[रामसेततु बाबत अनेक भ्रम पसरलेले आहे. लोकांमध्ये व्याप्त भ्रम दूर करण्यासाठी वाल्मिकी रामायणानुसार श्री रामांनी समुद्रावर सेतु कसा बांधला त्याचे वर्णन].
वाल्मिकी हे ऋषी होते. त्यांनी तटस्थ राहून रामायणाचे लेखन केले होते. त्यांना असत्य लिहिण्याचे काही कारण नव्हते. श्री रामांची जीवन कथेचे वर्णन करताना, सत्य काय तेच निष्पक्ष पणे मांडले होते.
आपल्या सर्वांनाच माहित आहे. सेतु हा नदी, नाले ओलांडण्यासाठी बांधला जातो. सपाट जमिनीवर सेतु बांधला जात नाही. रामसेतु बाबत अनेक भ्रम समाजात पसरले आहे. आपल्या इतिहासाला भाकड कथा मानणारे, डोळ्यांवर विशिष्ट चष्मा लावलेले तथाकथित विद्वान, ज्यांच्या मते धनुषकोडी ते तलाईमन्नार (श्रीलंका) यांच्या मध्ये असणार १८ मैल लांबीच्या समुद्रात लाखो वर्षांपूर्वी प्रकृती निर्मित एक भोगोलिक संरचना आहे. या संरचनेला अडम ब्रिज किंवा रामसेतु असे ही म्हणतात. या अतिविद्वानांच्या अनुसार श्रीरामाने कुठला हि पूल समुद्रावर बांधला नव्हता. दुसरी कडे धुर सनातनी लोक म्हणतात. हाच तो सेतु आहे जो श्रीरामानी समुद्रावर बांधला होता.
दोन्ही बाजूंचे म्हणणे सत्य आहे. पण ते पूर्ण सत्य नाही. मला तर वाटते अधिकांश लोकांनी वाल्मिकी रामायण वाचण्याचे कष्ट हि केले नसावे. रामसेतुचे चित्र पाहिल्यावर सामान्य माणसाला हि सहज कळते कि या सेतुचा किमान ३०% टक्के भाग आजहि समुद्र पातळीच्या वर आहे. ५०-६० हजार वर्षांपूर्वी समुद्राची पातळी आजच्यापेक्षा बरीच खाली होती, त्यावेळी हत्ती, बिबट्या सारखे जंगली जनावरेहि भारतातून या प्राकृतिक संरचने वरून चालत जाऊन श्रीलंकेत पोहचले असतील. काही भारतीय इतिहासकारांच्या मते रामायण हे ७५०० हजार वर्षांपूर्वी घडले होते. त्या वेळी समुद्र पातळी आज पेक्षा निदान २० फूट आणिक खाली असेल. त्या वेळी या प्राकृतिक संरचनेचा ७०-७५% भाग टक्के भाग समुद्राच्या वर असेल. उथळ समुद्र असला तरीही कित्येक ठिकाणी समुद्राची खोली १०-१५ मीटर खोल असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अश्या परिस्थितीत प्रकृती निर्मित पुलावरून श्रीरामांच्या वानरसेनेला शस्त्र-अस्त्र आणि शिदोरी घेऊन श्रीलंकेला जाणे अशक्यच होते.
आता विचार करू श्रीरामांची वानर सेना समुद्र तटावर पोहचली. २०-२५ हजारांचे सैन्य निश्चित असेल. एवढ्या मोठ्या सैन्याला समुद्र पार करायचा असेल तर शेकडोंच्या संख्येने नौका निर्मित करावी लागली असती. त्यात पुष्कळ वेळ ही लागला असता. पण समुद्र उथळ आणि खडकाळ असल्यामुळे नावेतून पार करणे एक अवघड कार्य होते. खालील चित्रावरून स्पष्ट आहे, आज ही समुद्र पार करताना नौका मार्ग (ferry) रामसेतु पासून पर्याप्त दूर आहे.
आपल्या देशात आज हि दुर्गम भागातले ग्रामीण, पावसाळ्यात नदी किंवा नाल्यावरचा पूल वाहून गेल्यास, नदी नाल्यांवर, लाकडाचे ओंडके टाकून कामचलाऊ पूल तैयार करतात. त्याच प्रकारे श्रीरामांनीहि जंगलातील वृक्ष, लता, गवत, दगड-धोंडे वापरून एक कामचलाऊ पूल बांधण्याचा निश्चय केला. जेणे करून सैन्य समुद्र पार करू शकेल. अश्या प्रकारचे पूल बनविण्याचे तंत्र अवगत असलेल्या नील नावाच्या वानराने हे कार्य पूर्ण करण्याचा बीडा उचलला.
