आपल्याला आयुष्यात केव्हा ना केव्हा आर्थिक मदतीची गरज भासते. काही वेळा आपण ही मदत नातेवाईकांकडून किंवा मित्रांकडून घेतो तर काही वेळा कर्ज पुरवठा करणा-या वित्त संस्थांकडून. जर आर्थिक साहाय्याची मागणी करणारी व्यक्ती सधन वर्तुळातील असेल किंवा पगारदार नोकर असेल किंवा त्या व्यक्तीचा चांगले उत्पन्न असणारा व्यवसाय असेल तर आर्थिक मदत मिळण्यास शक्यतो अडचण येत नाही. मात्र ही व्यक्ती जर का आर्थिकदृष्टया कनिष्ठ स्तरातील असेल किंवा जर गरीब असेल तर मात्र अशी मदत मिळण्याची शक्यता खूपच कमी असते. बरेचदा नातेवाईकही या व्यक्तीसारखेच गरीब असतात. वित्त संस्था परतीची हमी नसल्याने कर्ज देत नाहीत.
थोडेसे आर्थिक पाठबळ मिळाले तर खूप काही करता येईल असे अनेक तरुण, गृहिणी आणि छोटे व्यावसायिक आपल्या आजूबाजूला असतात. मात्र आर्थिक मदतीअभावी त्यांना आपल्या स्वप्नांना सत्यात उतरता येत नाही. अशांसाठी एक आशेचा किरण आहे; सुक्ष्म वित्त साहाय्य करणा-या संस्था. सुक्ष्म अशासाठी या कर्जांच्या रकमा खूप छोट्या असतात.
अशा सुक्ष्म वित्त साहाय्याची सुरुवात आपल्या शेजारच्याच देशात झाली. बांगलादेशातील चित्तगोंग विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात शिकवणा-या डॉ. मोहम्मद युनूस यांनी आसपासच्या खेड्यातील गरीब स्त्रीयांना छोट्या व्यवसायांसाठी लहान स्वरुपातील कर्जे देण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या या उपक्रमाची व्याप्ती इतकी वाढली की पुढे त्यांनी "ग्रामिण बँक" नावाच्या बँकेची स्थापना केली. डॉ. मोहम्मद युनूस यांना २००६ साली शांततेचा नोबेल पुरस्कार मिळाला.
डॉ. मोहम्मद युनूस यांच्यापासून प्रेरणा घेऊन सुक्ष्म वित्त पुरवठा करण्याचे प्रयोग जगभर सुरु झाले. यातला एक प्रयोग होता त्यांच्या शेजारचाच. श्री चंद्रशेखर घोष यांनी कलकत्त्यापासून साठ किमी अंतरावर असलेल्या बागनान या खेडेगावात "बंधन" नावाच्या सुक्ष्म वित्त पुरवठा संस्थेची स्थापना केली. सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास महिलांना रोजगारासाठी अर्थ साहाय्य करून गरिबी निर्मुलनाच्या दिशेने पाऊल टाकणे हा या संस्थेचा मुख्य हेतू होता. आणि संस्थेचा हा हेतू सफल झालाही. "बंधन"ने अनेक गरिबांना आर्थिक मदतीचा हात देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभे केले. छोटे व्यावसायिक बनवले.
भारतीय रिझर्व बँक बँकिंगचे नवीन परवाने देण्याचा विचार करत होती तेव्हा परवान्यासाठी "समाजातील आर्थिकदृष्ट्या कनिष्ठ स्तरास वित्त साहाय्य" हा एक निकष होता. "बंधन"ने आपल्या तेरा वर्षांच्या वाटचालीत ते कृतीतून दाखवून दिले होते. त्यामुळे भारतीय रिझर्व बँकेने "बंधन"ला बँकिंगचा परवाना दिला यात नवल ते काय.
सुचना: या छोटेखानी लेखात तपशीलातील चुका आढळल्यास कृपया निदर्शनास आणून द्याव्यात. एका स्तुत्य उपक्रमाची कसलीही माहिती न घेता खिल्ली उडवणारा लेख मिपावर आल्यावर व्यथित झालो आणि "बंधन"ची जुजबी ओळख व्हावी म्हणून चार शब्द लिहिले आहेत.
