ऑफिसला लागताना आम्ही दोघी एकत्रच लागलो. बाकी सगळे मुलगे होते. मुली अशा आम्ही दोघीच. खर तर ती थोडी उशिरानीच जॉईन झाली . जवळ जवळ एक महिना उशिरा. मी तिची अगदी आतुरतेने वाट बघत होते आणि ती जॉईन झाली. साडी नेसलेली ( मी आश्चर्यचकित -ऑफिस ला जॉईन होताना साडी ?). दिसायला पोक्त वगैरे चष्मा/ पदर दोन्ही खांद्यावरून पुढे घेतलेला. डोक्याला चपचपीत तेल लाऊन त्याची एक छोटीशी वेणी घालणारी. बंगलोर जवळच्या एका कुठल्यातरी आडगावातून आलेली. मुंबईत राहायला घर नाही म्हणून लांबच्या नातेवाईकांकडे राहणारी. आली तेव्हा अशी होती.
खर सांगायचं तर मी चक्क हिरमुसले. अगदी नाराज झाले म्हणा ना पण बघता बघता आमच्या या सुरवंटाच फुलपाखरात रुपांतर झाल की. मुंबई तिला चांगलीच मानवली म्हणायची. दोन्ही खांद्यावरचा पदर एकाच खांद्यावर आला. चपचपीत तेल लावणारी आत्ता रोजच्या रोज तेल लावेनाशी झाली. मस्त केस भुर्भुरायला लागले. चष्म्याच्या जागी कॉनट्याक्ट लेन्स आले. एकदम मस्त दिसायला लागली. छानच कडक. गोष्टी खूप पटापट घडत होत्या. तिला नोकरीला सहा महिने झाल्या झाल्या घरच्यांनी तिच्या लग्नाचं बघायला सुरवात केली आणि लग्न ठरलंच कि तीच. चला मुंबईत आत्ता तिला हक्काच घर मिळणार होत तर स्वताच. तिच्या बरोबरीने मी पण खुश झाले. नवरा दुबईत काम करणारा. आडगावात लहानपण गेलेल्या तिला हा मोठा कल्चरल शोकच होता पण तिने समजुतीने घेतलं आणि बघता बघता रुळली ती मुंबईत.
थोड्या महिन्यांनी नवर्यांनी "दुबईला चल" म्हणून आग्रह करायला सुरवात केली पण हिचीच ईछ्या नव्हती. मला म्हणायची" एवढी लागलेली गव्हरमेंट ची नोकरी कोण सोडणार आणि दुबईत जाऊन मी काय करू? नुसती घरात बसून रांधा/ वाढा/ उष्टी काढा? नाही जाणार मी दुबईत "मी म्हणायची बघ बाई. काय ठरवायचं ते पूर्ण विचारांती ठरव " ती म्हणे "विचार केलाय मी"
हळू हळू तिच्या दुबईत न जाण्याच्या निर्णयावरून घरात खटके उडायला लागले. काय करू मी दुबईत जाऊन ? ती म्हणे तिथे दिवसभर घरात बसून राहणार आणि संसारामध्ये अडकणार. नको वाटत ग. तिच्या सासरच्या घरामध्ये तिचा हा निर्णय कोणालाच आवडला नाही . आत्ता छोट्या छोट्या खटक्यांनी उग्र स्वरूप धारण करायला सुरवात केली होती. नवरा दुबईत. घरात सासू-सासरे आणि नणंदा. त्याचं करण्यात ती कंटाळून गेली त्यात दुबईला न जाण्याचा निर्णय घेतल्यावर तर घरातल्या लोकांच्या वागणुकीत चांगलाच फरक पडायला लागला. घरातल्यांनी तिच्याशी अबोला धरला रोजची धुसफूस - भांडण आणि अशातच तिच्या आयुष्यात तो आला. तिची काळजी घेणारा. तिच्या टेबलावर रोजच्यारोज पाणी आणून ठेवणारा. चहा आणून ठेवणारा तिची आस्थेने चवकशी करणारा. तिला कुठेतरी तेच पाहिजे होत. रोजच आपलं माणूस काळजी घेणार. ती खुश होती. रोजच्या रोज कुठेतरी कोपर्यात बसून त्या दोघांच बोलण चालायचं हसण खिदळण. काही तरी वेगळच घडत होत. मला स्वतःला अस्वस्थ करणारं. काय असेल त्याचं नातं? काय होणार होत त्यांच्या या नात्याचं?