वाल्मिकी रामायणात युद्धकाण्डातल्या २२व्या सर्गात ५४-७३ या वीस श्लोकांत समुद्रावर पूल बांधण्याचे वर्णन केले आहे. यात रामनाम लिहिले दगड पाण्यावर तरंगले असे काहीच लिहिलेले नाही. वाल्मिकी रामायणानुसार, सहस्त्रो वानर जंगलात गेले. अर्जुन, बेल, अशोक, साल, बांबू, नारळ, इत्यादी अनेक जातींचे वृक्ष मुळापासून किंवा कापून समुद्र किनार्यावर घेऊन आले. या शिवाय गवत, लता इत्यादी सुद्धा. बलिष्ठ वानर मोठ्या-मोठ्या शिळा आणि पर्वतांना उपटून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर घेऊन आले. किनार्यावर कोलाहल व्याप्त होता - कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. अश्या रीतीने केवळ पाच दिवसात वानरांनी हा पूल पूर्ण केला. श्रीरामाच्या सैन्याने या सेतुवरून समुद्र पार केला म्हणून या सेतुला लोक रामसेतु म्हणून ओळखतात.
वृक्ष, लता आणि दगडांचा उपयोग करून वीस पंचवीस हजारच्या सैन्येला उथळ समुद्रावर रामसेतुचा निर्माण करणे सहज शक्य होते. हा पूल कामचलाऊ असल्यामुळे काही वर्षांतच नष्ट झाला असेल. आजच्या घटकेला अर्थात ७५०० वर्षानंतर रामसेतुचे अवशेष सापडणे अशक्यच. पण हे मात्र निश्चित श्रीरामांनी समुद्रावर सेतु बांधला होता. कालांतरानी श्रीरामांच्या भक्तीत तल्लीन कवींनी आपापल्या परीने सेतु बांधण्याचे प्रसंग रंगविले.
टीप: वाल्मिकी रामायणातील सेतु बांधण्याचे कार्य कसे संपन्न झाले, युद्ध कांडातील, २२व्या सर्गातील काही श्लोक:
ते नगान् नागसंकाशाः शाखामृगगणर्षभाः ।
बभञ्जुः पादपांस्तत्र प्रचकर्षुश्च सागरम् ॥ ५५ ॥
ते सालैश्चाश्वकर्णैश्च धवैर्वंशैश्च वानराः ।
कुटजैरर्जुनैस्तालैः तिलकैस्तिमिशैरपि ॥ ५६ ॥
बिल्वैश्च सप्तपर्णैश्च कर्णिकारैश्च पुष्पितैः ।
चूतैश्चाशोकवृक्षैश्च सागरं समपूरयन् ॥ ५७ ॥
हस्तिमात्रान् महाकायाः पाषाणांश्च महाबलाः ।
पर्वतांश्च समुत्पाट्य यंत्रैः परिवहन्ति च ॥ ६० ॥
संक्षिप्त अर्थ: विशाल वानर जंगलात केले. तेथे जाऊन त्यांनी साल, अर्जुन, साल, अशोक, बांबू, नारळ इत्यादी अनेक मोठ्या मोठ्या वृक्षाना मुळासकट किंवा तोडून समुद्र किनार्यावर आणले. हत्ती समान विशाल वानरांनी मोठे मोठे पाषाण तोडून यंत्राद्वारे समुद्र किनार्यावर आणले.
समुद्रं श्रोक्षोयामासुः निपतंतः समंततः ।
सूत्राण्यन्ये प्रगृह्णन्ति व्यायतं शतयोजनम् ॥ ६२ ॥
दण्डानन्ये प्रगृह्णन्ति विचिन्वन्ति तथा परे ।
वानरैः शतशस्तत्र रामस्याज्ञापुरःसरैः ॥ ६४ ॥
मेघाभैः पर्वताभैश्च तृणैः काष्ठैर्बबंधिरे ।
पुष्पिताग्रैश्च तरुभिः सेतुं बध्नन्ति वानराः ॥ ६५ ॥
संक्षिप्त अर्थ:कोणी वानर माप घेण्यासाठी दंड पकडत होते, तर कोणी सामग्रीची जुळवाजुळव करत होते. मोठ्या शिळ्या समुद्रात टाकताना भीषण आवाज होत होता. सर्वत्र कोलाहल होता. गवत आणि लाकडांच्या द्वारा भिन्न-भिन्न स्थानावर वानर पूल बांधत होते. ॥इति॥
प्रतिक्रिया
16 Oct 2015 - 10:33 am | ए ए वाघमारे
चांगली माहिती.
