणून कारवाई नक्की करता येते. पण प्रेरणा घेऊन केलेल्या काव्याबद्दल तसे म्हणता येणार नाही असे वाटते. एखाद्या चित्राच्या बाबत कॉपीराईट च्या आधारे कारवाई करणे सोपे असते. कारण आंतरजालावर उपलब्ध असलेली चित्रे जर पाहिलीत तर प्रत्येक चित्रावर "released in public domain" "attribution required in the manner prescribed" "can not be used without permission" वगैरे सूचना लिहिलेल्या असतात. पहिल्या कॅटेगरीतील चित्र कोणीही कसेही वापरू शकते. दुसरे चित्रकाराचे नाव, संस्थळाचे नाव वगैरे माहिती देऊन वापरावे लागते तर तिसरे चित्रकाराची रीतसर परवानगी घेऊनच वापरता येते.

एखाद्या गाण्याची चाल उचलली तरी त्याला कॉपीराईट लागू करणे कठीण. कारण आपण त्याच रागाचा आधार घेऊन गाणे तयार केले असे संगीतकार म्हणू शकतो. तसेच लिखाणाचे विडंबन किंवा तोच फॉर्मॅट वापरून लिहिलेले दुसरे काही असेल तर प्रेरणा म्हणून उल्लेख करणे न करणे ही नंतर लिहिणार्‍याची मर्जी. त्याबाबत फार काही करणे शक्य नाही. तुमचा वैताग समजतो. पण अशा बाबतीत काही करणे कठीण असते. कॉपीराईट संबंधी चर्चा याआधी माहीतगार यांनी घडवून आणल्या आहेत. त्यांचे संदर्भ लक्षात घ्या प्लीज.

विशाल कुलकर्णी's picture

14 Nov 2015 - 7:45 am | विशाल कुलकर्णी

कटु असले तरी हेच सत्य आहे, त्यामुळे मन मानत नसले तरी नाइलाजाने का होईना पण तुझ्याशी सहमत आहे ताई.अगं, मोठमोठ्या कथा सरळ स्वत:च्या नावाने पोस्ट करतात (तेवढ्यासाठी मी वर्तुळ अर्धवट ठेवलीय तर एका बयोने फेबु वरच्या एका पानावर चौथ्या भागातच अर्धवट कथाच समाप्त म्हणून पोस्ट केलीय)

माहितगार's picture

14 Nov 2015 - 6:05 pm | माहितगार

प्रथमतः
उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत)
अशा चर्चांमधून सजगता वाढते आहे, किमान आक्षेप नोंदवले जात आहेत हि चांगली गोष्ट आहे. अर्थात या दोन्ही कविंनी चर्चा करताना प्रतिसाद उपप्रतिसाद देण्याची घाई करण्यापुर्वी कॉपीराइट कायद्याच्या संबंधीत कलमांची दोनचार पारायणे केली असती तर बरे पडले असते. इतरांनीही या निमीत्ताने कायदा काय म्हणतो हे समजून घेण्याच्या दृष्टीने कलमे अभ्यासून घेणे चांगलेच.

मी भारतीय कॉपीराइट कायदा माझ्या सवयीनुसार इंग्रजी विकिस्रोतावरून अभ्यासतो अजून एखाद्या विश्वासार्ह स्रोतातून तपासून घेणे उचित असावे. सदर चर्चेत दोन कलमे महत्वाची वाटतात एक अपवादांबद्दलचे ५२वे कलम आणि दुसरे श्रेय आणि मूळ लेखकाच्या ऑनर आणि रेप्युटेशन बद्दलचे कलम.

