काही दिवसांपूर्वी घरी एकटा होतो. उन्हं उतरली होती. सुटीची कामं, वाचन, टीव्ही पहाणं सगळं करून झालं तरी रविवारचा संधिकाल सरता सरत नव्हता. असं बर्याच दिवसांनी घडलं होतं. वेळ घालवायला मागच्या अंगणात गेलो. नेहेमीप्रमाणेच मावळत्या दिवसाला आणखी थोडं लांबवत, एकमेकांचा पाठलाग करत पक्षी झाडांवरून, विजेच्या तारांवरून झेपावत होते.
एकदम लक्षात आलं, खारी दिसत नाहीयेत आज. गेल्या महिन्यात तर कितीतरी होत्या. नेहेमी तारेवर एका टोकापासून दुसर्या टोकापर्यंत त्यांची पकडापकडी चालायची, मध्येच तारेला छेदून वाढणार्या झाडांच्या फांद्या लागल्या की तारेवरून झाडावर सूर, तिथून खाली, गवतावरून परत खांबाकडे, आणि मग पुन्हा तारेवरून पाठलाग. पण आज त्या दिसल्या नाहीत.
नीट पाहिलं तर दिसलं, त्या तारेवर लपेटून वाढलेली, त्या खारींना नाजूकपणे सांभाळून आधार देणारी आणि इतके दिवस हिरव्यागार पानांनी बहरलेली वेल उन्हाळ्याने तारेवरच सुकून गेली होती. पानं नव्हतीच कुठे. ज्या झाडावरून वाढत ती तारेपर्यंत आली होती, त्या झाडाशी तिचा संपर्क केंव्हाच तुटला होता, तिचं शुष्क करडं खोड बारीक दोरीसारखं होऊन असहाय्यपणे हवेत तारेखाली लोंबत होतं.
***********************
पंचाहत्तरी कधीच ओलांडून गेलेल्या आजींना दोन्ही पायांच्या गुडघेदुखीने अतोनात त्रास होत होता. पंधरा दिवसांत आज तिसर्यांदा डॉक्टरांकडे जाऊन आल्या होत्या नातवाबरोबर आणि नातसुनेबरोबर, पण काही त्यांना हवी तशी मदत झाली नाही. भेटीला आलेल्या पुतण्याला सकाळी सांगत होत्या, "अरे काय करतील डॉक्टर तरी, वाट्याच झिजल्या आहेत, आणि ते ऑस्टिओपोरॉसिस की काय ते झालंय म्हणे वयानुसार, आता याच्यापुढे आणखी काय अपेक्षा ठेवायची शरीराकडून? दिली तितकी साथ खूप म्हणायची! आणि या वयात ऑपरेशन वगैरे नकोच, ते डॉक्टरही रिस्क घेणार नाहीत, आणि मलाही झेपणार नाही. फक्त आपलं कुणावर ओझं नको इतकंच मागणंय देवापाशी!" स्वतः रिटायर होऊन पासष्टीला टेकलेला पुतण्या थोडा वेळ बसून, गप्पा मारून परत गेला.
दुपारची झोप झाली तशी आजी पाय खाली टेकवून उभ्या राहिल्या तर मस्तकात कळ गेली. त्यांनी वेदनेने कण्हत बाजूची खुर्ची धरली आणि परत पलंगावर बसल्या. त्यांच्या कण्हण्याचा आवाज ऐकून त्यांची दोन वर्षांची पणती धावत आली. पणजीला धरून म्हणाली, ''पज्जी, बाऊ झाला? थांब! मी कैलाग्गिवन लावते गुलघ्याला." तिने बाजूच्या टेबलवरचं कैलासजीवन उचलून आणलं, आणि पणजी 'नको रे राजा' म्हणत असतांना साडी वर सरकवून पोटर्यांपासून गुडघ्यांपर्यंत हळूवार हातांनी चोळलं. गेल्या रात्री तिची आजी पणजीला पेन-बाम लावून देतांना तिने पाहिलं होतं, पण तिच्या दृष्टीने 'कैलाग्गिवन' म्हणजे सगळ्या प्रकारच्या बाऊंवर रामबाण उपाय होता! मिनिटभरच फराटे मारले असतील, पण तिने पणजीकडे वर बघितलं, "बाछ? बला झाला बाऊ?" एव्हाना वेदना विसरलेल्या पणजीने हसून सांगितलं, "हो गं, छबडे, बला झाला! एक पापी दे!" पलंगावर चढून घाई-घाईने पापी देऊन चिमणी पळाली पुढच्या कामासाठी, आता भांडीवाल्या बाईंना मदत करायची होती! स्वयंपाकघरातून बाहेर येत असलेल्या लेकीकडे बघत आजी म्हणाल्या "कुठून कळतं लेकराला, फार मायाय गं बाई!"