इतिहासाबद्दल बोलताना आपल्या नेहमी काही गफलती होत असतात.काही गृहीतं मनात धरून आपण विचार करत असतो किंबहुना उत्तर आधी ठरवून मग त्याभोवती हव्या त्या प्रश्नांची गुंफण आपण करत असतो.स्वत:ला वैज्ञानिक दृष्टीचे मानणारेही याला अपवाद नाहीत. यातील काही गृहीतके अशी:
०१. पुढची पिढी ही आधीच्या पिढीपेक्षा नेहमी हुषार असते.
०२. तंत्रज्ञान हे नेहमी पुढे जात असते. म्हणजे मागच्या तंत्रज्ञानाच्या तुलनेत एकाच वेळी इफिशियंट आणि/किंवा वेगळे होत असते.
०३. ज्ञानाचा र्हास होत नाही. (जमिनीची किंमत नेहमी वाढतच जाते या चालीवर). वगैरे वगैरे
रामसेतू वगैरे खूप मोठ्या गोष्टी झाल्या. एक साधे उदाहरण पाहू.
उदा.पुरणाची पोळी हा एक पदार्थ घेऊ. कल्पना करा आज लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मेट्रोसिटीत एका विभक्त कुटंबात राहणारी एखादी नोकरदार मध्यमवयीन मराठी बाई आहे. या बाईला पुरणाची पोळी तयार करण्याची कृती माहीत असली तरी वेळेच्या अभावामुळे जरी ती तसे करू शकत नाही. गेली काही वर्षे ती नियमितपणे विकतच्या पुरणाच्या पोळ्या आणते. आता समजा या बाईला एक तरूण मुलगी आहे जिने कधीही आपल्या आईला पु.पो.बनवताना पाहिले नाही. मग शिक्षणाच्या निमित्ताने ही मुलगी हॉस्टेलला अनेक वर्षे राहिल्याने तिचा स्वयंपाकघराशी दैनंदिन संपर्क तुटला आहे. आता तिचे लग्न(समजा सासूस्वरूप ज्येष्ठ मार्गदर्शक महिला नसलेल्या) घरात झाले व ती नवर्यासोबत दूर परदेशी विभक्त कुटुंब करून राहते. आता तिला पु.पो.खावीशी वाटली तरी ती स्वत: तयार करू शकत नाही. कारण ते करण्याचे तंत्रज्ञाना(म्हणजे कृती)तिला माहितीच नाही. बाहेर ही माहीती उपलब्ध असेलही पण म्हणजेच तिच्यापुरता तरी या तंत्रज्ञानाचा र्हास झाला. हे उदाहरण अनेक पदार्थांना लागू करता येईल जसे सांजोर्या,साटोर्या,अनारसे असे अनेक स्पेशलाइज्ड पदार्थ. आपण आपल्या एका आयुष्यकाळातच इतक्या तंत्रज्ञानाचा र्हास पाहू शकतो तर मग रामायण-महाभारताची काय कथा?
दुसरे उदाहरण: आजच मोठ्या शहरांमध्ये योग्य रितीने तिरडी बांधण्याचे तंत्र माहीत असलेली माणसे दुर्मिळ होत चालली आहेत.
हा धागा व त्यावरील चर्चा वाचताना मला अमिताभच्या 'डॉन' सिनेमाची आठवण होत राहिली. त्यात अमिताभ हेलनला म्हणतो-'इस पिस्तौल मे गोलींया नही ये तुम्हे मालूम है-मुझे मालूम है लेकिन पुलिस को नही !'.
आपण सगळे पुलिस आहोत.आपल्याला काहीच माहीत नाही.असो
16 Oct 2015 - 4:25 pm | याॅर्कर
अगदी आपल्या डोळ्यासमोर काहीतरी घडते आहे आणि ते सत्य आहे असे वाटते.
मात्र तीन तासांनी आपण जे पाहिलं ते पडद्यावर पाहिलेले असते हे समजते, व ती एक मनोरंजक/भावनिक/प्रेरणादायी स्क्रिप्ट असते इतकेच.
