बरेच दिवस झाले तरी नकटीचं लग्न ठरत नव्हतं. वधूपित्यानं संभाव्य वर शोधून ठेवले होते. आपणच मुलीचा सांभाळ केलाय, असं म्हणविणारे काके-मामेही प्रयत्न करून थकले होते. पण "कुलस्वामिनी' कौल देत नव्हती. काही ना काही अडचण सतत येत होती.
नकटीच्या लग्नापायी बऱ्याच जणांचं घोडं अडलं होतं. त्यांच्या सामाजिक कार्याच्या लालसेत अडथळा येत होता. समाजाच्या सेवेसाठी आयुष्य वाहून घेणाऱ्या त्या बिचाऱ्या प्रामाणिक गांधीवाद्यांचं, राष्ट्रवाद्यांचं सगळं अवसानच गळाल्यासारखं झालं होतं. इच्छा असूनही संधी न मिळाल्यानं समाजासाठी काही करता येत नव्हतं. नकटीच्या लग्नाचा एकदा बार उडवू, मगच समाजकार्य करू, अशी प्रतिज्ञा त्यांनी केली होती. पण कुठेतरी माशी शिंकत होती.
तसं एकदा वधूपित्यानं मनाचा हिय्या करून नकटीचं लग्न ठरवलंही होतं. स्वयंवरच मांडलं होतं म्हणा ना! तिला नटवून, सजवून मंडपात आणलं होतं. लग्नाची सगळी तयारी झाली होती. इच्छुक असलेले सगळे राजे-महाराजे, अथिरथी-महारथी जमले होते. सगळीकडे आनंदीआनंद होता. आता नकटीचं लग्न होणारच, असंच वातावरण होतं. मात्र पुन्हा कुलस्वामिनीनं डावा कौल दिला. झालं! सगळी मेहनत पाण्यात गेली. बरं, कुलस्वामिनीवर वधूपित्याची भक्ती अफाट. तिच्याशिवाय तर झाडाचं पानही हलायचं नाही. ती लांबच्या वारी असली, तरी विमानवारी करून तिच्या पायी लोटांगण घालण्याशिवाय कुणाला पर्यायही नव्हता.
मध्यंतरी बरेच दिवस गेले. नकटीचं लग्न हा आता नातेवाइकांच्या, शेजाऱ्यापाजाऱ्यांच्या आणि काही चहाटळ पत्रकारांच्याही चेष्टेचा विषय झाला होता. कुणीही यावं आणि टपली मारून जावं, अशी नकटीची आणि त्यातून वधूपित्याची अवस्था झाली होती. बरं, आधीच त्याच्या घरातल्या, घराबाहेरच्या अनेक समस्यांनी तो मेटाकुटीला आला होता. बाहेरून घरात येऊन त्याच्याच डोक्यावर ठाण मांडून बसलेल्या सोयऱ्यांनी उभा दावा मांडला होता. नकटीला आम्ही सांभाळू, असं जाहीर करून, वधूपित्याची लायकीही त्यांनी चव्हाट्यावर मांडली होती. अधूनमधून त्यांचंही कुलस्वामिनीला कौल लावणं चालूच होतं. पण कुलस्वामिनी भक्तांची परीक्षाच पाहत होती जणू. कुणालाच नीट कौल देत नव्हती.
...आणि एके दिवशी चमत्कार झाला! त्या बाहेरून आलेल्या परक्यांनी वधूपित्याची अब्रू पुन्हा चव्हाट्यावर मांडली आणि कुलस्वामिनीकडे धाव घेतली. आता वधूपित्याच्या हातून सर्व अधिकार जाणार आणि नकटीची जबाबदारी उपऱ्यांकडे जाणार, असंच निष्ठावंतांना वाटायला लागलं. पण झालं भलतंच. एवढे दिवस न पावलेली कुलस्वामिनी वधूपित्यावर अचानक प्रसन्न झाली. त्याच्या बाकीच्या मागण्या तर तिनं मान्य केल्याच, वर उपऱ्यांना गप्प बसण्यास सांगून त्याच्या पदरात आणखी दान टाकलं. आंधळा मागतो एक डोळा अन् देव देतो दोन म्हणतात, ते खोटं नाही. कुलस्वामिनीनं नकटीच्या लग्नालाही कौल दिला, तेव्हा तर वधूपित्याला आभाळ ठेंगणं झालं.
मंडप पुन्हा सजला. सनई-चौघडे वाजू लागले. घराला रंगरंगोटी झाली. वधूपिता कधी नव्हे एवढा तजेलदार दिसत होता. नकटीच्या लग्नाचा मुहूर्त एकदाचा ठरला...बारामतीच्या व्याह्यांबरोबर बोलणीही झाली. पुढं पुढं करणाऱ्यांचे कानही सोनारानंच टोचले, ते बरं झालं. आता पुढच्या आठवड्याच्या मुहूर्ताकडे सगळ्यांचे डोळे लागले आहेत...लग्नाला यायचं हं!
---
टीप ः या लेखातील सर्व पात्रे व घटना काल्पनिक आहेत. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, मंत्रिमंडळ विस्तार यांच्याशी त्यांचा संबंध आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा.