आठचा थाट
( चारचा चहा, सहाचा वडा आणि बाराचा बार झाल्यावर त्यात आमचीही एक भर. सदर कथा पूर्णतः काल्पनिक असल्याने लई लोड घेऊ नये.)
पाच वाजून गेले होते. सगळा स्टाफ चुळबुळत घड्याळाकडे पहात होता. तो देखील आता अस्वस्थ झालेला होता. त्याला जास्तच राग आलेला. कारण सकाळपासून काही तरी अगम्य पनवती त्याच्या मागे लागलेली होती. सकाळी येताना गाडी घराबाहेरच पंक्चर झाली. ऑफिसचा प्रवास लोकलमधली घामट गर्दी सहन करत करावा लागला. ऑफिसात गेल्यावर बॉसने उशिरा आल्याबद्दल झाडणी केली. वर पुन्हा दिवसभर सगळी तुंबलेली कामं अगदी आग लागल्यासारखी भराभरा डोकं वर काढू लागली. दिवस कसा संपत आला ते देखील कळलं नाही.
चार वाजता परत एक महत्वाचं काम आल्याने बॉसने सर्वांनाच उशीर होईल याची जाणीव दिली. अधून मधून त्यालाही आतून बोलवणं येत होतं. त्याच्या विषयाची कामे सांगून बॉस त्याच्याकडून पूर्ण करवून घेत होता. केबिनचा दरवाजा सतत आत जाणा-या आणि बाहेर येणा-या माणसांनी धडाधडा वाजत होता. त्याला वैताग आलेला आता या आवाजाचा. शेवटी कधीतरी सहा वाजता हा छळ संपला आणि बॉसने सर्वांना घरी जायची परवानगी दिली.
झटकन बॅग खांद्यावर अडकवून तो बाहेर पडला. रस्त्यावर हात दाखवून एक रिक्षा त्यानं थांबवली. “चलो स्टेशन चलो जल्दीसे”. रिक्षावाला गूढसं हसला. आणि पुढच्याच चौकात त्याला कारण कळलं. हा मोठा ट्रॅफिक जाम. अगदी पाच मिनिटाच्या प्रवासाला 20-25 मिनीटे वाया घालवून तो स्टेशनवर पोहोचला. गाडी घेतल्यापासून त्यानं फारसा लोकलचा प्रवास केलेला नव्हता. पण आज ती दरवाजातून बाहेर लोंबकळणारी गर्दी पाहून पुढच्या परिस्थितीचा अंदाज आला त्याला. पुढचा पाऊण तास असह्य घुसमट, गर्दी, कुबट वास, उभे राहून राहून पायाला आलेले गोळे.
सरतेशेवटी कसबसं त्याचं स्टेशन आलं. गर्दीच्या रेट्यानंच त्याला खाली उतरवलं. स्टेशनबाहेर आल्यावर त्याला आता प्रकर्षानं आठवण झाली असेल तर ‘ती’ची. मनमोहक सुरेख सोनेरी रंग, आकर्षक काचेच्या बाटलीत भरलेली, तनमन रिलॅक्स करणारी, सा-या जगाला गोलगोल पिंगा घालायला लावणारी. आयला आणि उद्या तर सुट्टीच आहे! वा, बेत ठरला तर!
भराभरा त्याची पावलं ओळखीच्या वाईन शॉपकडे जाऊ लागली. पुढच्या कॉर्नरला वळलं की पोहोचलोच! अरेच्चा! तिथं तर भलंमोठं कुलुप टांगलेलं. दारावरती ‘ड्राय डे’ची नोटीस त्याला वेडावून दाख़वत होती. त्येचा **ला या ड्राय डेच्या! तिथंच एक रिक्षावाला उभा होता, याची गंमत बघत! “ओ साहेब, मी तुम्हाला घेऊन जातो बराबर ठिकाणावर. चला या!” तराट सुटली रिक्षा गल्ली बोळ पार करत.