कलम ५२ उपकलम १ - a खंड ii मधील वाक्ये एकत्र ठेवलीतर, कॉपीराइटला उपलब्ध अपवादांबद्दल माझे वाचन
52. Certain acts not to be infringement of copyright
(1) The following acts shall not constitute an infringement of copyright, namely,-
[6thAmnd 75](a) a fair dealing with any work, not being a computer programme, for the purposes of-—
[(i) मूळ कायद्यात वाचा तुर्तास टाळले आहे]
(ii) criticism or review, whether of that work or of any other work;

बहुधा दोन्हीही कविता criticism or review प्रकारात मोडत असल्याचा दावा करता येईल अशी शक्यता वाटते तेव्हा कॉपीराइटचा पहिला दावा अपवाद मिळाल्याने निरस्त ठरण्याची शक्यता असावी. पण त्याच वेळी पै तै म्हणतात तसे एका कवितेवरून दुसरी कविता प्रेरीत असण्याची शक्यता वाटते. -व्यक्तीगत मत-(अनलेस असाच त्याही पुर्वीचा अजून कुणाचा फोर्म दाखवता आला तर बाजूत फरक पडू शकेल) पण जिथे प्रेरणा आहे आणि कायद्यात सरळ सरळ अपवाद उपलब्ध आहे तेव्हा मोकळेपनाने श्रेयस्विकार/दान करून कायद्याच्या अपवादाचा फायदा घेणे अधिक सुयोग्य चतुर लक्षण ठरावे, पण हट्टाला पेटलेल्यांना काही सांगणे कठीण असो. आपण कलम ५७ उपकलम १ खंड a आणि b मला कसे दिसते ते पाहूयात

57. Author's special rights
4[(1) Independently of the author's copyright and even after the assignment either wholly or partially of the said copyright, the author of a work shall have the right-
(a) to claim authorship of the work; and
(b) to restrain or claim damages in respect of any distortion, mutilation, modification or other act in relation to the said work [6thAmnd 94] if such distortion, mutilation, modification or other act would be prejudicial to his honour or reputation:
PROVIDED that the author shall not have any right to restrain or claim damages in respect of any adaptation of a computer programme to which clause (aa) of sub-section (1) of section 52 applies.
Explanation : Failure to display a work or to display it to the satisfaction of the author shall not be deemed to be an infringement of the rights conferred by this section.

एकदा प्रेरणा आहे हे स्विकारल गेल श्रेय न देण्यासाठी 57.1.(b) पुन्हा वाचून Explanation वाचा केलेले बदल मूळ लेखकाला पसंत आहेत की नाही याचा संबंध नसावा. केवळ केलेल्या बदलांंमूळे मूळ लेखकाच्या व्यक्तीगत reputation ला बाधा येते काय ? किंवा व्यक्तीगत honour ला धक्का पोहोचतो काय ? व्यक्तीगत reputation ला धक्का पोहोचतो का हे कमी सब्जेक्टीव्ह वाटते, व्यक्तीगत honour ला धक्का पोहोचतो काय ? हा प्रश्न अधिक सब्जेक्टीव वाटतो. (माझ्या व्यक्तीगत मते या विशीष्ट केस मध्ये कविता क्रमांक २ वेगळ्याच विषयावर टिका करते आहे किमानपक्षी मूळकविच्या हॉनरला धक्का पोहोचवण्याचा हेतु अथवा केलेले बदलांच्या हेतु तसा वाटत नाही, तरी पण मूळ कविने मला प्रेरणेचे श्रेय न दिल्यामुळे माझ्या ऑनरला धक्का पोहोचतोय अशी भूमिका घेतली तर न्यायालयात कितपत टिकेल माहित नाही पण कदाचित मॅच खेळली जाऊ शकते.

अर्थात अ‍ॅग्रीव्हड व्यक्तीने लिगल प्रोसीडींग बद्दल अवाक्षरही काढण्याच्या आधी तज्ञ वकीलाचा सल्ला घ्यावा, कारण कलम ६०ची अत्यंत बारकाईने काळजी घेण्याची आवश्यकता असावी. कलम ६० न्यायालयीन प्रक्रीयेच्या बाहेर जाऊन इतर माध्यमातून न्यायालयीन कारवाईची ग्राऊंडलेस थ्रेट देऊ देत नाही. कुणालाही काय बाजू मांडायची ती केवळ न्यायालयासमोर अशी काहीशी कायद्यातील कलमातून अपेक्षा व्यक्त होत असावी हे कलम मूळात कायद्यातून वाचून घेतलेले उचित असावे (अधिक क्लिष्टता टाळण्याच्या दृष्टीने आणि कायदा मूळातून वाचला जावा म्हणून येथे उधृत करत नाही.)