त्यांच्या या नात्याला कुठलाही तरी वेगळा रंग प्राप्त होणार होता का? हो होणारच होता. पण इतक्या वेगानी? घटना इतक्या वेगानी घडल्या कि ऑफिस मध्ये कुणाच्या लक्षात यायच्या आत आणि जास्त कुठलाही बोलबाला व्हायच्या आत ती चक्क त्याच्या बरोबर पळून गेली कि. नवरा, घरसंसार सगळ सोडून? ऑफिस मध्ये बातमी पसरली आणि सगळं ऑफिस शॉकमध्ये. असं पण घडू शकत? हॉरिबल. जस्ट हॉरिबल. पण घडलंच तस होत.
आत्ता तर तिने अशा पद्धतीने वागून नवर्याला / नवर्याच्या घरातल्या सगळ्यांनाच वेगळ काही करायला पर्यायच न ठेवल्याने डायव्होर्स होण अपरिहार्यच होत आणि तसा तो झालाच. एकमेकांच्या सहमतीने. पण त्या काळातही "ही" त्याच्या बरोबर त्याच्या चाळीतल्या खोलीत राहत होती आणि हे पाहून तर अख्या ऑफिस ची पाचीच्या पाची बोट तोंडात जायची बाकी होती. आली तेव्हा कशी होती? आणि आत्ता काय झालं? आम्ही ऑफिस मधले सगळेच शॉकमध्ये.
तिचं मात्र बसं चाललं असावं चाळीतल्या त्या एका खोलीत. रोज ऑफिसला येत होती पण तस तिचही कोणाकडे लक्ष नसायचं आणि ऑफिसचही. सगळे तिच्याशी बोलायला घाबरतच होते माझ्या सकट. मनात यायचं? कसे आम्ही दोघींनी एकत्र दिवस/ महिने काढले होते आणि आत्ता काय हि तिची अवस्था." अर्थात त्याला तीच जबादार होती. त्यांचा डायव्होर्स झाल्यावर तिने लग्न केल त्याच्याशी आणि बघता बघता दिवस पालटले. आत्ता ती त्याच्या हक्काची झाली होती ना. आत्ता तिला वेगळ खुश ठेवण्याची जरुरी नव्हती त्याला. मग तर काय कसंही वागण सुरु झाल त्याचं. मोकाटच सुटला तो. रोज दारू पिउन घरी यायला सुरवात झाली आणि दारूकरता तिच्या कडे पैसे मागायलाही. लग्न झाल्या झाल्या आधी धारण केलेला चांगुल पणाचा मुखवटा खाडकन गळून गेला आणि ती खरी हादरून गेली. पण करता काय? परिस्थितीला निमुटपणे शरण जाण्याशिवाय पर्याय तरी होता का? रोज ऑफिस ला यायची ती दुर्मुखलेली कशी तरी काम करणार आणि जाणार.
एके दिवशी ऑफिस ला आली ती अवतारातच. केस पिंजारलेले. आंघोळ तरी केली होती कि नाही देवच जाणे. आल्या आल्या माझ्या टेबल जवळ येउन कोसळून रडायलाच लागली.अरे काय झाल काय ? मी पण एकदम गोंधळून गेले . तिला हाताला धरून पहिल्यांदी लेडीज मध्ये नेल. म्हटलं आधी तोंड धू. शांत हो बघू आणि मग काय ते बोल. तुफान रडत होती.
"मी फसले ग. पूर्ण फसले. ठार फसले"
अग झाल तरी काय?
"काय झाल नाही ते विचार. रात्रभर मारहाणी शिवाय दुसर पदरात काहीच नाही ग "
मी पण खर तर हादरून गेले. काहीच बोलायला सुचेना आणि मी तरी काय बोलणार होते तिच्याशी ? खर तर "तुझच चुकलय. भोग आत्ता आपल्या कर्माची फळ " अस प्रकर्षाने म्हणावस वाटत होत. पण मी आपली शांतपणे तिच्या पाठीवरून हात फिरवत बसले. "काहीतरी नक्की मार्ग निघेल. आपण काढू" अशी खोटी खोटी आशा दाखवत राहिले. माझ्या हातात तरी दुसर काय होत? घरी गेल्यावर सुद्धा तिचा विचार पाठ सोडत नव्हता. काय हे? काय हि तिची अवस्था? खूप वाईट वाटत होत. कस बर तिला बाहेर काढता येईल या सगळ्यातून? काय कराव? खूप विचार करत होते. मग विचार करता करता एक मार्ग सुचला आणि लगेचच तिला सांगितला. तिला म्हटलं "एकदम टॉप बॉसेसना भेट आणि तुझ्या माहेरच्या गावच्या जवळ म्हणून बंगलोर मध्ये ट्रान्स्फर मागून घे." तिला एकदम पटलं ते. डोळे लुकलुकले. येस तेच करते म्हणाली. म्हटलं "जरा जपून त्याला सुगावा लागू न देता करायचं आहे हे सगळं" . ती म्हणाली "माहितीये मला". हुशार ना आमची बाई.
लगेचच वरच्यांना भेटली. वरच्यांनी (वरिष्ठ) पण तिला दिलासा दिला "करणार तुझी ट्रान्स्फर करणार. पण पटकन ऑफिसर ची परीक्षा दे बघू आधी. लगेचच करतो तुझी ट्रान्स्फर". आमची बाई जिद्दीची. एवढ्या कटकटीन मधून पण धडाधड पेपर दिले आणि पहिल्या झटक्यात पास होऊन ऑफिसर झाली सुद्धा. परत आपली वरच्याच्या केबिन मध्ये हजर" आत्ता पाळा शब्द तुमचा". वरच्यांना पण कुठेतरी कणव वाटत होती तिच्या बद्दल. बाई हुशार आहे पण अशी अशी भरकटली. होत असं कुणाकुणाच्या आयुष्यात. वरच्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि हिची ट्रान्स्फर झाली. गुपित मला येउन सांगितलच. आनंदाचे अश्रू पण माझ्या ओंजळीत घालून गेली. आत्ता नवर्याला न सांगता सगळ्या गोष्टी करण्याची तिला खबरदारी घ्यायची होती. सामानाची बांधाबांध चाललेली नवर्याला दिसत होतीच.
काय ग? कुठे चाललीस?
जरा माहेरी जाऊन येते. वडिलांची तब्बेत बरोबर नाहीये.
ठीक आहे जा पण जाताना मला पैसे देऊन जा. ३० हजार.
कशाला रे पाहिजेत तुला.?
असेच. तुला काय करायचंय? जास्त प्रश्न विच्रायचे नाहीत. समजलीस ना. मुकाटपणे पैसे दे. कुठल्या गाडीने जाणार आहेस?
तिने गाडीच नाव आणि तिकिटांची झेरॉक्स त्याच्या हातात ठेवली. पैसे स्टेशन वरच देते म्हणाली. काढावे लागतील ना एवढे कुठे जवळ बाळगून असते. नवर्याला पण पटलं."
दुसर्या दिवशी घरातून निघाली. नवरा नेहमी प्रमाणेच घरात नव्हताच. तिलाही तेच पाहिजे होत.
टॅक्सीत बसली आणि डायरेकट एयरपोर्ट गाठलं प्लेननि बंगलोर आणि बंगलोर वरून माहेरी. माहेरी पोचल्यावर मला फोन केला. " अशी अशी मी प्लेन नीच घरी पोचले बर का. ट्रेन च्या भानगडीत पडलेच नाही. त्याला तीस हजार रुपये द्यावे लागले असते ना. आत्ता माहेरी सुखरूप पोचलेय. पण आत्ता नवरा तुफान पिसाटेल. नवर्याचा काही ऑफिस मध्ये चौकशीला फोन आला तर तस खर तर कोणालाच माहिती नाहीये. फक्त तुलाच माहितीये म्हणूनच तुला म्हणून सांगते. तुझ्याकडे चुकून माकून चौकशी केलीच तर मला काहीही माहित नाही म्हणून सांग".
मी सांगितलं "अजिबात काळजी करू नकोस ग. मी घेईन काळजी. आत्ता माहेरी सुखरूप पोचली आहेस ना. आत्ता मात्र नीट वाग. नीट रहा "
तिचा फोन ठेवला आणि मला एकदम सुटल्या सुटल्यासारख वाटायला लागलं. प्रचंड मोकळं मोकळं. ती माझ्या आयुष्यातून गेली तर होतीच पण तिच्या संबंधातल्या काळज्या / तिची दुख्खं पण स्वता बरोबर घेऊन गेली होती. आत्ता तिची काळजी करण्याची मला जरुरीच नव्हती.
