चीनचा दौरा संपत आलाय. उद्या घरी परतणार. या दौर्यात नेहेमीप्रमाणे चावज्झौ होतेच. चावज्झाउ गेस्ट हॉटेल म्हणजेच ईंग बिंगवान ला उतरलो होतो. दुसर्या दिवशी सकाळी साडे आठ ला नाश्त्याला मी आणि हुंग यान भेटणार होतो. सकाळी लवकतच जाग आली. आवरले आणि आवारात फिरायला निघालो. अचानक चार वर्षांपूर्वीच्या प्रसंगाची आठवण झाली.
मी असाच कामानिमित्त आलो होतो. बरोबर माझा एक दाक्षिणात्य सहकारी होता, आपण त्याला रामू म्हणुया. दिवसभराचे काम संपले. साडेसातच्या सुमारास हॉटेलवर परत आलो. सोडायला आलेल्या मंडळींनी विचारणा केली की आता इथेच जेवुन झोपणार की जरा फिरायला जाउया? वा! आणखी काये हवे? नाहीतरी आपण इतक्या लवकर जेवतही नाही आणि झोपतही नाही. चला तेवढीच पर्वणी भटकायची. त्या मंडळींना आम्ही जरा कपडे बदलुन आलोच असे सांगत आम्ही आपापल्या खोलीवर परतलो.
मस्त पैकी तुषार्स्नान केले, कपडे बदलले आणि बाहेर येणार इतक्यात दारावर थाप पडली. बघतो तर रामू! का रे बाबा? असा पिशाच्चा पाहिल्यागत का दिसतोस? रामूने घसा कुरवाळत विचारले, "तुझ्याकडे पाणी आहे का?" मी समोरच ठेवलेली बाटली त्याला देताच तो म्हणाला की त्याने त्याच्या खोलीतील शीतकपाटातील बाटली काढुन घोट घेताच घसा जळला! म्हणुन तो माझ्याकडे पाणी मागायला आला होता. मी फारसे लक्ष न देता फिस्स्कन हसलो. तो वैतागला. आता हसु नको तर काय? संध्याकाळ झाली की याच्या रक्तातील अल्कोहोल पातळी उतरते आणि तो सर्वप्रथम दोन घोट घेतो हे मला माहित होते. शिवाय चीनला येताना वाटेत सिंगापूर विमानतळावर याने काळ्या फितीच्या बाटल्या घेताना मी पाहिला होता. तीन बाटल्यांवर एक थैला भेट असल्यामुळे साहेबांनी तीन घेतल्या होत्या. वर " अरे तू घेत नाहीस तर दोन माझ्या नावे व एक तुझ्या नावे नेता येतील "असेही त्याने ऐकवले होते. आता जाईपर्यंत त्या तीन ची एक तरी असेल की नाही शंकाच होती. तेव्हा साहेबांनी चुकुन म्हणा वा सवयीने पाण्या ऐवजी तीच बाटली तोंडाला लावली असावी असे मी समजलो.
बाहेर आलो. मंडळी वाट पाहत होती. आम्ही निघालो. खाडीवर गेलो. रोषणाई बघीतली. जुन्या गावात फेरफटका झाला. नवा पूल बघीतला. मग जेवायला हे लोक आम्हाला पारंपारिक पदार्थ खायला खाडीकाठी असलेल्या अनेक छोट्या उपहारगृहांपैकी एकात घेऊन गेले. आंत शिरताच अनेक घंगाळांमध्ये नाना प्रकारचे समुद्री जीव ठेवेलेले दिसले. हवा तो प्राणी निवडाचा आणि उपहारगृहवाले तो शिजवुन देतात असा प्रकार होता. नाना प्रकारचे पदार्थ मागवले गेले. चांगले दोन तास कार्यक्रम चालला होता. मी आपला उकडलेल्या भाज्या, भात व फळे खात होतो. दुसर्या दिवशी सकाळी दहाला फोशानला निघायचे होते. म्हणजे आठला उठलो तरी चालण्यासारखे होते. कार्यक्रम संपवून अकरा वाजता परतलो. येताना पुन्हा रामूने घसा अजुनही जळत असल्याची तक्रार केली पण मी लक्ष दिले नाही. त्याला 'झोप म्हणजे बरे वाटेल" असा सल्ला देत मी माझ्या खोलीत येऊन आडवा झालो.