प्रतिक्रिया
7 Sep 2015 - 11:59 pm | एस
असेच वाटले होते.
8 Sep 2015 - 12:51 am | शलभ
मलाही..
8 Sep 2015 - 8:46 am | नाखु
या धाग्यालाही +१ आहेच आणि त्या धाग्यालाही.
तो धागा हा फक्त नावाच्या अनुषंगाने गमतीत लिहिला गेला होता, हा धागा माहीतीपूर्ण आणि कार्याचे महत्व अधोरेखीत करणारा आहे.
एखाद्या सदस्याने घेतलेल्या आय्डी नावावरून केलेल्या माफक विनोदाइतकेच त्या धाग्याचे मनोरंजन+साहित्यीक मूल्य आहे.
वाचक नाखु
प्रतीसादातील बोजड शब्दांना काल झालेली सा.सं. भेट कारणीभूत आहे.
8 Sep 2015 - 11:44 pm | डॉ सुहास म्हात्रे
+१
8 Sep 2015 - 12:45 am | बोका-ए-आझम
याचा अर्थ त्याच्याबद्दल आदर नाही असा का घेतला जातो हे समजत नाही. तो खिल्लीचा धागा माझ्यामते तरी विनोदी होता आणि त्यात बंधन या शब्दावरून विनोद केलेले होते आणि ते सर्व निखळ विनोद होते, कुठेही ओंगळ किंवा कमरेखालचे विनोद केले नव्हते. आता यापुढे मिपावर कुठल्या विषयांची खिल्ली उडवायची आणि कुठल्या नाही त्यांची एक यादी देत चला. म्हणजे बरे पडेल.
9 Sep 2015 - 1:15 pm | वेल्लाभट
हाच तर मोठा विनोद केलाय यांनी...
8 Sep 2015 - 7:10 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
Sa.Ga. sir, Can you please write in details please? Such good programs needs and deserves more exposure.
(Sorry for English, Something is not right with browser :( )
8 Sep 2015 - 10:14 am | चाणक्य
धन्यवाद धन्याशेठ.
8 Sep 2015 - 10:28 am | वेल्लाभट
शीर्षक बघून वाटलं की 'त्या' धाग्याचं विडंबन झालं की काय ! पण जेन्युइनली, तुम्ही पुरवलेली माहिती उत्तम आणि स्तुत्य आहे. नेव्हर न्यू अबाउट इट.
हे बाकी भारी होतं.
लेखनप्रकार 'विरंगुळा' लेखनविषय 'विनोद मौजमजा' असलेल्या धाग्यालाही तुम्ही एवढं गांभीर्याने घेता यात आनंदच आहे. फक्त इथे माझ्या माहिती पेक्षा तुमची विनोदग्रहणक्षमता तोकडी ठरली. चालायचंच.
8 Sep 2015 - 8:51 pm | सतिश गावडे
एखाद्या संस्थेची कसलीही माहिती न घेता केवळ त्या संस्थेच्या नावावरून विनोद करणे म्हणजे... असो.
9 Sep 2015 - 1:15 pm | वेल्लाभट
थँक यू.
8 Sep 2015 - 12:16 pm | मित्रहो
मी बंधन बँक म्हणजे नवीन पेमेंट बँक समजत होतो. ती सूक्ष्म वित्त पुरवठा कंपनी जिला बँकेचा परवाना मिळाला ती आहे होय.
सूक्ष्म वित्त पुरवठा ही पद्धत फायनांशियल इनक्लुझन च्या दृष्टीकोनातून चांगली आहे पण त्यात प्रकारात पण त्रुटी आहे. आंध्रामधे एसकेएस बद्दल बरेच बरे वाइट लिहून आले होते. मूळ समस्या कुठल्या कारणासाठी वित्त पुरवठा होतो. तो अॅसेट निर्मितीसाठी व्हायला हवा. तो आरामदायी वस्तूवरील खर्चासाठी नको.
