काही दिवसांपुर्वी मुंबईला आलो होतो. गोरेगावच्या एका रस्त्यावरून जाताना सहजच बाजूला असलेल्या बस स्टॉपकडे दृष्टी गेली आणि सर्व प्रथम नजरेत भरला तो एका जाहिरातीतला अक्षय कुमार, त्याच्या सुंदर निळ्या शर्टासहित. चेहऱ्यावर प्रसन्न भाव आणि नजरेत चमक. आणि दुसर्याच क्षणी दिसला तो त्याच्या छत्र छायेत गाढ निजलेला मनुष्य. त्या बस स्टॉपच्या अरुंद बेंचवर, वरील स्टीलच्या बारला धरून शांतपणे झोपला होता. पण शांतपणे तरी कसं म्हणता येईल ? त्याने, पडू नये म्हणून, दोन्ही हाताच्या पकडीने वरचा बार घट्ट धरून ठेवला होता. त्याची झोप गाढ असेल पण निर्धास्त नक्कीच नसेल, एकाचवेळी गाढ पण जागरूक.
ज्या रस्त्यावर हा बस स्टॉप होता तो फार रहदारीचा आणि गजबजलेला होता. समोरच एका मोठ्या बिल्डींगचे काम अगदी जोरात चालू होते, त्यातून सिमेंटने लादलेले ट्रक, जेसीबी आत बाहेर करत होते. जवळच सिग्नल असल्यामुळे रिक्षा, कार, टू-व्हीलरचे कर्णकर्कश्श हॉर्न सतत वाजत होते. त्यात पोलिसाच्या शिट्ट्या आणि लोकांची रहदारी. ह्या सर्व कोलाहला पासून अनभिज्ञ, तो अगदी शांतपणे पहुडला होता.
मला हा फोटो काढावासा वाटला त्यातील विरोधाभासामुळे. अक्षय कुमार सारख्या प्रसिद्ध आणि श्रीमंत कलाकाराच्या जाहीरातीखाली हा ‘क्ष’ शांतपणे पहुडला होता. एक आपल्या क्षेत्रात नावाजलेला तर दुसरा अगदी अनोळखी, एकाच्या समोर कुबेर हात जोडून उभा तर दुसर्याकडे झोपायला जागा नाही. एक निर्धास्त तर दुसरा झोपेत देखील जागरूक.
एक गोष्ट मात्र खरी, मुंबईत श्रम करणार्याला इतर काही मिळो न मिळो, दोन वेळचे जेवण तरी नक्कीच मिळते.
फोटोतील दोघेही आणि इतर असंख्य, मुंबईत त्याचसाठी तर येतात ना ?
मग सहजच म्हणावेसे वाटते, “ये है बंबई मेरी जान.”
प्रतिक्रिया
27 Sep 2015 - 11:24 am | दा विन्ची
छान निरीक्षण
27 Sep 2015 - 1:42 pm | दमामि
आवडले.
27 Sep 2015 - 2:19 pm | dadadarekar
.
27 Sep 2015 - 2:22 pm | जव्हेरगंज
आवडले
27 Sep 2015 - 2:28 pm | मांत्रिक
सुंदर! तटस्थता चांगली जमली आहे.
29 Sep 2015 - 3:06 am | सौन्दर्य
सर्व प्रतिसादांचे मन:पूर्वक आभार !
29 Sep 2015 - 8:57 pm | pradnya deshpande
छान
29 Sep 2015 - 9:14 pm | बिन्नी
छान आहे फोटो