अर्थपुर्ण घटना अर्थात Synchronicity
काही दिवसापासून काही तरी लिहावे असे वाटत होते. त्यानंतर काही लेखन मिपावर सादर केले. मात्र अनेक दिवस घोळत असलेला विषय “अर्थपुर्ण घटना आणि मानवी मन”.
नैसर्गिक घटना कालातीत अशा शक्तिकडून कालात घडवल्या जाणाऱ्या योजनाबद्ध घटना असून त्या एखाद्या मानवी मनाच्या संबंधाने म्हणजेच अर्थपूर्ण रीतीने आणि एककालीय रीतीने घडतात. कार्ल युंग या प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञाने अशा घटनांना ‘एककालीय घटनात्मकता’ असे नाव दिले आहे. (अशा एककालीय घटना मानवी मनाच्या संबंधानेच नेहमी घडत असल्यामुळे त्या सर्वच ‘अर्थपुर्ण’ च असतात. म्हणून त्यांना ‘एककालिय’ म्हणण्याऐवजी फक्त ‘अर्थपुर्ण’ म्हणणे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ ग्रंथात म्हटले आहे ते मलाही मान्य आहे म्हणून तोच शब्दप्रयोग मी ही इथे वापरणार आहे. गळतगे यांनी तिथेच असेही स्पष्ट केले आहे की सर्वच अर्थपुर्ण घटना एककालिय (Synchronistic) नसतात. पुनर्जन्माच्या घटना अर्थपुर्णच असतात पण त्या एक कालिय नसतात.)असो.
आता काही अशा घटना नमूद करू इच्छ्ति ज्या माझ्या संबंधी घडल्या.
नंबरप्लेट
चंदननगर भागातून मी एकदा रात्री नगर रस्त्यावरून घरी परतत होतो. त्याआधी चितळेबाबांच्या घरी झालेल्या चर्चेतील विषय घोळत असताना एक कार माझ्या दुचाकीला पार करून पुढे गेली. जरा नाविन्यपुर्ण रीतीने लिहिलेल्या कारच्या नंबरप्लेटने माझे लक्ष वेधले. त्यात जे आडनाव भासेल असे दिसत होते ते नेमके ज्या एका आडनावाच्या व्यक्तीच्या संबंधी मी व चितळे बाबा बोलत होतो तेच होते! नीट वाचल्यावर नंबरही कळत होता. ती कार पुन्हा 2 वेळा पुढे आली तेंव्हा मला या घटनेला ‘अर्थपुर्ण घटना’ म्हणता येईल का? असे मनात म्हणत होतो. ती कार पुन्हा पुन्हा माझ्या पुढे जाई व नंतर गर्दीमुळे अडकून थांबे! त्यावेळी दुचाकीवाल्यांना मधून वाट काढत पुढे जायला मिळाले की ती नेमकी समोर येई! पटकन फोटो काढावा असे वाटून कमरेपाशीच्या पाऊचमधून मी मोबाईल काढेपर्यंत पण ती गाडी सरकन पुढे गेली, ‘जाऊ दे’ म्हणत मी मोबाईल वरच्या खिशात टाकला. विमाननगरच्या चौकात पुन्हा लाल दिव्यामुळे अडकलेल्या गाड्यांचा ताफा पार करत मला ती गाडी अगदी पुढ्यात सापडली! मी फोटो काढून घेतला. कालांतराने तो फोटो मोबाईल मधून पुसलाही गेला. मात्र ही घटना मला यासाठी आठवते की विविध योनीतील अचाट प्रकार कसे घडतात याचे वर्णन करताना त्याच नावाची (त्याच व्यक्तीची नव्हे) चर्चा फार रंगली होती. चितळेबाबांनी नंतर एकदा खराडीतील कालभैरवाच्या मंदिरामागील नदीकाठी बसून अतींद्रिय शक्ती या विषयावर बोलत असताना एकाएकी ते सिगरेट शिलकावून माझ्याशी न बोलता नदीच्या पात्राकडे पहात बोलायला लागले. ते इतका वेळ चालले की दुसरी, तिसरी सिगरेट झाली तरी ते त्यांचे बोलणे संपेचना. मला उद्देशून ते मधे मधे काय बोलणे चालले आहे याचा संदर्भ सांगत होते. (इथे अशा घटनासंबंधी अविश्वासाची भूमिका असल्याने ते मी टाळतो.)
अचानक फोटो फ्रेमवरील फूल पडणे
पुण्याजवळील शिरगाव प्रतिशिरडीला अनेक जणांनी भेट दिली असेल. एकदा आम्ही 8-10 जण कथनात ऐकताना आता या खोलीत अशी घटना घडेल की त्यामुळे जमलेल्यांना या कथनाची प्रचिती आत्ता इथे एका अशक्य घटनेतून मिळेल. पुर्वी एकदा साईबाबांनी या जागेवर – त्या काळात बांधावर - बसून इथे माझे मंदिर बनेल असा संकल्प केला होता. यावर आत्ता जमलेल्यांना विश्वास ठेवणे अशक्य आहे. नेमके त्याच वेळी एका फोटो फ्रेमवर लटकवलेल्या हारातील गुंफलेले एक फूल - पुर्ण हार नाही - टपकन खाली पडले. आता खात्री झाली का? अशी विचारणा ही झाली! ही अर्थपुर्ण घटना माझ्यासह, गळतगे व खुद्द प्रकाशजी देवळ्यांना समोर घडली.
माझे एक तांबरममधील स्नेही श्री एम आर थंपी, इंडिया पोटॅश कंपनीत उच्च पदस्थ अधिकारी होते. अर्थपुर्ण घटनेचा आपला एक दाखला देताना म्हणाल्याचे आठवले. ‘कमांडर ओक, अहो तुमच्या कथनाला इंग्रजीत करुन देताना घडलेली घटना सांगतो, मला माझ्या ऑफिसच्या कामासाठी एक write up लिहायचा होता. संदर्भ मला कोट करायला नेमके ते पुस्तक ऑफिसाच्या रगाड्यात कुठे ठेवले होते आठवेना! वेळ जवळ येत होती. मनात संकल्प करुन बसलो. अन एकाएकी एक पुस्तक रॅकमधून खाली पडले. ते पहाता मला हवा तो संदर्भ सापडला!’
नेपाळयात्रा
अनेकांनी इथे नेपाळ यात्रेवरील योगविवेक यांनी सादर केलेला धागा वाचला असेल. आम्ही दोघांनी जायचे ठरवले. रेल्वे - विमानाची तिकिटे काढली. पण भेटायचे कुणाला? कुठे? कसे? काहीच ठरले नव्हते! काठमांडू विमानतळावरून जायचे कुठे? या सामान्य प्रश्नाचे उत्तर नव्हते. मनातील संकल्प प्रखर होता. अशावेळी एक अचानक घटना घडली. कधीही आपणहून फोन न करणाऱ्या व्यक्तीकडून फोन आला. इकडच्या तिकडच्या बोलण्यातून मी दोन दिवसांनी नेपाळला जातोय असे त्यांना कळले. नंतर मला एकांचा फोन आला, ‘आपण नेपाळात जाताय ना? मग आपल्याला तेथील व्यवस्था पहायला एक व्यक्ती येईल!’ आणि तसेच झाले. ती व्यक्ती कोण होती? त्यांच्यामुळे आमची नेपाळयात्रा अर्थपुर्ण कशी झाली” ते फोटोसकट मिपाकरांनी धाग्यात वाचलेले असेल. असो.