त्या नंतर ती कधीच मला भेटली नाही. तिचं पुढे काय झालं मला माहित नाही ना मी कधी जाणून घ्यायचाही प्रयत्न केला पण माझ्या आयुष्यातल्या एका पानावर तिचे अश्रू सांडलेत एव्हढं मात्र नक्की.
प्रतिक्रिया
4 Oct 2015 - 8:40 pm | एस
रोचक आठवण आहे. कित्येकदा आयुष्याच्या प्रवासात अशी विसरून शकणारी, पण परत न येणारी वळणे येतात.
4 Oct 2015 - 8:41 pm | मांत्रिक
आई शप्पथ!!! पार काळजाला भिडलं लिहिलेलं!!!
4 Oct 2015 - 8:46 pm | पैसा
काय बोलावं.
4 Oct 2015 - 8:58 pm | जव्हेरगंज
लेखन आवडले.
मी तर म्हणेन ती बाई मुर्ख होती. किंवा तिला दु:खात जगायची आवड असणार.
4 Oct 2015 - 9:01 pm | समीर_happy go lucky
अविचाराने घाई करून परिस्थिती analyse न करता फक्त (माहित असलेल्या) एकाच दृष्टीकोनानाने निर्णय घेतले कि ते असे गळ्याशी यायची शक्यता असते, कधी कधी झगडणे या पर्यायापेक्षा परिस्थितीशी जुळवून घेणे हा पर्याय आयुष्यात आवश्यक ठरतो नाहीतर अशी वाताहत होते (वैयक्तिक मत)
4 Oct 2015 - 9:03 pm | समीर_happy go lucky
मला टायटल समजल नाही, हे तुमच्या आयुष्यातील दुखरे पान कसे काय?? "विसरण्यायोग्य आठवण" म्हणा हव तर पण "दुखरे पान"???
4 Oct 2015 - 9:22 pm | एकजटा अघोरी
आता बास करा!!! एखाद्या पुरुषाच्या बेकार प्रेमजालात एखादी स्त्री फसली तर ती मूर्ख होते का? तुम्हाला त्या दुष्ट मनुष्याचा राग येत नाही? त्याच्या कपटीपणाविषयी काहीच मत व्यक्त न करता तुम्ही तिलाच का नावे ठेवता आहात? ती बिचारी तर त्याच्याबरोबर चाळीत रहायला तयार झालती. अजून काय करावं तिनं? रस्त्यावर बूट पुसावेत काय त्या भुक्कडसाठी? त्यापेक्षा त्यानं मरुन का जौ नये?
5 Oct 2015 - 11:48 am | सुजल
ती आणि मी एकत्र जॉईन झाल्याने तिच्या मध्ये माझी मानसिक गुंतवणूक झाली होती. सगळ्या गोष्टी ती मला सांगत होती. त्या काळात तीच दुखः हे जणू काही माझच दुखः झाल होत त्यामुळे ते माझ्या आयुष्यातलं दुखर पानच होत. नाही कस ?
4 Oct 2015 - 9:26 pm | समीर_happy go lucky
^^^^^^^^^^हि झाली टोकाची प्रतिक्रिया पण काही प्रसंग असे असतात कि स्त्रियांचा तोल जास्त लवकर ढळतो अस माझ obsevation आहे [बहुबलीने कोणताही गैरसमज करून अंगावर येऊ नये]
4 Oct 2015 - 10:37 pm | तर्राट जोकर
काही प्रसंग असे असतात कि स्त्रियांचा तोल जास्त लवकर ढळतो अस माझ obsevation आहे
^^^^^^^^^^हि झाली टोकाची प्रतिक्रिया.
:-)
4 Oct 2015 - 10:42 pm | एकजटा अघोरी
धन्यवाद ट्ज बुवा!!!
4 Oct 2015 - 10:47 pm | असंका
:-))
4 Oct 2015 - 10:18 pm | चित्रगुप्त
आवडले लेखन.
२-३ ठिकाणी 'शोक' वाचून जरा आश्चर्य वाटले, मग कळले 'शॉक' लिहायचे होते ते.
तिने नंतर तुम्हाला एकदाही फोन केला नाही याचे जरा आश्चर्य वाटले. सहज कधी जमले तर तिला फोन करून चवकशी करायला हरकत नाही असे वाटते. काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळवून टाकावीत. कळले तर आम्हालही कळवा.
5 Oct 2015 - 12:01 am | तर्राट जोकर
काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे मिळवून टाकावीत. कळले तर आम्हालही कळवा. >> सहमत.
