नवं घर भर रहदारीच्या रस्त्यापासुन म्हटलं तर आत, म्हटलं तर जवळ असं होतं. किल्ल्याचे बुरूज असावे तशा दोन दुमजली इमारती रस्त्यावर तोंड करून उभ्या होत्या, त्यांच्या मधून घराच्या आवारात येणारी वाट होती. घराच्या आजुबाजुला लहानमोठे कारखाने, शेजारी मुन्सिपाल्टीची बंद होऊ घातलेली एक सुस्त शाळा, समोर वेगवेगळी दुकानं, डोक्यावर एक लोकप्रिय इस्पितळ आणि मागच्या बाजुला जरा लांबवर दिसणारं मुसलमानांचं कब्रस्तान असं सेटिंग होतं सगळं. शिवाय समोरचा रस्ता ओलांडला की ख्रिश्चन मिशनचे कंपाऊंड. त्यामुळे सर्व थरातल्या लोकांचा राबता त्या भागात असे. सुरवातीला मला मोठी मजा वाटत असे, कारण रोज उठून बाहेर वरांड्यात बसलं की कोणी पटकेवाले, कोणी लंगोटवाले, कोणी काठी-कांबळं घेतलेले धनगर, पिऊन टाईट होऊन झोकांड्या खात चाललेले असे अनेक जण दिसत. एकजोडी पांढरे कपडे रोज धुवून घालणार्याला रोज वेगवेगळे रंगीत कपडे घातलेले लोक दिसले तर जसं वाटेल तसं थोडंफार वाटायचं.
शेजार असा फारसा नव्हताच. होते ते हेच सगळे लोक, आणि जरा वाट वाकडी करून गेलं की येणारी मिश्र वस्ती. छायाताई आणि लक्ष्मीबाई तिथेच रहायच्या. त्यांच्या घरी गेलं की चुलीतल्या धुराचा वास घरभर पसरला आहे असं वाटे, अंगण सारवलेलं, बांबुच्या डालग्यात अंग आखडुन बसलेल्या कोंबड्या. सणावाराला आई आणि मी काही फराळाचं घेऊन गेलो की कधी कडाकण्या आणि ओलं खोबरं, किंवा खुसखुशीत बाखरवड्या खायला मिळत. करंज्या मात्र अगदी खुळखुळा असायच्या आणि खाववत नसत. तसेच गर्याचे लाडू. भिंतीवर मारले की रिबाऊंड होतील असं वाटायचं. खाताखाता जबडा दुखून येईल असला ज्याम लाडू. वस्तीत दत्तजयंतीचा उत्सव मोठा असायचा. आम्ही प्रसादाला गेलो की, बंगल्यातल्या वैनी, आलासा का म्हणुन स्वागत होई, कधी कोणी 'बामनं आल्यात व्हंय' म्हणे. धुपाचा वास सगळीकडे घमघमत असायचा, एखादी दिवाबत्ती फकाफक उजेड फेकत गल्लीच्या कोपर्यात उभी असे. दर्शन घेऊन झाले की आम्ही विभुत्यांच्या घरी जाऊन बसत असू. दोन जमखान्यांच्या पट्ट्या अंथरलेल्या असत, जेवायला पत्रावळी आणि पानांचे द्रोण, पाण्याला घरची भांडी. मग पंगती बसायला घेतल्या की छायाताई बोलवायला येई. वाण्यांच्यात बसलायसा व्हंय, मी हिकडं हुडकायलोय! म्हणायची. प्रसादाची खीर अख्ख्या गव्हाची, गूळखोबरं घातलेली. मी पहिल्या पंगतीला बसून भरपूर खीर हाणायचो. खिरीतले जाड खोबर्याचे तुकडे बाजुला काढून शेवटी नुसतेच खोबरे खायचो. मजा यायची.
