लालीची गोष्ट भाग ३

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
11 Oct 2015 - 1:57 pm

भाग २

"रंगा आपण कुठे जातो आहोत? दामले सर माझी वाट बघत असतील रे गेटकडे." रंगाचा हात धरून धावत असताना लाली म्हणाली. रंगाला मात्र तिला उत्तर देणे जरुरी नाही वाटले नाही. तो तिला घेऊन अंधाऱ्या गल्ल्या पार करत भराभर चालत होता. लाली पुरती गोंधळली होती. ती फक्त चालत होती. किती वेळ ते दोघे चालत होते त्याची तिला कल्पना आली नाही. पण अचानक रंगा थांबला. तो एक ट्रेनचा मोडकळीला आलेला डब्बा होता.

"वर चढ." रंगा लालीला म्हणाला. आणि स्वतः वर चढला. लाली त्याच्या मागोमाग वर चढली. थोडा दम खाऊन रंगा तिला हसत म्हणाला;"तुझ्या त्या दामले मास्तरच काही खर नाही बर का लाली."

लालीने त्याच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघितले. "अग तो आता पुरता घाबरला असेल. तू नाही आलीस हे बघून. त्याला तुझ्यावर निट लक्ष ठेवायला सांगितलं होत. तुझी बोली लागणार होती न २-४ दिवसात." हे एकून लाली चमकली. रंगा आपल्याच नादात बोलत होता;"अम्माने आतापर्यंत अख्खा मोहोल्ला हलवला असेल. पण तिला माझा संशय नाही येणार. मी तिच्याकडचा दलाल नव्हतोच. साली पैसा देताना खळखळ करायची. आणि कस्टमर्स तर तिला सगळे vip हवे असायचे. साली! आपण मागच्या मोहोल्ल्यात असायचो. चार दिवसांपूर्वी माई आली तोपर्यंत मी तुला विसरून पण गेलो होतो. पण माईने सगळ सांगितल आणि आपण तिला वाचन दिल... कूच भी होयेंगा तो भी चलेगा पण आपण लालीला त्या ताईच्या हवाली करणार आणि तो पर्यत लाली आपली जिम्मेदारी. माईने सुखी नंतर मला सांभाळला होता मी कामाला लागेपर्यंत. उसका कर्जा कभी तो उतारना था."

"म्हणजे तू केवळ कर्ज म्हणून मला मदत करतो आहेस का?" लालीने रंगाला तीव्र स्वरात प्रश्न केला. रंगाने लालीकडे बघितले आणि तो हसला. "नही लाली. तुने बोहोत पढना चाहिये ऐसे मुझे लगता हे इसलिये मै तेरी मदत कर रहा हु. तू हुशार आहेस. तू साली मोठी झाली पाहिजेस." अस म्हणून त्याने कागदातून बांधून आणलेला वाडा पाव बाहेर काढला. एक लालीला दिला आणि २ स्वतःसाठी ठेवले. ते बघून त्या परिस्थिती देखील लालीला हसू आले.

एक-दोन नाही तब्बल ३ महिने लाली त्या ट्रेनच्या डब्ब्यात काढले. रंगा चोवीस तासात कधीतरी येऊन जायचा. तिला खाण घेऊन यायचा आणि त्याचवेळी लालीच्या गायब होण्यामुळे बाहेर झालेल्या हंगाम्याच्या खबरी तिला द्यायचा.

लाली परीक्षा केंद्रातून बाहेर न आल्याने सरांची खूप पंचायीत झाली होती. निर्मला ताई आणि दामले सरांवर अगोदर संशयाची सुई आली. परंतु त्यांनी खूप स्पष्ट शब्दात सांगितलं की आमच्यावर एका लालीची नाही तर इथे असणाऱ्या प्रत्येक मुलाची आणि मुलीची जवाबदारी आहे. त्यामुळे एका मुलीला पळायला मदत करून आम्ही इतर मुलांचे नुकसान करणार नाही. त्या दोघांचा हा मुद्दा सर्वाना पटला. पण अम्माने मात्र शीलाला मारून मारून अर्धमेली केली. आजू-बाजूच्या दोघी तिघी मध्ये पडल्या म्हणून केवळ शीला वाचली होती. त्यानंतर शिव्यांची लाखोली रोज अम्मा जप केल्याप्रमाणे शीलाला द्यायची. शीलाच बाहेर पडण बंद केल गेल होत. सुरवातीचे काही दिवस तिला ट्यूब जेल मध्ये ठेवल होत.