सकाळचे नऊ वाजले. नाश्ता झालाच होता. सामान बांधुन आम्ही पैसे चुकते करायला स्वागतकक्षात आलो. चिंग वन व चालक युएन हजर होतेच. मी माझे देयक चुकते केले व पावती घेतली. रामूने आपले देयक देताना होटेलच्या कर्मचार्यांना पाण्याच्या बाटलीच्या रकमेकडे बोट दाखवत आक्षेप घेतला व पुन्हा वाद सुरू केला. दिलेले पाणी पिण्यालायक नव्हते तर पैसे कसले घेता? उलट तुम्हीच मला भरपाई द्या अशी हुज्जत त्याने सूरू केली. आता मीही दाखल झालो. अनेकदा असे होते की लबाड लोक पैसे द्यायचे टाळता यावे म्हणुन काहीतरी सबबी सांगतात. हॉतेलवाल्यांना हा त्यातलाच प्रकार वाटला. त्यांनी साफ दुर्लक्ष केले. मात्र रामू ठामपणे म्हणाला की ते पाणी पिण्यासारखे नव्हते. निघायला उशीर होत होता. आता मी मधे पडलो. रामूने सांगितले की त्याच्यावर विश्वास नसेल तर हॉटेलने आपल्या कर्माचार्यांना ती बाटली घेऊन येण्यास सांगावे; ती बाटली तशीच त्याच्या खोलीत होती. एका सेविकेने ती बाटली आणली व झाकण उघडुन तोंडाजवळ नेताच उलटी आल्यासारखा चेहरा केला. एकुण प्रकार गंभिर होता. आता मीही गांभिर्याने दखल घेण्याचे ठरवले. जर ते पाणी खरच दूषीत असेल वा विषारी असेल तर अशा अनेक बाटल्या त्या हॉतेलातल्या प्रत्येक खोलीत ठेवल्या गेलेल्या असणार. माझ्या डोळ्यापुढे बागेत खेळणारी लहान मुले आली. जर कच्ची रम पिणारा मनुष्य घसा जळल्याची तक्रार करतो तर त्या लहानग्या जीवांचे काय?
हे सगळे हॉटेल कर्मचार्यांना सांगताना भाषेचा प्रश्न होताच. वर ते लबाड लोक दुर्लक्ष करू पाहत होते. मी चिंग वन ला सगळा प्रकार सांगितला. ती त्यांना सांगु लागली पण एक मुलगी व तीही परक्या गावातली म्हणताना ते कटवायला बघत होते. एकूण प्रकार बरोबर नव्हता व कदाचित अनेकांच्या जीवाला अपाय होण्याची शक्यता होती, विशेषतः लहाल मुलांना. माझ्या डोळ्यापुढे खेळणार्या निष्पाप मुलांचे चेहरे दिसत होते. आता मी सूत्रे हाती घेतली व रामूला तोंड बंद ठेवाला व खास करून पैशाची भाषा बंद करायला सांगितले. प्रश्न पैशाचा नव्हता, आम्हाला काही फुकट लाटायचे नव्हते मात्र अपप्रकार होऊ द्यायचा नव्हता. ते आम्हाला व चिंग वनला दाद देत नाहीत असे दिसत होते. मग मी चिंग वनला सुचविले की आता आपल्या स्थानिक यजमानांना बोलावले पाहिजे. हे लोक व्यवस्थापक जागेवर नाहीये असे सांगत टाळत होते. आम्ही केनीस व चेनला बोलावले. अवघ्या पंधरा मिनिटात दोघांच्या गाड्या दारात उभ्या राहिल्या.
गोल गरगरीत केनीसने येताच सगळा प्रकार विचारला व मग होटेल्च्या कर्मचार्यांना सर व्यवस्थापकाला बोलावायला सांगितले. त्यांनी तत्परतेने तो उपलब्ध नसल्याचे सांगितले. असे काय? तो काय; त्याचा बाप देखिल पांच मिनिटात हजर होईल असे ऐकवत आपले परिचय पत्र त्यांच्या तोंडापुढे नाचवले. ती अस्थापना त्या गावतली मोठे प्रस्थ होती. केनीसने दमात घेत सांगितले की त्या शहराचा पोलिस आयुक्त आणि तो एकाच कॉफी क्लबचे सदस्य आहेत व एकमेकांना उत्तम ओळखतात. मी केनीसला सांगितले की आम्हाला तर आता जावे लागेल, भारतात गेल्यावर मी चिनी दुतावासात याचा पाठपुरावा करीन पण समजा असे पाणी इतर खोल्यात ठेवले गेले असले आणि कुणा लहान मुलाला बाधा झाली तर? निदान हे आपल्या डोळ्यापुढे घडत असताना मला जाणे बरोबर वाटले नाही. केनीसला माझे म्हणणे पटले. तो शांतपणे त्या मुजोर लोकांना म्हणाला, की तुम्ही असे ऐकणार नसाल तर काय करायचे ते त्याला माहित आहे. आपला हस्तसंच बाहेरे काढत त्याने सांगितले की तो आता त्या शहराच्या पोलिस प्रमुखांना बोलावुन हॉटेलला टाळे लावविणार आहे.