इमारत तशी बरीच आडवी पसरलेली होती पण आमच्या वाट्याला त्यातल्या चारच खोल्या आल्या होत्या. म्हणजे म्हणायला चार, पण वापरासाठी दोनच. कारण बाबांच्या भाषेत सांगायचं तर ऑफिस-कम-घर. दोन खोल्या रहायला, एक खोली ऑफिसच्या मॅनेजरची आणि उरलेली एक टेलेप्रिंटर्स, टाईपरायटर्स आणि टेक्निशियन्सची. एक सामाईक संडास आणि न्हाणीघर. घरातले, बाहेरचे, ऑफिसातले सगळ्यांना मुक्तद्वार असे. पण बाबांबरोबर नव्या गावात रहायला आल्याचा आनंद इतका होता, की कसलीच तक्रार नव्हती. निदान आम्हा मुलांची तरी नाहीच. मॅनेजरची म्हणून सांगितली ती एक खोली ही बाबांच्या ऑफिसकामासाठी आणि पेपर-रोल्सचे भलेमोठे बिंडाळे एकावर एक रचून ठेवण्यासाठी असे. वर्षातुन एकदा स्टेशनरीचा खोका पोष्टाने मुंबईहुन येत असे, त्यात पेन्सिली, रबरं, स्टेपलर्स, शिक्के, नोटपॅड्स, टाईपरायटरच्या रिबीना वगैरे असत. त्या सगळ्या सामानाची व्यवस्था बाबांच्या टेबलाखाली होत असे. पण रोल्स ठेवणार कुठे? त्यासाठी भिंतीवर आडव्या पट्ट्या मारून छानसा रॅक केलेला होता. त्याची मजबूती टेस्ट करायला एकजण त्यावर उभा राहुन पाहत असे. पेपर रोल्स यायचे तो दिवस फार धांदलीचा असायचा. भला मोठा लाकडी पेटारा टेंपोतुन उतरवून घेण्याचा कार्यक्रम व्हायचा, त्यासाठी मोठी जाड लाकडी फळी लागायची. ती आणली की मग टेंपोवर फळीची उतरंड टाकुन, बाळूकाका वगैरे टेक्निशियन्स येऊं द्या हो मागे, येऊं द्या म्हणत हळुहळू पेटारा किंवा पेटारे उतरवून घ्यायचे. मग मारतूल, कानस वगैरे लावुन तो लाकडी खोका उघडला की पहिल्यांदा खाकी, डांबरी कागदाचे वेष्टण फाडाफाडी न करता उघडायचे. पुस्तकांना कव्हरं घालायला एकदम मजबूत कागद. शिवाय, पाणी पडलं तरी वांधा नाही कारण कागद डांबरी असायचा. मग एकेक करून ते कागदाचे बिंडाळे काढून रॅकवर एकावर एक ठेवत जायचे, एकेक रोल २-२ किलोचा तरी असेलच. ऑफिसात ३ टेलेप्रिंटर मशीन्स लाकडी कॅबिनेटमध्ये ठेवलेली असत. त्यांच्या खालच्या भागात हे पेपर-रोल्स टांगले जात आणि टेलेप्रिंटर्स अहोरात्र कडकट्ट-कडकट्ट-ठींऽऽग आवाजात रोल्स पुढेपुढे खेचत त्यांवर मजकूर प्रिंट होत असे. रोल खलास झाला की मग तो बदलावा लागायचा. मी जवळ असलो तर बाबा मला रोल्स काढायला सांगत. मग मी मोठ्या हिंमतीने रोल उचलून त्याच्या सेंटरला असलेली प्लास्टिकची बुचं उपसून खिशात ठेवत असे आणि रोल बदलत असे. वर्गात कार्यानुभवाच्या तासाला या बुचांच्या बदल्यात कंचे, सिगारेटची चांदी वगैरे गोष्टी जमा करायच्या किंवा उगाच भाव खायचा.
सुरवातीला टेलेप्रिंटर्स शेजारीच असल्यामुळे झोप येत नसे पण हळुहळू त्या सगळ्याची सवय झाली. उद्यमनगरची लाईन गेली की बाबा मोठ्याने लाईन गेली रेऽ म्हणून हाक द्यायचे. हाक आली की मी तडक उठून बाहेर असलेला खटका वरून खाली ओढत असे आणि राजारामपुरी लाईनवर खटका गेला की प्रिंटर्स परत सुरू व्हायचे. उलट राजारामपुरीची लाईन गेली की खालुन वर खटका केला की झाले! दोन्हीकडची लाईन गेली की मशिन्सना उसंत मिळायची. मग बाबा एमेसिबीला फोन करून कुठली लाईन का बंद आहे याची चौकशी करायचे, जरावेळाने एमेसिबीचा फोन आला की पुन्हा राजारामपुरी किंवा उद्यमनगर चालू! एकूण मशिन्स चालू नसली तर या सगळ्या गोंगाटामुळे का होईना पण झोप उडायची.