राम,कृष्ण,रावण,कंस नक्कीच होऊन गेले असतील, त्यात काही वाद नाही.
अर्थात,थिएटर मधून बाहेर पडा!एवढच
16 Oct 2015 - 5:38 pm | भीमराव
वेदांना चाल लावनारा माणुस रावण होता असे ऐकुन आहे,
मराठी मान्स एकमेकांना भेटल्यावर रामराम म्हनतात, (मिपा वर आम्ही"रामराम पाव्हणं, आपल्या येन्याची नोंद करा सदस्य व्हा"या हाकेमुळेच आलो), ईडा पिडा टळुन बळीचं राज्य मागनार्यानच्या सोबतच ईथले लोक रामराज्याची स्वप्न पाहत आलेत. बाकीचे काहीही असले तरी राम आपल्या समाज मनामध्ये खोल रुजलेला आहे, राम हा इथल्या पुरुषप्रधानतेच्या आदर्शांपैकी एक आहे. राम ऐतिहासीक,की काल्पनीक की बाहेरुन आलेले पात्र की अजुन काही या पेक्षा त्या ग्रंथामधल्या व्यक्तीरेखा कोणत्या परीस्थीती मधे कशा व का वागल्या, त्याचे परिणाम काय झाले यावर लक्ष देने हेच मला योग्य वाटते.
बाकी सगळे रामजाने.
16 Oct 2015 - 7:50 pm | श्रीनिवास टिळक
प्रचेतस--'भारतातले सर्वात प्राचीन साहित्य म्हणजे ऋग्वेद. पण ह्यातही रामायणाचा उल्लेख नाही.'
ऋग्वेदात राम हा शब्द दोनदा येतो. त्यातील एकाचा आधार घेऊन (ऋ मंडल १०, अध्याय ३ ऋचा ३) ''इतिहास पुराणाभ्याम वेदार्थम समुपबॄम्हयेत'' या महाभारतातील वचनाला अनुसरून नीळकंठ चतुर्धर या मराठी विद्वानाने १७व्या शतकात ''मंत्र रामायणं'' हा ग्रंथ संस्कृतमध्ये लिहून त्यात रामकथेचे वेदमूलकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. मंगलाचरणाच्या पहिल्या श्लोकात ते म्हणतात—दशरथपुत्र प्रभू रामचंद्र पृथ्वीवर मानव अवतारात अवतीर्ण झाले तेव्हाच प्रचेता पुत्र वाल्मीकि यांच्या मुखातून रामायणाच्या स्वरुपात साक्षात वेदच प्रगट झाले. म्हणून रामायण वेद आहेत यात काही शंका नाही.
अवांतर (१) नीळकंठ यांची महाभारतावरील ‘भारतभावदीप’ हि टीका प्रसिद्ध आहे (२) प्रभुनाथ द्विवेदी यांचे ''मंत्र रामायणं--मूल संस्कृत + हिंदी भाषांतर'' हे पुस्तक प्रकाशीत आहे (उत्तर प्रदेश संस्कृत संस्थान लखनऊ)
16 Oct 2015 - 8:43 pm | प्रचेतस
ऋग्वेदातले मंडल पहिले आणि दहावे हे नंतरचे समजले जाते.
आपण दिलेल्या मंडलातील उपरोक्त सूक्त अग्नीला उद्देशून आहे. त्याचा श्लोक व् त्याचा भावार्थ असा आहे.
भद्रः भद्रया सचमानः आ अगात् स्वसारं जारः अभि एति पश्चात्
सु प्रकेतैः द्युभिः अग्निः वितिष्ठन् रुशत्भिः वर्णैः अभि रामं अस्थात् ॥ ३ ॥
कल्याणकर अग्नि हा कल्याणरूप उषेसहित प्राप्त झाला तेव्हां भक्ताची भगिनी जी उषा तिचा प्रियकर तिच्या पाठोपाठच आला आणि सर्व वस्तू आमच्या दृष्टीस पाडणार्या दीप्तीने सर्वत्र भरून आपल्या तेजस्वी किरणांनी प्रत्येक मनोरम वस्तूला व्यापून राहिला.
ह्यातील राम ह्या शब्दाचा अर्थ मनोरम, आल्हाददायक, आनंदित करणारा (pleasant, delightful, lovely) अशा अर्थाने होतो. केवळ राम ह्या शब्दावरून त्यास दाशरथी राम समजणे म्हणजे हे अतर्क्य आहे.