ही जालिम मात्रा लागु पडली. वास्तविक पाहता पोलिस कारवाईची धमकी आम्हीही दिली होती पण परकी माणसे हे करणे शक्य नाही, त्यांना निर्धारीत वेळेवर जायचे आहे शिवाय परक्या गावात पोलिसांच्या भानगडीत कोण पडतोय असा सूज्ञ विचार त्यांनी केला होता. मात्र हा टग्या गावचांच शिवाय खरोखरीच पोलिसात त्याची ओळख असली तर महागात पडायचे या विचाराने आता ते हबकले. आता पर्यंत 'उपलब्ध नसलेला' सर व्य्वस्थापक अचानक हजर झाला व त्याने नरमाईची भाषा सरू केली. आपण इथे बोलण्या ऐवजी कॉफी शॉपमध्ये जाऊ अशी विनंती त्याने केली. आता रोख बदलला होता. त्याने सर्व प्रथम आपल्या कर्मचार्यांतर्फे झालेल्या वर्तनाची व बेजबाबदार पणाची माफी मागीतली. मग त्याने मिटवायची भाषा सुरू केली. त्याने आम्हाला झाल्या प्रकाराबद्दल पैसे माफ करण्याचा देकार दिला. मी पावती दखवत अभिमानाने सांगितले की आम्ही भारतिय कुणाचे काही फुकट घेत नसतो. "तुमचे हॉटेल उत्तम आहे, सेवा उत्तम आहे, त्याचे पैसे मी दिलेले आहेत". तो वरमला. मग त्याने विचारले की आता त्यानी काय करावे असी अपेक्षा आही आमची? मी ठामपणे सांगितले की त्या दूषीत पाण्याचा निकाल लागला पाहिजे. त्याने आम्हाला थोडा वेळ देण्याची विनंती केली व कॉफी मागवली'
दहा मिनिटात तो परतला व म्हणाला की सगळ्या खोल्यांमधले पाणी नव्या पुरवठ्याने बदलले गेले आहे, आम्ही आधीच्या गोळा केलेल्या बाटल्या बघु शकतो. शिवाय त्याने त्या पाणी पुरवणार्या ठेकेदारालाही बोलावला असल्याचे सांगितले. त्याने पुन्हा एकदा झाल्या प्रकाराची माफी मागितली व पुन्हा असे होणार नाही अशी हमी दिली. माझे काम झाले होते. जर मला महित असतानाही मी दुर्लक्ष केले असते व न जाणो कुणाला अपाय झाला असता तर? अशी बोचणी मला कायम लागुन राहिली असती. आमहाला निघायला उशीर झालाच होता, पण एक कर्तव्य केल्याच्या समाधानात मी सहकार्यांसह केनीस व चेनचे आभार मानून तिथुन बाहेर पडलो व फोशानच्या मार्गाला लागलो.
प्रतिक्रिया
30 Aug 2008 - 9:00 pm | प्रभाकर पेठकर
अभिनंदन सर्वसाक्षी, अगदी योग्य तेच केलेत.
एक सांगावेसे वाटेल, पोलीसांपेक्षा महापालिकेच्या आरोग्यखात्याकडे तक्रार करायची. अर्थात, चीनमध्ये अशी प्रकरणे पोलीस हाताळत असतील तर त्यांना कळविणे योग्यच होते.
30 Aug 2008 - 9:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
जाऊ द्या ना, आपल्या काय त्याचे, असे म्हणुन आपण अनेक सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. मात्र परदेशात राहुनही दुषीत पाण्याविषयी ज्या जागृकतेने इतरांना अपाय होऊ नये म्हणुन, आपण जी तत्परता दाखवली त्याबद्दल आपले अभिनंदन !!!
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
31 Aug 2008 - 3:53 pm | विसोबा खेचर
मात्र परदेशात राहुनही दुषीत पाण्याविषयी ज्या जागृकतेने इतरांना अपाय होऊ नये म्हणुन, आपण जी तत्परता दाखवली त्याबद्दल आपले अभिनंदन !!!
साक्षी, हेच म्हणतो रे...!
तात्या.