आता मिपासारख्या थर्डपार्टी संस्थळाची जबाबदारी काय बनते ? मला वाटते (इतर कोणत्याही कारणावरुन एखादी गोष्ट न ठेवण्या बाबत संस्थळाची स्वतंत्र पॉलीसी असू शकते) कॉपीराइट भंगाची कुणी अधिकृत लेखी कम्प्लेंट केल्यास कलम ५२ C मधला Provided that चा भाग लागू पडत असावा तो मूळातून व्यवस्थीत वाचून घ्यावा तो पुरेसा नेमका आणि स्पष्ट आहे असे वाटते.

अर्थात संस्थळाला अशी कोणतीही लेखी सूचना देण्यापुर्वी सूचना देणार्‍यानेही ५२ C आणि कलम ६० आवर्जून वाचावे असे वाटते.

वर नमुद केल्या प्रमाणे कायदा मूळातून वाचून समजून घ्यावा (आणि आणखी एका विश्वासार्ह स्रोतातून पडताळून घ्यावा), गरजेनुसार तज्ञ वकीलांचे मार्गदर्शन घेणे श्रेयस्कर असावे.

हि कायद्याची बाजू झाली कायद्याच्या पलिकडे जाऊन प्लॅगरीझम उचलेगिरी बद्दल काही नैतीक तत्वे असू शकतात पण त्याही संदर्भाने गोष्टी खूप अटीतटीला पोहोचत असतील तर कायदेविषयक तज्ञांचा सल्ला घ्यावा (खासकरुन केस काठावरची असेल तर) किंवा सबुरी बाळगावी हे उचित असावे.

चुभूदेघे. उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू

धन्यवाद आणि शुभेच्छा

(वरच्या प्रतिसादात अमेंडमेंटचे क्रमांकन आलेले आहे ते इंग्रजी विकिस्रोतातून आलेले आहे हे ध्यानात घ्यावे)
हा उर्वरीत प्रतिसाद इतर चर्चेशी संबंधीत ठरेलच असे सांगता येत नाही, वर नमुद केलेले ५७-१-(b) हे पुर्वी (बहुधा इ.स.२०१२च्या अमेंडमेंट पर्यंत) केवळ कॉपीराइट च्या कालावधीतच लागू होत असे. २०१२च्या अमेंडमेंट नंतर ही अट काढून घेतल्यामुळे कॉपीराइट संपलेल्या साहित्यालाही हे कलम लागू पडावे आणि इतर देशातील ब्लास्फमी लॉजचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांनी तुलना करुन पहावे (केवळ कॉपिराइट धारक अथवा त्याचा प्रतिनिधीच या कलमांचा लाभ घेऊ शकत असावा) पण तरीही कलम सॉलीड मोघम झाल्यासारखे आणि क्वचीत घटनेतील अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या बाहेरचे अर्थ तर त्यातून ध्वनीत होणार नाहीत अशी शंका वाटते; या विषयावर एखादी केस हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टातून निर्वाळा घेऊन पुढे येऊ शकली तरच खरे तो पर्यंत असे विषय धूसरच राहतात.

उत्तरदायकत्वास नकार (माहितगारकृत) लागू

आनंद कांबीकर's picture

13 Nov 2015 - 8:39 pm | आनंद कांबीकर

ही कविता आवडली

दमामि's picture

14 Nov 2015 - 2:49 pm | दमामि

संदर्भ कळला नाही.

मुक्त विहारि's picture

14 Nov 2015 - 7:25 pm | मुक्त विहारि

मला पण, संदर्भ कळला नाही.