घराजवळच एक मोठा लोखंडी कपाटांचा कारखाना होता, आणि त्या कारखान्याबाहेर एक यंत्र जमिनीत घट्ट रोवलेले होते. त्यात भलेमोठे स्टीलचे पत्रे घालुन हवे तसे वाकवित असत. असे साईझ केलेले पत्रे घेऊन, त्यांवर एकजण मध्येमध्ये मोठ्या हातोड्यांनी घण घालत असे, एकीकडे वेल्डर जोडकाम करत असे. मेणचट निळा पोशाख चढवून, डोळ्याला विचित्र गॉगल लावुन, एका हाताशेजारी शिल्डकाच घेऊन वेल्डर बसत असे. तो तसा बसला की मी जवळ बसलेला असलो तर उठून लांब जायचो. मग तो माझ्याकडे बघून म्हणायचा 'डोळ्यास्नी लऽय बाद काम बग! थिकडं लांब जा आन् बगू नगंस'. मग तो वेल्डींग गन घेऊन काम सुरू करी. टिर्र्ऽ कर्कश आवाज करत, अंगावर ठिणग्या उडवत ते काम चाले. संपले की जोडकाम बघायला मी जवळ जायचो, फोड आल्यासारखे दिसायचे पत्र्यावर आणि इकडे, तिकडे वेल्डींगच्या काड्यांची टोकं पेन्सिलीच्या बारक्या तुकड्यांसारखी पडलेली असत. ती टोकं मी गोळा करत असे. कच्चे पेरू घेऊन त्यात ही टोकांची आरी आरपार ठोकली की भोवरे तयार करता येतील असं वाटायचं. मी एकदोनदा तसा प्रयत्नही करून पाहिला होता पण भोवरा अगदीच कच्चा निघाला आणि ठोकताठोकताच त्याची दोन भकलं झाली. शिवाय जाळी गुंडाळायला पेरूवर गल्ल्या कशा करायच्या हाही प्रश्न होताच. त्यामुळे भोवरा प्रकरण कॅन्सल झालं. पण काही ना काही उपयोग होईलच या काड्यांचा असा विचार करून मी त्या दप्तरात साठवत असे. हा सगळा खजीना सापडू नये म्हणून मी दप्तर महिनोंमहिने धुवायला टाकत नसे, पण फारच कळकट दिसायला लागलं की आई एखाददिवशी हिसकावुन साठवलेला सगळा ऐवज फेकून द्यायची आणि गरम पाण्यात दप्तर भिजायला घालायची.
उजव्या बाजुला वळलं की एक लहान, लेथशॉप होते. ३ शिफ्टमध्ये काम चाले, मशिनटूल्स तयार करायचे बहुतेक. त्यांचा कचरा म्हणजे लोखंडाचा कीस. पेन्सिलींना गिरमिटाने टोकं केली की कसा छान गोलगोल लाकडाचा कीस निघतो तसाच, पण लोखंडाचा, धार असलेला कीस. दिवसभराच्या दोन शिफ्ट्स संपल्या की मोठ्या घमेल्यात तो गोळा करून एका बाजुला ठेवलेला असे. हातात घेतला की बोचायचा पण मस्त स्प्रिंगसारखा खालीवर व्हायचा. त्यातल्या त्यात मोठ्या, गुंतलेल्या रिंगा असलेले, मोठ्या मापाचे तुकडे मी उचलायचो आणि चड्डीचे दोन्ही खिसे भरून, चड्डीची टोकं चिमटीत धरून, हलक्या अंगानी मी चालत घरी येत असे; जेणेकरून खिशातल्या रिंगा मोडू नयेत. घरी आल्यावर हळूच खिसे मो़कळे करावे एखाद्या धोतराच्या तुकड्यावर, आणि एकेक रिंग नीट सोडवून सुटी करून ठेवावी. उपयोग वगैरे काही नाही, पण ते दिसायचे किती मस्त! आईला माझे हे उद्योग मुळीच आवडायचे नाहीत हे साहजिकच होते. दोन खोल्यांच्या घरात असा विचित्र खजिना कितीसा साठविता येणार? तांबा-पित्तळ-लोक्कांड-कल्हाऽई सामानवाला हातगाडी घेऊन दारात आला की आई या सगळ्या रिंगा त्याच्या गाडीवर घालायची. पण काही करायची सोय नव्हती, कारण हे सगळे व्हायचे ते शाळेच्या वेळेत! मग घरी आल्यावर आईशी तावातावाने भांडण करून जरावेळाने बाहेर पडून मी शेजारी चक्कर टाकीत असे.