नीलकंठाच्या प्रतिभेबाबत वादच नाही पण त्याने केवळ त्यावरून रामायणकथेचे वेदमूलकत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला म्हणजे ते तसेच असावे हे ग्राह्य धरता येणार नाही. ऋग्वेदातले श्लोक आजही नित्यकर्मात म्हटले जातात म्हणून आपण वैदिक काळात वावरत आहोत असा होत नाही.
बाकी महाभारतात तत्त्वज्ञान रामायणाच्या तुलनेने खूपच जास्त आहे इतके की महाभारताला पाचवा वेद असेही म्हणतात.
16 Oct 2015 - 8:49 pm | द-बाहुबली
एकुणच या विषयावरील विवीध मतांचे सिंहावलोकन इग आय स्टाइल ने करता रामायण प्रत्यक्षात घडले होते हे सबळ पुराव्याने आता सहज सिध्द करता येउ शकते या निष्कर्षाप्रत मन आले आहे. पण मुळ प्रश्न आहे की याचा उपयोग काय ?
कारण म्हणतात ना... “They say people with high IQ have a good chance to be an atheist, but it doesn’t mean one will become high IQ by stopping to believe in God.”
16 Oct 2015 - 9:31 pm | मांत्रिक
मस्तच!!!
17 Oct 2015 - 8:13 am | रमेश आठवले
वर चालेलेल्या चर्चेत रामायण किती वर्षापूर्वी घडले या विषयी वेग वेगळी मते मांडण्यात आली आहेत. त्या संदर्भात खालील माहिती महत्वाची वाटते. खाली दिलेल्या धाग्यात इराक देशात राम आणि हनुमान यांच्या ६००० वर्षापूर्वी दगडात कोरलेल्या शिल्पांचा फोटो आहे. म्हणजे रामायण भारतात बरीच शतके आधी घडले होते असे म्हणता येइल.
http://www.vina.cc/2015/09/28/6000-year-old-lord-rama-and-hanuman-carvin...
17 Oct 2015 - 8:44 am | प्रचेतस
तो संपूर्ण दुवा वाचून पु.ना. ओकांची आठवण आली. :)
17 Oct 2015 - 9:37 am | दत्ता जोशी
राम सेतूवर पु ना ओकांनी पण बरेच संशोधन केले आहे. पण त्याला मर्यादा असणारच आहेत.
रामायणातला राम सेतू नक्की कुठे आहे हे शोधण्यात ब्रिटीश पुरातत्व संशोधकांनी पण बराच रस घेतला होता असे वाचनात आले आहे. लिंक मिळाल्यास देतो.
17 Oct 2015 - 9:30 am | दत्ता जोशी
पूर्वी वेद हे वेगवेगळे नव्हते. ऋग्वेद हा पहिला म्हणजे सगळ्यात महत्वाचा वेद अशा अर्थाने घेतला आहे. व्यास ऋषींनी वेदांच्या मंत्र, ऋचा आणि सूक्ते यांचे वर्गीकरण करून चार भागात वर्गीकरण केले ते चार वेद. ( म्हणून व्यासांना वेदव्यास असेही पडले) वेदांचे मुख्य देव इंद्र अग्नी, आदित्य, वरुण, मरुत, विष्णू, रुद्रादी आहेत. वेद हा श्रुती चा भाग आहे तर पुराणे हा स्मृतीचा भाग आहे. पुराणे वेदानंतर आली. वेद हे ज्ञान, कर्म योगाच्या उपासनेचा भाग तर पुराणे भक्ती योगात महत्वाची. त्यामुळे राम ऋग्वेदात येण्याचे काहीच कारण नाही. (सर्वात मोठा आणि महत्वाचा ऋग्वेद सृष्टी, सृष्टीचे स्वरूप, उत्पत्ती, परमेश्वराचे स्वरूप आणि विविध देवतांची स्तुती- स्तवने गातो.)
17 Oct 2015 - 9:42 am | प्रचेतस
त्यातही ऋग्वेदातले पहिले आणि दहावे मंडल नंतर भर पडलेले आहे. यजुर्वेदात यज्ञयागादी गोष्टींचे वर्णन आहे तर सामवेदात प्रामुख्याने गायन आहे. अथर्ववेद ही प्रामुख्याने नंतरची भर मानली जाते.