तीन-एक तासांनी आजींच्या टीव्ही सिरियल एक-एक करून संपल्या, एकीकडे पणतीचं जेवण आईच्या लॅपटॉपवर यू-ट्यूब पहात पहात कसं-बसं संपलं. आता गाद्या टाकायची वेळ म्हणजे धुडगूस घालायची वेळ! चिमणीची नाचा-नाच सुरू झाली. मध्येच थांबून ती म्हणाली, "पज्जी, तू पन ये, आपन दोघी उद्या मारू!" नातसून तिला दटावणार इतक्यात गुडघ्यांवर हात टेकवत 'पज्जी' उठली, साडीचा पदर घट्ट गुंडाळला, आणि म्हणाली, "मी धरते हात तुझे, तू मार उड्या!"
घरातले सगळे पहातच राहिले!
*************************
आज आठवड्याने पुन्हा मागच्या बागेत गेलो. तारेकडे लक्ष गेलंच, कारण एक खार सरसरत झाडावर चढत होती. ती वाळलेली वेल तशीच होती, पण तिच्या उजवीकडे एक नवी कोवळी वेल जुन्या वेलीच्या दिशेने वाढत येत होती.
वाटलं, ती छोटी, कोवळी वेल म्हातार्या वेलीला म्हणतेय, "हाथ बढा ए ज़िंदगी, आंख मिला के बात कर!"
प्रतिक्रिया
22 Sep 2015 - 3:55 am | सटक
क्या बात!! सुंदर!! कुठून जिथून झंकारले तुमच्या मनात हे रूपक...तिथे बरेच काही असावे अजून ही आशा!!
22 Sep 2015 - 4:33 am | स्रुजा
अप्रतिम . फार प्रसन्न वाटलं लेख वाचुन , काही तरी सकारात्मक असं दाटुन आलं.
22 Sep 2015 - 7:07 am | चांदणे संदीप
वा! मस्त प्रसन्न करणारा लेख!
22 Sep 2015 - 7:14 am | चतुरंग
जियो बहुगुणी! यापेक्षा जास्त काही लिहू शकत नाही! _/\_
-रंगा
22 Sep 2015 - 7:16 am | मारवा
सुंदर !
22 Sep 2015 - 8:04 am | एस
वा!
22 Sep 2015 - 8:37 am | सिरुसेरि
+१
22 Sep 2015 - 8:54 am | श्रीरंग_जोशी
हे लेखन मनाला खूप भावलं.
22 Sep 2015 - 9:12 am | बाबा योगिराज
सकाळी सकाळी एकदम मूड फ्रेश झाला. सुंदर लिहिलय.
22 Sep 2015 - 9:16 am | नाखु
शन्नांची आठवण करून दिलीत तुम्ही
शतशः धन्यवाद प्रसन्नतेसाठी.
22 Sep 2015 - 10:23 am | अजया
प्रसन्नतेचा शिडकावाच असा सुंदर लेख म्हणजे.
22 Sep 2015 - 10:27 am | सस्नेह
प्रसन्न लेख !
22 Sep 2015 - 11:05 am | मीता
सकाळ प्रसन्न झाली . धन्यवाद
22 Sep 2015 - 11:20 am | हरीहर
सुरेख!
22 Sep 2015 - 11:38 am | प्यारे१
मस्त लिहिलंय. जीवनचक्र असंच सुरु असतं.
22 Sep 2015 - 12:19 pm | राजाभाउ
मस्त लिहिलय, एकदम फ्रेश
22 Sep 2015 - 12:40 pm | मुक्त विहारि
मिपा परतुनी आले....
(आशावादी) मुवि
22 Sep 2015 - 12:58 pm | कहर
मस्त
22 Sep 2015 - 1:01 pm | लाल टोपी
अप्रतिम मुक्तक, संवेदनाशील लेखन आवडले.
22 Sep 2015 - 1:36 pm | अन्या दातार
अप्रतिम. __/\__
22 Sep 2015 - 1:53 pm | पद्मावति
अतिशय सुंदर आणि सकारात्मक लिखाण. मस्तं फील गुड मुक्तक. आवडलं.