पोतनीसांच्या त्या लेथशॉपची आणखी एक घटना आठवते. आमच्या न्हाणीघराला एक खिडकीवजा झडप होती आणि ती पूर्ण बंद होत नसे. ही खिडकी आणि लेथशॉपचे दार समोरासमोर येई, १०-१२ फुटांचं अंतर फारतर. अंघोळीला बसण्याआधी पहिलं काम म्हणजे खिडकी बंद करणे! पण काही कामगार मुद्दाम मोठमोठ्याने अचकटविचकट गाणी म्हणत, वंगाळ बोलत. तोवर माझे शिव्यांचे ज्ञान 'भ' च्या बाराखडीपुरतेच होते पण इथे म्हणजे एकदम शिव्यांचे विश्वरूपदर्शन! बरं, पुरूषच शिव्या देत असं नव्हतं, बायाही मस्त लयदार शिव्या द्यायच्या. अंघोळिचे पाणी मोठ्या अॅलुमिनच्या डेचक्यात उकळत असे आणि तांब्यातांब्याने ते बादलीत काढून, अर्धी बादली भरून मग मी अंघोळीला जाई. असाच एकदा अंघोळीला म्हणून गेलो आणि सवयीने झडप बंद केली. गार पाण्याचे विसण घालायला सुरवात करतो न करतो तोच माझं लक्ष सहज खिडकीकडे गेले. दोन डोळे खिडकीशी! मागचा पुढचा काहीही विचार त्या वेळी सुचला नाही आणि तांब्या भरून उकळतं पाणी मी खिडकीवर फेकलं.. हात चांगलाच पोळला पण त्याची पर्वा न करता झडप उघडली. एक माणुस तळमळत चेहरा झाकुन मोठमोठ्याने शिव्या देत होता, मध्येच बेभान होऊन त्याने एक दगड खिडकीकडे भिरकावला. तेवढ्यात इतर कामगारांनी त्याला हातपाय धरून उचलले आणी उलट शिव्या देत त्याच्यावर हात साफ करून घेतले. मग उचलून त्याला वरच्याच दवाखान्यात घेऊन गेले आणि डॉक्टरांनी आधी प्रथमोपचार करून मग त्याची पूजा बांधली हे आठवते.
काही दिवसांनी तो खाली आला. मी बाहेरच बसलो होतो पण चेहर्याला बँडेज लावुन आलेल्याला बघून घाबरून आत पळालो आणि हळूच डोकावुन बघु लागलो. बाबांनी त्याला न्याहाळले आणि म्हणाले, का आलाहेस रे बाबा? आता हा जन्मभराचा डाग लागला की रे तुला!
खाली मान घालुन तो म्हणाला साहेब नसत्या नादानं काय झालं बगा माझं, जयप्रभा स्टुडिओत काम करत हुतो, च्यापान्याचं बगायचं, इडीतंबाकू लागली तर आनायची. आजउद्याकडं गेलो आसतो का नाय पिक्चरमंदी? काय करू म्या आता? तुमीच सांगा..
प्रतिक्रिया
16 Sep 2015 - 2:21 pm | मांत्रिक
मस्तच लिहिलंय! अगदी छान! शाळकरी दिवसांची आठवण आली. शेवटचा किस्सा फार खतरनाक हो!
16 Sep 2015 - 2:30 pm | मदनबाण
सुरेख लेखन !
जयप्रभा स्टुडिओत काम करत हुतो, च्यापान्याचं बगायचं, इडीतंबाकू लागली तर आनायची. आजउद्याकडं गेलो आसतो का नाय पिक्चरमंदी? काय करू म्या आता? तुमीच सांगा..