पुराणे ही वेदांनंतर आली हे बरोबर पण तसे अर्धसत्य. वेदांनंतर उपनिषदे आली. वेदांचे सार त्यात असल्यामुळे त्यांना वेदांत असेही म्हणून लागले. नंतर ब्राह्मणे, आरण्यके, रामायण-महाभारतादिक आर्ष महाकाव्ये व त्यापुढे भागवताच्या रचनेनंतर ख्रिस्तोत्तर कालखंडात पुराणे जन्माला आली.
17 Oct 2015 - 10:32 am | कैलासवासी सोन्याबापु
प्रचेतस जी,
वेदांची टिका उपनिषद त्यांची टिका ब्राह्मणके अन त्यांची टिका अरण्यक अशी एनालॉजी आहे का ती?
(बरेच दिवसांचा प्रश्न)
[शुद्धमततत्व इतिहासाचा विद्यार्थी(च)] बाप्या
17 Oct 2015 - 10:48 am | प्रचेतस
वेदांची टिका उपनिषदे आहेतच.
पण ब्राह्मणे आणि आरण्यके पण बहुधा वेदांवरच्याच टिका आहेत. ब्राह्मणांत वेदांवरील चर्चा आहेत तर आरण्यकांत कर्मकाण्डांचे वर्णन आहे. अर्थात ब्राह्मण आणि आरण्यकांबाबत इतकीच वरवरची माहिती माझ्याकडे आहे. हे दोन्ही पण मी वाचलेले नाही. सखोल माहिती मिपाकर शरद किंवा कदाचित ब्याट्या देऊ शकेल.
18 Oct 2015 - 10:20 pm | दत्ता जोशी
बापूसाहेब,
उपनिषदे, ब्राह्मणे आणि अरण्यके या सगळ्या वेदांवरील टीकाच आहेत. प्रत्येकाचा फोकस थोडा वेगळा आहे.
ब्राह्मणे मुख्यत्वे कर्म कांडावर अत्यंत तपशीलवार भाष्य करतात. (वेगवेगळ्या यज्ञ, याग यांचे अत्यंत बारीक तपशीलवार विधी,विशिष्ट यज्ञाच्या वेळी आवश्यक असेलली ग्रह स्थिती, यज्ञ वेदीची मांडणी, त्याची मोजमापे, "होता" म्हणजे आचार्य आणि यज्ञ कर्त्याने काय खावे आणि काय खावू नये, वस्त्रे कोणती आणि कशी नेसवीत इतकी बारीक तपशीलवर माहिती). यातले बरेच साहित्य कालोघात नाहीसे झाले आहे.
17 Oct 2015 - 10:47 am | दत्ता जोशी
अथर्व वेद संपूर्ण नंतरचा नाही. ऋग्वेद प्रामुख्याने अध्यात्म या विषयावर बोलतो. यजुर्वेद कर्म कांदाविषयी बोलतो तरी यजुर्वेदामध्ये निम्म्या रुचा आठर्व्वेदातीलाच आहेत. सामवेदात फक्त ५७ रुचा स्वतःच्या असून बाकी ऋग्वेद आणि आठर्व्वेदातल्या आहेत. कदाचित म्हणून बर्याच जनांना अथर्व वेद हा मुळ वेदांचा भाग नाही असे वाटते. अथर्ववेद मानवाच्या नित्य जीवनासाठी उपयोगी ज्ञान, माहिती आणि गाइड-लाइन देतो. मुल सनातन हिंदू धर्म समाज,समाज रचना, समाचा गरजा, गृहस्थाश्रम या सर्वांचे महत्व जाणतो. वेद व्यासांनी चार वेदांचे निर्माण करून वेगवेगळ्या ऋषींना त्याचे संगोपन करण्यासाठी( पुढे चालवण्यासाठी) दिले. याचा प्रचार प्रसार करतांना योग्य तो अभ्यास पूर्ण भाग वाढवणे किंवा कमी करणे याचे स्वातंत्र्य स्वतः व्यासांनी दिले आहे. अशी मोडिफ़िकेशन योग्यता असलेल्या ऋषीनाच करण्याची परवानगी होती. त्यामुळे वेगवेगळ्या ऋषीनि महत्वपूर्ण वाद किंवा कमी केली आहे. हे सर्वमान्य आहे. मग तुम्ही म्हणता तशी मग ९ सुमारे २०० हून अधिक) उपनिषदे, ब्राह्मणे आली . उपनिषदे हि वेदांवरील भाष्ये आहेत. ( वेद समजावून सांगण्यासाठी). अरण्याकांचा उद्देश मनुष्याच्या जीवनाचे उद्दिष्ट स्पष्ट करणे ( आध्यात्मिक), वैराग्य प्रदान करणे हा आहे. म्हणून अरण्यके पठणासाठी विशिष्ट काळ, वेळ, स्थान यांची मर्यादा घालून दिलेली आहे. अर्थात वेद पठणासाठी पण अनेक लिमिटेशन, गाइड लाइन दिलेली आहेतच.