बाकी मोहम्मद युनुसला पण ग्रामीण बँकेच्या काराभारातून नंतर काढण्यात आले.
8 Sep 2015 - 9:01 pm | पैसा
उत्तम माहिती. मायक्रो फायनान्स मधे असलेल्या बंधनला पूर्ण बँकेचा दर्जा मिळाला हे छानच झाले. डॉ. अशोक लाहिरी आणि चंद्रशेखर घोष यासारख्या सुयोग्य व्यक्तींकडे बँकेचे नेतृत्व आहे असे दिसते. काही वेगळेपणा टिकवून ही बँक काम करू शकते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
बाकी वेल्लाभटाच्या धाग्यावरून वाद व्हायचे कारण नाही. कसलेही विडंबन होऊ शकते. आयसाआयसीआय चे विडंबन आईच्याआईची बँक असे सर्रास होते तर आमच्या सिंडिकेट बँकेला स्टाफसुद्धा "शेंडीकट बँक" म्हणतात. निव्वळ गंमत म्हणून ते सोडून द्यावे. त्या धाग्यामुळे सतिश गावडे यांना हा धागा काढावासा वाटला हे त्यात सगळ्यात चांगले झाले.
9 Sep 2015 - 1:16 pm | वेल्लाभट
+१
8 Sep 2015 - 10:08 pm | सव्यसाची
शेखर गुप्ता यांनी वॉक द टॉक मध्ये चंद्रशेखर घोष यांची मुलाखत घेतली होती.
ती इथे पाहायला मिळेल:
http://www.ndtv.com/video/player/walk-the-talk/walk-the-talk-with-chandra-shekhar-ghosh-founder-and-cmd-bandhan-bank/378999
9 Sep 2015 - 12:08 pm | बोका-ए-आझम
यांचं भाषण ऐकायचा योग २००६ साली आला होता. मुंबई विद्यापीठात हे भाषण झालं होतं. तेव्हा त्यांनी ग्रामीण बँकेची काही तत्वं सांगितली होती -
१. कर्ज हे त्यांनाच मिळेल ज्यांना ती वस्तू बाजारातून घेणं परवडत नाही.
२. कर्ज हे अशाच गोष्टींसाठी मिळेल ज्यांचा उपयोग हा उदरनिर्वाहासाठी होणार आहे. उदाहरणार्थ टीव्ही विकत घेण्यासाठी कर्ज मिळणार नाही.
३. कर्ज हे स्त्रियांना मिळेल. गरिबीचे जास्तीत जास्त चटके त्यांनाच बसतात.
४. कर्जासाठी तारण म्हणून ठेवलेली गोष्ट - घर किंवा जमीन ही त्या स्त्रीच्या नावावर असली तरच कर्ज मिळेल.
५. जर कुठलीही मालमत्ता नसेल तरीही कर्ज मिळेल पण तेही घरातील स्त्रीलाच.
६. कर्जाचं वाटप आणि परतफेड याची जबाबदारी त्या गावातील बचतगट (Self Help Group) यांच्याकडे असेल. ग्रामीण बँकेचे विकास अधिकारी या गटांशी नियमित संपर्क ठेवतील.
७. एक कर्ज पूर्णपणे फेडल्यावरच दुसरं कर्ज मिळेल.
या तत्वांचं शिस्तबद्ध पालन केल्यामुळेच ग्रामीण बँक आज सूक्ष्म वित्त क्षेत्रातली एक अग्रगण्य संघटना आहे. भारतात ही मूळ तत्वं तितक्या शिस्तबद्ध रीतीने राबवली गेली नाहीत हे निरीक्षण युनुस यांनी त्या भाषणानंतरच्या प्रश्नोत्तरांच्या कार्यक्रमात नोंदवलं होतं. त्यांच्यासारख्या द्रष्ट्याला केवळ राजकारणापायी ग्रामीणमदून बाजूला काढण्यात अालं हे दुर्दैव.
9 Sep 2015 - 12:45 pm | बॅटमॅन
मस्त माहिती गावडे सर.