एका चिंचोळ्या गल्लीच्या तोंडाला रिक्षा थांबली. “साहेब, या गल्लीत बरोबर मधलं घर. जावा तिथं. महागात मिळेल पण काम होईल.” एव्हांना चांगलाच अंधार झालेला. त्या अंधा-या, चिंचोळ्या गल्लीतनं चालायचं म्हणजे एक दिव्यच होतं. भरीत भर पुढून देखील सतत माणसे येत होती. त्यांचं काम झालं असावं! घर शोधायला त्रास पडला नाही त्याला. सतत राबता चालूच होता. एका पडद्याआडून एक डोकं बाहेर आलं,“क्या चाहिये?” त्यानं त्याचा ब्रॅंड सांगितला. डोकं आत जाऊन परत बाहेर आलं. पैसा आणि वस्तू यांची देवाण घेवाण झाली.
वा! शेवटी काम झालं तर! मिळालेला जिन्नस त्यानं नीट पिशवीत ठेवला. घराचं गंजकं गेट उघडून बाहेर येत असेल तेवढ्यातच गल्लीच्या त्याची रिक्षा थांबलेल्या टोकाला गलका झाला. “आरं पोलीस आलं” अशी बोंब झाली आणि धावपळ उठली. लगेच त्याच्या चलाख मेंदूनं निर्णय दिला. ‘गल्लीच्या दुस-या टोकाला पळ साल्या.’ तसाच तर्राट पळत सुटला. पायाखाली रस्ता असा नाहीच. पण तरीही पळायचंच. शेवटी भारतीयच आहेत पाय. त्यांना आडवळणं ओळखीचीच.
काही वेळानं एक मोठा रस्ता दिसल्यावर त्याला हायसं वाटलं. अगदी जोरजोरात हातवारे करुन त्यानं रिक्षा थांबवली. “राजनगर चलो जल्दीसे.” रिक्षा नवीन होती. उत्तम कंडीशन. त्याला बरं वाटलं. गार वा-यानं जीव सुखावल्यासारखा झाला. हळूच परत एकदा मागं वळून बघितलं त्यानं. पोलीसगाडी नव्हती. हायसं वाटलं त्याला आणि आता तर अगदी गुदगुल्या झाल्यासारखं हसू फुटायला लागलं. एखाद्या लहान मुलाला आईच्या नकळत फ्रीजमधून आईस्क्रीम किंवा चॉकलेट चोरल्यावर होतो तसा आनंद. अगदी निरागस आनंद.
त्याच्या अपार्टमेंटपाशी आल्यावर रिक्षा थांबली. बिल पे केल्यावर तो लगेच तिथल्या किराणा दुकानात गेला. “अरे रावळभाई, एक कोकाकोला और हल्दीरामका खारा सेंगदाना पाकीट.” रावळभाई अगदी खुदुखुदु हसला. “क्या शेठ! आज बहोत खुश दिखते हो?” काय करायचंय या ढेरपोट्या म्हाता-याला? इरसाल कुठला? जाऊ देत.
मस्त पैकी नव्यानं ऐकलेलं एक उडत्या चालीचं गाणं शिट्टीवर वाजवत तो जिना चढू लागला. घरी जेवण काय बनवलं असेल बायकोनं? आज शुक्रवार आहे नं. नक्कीच चिकन बनवलं असेल. वा! मजा आहे आमची आज! बस, पिंट्या लवकर झोपला पाहिजे. त्याची एक फार लुडबुड मध्येमध्ये असते. आठ वाजत आले होते. फ्लॅटबाहेर उभा राहून त्याने अधीरतेने बेल 2-3 वेळा वाजवली. “आले.” बायकोचा चिडका आवाज. दार उघडून फणका-यानं ती खेकसली, “भाक-या बडवत होते. थोडा दम निघत नाही का?”
त्याच्या हातातील पिशवी तिनं घेतली. आत बघितलं. “वाटलंच आज आणणार म्हणून!”. तेवढ्यात पिंट्या धावत आला आतून. “पप्पा! मला काय आणलं? मम्मी पिशवी दे बघू?”
मम्मीः “अरे राजा, हे तुझ्यासाठी नाही.”
पिंट्याः "नाय, मला बघायचंय."
थोडीशी खेचाखेच.
त्याच्या चेहे-यावर भय.
पिशवी हातातून पडली.
खटळ्ळ फट्ट!!!!!!!!!!
दिवसभराचा कामाचा थकवा त्याच्या चेह-यावर अनेक पटीने दाटून आला.