ख्रिस्तोत्तर कालखंडातजन्माला आली.
इथे थोडा वाद आहे. जन्माला आली कि लिहिली गेली? माझ्या मते लिहिली गेली. बौध ग्रंथ याच काळात लिहिले गेले म्हणजे ते त्या वेळी जन्माला आले असे म्हणता येणार नाही ना? बर्याचशा गोष्टी मुखोद्गत करून गुरु शिष्य परंपरेने पिढ्यान पिढ्या हे वांग्मय पुढे आले आहे. बौध तत्वज्ञान हि तसेच आले. क्रिस्त काळानंतर ग्रंथ "लिहिण्याची" फ्याशन आली हे मात्र नक्की.
17 Oct 2015 - 10:55 am | प्रचेतस
जन्माला आली असेच मी म्हणेन.
कारण पुराणांत चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, सातवाहन वंशावळ अगदी गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञश्री सातकर्णी यांचेसहित गुप्त राजवटींतील राजांचेही वर्णन आहे. मौर्य घराणे सोडले तर उरलेल्या राजवटी प्रामुख्याने ख्रिस्तोत्तर आहेत.
17 Oct 2015 - 1:00 pm | दत्ता जोशी
रामायण नि महाभारतात हे आहे? कोणत्या?
17 Oct 2015 - 1:11 pm | प्रचेतस
नाही हो.
पुराणांमध्ये म्हणजे ब्रह्म पुराण, अग्नीपुराण, स्कंद पुराण आणिक इतर अशा ठिकाणी.
रामायण महाभारत हे महाकाव्यांमध्ये मोडतात.
17 Oct 2015 - 3:26 pm | दत्ता जोशी
मी कुठे नाही म्हटलं? पण ज्योतिषानुसार रामायण काळ यावर असलेले मतभेद , वेदांमध्ये श्री रामाचा उल्लेख नसणे, किंवा काही पुराणात जी निर्विवाद पणे इस नंतर लिहिली गेली आहेत त्यात अलीकडच्या राज घराण्यांचा समावेश असणे हि रामायण काल्पनिक असण्याचा पुरावा असू शकत नाहीत. चान्सेस ५०-५० असू शकतात. इतकेच मला म्हणायचे होते.
राहिला भाग वाल्मिकी रामायणातील भूगोल, यावर मी अगदी विरुद्ध मते वाचली आहेत संदर्भ नक्की देतो.
17 Oct 2015 - 3:55 pm | प्रचेतस
रामायण काल्पनिक असल्याचे कारण म्हणजे-
रामायणातील काही चुकीचे भौगोलिक उल्लेख
रामायणातील चमत्कार
वानर, अस्वल, गृध्र असे मनुष्यवाणीने बोलणारे पशुपक्षी (महाभारतातही असे आहे पण एकूणात प्रमाण कमी असून जितके आहे तितके प्रक्षिप्त मानता येण्यासारखे आहे.)
रामायणातील अतिशयोक्त वर्णने
रामाचे पराकोटीचे आदर्श असणे, इतका आदर्श माणूस फ़क्त कल्पनेतच असू शकतो.
कुठलाही पुरातत्वीय पुरावा नसणे.
18 Oct 2015 - 9:20 pm | दत्ता जोशी
वाद व्यक्तिशः तुमच्याशी नाही.
पुरातत्व शास्त्राच्या पण काही गाइड लाइन असतील. त्या मला माहिती नाहीत. तरी पण रामायणातील चमत्कार, मनुष्य वाणीने बोलणारे पशुपक्षी पण बाजूला ठेवून राम सेतूचा जो अभ्यास व्हायला हवा होता तो झाला नाही. अशा प्रकारचे संशोधन करताना बर्याचदा काय सिद्ध करायचे आणि काय नाही याची खुणगाठ कळत न कळत कुठेतरी बांधली गेली असते. ( कृपया वैयक्तिक घेवू नये) किंवा बर्याचदा संशोधनात काही गती झाली नाही कि " हे काल्पनिक किंवा नाहीच " असा शिक्का मारून अर्किओलोजि आणि विज्ञान दोघेही फ़ाइल क्लोज करून पुढे जात असतात. याची अनेक उदाहरणे जगभर आहेत.