रंगा एक एक खबर लालीला देत होता. नशिबाने कोणालाच रंगाचा संशय आला नाही. त्याच कारण म्हणजे लाली शिकायला लागली आणि रंगाने स्वतःच तिच्यापासून स्वतःला तोडून घेतल होत. आणि कधी इतर कोणाशी बोलताना लालीचा विषय निघाला तरी तो वैतागून म्हणायचा;"वो तो madam हे भाई. अपना क्या लेना देना उससे."

अम्माने शीलाला परत धंद्याला लावलं. मात्र आता अम्मा शीलाच्या बाबतीत जास्त क्रूर झाली होती. ती एक-एकदा शीलाला उसंत मिळू देत नव्हती किंवा तिला पैसे पण मिळू देत नव्हती. कस्टमरचे पैसे ती त्यांच्याकडून वसूल करायची . पण शीला तोंडून अवाक्षर काढत नव्हती. मात्र हळू हळू लालीच जाण सगळ्यांनी स्वीकारलं.

आणि एक दिवस रंगा आल्या-आल्या म्हणाला;"चल लाली." लाली गोंधळली. "कुठे जायचं रंगा? आपण पकडले गेलो तर?" तिने घाबरून विचारलं.

"तू चल तो. मी बघून घेतो ना सगळ. तू चल इथून." अस म्हणून रंगाने तिला रेलच्या डब्ब्यातून उतरवली. लाली रंगाच्या मागून निघाली. खूप चालल्यानंतर रंगा लालीला एका मोठ्या इमारतीच्या गेट जवळ घेऊन आला. अजूनही लालीला काय चालू आहे त्याचा अंदाज नव्हता. थोड्यावेळाने गेटजवळ एक रिक्षा थांबली आणि त्यातून निर्मला ताई उतरल्या. त्यांना बघताक्षणी लालीचा सगळा धीर सगळा बांध फुटला. ती धावत जाऊन त्यांच्या गळ्यात पडली. तिला बघून निर्मलाताई चक्रावून गेल्या होत्या. त्यांनी रंगाला तर ओळखलेच नव्हते. एक तर तो त्यांच्या संस्थेत खूप कमी दिवस आला होता आणि लहान वयातच आयुष्याला लागलेल्या वेगळ्या वळणामुळे त्याचाताला कोवळेपणा करपून गेला होता.

"लाली तू? इथे कशी? कोण हा? याचा हात धरून पळालीस? अग निदान आपल्या माईचा तरी विचार करायचास ना! बिचारी रोज रोज मार खायची. निदान तिला सांगून तरी जायचस." निर्मलाताई तिला जवळ घेऊन बोलत होत्या. आणि लाली फक्त रडत होती.

रंगा पुढे झाला आणि म्हणाला;"ताई तुम्ही मला ओळखल नसाल. मी फार नाही आलो तुमच्या इथे. माझ नाव रंगा. मी लालीचा दोस्त आहे. पण लाली माझा हात धरून नाही पळाली. माईनेच तिला माझ्याबरोबर पाठवली. ताई लालीच्या लास्ट पेपर नंतर तिची बोली लागणार होती. लाली तर टोटल चिकना आयटम... म्हणजे मस्त दिसते. तो फिर उसकी बोली बडी लागती और कोई खरीद लेता तो वो माई को कभी भी नही दिखती. म्हणून माई एका दुपारी मला भेटली. आणि माझ्याकडून शपथ घेतली की मी लालीला पळवून मग तुमच्याकडे आणून सोडीन. माईसाठी आपण काय पण करणार. आणि लाली तर हुशार पोरगी आहे. आयुष्यात कधीतरी या चांगल्या कामाचा फायदा होईल. बर ताई चालतो. आता लाली तुमच्याकडे." अस म्हणून तो निघाला. आणि पुढे जाऊन परत लालीकडे आला. तिचा हात हातात घेऊन म्हणाला;" लाली आपल्याला विसरू नको हा कधीपण. आणि माईला घेऊन जा त्या नरकातून. आपण तुझ्या टच मध्ये राहू." आणि मग एकदम तिच्याकडे पाठ करून निघून गेला. त्याला त्याचे अश्रू तिच्यापासून लपवायचे होते. लालीला नवीन आयुष्य सुरु करताना जड जाऊ नये आणि तिचे पाय मागे अडकू नयेत याची काळजी घेऊन रंगा परत त्याच्या दुनियेत निघून गेला.

निर्मलाताई लालीला घेऊन घरी गेल्या. ताईंकडे त्यांचे रेटायर्ड झालेले यजमान आणि त्या असे दोघेच असायचे. त्यांचे दोन्ही मुलगे परदेशात शिकून तिथेच राहिले होते. ताईंनी यजमानांना लालीची एकूण परिस्थिती सांगितली. आणि आता हीच काय करूया अस विचारल.