प्रतिक्रिया
17 Oct 2015 - 4:28 pm | जेपी
अरेरे...
चांगलय.
17 Oct 2015 - 8:17 pm | एकजटा अघोरी
वाह! झकासच!!!
17 Oct 2015 - 8:22 pm | बाबा योगिराज
धन्य.
पण कथा मस्तच आहे.
17 Oct 2015 - 8:26 pm | पाटीलअमित
जमतेय
अजून येऊ द्या
17 Oct 2015 - 8:54 pm | टवाळ कार्टा
अरेरे....म्हणून अश्यावेळी घरच्यांसाठीसुध्धा आठवणीने काहीतरी घेउन जावे ;)
17 Oct 2015 - 8:56 pm | एकजटा अघोरी
हा हा हा!!! टक्याराजे!!! अगदी दुखरी नस पकडली!!!
17 Oct 2015 - 9:10 pm | टवाळ कार्टा
आनंद वाटल्याने वाढतो
18 Oct 2015 - 12:42 pm | मांत्रिक
???
पप्पा, मम्मी आणि पिंट्या तिघं मिळून ढोसत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आलं!!!
18 Oct 2015 - 4:12 pm | टवाळ कार्टा
आर्र...तस्स नाय
मुलाला चॉकलेट
बायकोला गजरा
आप्ल्याला बाट्ली ;)
17 Oct 2015 - 9:35 pm | कैलासवासी सोन्याबापु
बिचारा! वाईट झाले
(चार दिशांस एक एक थेंब उडवून श्रद्धांजली)
पोरगे तरी कसले एडिसन! आई बापाचे (करवादत का होईना) फ्राइडे नाईट फूल टाइट चे एकमत पोराने स्वाहा केलेन :D
17 Oct 2015 - 9:38 pm | मांत्रिक
ओ बाप्पू हो!!! झकासच प्रतिसाद!!!
ढिंच्याक ढिच्याक!!!
18 Oct 2015 - 9:48 am | पगला गजोधर
पुढच्यावेळी अश्याच सिच्युऐषणसाठी प्लास्टिक कंटेनर वापरावा.
![प्लास्टिक कंटेनर](http://i.imgur.com/cK81y.jpg)
18 Oct 2015 - 10:07 am | कैलासवासी सोन्याबापु
शिरसाष्टांग प्रणिपात दंडवत घालतो आहे स्वीकार व्हावा! पग भाऊ
(मंडई क्षेत्री प्यासा मंदिराचा भक्त) बाप्या
18 Oct 2015 - 12:38 pm | बाबा योगिराज
१० क्याण ची आर्डर घ्या आमची.
18 Oct 2015 - 4:13 pm | टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या
18 Oct 2015 - 10:22 am | ज्ञानोबाचे पैजार
आम्ही अशा महत्वाच्या वस्तू स्वतःच्या खिशा मधेच ठेवतो.
पैजारबुवा,
18 Oct 2015 - 5:26 pm | दत्ता जोशी
मांत्रिक भाऊ,
ती रिस्क नावाची कविता वाचली नाही काय? ;-)
( कृ. ह. घ्या.)
19 Oct 2015 - 2:06 pm | बॅटमॅन
म्हणून मी कधीच रिस्क घेत नाही.....
बादवे आज ती कविता वर आली तर लेखकाच्या मागे फुकट ससेमिरा लागायचा तेच्यायला...आमच्या भावना दुखवल्या म्हणून. :(
19 Oct 2015 - 8:11 pm | मांत्रिक
कायच कळलं नाही! व्यनी कराल? कुणाच्या तरी भावना दुखावल्या एवढंच समजलं!
18 Oct 2015 - 9:01 pm | रातराणी
भारी लिहिलंय!
19 Oct 2015 - 1:38 pm | जगप्रवासी
हाहाहाहाहा बिच्चारा. छान जमलाय लेख
26 Oct 2015 - 3:03 pm | शित्रेउमेश
बिचारा त्याचा मुलगा... कसला धुतला असेल पोराला... ;)
18 Sep 2024 - 3:53 pm | diggi12
भारी लिहिलंय
18 Sep 2024 - 8:32 pm | विवेकपटाईत
मस्त कथा. बाकी बायकोच्या शिव्या किती खाल्या याचेही वर्णन आवडले असते.