प्रत्येकाच्या आयुष्यात अनाकलनीय घटना घडतात. त्रयस्थ व्यक्तीने 'असे का नाही केले, तसे का नाही केले' असे मागाहून म्हणणे सोपे असते. सुजाण लोकांनी कुणाच्याही आयुष्यात अशा घटना घडू शकतात याची नोंद ठेवणे, तसे काही लक्षणं आढळत असल्यास योग्य व शक्य असल्यास मार्गदर्शन करणे हे करावे. बाकी ज्याचं त्याचं प्राक्तन.
राहता राहीला कुणी कुणाला फसवण्याचा प्रश्न. 'मला कुणीही फसवू शकत नाही' म्हणणारेही फसवणुकीस बळी पडतात. तस्मात कुणी फसले गेल्यास 'असा कसा तू मूर्ख' म्हनुन कुणाची अवहेलना बरी नव्हे.
5 Oct 2015 - 10:09 am | पैसा
असे खूपदा पाहिले आहे की एखाद्याला आपण अतिशय महत्त्वाची मदत केली असेल तर त्यांना त्या मदतीचे, उपकाराचे ओझे वाटते आणि मग ते आपल्यासमोर आले की उपाकाराखाली दबल्यासारखे वाटते म्हणून म्हणा, आपल्यासमोर यायचे टाळतात किंवा संबंध ठेवणे नाकारतात, किंवा त्यात काय मोठं असं म्हणून मुळात काही महत्त्वाची मदत केली होती हेच नाकारतात. कदाचित मदत करणार्यासमोर येताना आपण कमी पडलो ही भावना मूळ धरत असेल किंवा तो संकटाचा कालखंड आठवणीतूनही काढून टाकायची धडपड असेल. मात्र असे खूपदा अनुभवले आहे. त्यामुळे आता जर कोणी मला असे टाळायचा प्रयत्न करत असेल तर मीही त्याला विसरून जाते म्हणजे मग त्याने असे का केले हा प्रश्नच शिल्लक रहात नाही!
5 Oct 2015 - 11:01 am | तर्राट जोकर
ह्या शक्यतेस व आपल्या अनुभवाधारित भावनेस अनुमोदन.
पण त्या व्यक्तीचे आयुष्य योग्य प्रकारे चालले आहे की नाही याबाबत उत्सुकता राहतेच. ती मजेत जगत असेल तर संपर्काचा, जुन्या आठवणी उगाळण्याचा प्रश्नच येत नाही. पण "यदाकदाचित समस्येत असेल व त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे पण आधीच्याच आठवणींनी अपराध्यासारखे वाटत असेल, मदत मागायची लाज वाटत असेल तर.." हा ही एक दृष्टीकोन असू शकतो.
असो. शक्यता अनेक असतात. निर्णय दोघांनीच घ्यावा. तो त्यांच्यापुरता मर्यादीत ठेवला तरी चालेल. इथे नाही कळवले तरी चालेल. आपण कुणा त्रयस्थाच्या आयुष्याला आप्ल्या मनोरंजनाचे साधन बनवणे तर अमानुषच आहे.
4 Oct 2015 - 10:51 pm | रातराणी
लेखन आवडले.
4 Oct 2015 - 11:40 pm | दिवाकर कुलकर्णी
मेलोड्रामँटिक वाटतं,
4 Oct 2015 - 11:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुन्न करणारा अनुभव.
5 Oct 2015 - 12:48 am | उगा काहितरीच
वेगळाच अनुभव !
5 Oct 2015 - 1:12 am | ज्योति अळवणी
वाचून खरच मन दुखलं. तिच्या होणाऱ्या परवडीमुळे. अचानक मिळालेल्या मोकळीकीमुळेही असेल कदाचित पण तिला नंतरची बांधिलकी नको होती. त्यातूनच अविचारी पाउल उचलले गेले असेल. पण हिमतीने त्यातून ती बाहेरही पडली. ते महत्वाचे. कदाचित तुम्हाला contact केला तर तिच जुनी दु:ख मान वर काढतील म्हणून तिने परत कधी contact केला नसेल. कदाचित आता ती खूप सुखी असेलही.
5 Oct 2015 - 1:13 am | विवेक ठाकूर
तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!
5 Oct 2015 - 8:41 am | अजया
एक चूक तिला आयुष्यभर भोवली.आता कदाचित तिच्या ठावठिकाण्यामुळे आधीचा नवरा तिला त्रास देऊ नये किंवा तिच्या आयुष्यातले ते पानच तिने मिटवून टाकले असावे.अशा घटना होतच असतात मात्र आपल्या आजुबाजूला.यात स्वतःची फार मानसिक गुंतवणूक करु नये मात्र.