Android APP
आजच्या तरूण पिढीच्या गरजेची वस्तू स्मार्टफोन! त्यावर आवडीच्या अॅप डाऊनलोड करून, कानातखुंट्या अडकवून मिरवणाऱ्यांना माझ्या आवडीच्या विषयाची माहिती कळावी म्हणून मला अॅप बनवायची प्रचंड मनोधारणा झाली. लाखो अॅप बाजारात आहेत पण ते बनवणारे मिळेनात. आपल्या हरहुन्नर मिपाकरांची मदत घ्यायला हवी असे वाटून ‘मुविं’नी एक धागाही सादर केला होता. तो वाचून एका दोघांनी त्यांना फोनवर संपर्क केला, पैकी एकानी नंतर माझी भेट घेऊन एक मस्त अॅप बनवले. आज करता करता 5 अॅप मुळे हजारोंच्या संख्येने माझ्या आवडत्या विषयाची माहिती इच्छुकांना मिळत आहे. या अर्थपुर्ण घटनांच्या साखळीतील जो दुवा - सुकृत रायते, तो मिपावर फार क्वचित, फक्त काय चालले आहे असे पहायला त्या दिवशी सहज आला होता. नंतर पुन्हा मिपाउघडूनही पाहिले नाही! असे त्याने बोलताना सांगितले. असो.
मिपाकरांना अशा अर्थपुर्ण घटनांचे आणखी काही किस्से वाचायला हवेत असे म्हटले गेले तर पुढील भाग लिहीन म्हणतो.
प्रतिक्रिया
2 Nov 2015 - 10:50 pm | गामा पैलवान
कमांडर साहेब,
तुम्ही ज्याला अर्थपूर्ण घटना म्हणता तिला संकल्पशक्ती असंही म्हणता येईल.
आ.न.,
-गा.पै.
2 Nov 2015 - 11:52 pm | चित्रगुप्त
म्हणजे नेमके काय ? 'एकसमयावच्छेदेकरून' की अचानक, अनपेक्षितपणे घडणार्या घटना ?
म्हणजे काय ?
'अर्थपूर्ण' म्हणजे नेमके काय ? कश्यामुळे अमूक एक घटना 'अर्थपूण' ठरते ?
वरील गोष्टींचा खुलासा केल्यास चर्चा पुढे वाढवता येईल.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे माझ्या बाबतीत एक घटना घडलेली आहे:
१९९४ साली मला पत्नीसह सिंगापूरला जायचे होते. दोघांचे पासपोर्ट आधी बनवायचे होते.त्यासाठी तेंव्हा चंदिगडला जावे लागायचे. लहान मुलांना घरी ठेऊन दोघे सहा तास बस प्रवास करून तिथे जायचो. काही केल्या काम होत नव्हते. आमची फाईल त्यांना सापडत नव्हती म्हणे. शेवटी मीच हुडकतो, मला आत जाऊ द्या असे म्हटल्यावर जाऊ दिले. मोठ्या हॉल मधे अनेक अलमार्या अर्जांच्या हजारो फायलींनी गच्च भरलेल्या होत्या. अंदाजाने एक अलमारी उघडतो, तो एका फायलीत असणार्या अर्जात लावलेला माझ्या पत्नीचा फोटो खाली पडला, आणि आमची फाईल लगेच सापडली. तेंव्हा या गोष्टीचे फार आश्चर्य वाटले होते. एवढा योगायोग घडून येणे हे असंभव वाटत होते, पण अन्य कार्यकारणभाव सांगता येत नव्हता.
4 Nov 2015 - 2:18 am | शशिकांत ओक
अर्थपुर्ण म्हणजे काय?
मराठीत Synchronicity या शब्दाला ‘एककालिय’ म्हणण्याऐवजी ‘अर्थपुर्ण’ असे प्राचार्य अद्वयानंद गळतगे यांच्या ‘विज्ञान आणि चमत्कार’ ग्रंथात म्हटले आहे. त्यांच्या ग्रंथाचा आधार घेऊन खालील उद्धरणे देत आहे.
“ज्या घटनांचा कुठल्याही भौतिक कारणाशी संबंध नसतो, अशा प्रकारच्या भौतिक कार्यकारणाबाहेर घडलेल्या व व्यक्तिच्या मनाशी संबंधित असलेल्या घटना स्थलकालातीत घटना असतात. ज्या त्या व्यक्तिच्या मनासाठी त्या अर्थपुर्ण असतात म्हणून त्या एककालिय म्हणण्यापेक्षा अर्थपुर्ण असे ते म्हणतात. ‘काहीही कारण नसणे’ हे अर्थपुर्ण घटनांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. मात्र संबंधित व्यक्तिच्या मनाशी स्थलकालातीत व कार्यकारणाच्या बाहेरच्या सर्व घटना अतींद्रिय असतात.”