माहितगार's picture

14 Nov 2015 - 10:13 pm | माहितगार

मलाही संदर्भ चटकन लक्षात आला नाही पण साहेबांच अलिकडे खूप लेखन नसल्यामुळे शोधता आले. एवढी हिंट पुरेशी असेल .?

खटासि खट's picture

15 Nov 2015 - 10:32 am | खटासि खट

पैसा तै, माहीतगार, विशाल कुलकर्णी आणि इतर सर्वांचे आभार. माहीतगार तुम्ही दिलेली माहीती उपयुक्त आहे. सणासुदीमुळे आभार मानण्यास उशीर झाला. पण आपण सर्वांनी वेळात वेळ काढून दखल घेतली याबद्दल आभार न मानणे हा कृतघ्नपणा होईल.

संस्थळ किंवा प्रशासक यांना गोत्यात आणणे, त्रास देणे यापैकी कुठलाही विचार नव्हता. तसेच सायबर सेल कडे जाण्याचाही विचार नव्हता. संपादक मंडळाच्या ध्यानात आणून देणे हा मर्यादीत हेतू होता. ते सुद्धा नाईलाजाने. प्रेरणा घेऊन केलेल्या कविता असतात. कधी कधी कल्पना ढापलेली आहे पण शब्द वेगळे आहेत हे सुद्धा लक्षात येते. त्याचंही फारसं वाईट वाटत नाही.

अनेकदा काहीतरी वाचलेलं असतं, ते सर्वोत्तम आहे असं काही नाही पण मेंदूच्या बल्क-अप मेमरीत जातं. अचानक त्यापासून काव्य स्फुरतं, ते आपलंच आहे असा समज होऊ शकतो. अशा वेळी आठवण करून दिल्यास संबंधिताला काही काळाने लक्षातही येतं.

पण इथे असा प्रकार झालाय की कल्पना उसनी घेतल्यावर अन्यत्र मूळ रचना ढापलीये का असा प्रश्न विचारून संबंधिताने वाद उकरून काढला आहे. हे अजाणता झालेलं नाही. कारण संबंधिताचा इतिहास पाहता त्याला वाद उकरून काढणे, एकाच वेळी दहा पंधरा ड्युआयडी हाताशी ठेवणे (जे मिपा किंवा ऐसी अक्षरे वर शक्य नाही), स्क्रीन शॉट घेत राहणे, कांगावे करणे यात जास्त रस आहे. त्यामुळं मूळची मिसळपाववरील रचना अन्यत्र प्रकाशित होताच तिथे कविता ढापलेली आहे का असा प्रश्न ड्युआयडीने विचारून इथे विडंबन सादर केलं आहे.

इथे कित्येकदा एखादी रचना प्रकाशित झाल्यानंतर तिचं गद्य पद्य विडंबन सादर होतं. मूळ रचना पहिल्या पानावर असताना मुद्दामून प्रेरणा घेतलीये, विडंबन आहे हे सांगितलं नाही तरी चालतं. पण मूळ रचना विस्स्मरणात गेल्यावर तसं नमूद केलं पाहीजे हे काव्यचोराला सांगितल्यानंतर त्याने फुटा आता वगैरे भाषा वापरली होती. ती कमेण्ट आता दिसत नाही (प्रतिसाद संपादीत करता यायला लागला काय ?). तसंच प्रतिसादांचा टोन सुद्धा उर्मटपणाचाच आहे.

अन्य संस्थळावर वाद घालताना मळ कवीला शिवीगाळ करण्यात आलेली आहे. ( या इसमास अनेकांनी म भ च्या भाषेत शिव्या घातलेल्या आहेत याला कारणं काय आहेत हे सांगत बसत नाही. इतर सभासदांवर ही वेळ का येत नाही यात त्याची उत्तरं दडलेली आहेत).