22 Sep 2015 - 1:55 pm | डॉ सुहास म्हात्रे
सुंदर !
22 Sep 2015 - 3:34 pm | gogglya
+१११
22 Sep 2015 - 5:20 pm | बोका-ए-आझम
फारच सुंदर!
22 Sep 2015 - 8:20 pm | स्वाती२
_/\_ सुरेख!
22 Sep 2015 - 8:40 pm | प्रभाकर पेठकर
हळुवार भावनांचं कलात्मक सादरीकरण. अत्तिशय आवडलं लेखन. हिच भावनिक गुंफण म्हातारपणी जगण्याला ताकद देत असावी.
22 Sep 2015 - 10:33 pm | दीपा माने
धन्यवाद!
22 Sep 2015 - 10:34 pm | दीपा माने
धन्यवाद!
23 Sep 2015 - 12:27 am | रातराणी
अप्रतिम!
23 Sep 2015 - 12:36 am | दिवाकर कुलकर्णी
हँटस ऑफ!!!
23 Sep 2015 - 1:36 am | palambar
वा वेलीची उपमा आणि फोटो परफेक्ट, पणजी भाग्यवान आहेत.
23 Sep 2015 - 11:01 am | वेल्लाभट
फॅनटॅस्टिक !
शब्दच नाहीत....
काय लिहिलंयत !
अत्तिशय सुंदर !
23 Sep 2015 - 6:42 pm | आनंदराव
फारच छान
सुंदर...
24 Sep 2015 - 2:03 pm | मधुरा देशपांडे
सुरेख!!
24 Sep 2015 - 3:35 pm | पलाश
फार चांगलं आहे हे!! _/\_
24 Sep 2015 - 3:42 pm | इशा१२३
अप्रतिम लेख.फार सुंदर लिहिलय.
24 Sep 2015 - 4:12 pm | नीलमोहर
खूपच सुरेख लिहीलंय..
24 Sep 2015 - 4:28 pm | पैसा
अतिशय सुंदर!
24 Sep 2015 - 4:29 pm | अद्द्या
:)
सुंदर लेखन
24 Sep 2015 - 9:07 pm | किसन शिंदे
लेखन आवडलं!
24 Sep 2015 - 10:51 pm | बहुगुणी
या लेखाच्या निमित्ताने गुलझार यांनी लिहिलेलं, वनराज भाटियांच्या संगीत दिग्दर्शनात येसूदास यांनी गायलेलं, 'हिप हिप हुर्रे' या चित्रपटातलं राजकिरण* या कलाकारावर चित्रित हे अप्रतिम गाणं आठवलं होतं ते अजून रोज डोक्यात घोळतंय:
एक सुबह इक मोड़ पर
मैने कहा उसे रोक कर
हाथ बढ़ा ए ज़िंदगी
आँख मिला के बात कर
रोज़ तेरे जीने के लिये,
इक सुबह मुझे मिल जाती है
मुरझाती है कोई शाम अगर,
तो रात कोई खिल जाती है
मैं रोज़ सुबह तक आता हूं
और रोज़ शुरु करता हूं सफ़र
हाथ बढ़ा ए ज़िंदगी
आँख मिला के बात कर
तेरे हज़ारों चेहरों में
एक चेहरा है, मुझ से मिलता है
आँखो का रंग भी एक सा है
आवाज़ का अंग भी मिलता है
सच पूछो तो हम दो जुड़वां हैं
तू शाम मेरी, मैं तेरी सहर
हाथ बढ़ा ए ज़िंदगी
आँख मिला के बात कर
मैने कहा उसे रोक कर....
(यातली दीप्ती नवल तिच्या इतर चित्रपटातल्यापेक्षा अगदीच वेगळी दिसली.)
(अवांतरः * राजकिरण हा एक अतिशय उमदा आणि देखणा कलाकार फार लवकर गायब झाला. तो १९९४ नंतर नाहीसा झाला आणि त्याच्या मुलीसह कुटुंबिय अद्यापही त्याच्या शोधात आहेत असं दिसतं.)
24 Sep 2015 - 11:16 pm | पैसा
अत्यंत सुरेख सिनेमा आहे! पुन्हा कुठे बघायला मिळेल देवजाणे! राजकिरणबद्दल एक बातमी वाचली होती. दुर्दैवी आहे पण ऋषि कपूरकडून आल्यामुळे खरी असावी.
http://timesofindia.indiatimes.com/entertainment/hindi/bollywood/news/Ac...