हा तर निर्लज्यपणाचा कळस आहे !
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- || BLAZE OF GLORY ||
16 Sep 2015 - 2:39 pm | पद्मावति
खूप छान लिहिलंय. आवडलं.
16 Sep 2015 - 3:56 pm | मी-सौरभ
आवडेश
16 Sep 2015 - 6:12 pm | अत्रुप्त आत्मा
+१
16 Sep 2015 - 6:09 pm | एस
फार छान लिहिलंय!
17 Sep 2015 - 8:52 am | एक एकटा एकटाच
मस्त लिहिलय
सगळ्या गोष्टी त्रिमितीय स्वरूपात डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
सुरेख लिखाण.
17 Sep 2015 - 9:10 am | उगा काहितरीच
छान बालपण गेलंय की तुमचं . लेखनही छानच.
17 Sep 2015 - 2:35 pm | चांदणे संदीप
आवडल!
17 Sep 2015 - 3:04 pm | पैसा
खूप सुरेख! लिखाणाची लय सापडली आहे तुम्हाला!
17 Sep 2015 - 3:15 pm | बोका-ए-आझम
आवडला. पण क्रमश: नाही?
17 Sep 2015 - 6:09 pm | मास्टरमाईन्ड
सध्याच्या ऑगस्ट इंजिनियरिंगच्या आजूबाजूचा परिसर दिसतोय उद्यमनगरातला.
आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलसमोरचं
17 Sep 2015 - 6:31 pm | मारवा
हा लेख आवडला
पण खास म्हणजे तुमचा पियुष मिश्रा वरील लेख वाचला
तो प्रचंड आवडला.
तुमची शैली अप्रतिम विश्लेषण मार्मिक
तुमच्या मिश्रा वरील लेखात आलेले एकेक उल्लेख रेजींग बुल आदिचे अंगावर रोमांच उभे करत होते.
गुलाल चित्रपटावरील तुमची कॉमेंटरी ग्रॅन्ड
आणि हो भिन्न षडज देखील खुप आवडला किशोरी च्या अनपॉप्युलर रागांवर आपण लिहावे कधी तरी
मजा येईल वाचायला
आणि हो तुमची जी अंबरीश मिश्र च्या शैलीशी तुलना केलीय ती अगदी योग्य आहे
तुमचा लेख वाचल्यावर पहीली आठवण झाली अंबरीश मिश्र च्या शुभ्र काही जीवघेणे ची च नाहीतर सालं मराठी
ललित लिहीणारयांच्या नेणीवेवर पुलवपु बसलेले असतात.
तुम्ही मौनराग वाचल नसेल एलकुंचवारांच तर जरुर वाचा एक मित्रत्वाचा सल्ला तुम्हाला आवडेल खुप
खुप कमी लिहीता हो तुम्ही पण
नक्षत्रांचा चुरा चुरा बिलकुल
धन्यवाद
17 Sep 2015 - 6:49 pm | सस्नेह
छान लिहिलं आहे.
कोल्लापूरकर वाट्टं तुम्ही ?
17 Sep 2015 - 6:53 pm | बॅटमॅन
इतर लेखांप्रमाणेच हाही एकदम खास लेख. लयच आवडला....आशेच ल्हीत र्हा.
17 Sep 2015 - 7:00 pm | योगी९००
लेख आवडला..!!
त्यातल्या त्यात आमच्या कोल्हापुरच्या राहत्या भागाचे वर्णन वाचून बरे वाटले..!!
17 Sep 2015 - 9:51 pm | चाणक्य
लिखाण
17 Sep 2015 - 10:11 pm | अजया
लेख आवडला.
21 Sep 2015 - 7:01 pm | नि३सोलपुरकर
लय बारी लिवलय साहेबा ,
आणी बर्याच दिवसानंतर "गरा,जमखाना मारतूल" वगैरे शब्द वाचण्यात आले .
धन्यवाद ..
बाकी ते मनोज वाजपेयी वर लिहणार होता अण्णा तुम्ही .... लिवा लवकर लवकर ..
(वाचण्यास उत्सुक असणारा )
नि३