चोर ते चोर आणि वर शिरजोर असा प्रकार झाल्याने लक्षात आणून द्यावंसं वाटलं. खरं तर यामुळे इतर सर्व सदस्यांचा वेळ नाहक वाया गेला हे आता जाणवतंय. तसदीबद्दल क्षमा करावी ही नम्र विनंती.

माहितगार's picture

15 Nov 2015 - 7:44 pm | माहितगार

तसदी अथवा वेळ वाया गेला असे मुळीच वाटले नाही. (संस्थळ अथवा प्रशासकही गोत्यात येतात असे वाटत नाही-त्यांची कर्तव्ये आणि काळजी घेण्या इतपत कायदा सुस्पष्ट आहे) या निमीत्ताने कॉपीराइट विषयाच्या बारकाव्यांची चर्चा होऊ शकली. प्रेरणा कुठून कुठे घेतली गेली हे पुरेसे स्पष्ट वाटले, आणि ढापाढापी होते तेव्हा उलट मूळ लेखकांनी आक्षेप नोंदवण्याची संस्कृती जोपासण्याचीसुद्धा आवश्यकता आहे, एवढेच की कायद्याच्या बारकाव्यांची माहिती घेऊन केले की आपली मांडणी अधिक इफेक्टीव्ह होऊ शकते.

मराठी माणूस सहसा चारचौघात मो़कळेपणाने चुक कबूल करत नाही आपल्या गाडीने अपघात होऊनही समोरच्या वरच डाफरले म्हणजे आपन कुणी मोठे होते असे वाटते. मांजरीने किती डोळे झाकून दुध पिले तरी बाकीच्या जगाला काय झाले ते कळण्यास खूपही वेळ लागत नाही. नैतीक दृष्ट्या त्यांनी प्रेरणा कबूल केली असती आणि तशी सवय असणे चांगले असते, यावेळी काठावर निभावले असावे पण उचलेगिरीची सवय असेल तर प्रत्येककेस मध्ये काठावर निभावता येईल असे नाही हे त्यांनी लक्षात घेतले तर त्यांच्याच भल्याचे, पण हे ज्याचे त्याला कळावयास हवे.

तारखा इतक्या जवळ आहेत की, 'मेंदूच्या बल्क-अप मेमरीत जातं. अचानक त्यापासून काव्य स्फुरतं, ते आपलंच आहे असा समज होऊ शकतो.' हे या वेळच्या केस मध्ये असण्याचा संभव तार्कीक दृष्ट्या कमी वाटतो.

सोमदेव सूरी आणि सारंगधराचे अर्थासहीत श्लोक संस्कृत काव्यातील 'श्रेय नामांकन', आणि काव्यचौर्याचा निषेध उत्तम वाचनासाठी संबंधीत मित्रास वाचावयास सांगण्यास हरकत नसावी असे वाटते :)

असो. बाकी या सर्वचर्चेत या निमीत्ताने आपले मूळ काव्य वाचण्यात आले आणि ह्या धाग्यातील कविता दोन्ही आवडल्याचे नोंदवायचे राहीले. पु.ले.शु.

माहितगार's picture

15 Nov 2015 - 7:48 pm | माहितगार

सॉरी अनवधानाने वरच्या प्रतिसादात संस्कृत काव्यातील 'श्रेय नामांकन', आणि काव्यचौर्याचा निषेध' धाग्याची लिंक जरा गंडली, संपादकांनी कृपया http://www.misalpav.com/node/32499 हि लिंक वापरून दुरुस्ती करून द्यावी ही नम्र विनंती

मनीषा's picture

15 Nov 2015 - 2:58 pm | मनीषा

या फांदीवर त्या फांदीवर शेपटाने लटकून
खिडक्या खिडक्यातील कागद चोरूनिया वाचून
तयार झाली कविता एक कटून नि पेस्टून
हळूच टाकली अनुदिनीवरती शुभमुहूर्त पाहून

हे मस्तं आहे... म्हणजे तुम्ही चांगलं लिहिलय .
पण असे करणे चूकच आहे.
ज्याचे श्रेय त्याला द्यायलाच पाहिजे.