5 Oct 2015 - 8:50 am | नाखु
तीच्या धाडसाला सलाम आणि तुम्हाला धन्यवाद.
आक्रस्ताळी प्रतीसादकांना "स्त्री मुक्ती " आणि "मुक्त स्त्री" यातला नेमका फरक ही कथा वाचून येईल अशी आकाशातल्या बाप्पा कडे आर्जवी प्राथना करून माझे ४ शब्द संपवतो.
पु भा प्र.
चांगल्याला चांगलं म्हणणारी चिमणची हटेला संघटना.(अखिल मिपा मापंकाढे मित्र मंड्ळाशी संलग्न)
वि.सू. कट्ट्याला केलेली बॅट सूचना (सुरक्षीत अंतर )अंमलबजावणी केली आहे
5 Oct 2015 - 10:31 am | नूतन सावंत
चुका घडतातच.त्यातून सावरणे हेच खरे.पण पहिल्या लग्नावेळीच पालकांना,माझ्यासाठी परदेशी स्थळे पाहू नका असे सांगायला हवे होते.त्या मुलाला निष्कारण त्रास झाला.
5 Oct 2015 - 11:48 am | विवेक ठाकूर
5 Oct 2015 - 10:42 am | स्वाती दिनेश
आवडले तरी कसे म्हणू?
स्वाती
5 Oct 2015 - 11:11 am | खटपट्या
दुसर्या नवर्याला चाबकाने फोडले पाहीजे.
-निळा महाड
5 Oct 2015 - 1:05 pm | नाखु
+हिरवा पिवळा होईपर्यंत
तांबडा दगड
5 Oct 2015 - 11:12 am | पद्मावति
खरंच कठीण परीस्थती. लेखन आवडले.
5 Oct 2015 - 11:48 am | पदम
मैत्रि छान निभावलीत.
5 Oct 2015 - 1:35 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुन्हा तिला फोन करु नका आणि आत्ता काय सुरु आहे असं विचारू नका. कदाचित तिचं आयुश्य खुप सुखाचं असेल तसं व्हावं. पण आता अजुन काही तिच्या आयुष्यात त्रांगडं वाढलं असेल तर मला तरी वाचायचं नै ब्वा !
-दिलीप बिरुटे
5 Oct 2015 - 1:51 pm | द-बाहुबली
आता तिच्या लक्षात आले अस्ल तारेवरची कसरत कशाला म्हणतात ते. चांगी सरकारी नोकरी होती टाकली असती १ वर्शाची रजा आली असती दुबैत राहुन काय बिघडले असते ?
5 Oct 2015 - 2:31 pm | तर्राट जोकर
नोकरीच्या सुरवातीची दोन वर्षे कसलीही सूट मिळत नाही.
5 Oct 2015 - 2:47 pm | प्यारे१
दुखरं पान मैत्रिणीच्या आयुष्यात होतं. ते तिनंच निर्माण केलं होतं किंवा झालं होतं म्हणा. कधी कधी नेव्हर एन्डींग दु:खाचा काळ सुरु आहे असं वाटतं. पण मैत्रिणीनं त्यातून सुटका करुन घेतली. काही चुका केल्यानंतर भूतकाळ पूर्णतः पुसून टाकावासा वाटतो. मैत्रिणीला आपली चूक कधीचीच कळून आली असणार. अशा वेळी त्या मैत्रिणी नं तुम्हाला काही कळवलं नाही अथवा क्णाशी संबंध ठेवले नाहीत तर आश्चर्य वाटायला नको.
अशी पानं पलटणं किंवा फाडणं च उत्तम. ;)
8 Oct 2015 - 7:22 pm | सूड
ही वाचायची राहून गेली होती. छान लिहीलंय!!
8 Oct 2015 - 7:29 pm | इडली डोसा
चांगलं लिहिलं आहे. कधि कधि कोणाशी ऋणानुबंध जुळले की त्या माणसाचे दु:ख पण आपलेच आहे असे वाटते. म्हणुनच तिची जी परवड झाली ती तुमची दुखरी आठ्वण झाली.
8 Oct 2015 - 8:11 pm | श्रीरंग_जोशी
कथा वाचल्यावर असेच विचार मनात आले.
पुलेशु.