1 Sep 2008 - 4:54 pm | लिखाळ
>>जाऊ द्या ना, आपल्या काय त्याचे, असे म्हणुन आपण अनेक सामाजिक प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो. मात्र परदेशात राहुनही दुषीत पाण्याविषयी ज्या जागृकतेने इतरांना अपाय होऊ नये म्हणुन, आपण जी तत्परता दाखवली त्याबद्दल आपले अभिनंदन !!!<<
सहमत आहे. अभिनंदन.
--लिखाळ.
30 Aug 2008 - 10:16 pm | यशोधरा
अभिनंदन!
>>मी पावती दखवत अभिमानाने सांगितले की आम्ही भारतिय कुणाचे काही फुकट घेत नसतो
हे पण आवडले!! :)
31 Aug 2008 - 4:16 am | मदनबाण
हेच म्हणतो..
मदनबाण.....
"Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life."
-- Swami Vivekananda
30 Aug 2008 - 10:57 pm | रेवती
सर्वसाक्षी,
आपण खरंच चांगला निर्धार केलात. प्रामुख्याने लहान मुलांचा केलेला विचार आवडला.
रेवती
1 Sep 2008 - 2:22 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
सहमत
31 Aug 2008 - 8:41 am | शितल
पाण्याने अनेक आजार पसरतात, लहान मुले तर त्याचे पहिले भक्ष ठरतात. तुम्ही खुप चांगले काम केले.
:)
31 Aug 2008 - 5:50 pm | धनंजय
तुम्ही पाठपुरावा केला हे फार चांगले केले.
सुरक्षिततेचा प्रश्न होता.
1 Sep 2008 - 12:00 pm | स्वाती दिनेश
साक्षीजी,
ह्या वेळचा चिनी अनुभव वेगळाच आहे की.. वेळ कमी आणि भाषेची अडचण असतानाही तुम्ही ह्या 'दूषित पाणी' प्रकरणाचा केलेला पाठपुरावा अभिनंदनीय आहे.
स्वाती
1 Sep 2008 - 1:51 pm | ऋषिकेश
असेच म्हणतो.
साक्षीजी तुमचे अभिनंदन
-('मिसळ'लेला) ऋषिकेश
1 Sep 2008 - 2:24 pm | मनस्वी
धन्य आहात. अभिनंदन! खूप छान केलेत!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
1 Sep 2008 - 2:33 pm | अनिल हटेला
परदेशात राहुनही दुषीत पाण्याविषयी ज्या जागृकतेने इतरांना अपाय होऊ नये म्हणुन, आपण जी तत्परता दाखवली त्याबद्दल आपले अभिनंदन !!!
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
1 Sep 2008 - 10:17 pm | एकलव्य
आवडला. अभिनंदन!
आपले वर्तन नक्कीच अनुकरणीय आहे.
1 Sep 2008 - 10:35 pm | सर्वसाक्षी
मंडळी , आपला आभारी आहे.
एक परवलीचा सल्ला - आपण ग्राहक आहात; जर आपली बाजु रास्त असेल तर कुणालाही नडाला मागे पुढे पाहु नका. मला आगाऊ सांगुनही शाकाहारी भोजन न दिल्याबद्दल मी थाय एअरला वाजवले आहे. कबुल केलेले आणि प्रत्यक्ष दिलेले यांत तफावत - अगदी बारिक का असेना पण आठळल्यावर थेट आय सी आय सी आय व्यवस्थापकिय संचालकांच्या कार्यालयातुन खुलासा व हमी मिळविलेली आहे. इथे तर कुणाच्या जीवन - मरणाचा प्रश्न होता. मागे का हटाचे?
जर नडाचे तर थोरल्या बाजिरावांचे बोल लक्षात ठेवाचे - 'मूळावर घाव घातला तर फांद्या आपोआप खाली येतात'. प्रतिसाद मिळत नसेल तर उगाच कुणा आंडु-पांडुला आपली दर्दभरी कहाणी ऐकवत राहु नका, पत्ता/ क्रमांक वगैरे शोधा आणि थेट व्यवस्थापकिय संचालकांना गाठा! एखादी फिर्याद व्यवस्थापकिय संचालकांच्या कार्यालयात गेली की त्यांना त्याची दखल घ्यावीच लागते आणि जर त्यांच्या कचेरीतुन ती तक्रार खाली खुलाशा साठी गेली तर कालबद्ध उत्तर देणे कर्मचार्यांना क्रमप्राप्तच असते. हा प्रयोग मी गोदरेज कीटकनाशक सेवा, आय सी आय सी आय, वगैरेंवर केलेला आहे आणि तो यशस्वी झालेला आहे.