आज रामायण नक्की कुठे झाले, कोणता पर्वत नक्की कुठे आहे, लंका म्हणजे आजची श्री लंका आहे कि त्यापुढे होती जी आज पाण्याखाली गेली आहे, इ. वाद आहेत ते गेली काही शतके होते आणि उद्याही राहतील हि एक शोकांतिका आहेच. पण किमान रामसेतू किंवा सेतुबंधाचे संशोधन कोणताही पूर्वग्रह न ठेवता का केले जात नाही ते मात्र मला खरेच कळलेलं नाही.
अर्थात रामसेतू संशोधन हि आजची तातडी किंवा निकड नाही. शिवाय ते संशोधन व्यापार/ उद्यम केंद्रित हि नाही त्यामुळे त्यात कोणा मोठ्या कंपनीला/ वित्त पुरवठादाराला फारसा रस असण्याचे कारण नाही. मनुष्य जातीचे भवितव्य त्यावर अवलंबून आहे असेही म्हणता येत नाही कारण राम कथा आणि रामनामाने जे साध्य करायचे ते "सिद्ध" करून आमच्या संतांनी जगासमोर ठेवले आहे. त्यामुळे माझ्या सारख्या वैष्णवाला तरी रामायण काल्पनिक होते किंवा नाही हा वाद अस्वस्थ करत नाही.
17 Oct 2015 - 1:41 pm | dadadarekar
अल्ला उपनिषद मध्ये अकबराचा उल्लेख आहे म्हणे.
17 Oct 2015 - 1:12 pm | सतिश गावडे
मागे अशाच एका वादात समोर आलेला मुद्दा आठवला: लंडन आहे तर मग हॅरी पॉटरही होऊन गेला असला पाहीजे.
17 Oct 2015 - 3:11 pm | दत्ता जोशी
काही संदर्भ नसतांना आणि काही अभ्यास नसतांना उगीचच आपल्या थोर अस्तित्वाची जाणीव काही लोकांना सारखी का करून द्यावीशी वाटते हे एक न उलगडलेले कोडं आहे.
17 Oct 2015 - 3:24 pm | काळा पहाड
म्हणूनच 'गुजरात' करावं लागतं.
17 Oct 2015 - 3:37 pm | कैलासवासी सोन्याबापु
जोशी काका,
नका लक्ष देऊ तुम्ही! दादु काड़ी टाकतात फ़क्त होलसेल मधे! तीच त्यांची करमणूक आहे! आपण कश्याला त्यांना ती पुरवा!! कसे?
दादुमियाँ, कट्टरपणाला सांख्यिकी बेस द्यायला तुम्ही जरा वैचारीक मतभेद (रंगीत चष्मा) बाजूला ठेवून गुरजींची शिकवणी लावा!
17 Oct 2015 - 6:43 pm | श्रीनिवास टिळक
रामकथेचे वेदमूलत्व सिद्ध करण्यासाठी नीलकंठानी १५७ श्लोक रचले आहेत ते वाचूनच मत व्यक्त करणे उचित ठरावे. मात्र मंत्र रामायणाचे भाषांतरकार प्रभुनाथ द्विवेदी आपल्या मताशी सहमत आहेत. प्रस्तावनेत ते म्हणतात: मंत्र रामायणके माध्यमसे रामकथाकी वैदिकता सिद्ध करनेके लिये नीलकंठ चतुर्धर जो अद्भुत अध्यवसायपूर्ण श्रम किया है वह सर्वथा प्रशंसनीय है। किंतु मेरी दृष्टिमें उनके विवेकपर उनका हठ भारी पड़ा है...कहींका ईंट कहींका रोड़ा, भानुमतीने कुनबा जोड़ा।
19 Oct 2015 - 5:53 am | चित्रगुप्त
या धाग्यावरील सर्व प्रतिसाद वाचणे हे एक मोठेच काम आहे, तेंव्हा सध्या फक्त 'पाण्यावर दगड तरंगणे' या विषयीचे (पाण्यावर दगड तरंगवून पिरॅमिड कसे बांधले असावेत याबद्दल) संशोधनात्मक व्हिडिओ इथे देतो आहे:
भाग १ : How were the pyramids of egypt really built - Part 1
https://www.youtube.com/watch?v=TJcp13hAO3U
भाग २ : How were the pyramids of egypt really built - Part 2
https://www.youtube.com/watch?v=rxFXsoqbfrk