"काय करायचं म्हणजे? लाली इथे राहील आणि शाळेत जाईल. आपण तिला शिकवू तर शकतोच न निर्मला. लाली तू इथेच रहायचं आहेस. काही काळजी करू नकोस. सगळ ठीक होईल बेटा." त्यांचा या बोलण्यामुळे निर्मलाताईना एकदम मोकळ वाटल. त्यांची देखील तिच इच्छा होती; पण यजमानांना चालेल कि नाही याचा अंदाज नसल्याने त्या काही बोलल्या नव्हत्या.

ताईंनी लालीला शाळेत घातली. लाली देखील मनापासून अभ्यास करायची. शाळा सुरु झाली आणि काही दिवसांनी लाली निर्मलाताईच्या मागे लागली की त्यांनी तिला कुठेतरी कामाला लावावी. लाली अगदी हटूनच बसली आणि मग ताईंनी तिला त्यांच्या ओळखीच्या एका ड्रेस designer कडे मदतनीस म्हणून लावली. ......... आणि लालीच्या नव्या आयुष्याला सुरवात झाली.

लाली एक एक वर्ष पुढे सरकत होती. तिच व्यक्तिमत्व दिवसागणिक खुलत होत. शाळा अभ्यास आपल काम आणि निर्मलाताईना घरकामात मदत... असा लालीचा दिनक्रम ठरून गेला होता. शाळेत ती प्रत्येक स्पर्धेत भाग घेत होती. आणि चमकत देखील होती. लालीने दहावीची परीक्षा दिली. पुढे काय कराव याचा अलीकडे ती सारखा विचार करत होती.

एकदिवस ती कामावरून परत आली आणि काका आणि ताई चिंतेत दिसले. लालीने ताईजवळ जाऊन विचारल.;"काय झाल ताई?कसली चिंता आहे तुम्हाला दोघांना?"

ताई एवजी काकाच म्हणाले;"अग अक्षयचे... आमच्या मुलाचे... पत्र आले आहे. सून प्रेग्नंट आहे. हिला ते तिथे बोलावत आहेत. आणि हिला तुझी काळजी वाटते आहे."

लालीने ताईचा हात हातात घेतला आणि म्हणाली;"ताई माझी काळजी नका करू तुम्ही. मी स्वतःला निट सांभाळू शकते. जा तुम्ही दोघे."

ताई हसून म्हणाली;"अग आम्ही दोघे नाही जाणार आहोत. मी एकटीच जाणार आहे." त्यावर हसत लाली म्हणाली;"मग काकांची चिंता करू नका तुम्ही. मी आहे ना. घरातल काम आणि स्वयंपाक सगळ बघीन मी. आता तर शाळा पण नाही."

आणि मग ताई सुनेच्या बाळंतपणासाठी अमेरिकेला गेल्या. दिवस छान जात होते. लाली रोज स्वयंपाक आणि घरातली काम आवरून कामाला जायची आणि संध्याकाळी येऊन बाकीचे काम उरकायची. लालीला जरी ताईनी घरात ठेवली होती तरी लाली तिची पायरी सांभाळून असायची. त्यामुळे ती कायम स्वयंपाकघरात झोपायची.

एकदिवस ती संध्याकाळी घरी आली तर घरातले सगळे दिवे बंद होते. तिने दिवे लावले आणि काळजी वाटून काकाना हाक मारायला लागली. काकांनी बेडरूम मधून ओ दिली. लाली लगेच तिथे धावली. काका बेड वर पडले होते आणि अस्वस्थ वाटत होते.

"काय झाल काका? मी डॉक्टरना बोलावू का?" तिने काळजी वाटून काकाना विचारले.

"काही नाही ग. जरा दुपार पासून अंगात कणकण आहे अस वाटत आहे. डोक पण दुखत आहे खूप." काका खोल आवाजात म्हणाले.

"अरे मग फोन करायचात न मला. मी लवकर आले असते काका. थांबा तुम्हाला पेज करून देते/" अस म्हणत ती मागे फिरली.

"नको ग. इच्छा नाही. त्यापेक्षा डोक दाबून देतेस का?" काकांनी विचारले.