इथे गळतग्यांनी अनेक उदाहरणे देऊन म्हटले आहे की “जीवसृष्टी नव्हे तर निर्जीव (जड) सृष्टी सुद्धा मानवी मनाशी अर्थपुर्णरित्या जोडली गेली असल्याचे दिसून येते. नेमके पुस्तक खाली पडणे, फुल टपकून पडणे ही त्याचीच प्रत्यक्ष उदाहरणे आहेत. जडसृष्टी सुद्धा मानवी मनाला अर्थपुर्ण रीतिने प्रतिसाद देते हे यावरून सिद्ध होते. यासाठी मानवी मनात त्या प्रतिसादाला अनुकूल अशी सहानुभूतियुक्त अनुकंपने (sympathetic vibrations) निर्माण झालेली असली पाहिजेत. असे यावर गळतगे यांचे प्रतिपाद आहे. ते यापुढे जाऊन म्हणतात की भानामतीत संबंधित व्यक्तिच्या विशिष्ठ मानसिक अवस्थेमुळे सहानुभूतियुक्त अनुकंपने नेहमी निर्माण होत असतात. म्हणून जड वस्तूसुद्धा अर्थपुर्ण रीतीने वागताना दिसतात. ही गोष्ट स्वतः युंगनेच एका प्रयोगाने दाखवून दिले आहे... “
“युंग आणि वुल्फगँग पॉली (नोबेल पारितोषक विजेता भौत शास्त्रज्ञ) या दोघांनी संयुक्तपणे लिहिलेल्या या विषयावरील पुस्तकाला म्हूणूनच ‘Synchronicity : An Acausal Connecting Principle’ ( एककालिक घटनात्मकता:कार्यकारणाबाहेरचा संबंध जोडणारे तत्व)असा मथळा दिला होता.”
3 Nov 2015 - 5:42 pm | भाऊंचे भाऊ
जाता जात गोष्टी अर्थपुर्ण कशा कराव्यात यासाठी आपण विल स्मिथमा फोकस चित्रपट नक्कि बघा.
3 Nov 2015 - 7:03 pm | कंजूस
ध्यास असला की गोष्टी घडतात.
3 Nov 2015 - 7:10 pm | मांत्रिक
ओक साहेब! माझेदेखील असे काही अनुभव उद्या नक्की शेयर करेन. आता मोबल्यावर शक्य नाही.
4 Nov 2015 - 1:15 am | शशिकांत ओक
जरूर. वाचायला आवतील...
6 Dec 2015 - 1:18 am | शशिकांत ओक
मित्रा मांत्रिक,
आपल्या बाबतीत घडलेल्या अर्थपूर्ण घटना वाचायची उत्सुकता आहे.
4 Nov 2015 - 3:21 am | दिवाकर कुलकर्णी
अर्थपूर्ण घटना, या शब्दानं अर्थ बोध होत नाही
संकेत दर्षक ,संकेत सूचक असा अर्थ अभिप्रेत आहे काय
7 Dec 2015 - 10:32 am | नितीनचंद्र
डॉ राजीव शारंगपाणी यांनी लिहलेल्या एका पुस्तकाच्या प्रकाशनाला प्रसिध्द उद्योगपती श्री प्रकाश रत्नपारखी उपस्थित होते. आपल्या भाषणात ते म्हणाले की त्यांना असेच काहीसे अनुभव येतात ज्याला ते परमेश्वराचा प्रसाद मानतात. एखाद्या समस्येवर दिवसरात्र विचार चालु असताना अचानक काही घटना घडतात जसे एखादा मित्र भेटतो ज्याचा व्यावसायीक संबंध नसतो पण तो विचारतो बरेच दिवसात अमुक मित्र भेटला नाही आणि मग लक्षात येते की त्या न भेटलेल्या मित्राकडे आपल्या समस्येचे उत्तर कदाचित असेल असा संकेत मिळतो आहे.
परमेश्वरावर श्रध्दा असल्यावर असे संकेत अनेक वेळा मिळतात.