"अरे काका कमाल करता. विचारता काय. देते न. आलेच. फक्त हात पाय धुवून देवाला दिवा लावून येते." अस म्हणून लाली आत गेली. आणि पटकन हात पाय धुवून, देवाला दिवा लावून परत आली. ती काकांच्या उशाशी बसून त्यांच डोक दाबू लागली. काका थोडावेळ शांत होते. पण अचानक त्यांनी लालीचे दोन्ही हात धरले आणि तिला अचानक आपल्या अंगावर ओढून घेतले. लालीला काय होत आहे हे समजायच्या आत ती काकांच्या अजस्त शरीराखाली दाबली गेली होती. आणि काका तिच्या कपड्यांशी झोंबत होते. त्यांनी तिचा कुर्ता फाडला. लाली मोठ्याने किंचाळली. तिला एकूण प्रकार लक्षात आला. पण अस काही होईल असा विचार तिने स्वप्नातही केला नव्हता. ती प्रतिकार करत होती. पण तिची शक्ती कमी पडत होती. काकांनी तिचे दोन्ही हात तिच्या डोक्यावर एका हाताने दाबून धरले आणि त्यांचा दुसरा हात तिच्या सालवारीच्या नाडीशी झोंबू लागला आणि अचानक लालीला कुठूनतरी बळ आले. तिने सगळा जोर लावून काकाना ढकलले . कामांध झालेल्या काकाना लालीमध्ये इतका जोर असेल याची कल्पना आली नाही. तिने दिलेल्या धक्याने ते एका बाजूला कलंडले. त्या क्षणाचा फायदा घेत लाली एकदम उठली आणि बाथरूमकडे धावली. ती आत शिरली आणि तिने आतून कडी लावून घेतली. आपण सुरक्षित आहोत याचा अंदाज आल्यावर मात्र तिला रडायला यायला लागल.

'ताई किती विश्वासाने आपल्याला काकांकडे सोडून गेल्या. गेली ३ वर्ष ज्यांनी आपल्याला मुलीसारख वागवल त्या काकांनी अस कराव. आता मी काय करू.' लालीच्या मनात विचारांचा पूर आला होता. तिने दाराला कान लावला. पण बाहेरून काहीच आवाज येत नव्हता. बराच वेळ झाला तरी सगळ शांत होत. आता मात्र तिच्या काळजाचा टोका चुकला. काकांच काही बर-वाईट तर झाल नसेल न? त्या परिस्थितीत ही तिच्या मनात एक विचार डोकावून गेला. आणि त्याचवेळी बाहेरून दारावर थाप पडली.

"लाली..... लाली......" काका बाहेरून हाक मारत होते.

त्यांचा आवाज एकला मात्र क्षणापूर्वी त्यांची काळजी करणारी लाली संतापाने लाल झाली.

काका अजूनही आर्जवी स्वारात तिला हाक मारत होते;"लाली प्लीज बाहेर ये. मला माफ कर ग. मला खरच माहित नाही मला अस काय झाल होत. मी तुझे पाय धरायला तयार आहे. पण बाहेर ये. लाली..... बेटा....."

त्यांच्या तोंडून बेटा शब्द एकला मात्र लालीच्या तळपायातली आग मस्तकात गेली. बाथरूम मधला कपडे धुवायचा धोका घेऊन ती बाहेर आली.

"बेटा? बेटा? लाज नाही वाटत म्हाताऱ्या. अरे रस्त्यावरून आले असले तरी मी रस्त्यावर नाही पडलेले. समजलास. भडव्या काय समजतोस? मला नासवल असतस ना तर तिथल्यातिथे तुला नपुसक करून टाकला असता. मग दोन पोरांचा बाप असूनही दोन पायांच्या मधला ऐवज या वयात हरवून बसला असतास.... तुला काय वाटल मी काय साध-सुध कोकरू आहे? भेंडीच्या तुझ्या घरात फक्त ३ वर्ष आहे मी. त्याअगोदरची सगळी वर्ष मी अशा ठिकाणी काढली आहेत की तूच काय तुझ्यासारखे १० जण झोपवू शकते मी या एका दांडूक्याने" लाली डोळ्याने आग पाखडत होती आणि तोंडाने जाळ!

काका गयावया करायला लागले होते. "लाली मला काय झाल मलाच कळल नाही ग. गेले दोन दिवस फक्त तूच दिसत होतीस. जागे पाणी पण आणि झोपेत पण. घोड चूक झाली माझ्या हातून. मला माफ कर. काय तोंड दाखवीन ग मी निर्मलाला आणि माझ्या मुलांना? माफ कर ग लाली."

पण लाली आता माफ करण्याच्या मनस्थिती नव्हती. आणि पुढे काय कराव हे देखील तिला सुचत नव्हत. मात्र तिने काकाना दम देवून गप्प केल. आणि झराझर हाताला मिळतील ते स्वतःचे कपडे उचलून ती घराबाहेर पडली.

कथा

प्रतिक्रिया

दत्ता जोशी's picture

11 Oct 2015 - 5:26 pm | दत्ता जोशी

दुःखांत करू नका प्लीज.