म्हणजे उन्हाळ्याचा शेवट चालू होता .पावसाळ्याला नुकतीच सुरवात झाली होती . उन्हं कलू लागली होती . दिवसभर उन्हाच्या काहिलीनं वैताग आला होता .पण आता कसं गार वारं सुटल्या मुळं जीवाला बरं वाटत होतं .आभाळ जरा भरून आल्यासारखं वाटत होतं . दिवसभर फळं विकत बसलेली कमळी आता कंटाळली होती . तिच्या पाटीतला (टोपलीतला) शेवटचा द्राक्षाचा घड संपला .विक्री चांगली झाली होती . २-३ पेरू शिल्लक होते पण 'आता लई उशीर नगं करायला. न्हाईतर आई कावल' म्हणून तिनं ते जवळच्या कापडी पिशवीत घातले . जवळच्या बाटलीतलं पाणी बी दोन घोटंच उरलं होतं .ते संपवलं .लुगडं झटकून ती उठली . केस सोडून पुन्हा अंबाडा घातला . डोईवर पदर घेतला अन पाटी काखोटीला मारून ती रस्ता तुडवू लागली .
कमळी शेजारच्या गावातून तालुक्याला फळं विकायला यायची.तिचा बा तिच्या लहानपणीच वारला होता .बा गेल्यानंतर तिनं चौथीतून शाळा सोडली होती . घरची थोडीफार शेती होती . आई शेतीकड लक्ष द्यायची पण कमळीला काही शेतात राबायला आवडायचं नाही . ती आपली जायची फळांची पाटी घेवून तिच्या मैत्रिणीबरुबर .गाव तसं तालुक्यापासून जरा लांब होतं . कधी मधी गाडी मिळायची . पण कमळीला आपलं चालतच जायला आवडायचं .
दोघीजणी गप्पा मारत चालायच्या . गाडीचं पैसं वाचवून वाचवून तीनं नुकतंच चांदीचं पैंजण घेतलं होतं .
कमळी आसंल १७-१८ वर्षांची पोर . मोठं टपोरं डोळं , धारदार नाक अन नाजूक जीवणी सौंदर्यात भर घालायची त्यातून केसांच्या बटा कपाळावर कपाळावर भुरभूरायच्या . तिचं नाव 'गुलाब' असायला हवं होतं . पण आईबापानं कमळी ठेवलं होतं . तर अशी हि कमळी. आज तिची मैत्रीण तिच्या मावशीकड गेल्यामुळे कमळीला एकटच तालुक्याला जावं लागलं . अन त्यात उशीर झाल्यामुळं ती झपझप पाय टाकत चालली होती . 'तुझ्यासारख्या तरण्याताठ्या पोरीला लवकर घराकडं यायचं काळात नाय का टवळे SSS ' म्हणून गेल्याच आठवड्यात आई रागं भरली होती .आज पुन्हा बोलणी खावी लागणार म्हणून करत होती . अशीच स्वतःच्या विचारांत गुंग होवून चालत असताना . 'हुरर्र हय्या' म्हणून बैलगाडी हाकल्याचा आवाज आला . कमळीनं वळून बघितलं .
"कमळे . ये गाडीत बस . " - गाडीवाल्याचा आवाज आला
"कोण शिर्पा मामा ?" - कमळीनं विचारलं
"मामा नव्हं . चिरंजीव हैत त्यांचं "
"कोण गण्या ?"
गण्या सातवी पर्यंत शिकला होता . नंतर त्याचं काय मन रमंना शाळेत . आणि बाप बी काय त्याच्या अभ्यासाच्या मागं लागत नव्हता . घरची परिस्थिती चांगली असल्यामुळे कुणी त्याला शाळेत जावून शिकंच असा काय आग्रह केला नव्हता . गण्या आसंल कमळीहून २-३ वर्षांनी मोठा .तरणाबांड .दिसायला बी झ्याक होता .पिळदार शरीराचा . दोघांना एकमेकांबद्दल मनातून कायतरी वाटत होतं . आत्ताच्या भाषेत बोलायचं तर दोघांचा एकमेकांवर क्रश होता .पण कुणी तसं स्पष्ट बोलून दाखवलं नव्हतं एकमेकांना . एकदा फक्त गण्याने "कमळी सोभंल बघा गणेशला" असं कमळीच्या आईनं गाण्याच्या बापाला म्हणल्याचं ऐकलं होतं .कमळीला सगळ्यात जास्त आवडायचा तो त्याचा निर्भीड स्वभाव . एकदा त्यानं आणि त्याच्या बापानं गुंडांशी चार हात करून त्यांना चांगलंच लोळवल होतं . आता गाडीत गण्या आहे म्हणल्यावर कमळीच्या काळजात जरा धडधड झालं . गण्याच्या काळजात आनंदानं लाह्या फुटल्या . पण ये म्हणल्यावर लगीच कशाला जायचं गाडीत म्हणून ती म्हणाली ,
"नको . मी जाते कि चालंत " - कमळी
"चालंत ? गाडी असताना ?" - गण्या
"व्हय . त्याला काय हुतंय ? रोज तर चालत जाते कि"
"आगं . पण रोज कुठं असतीया गाडी . आज आहे ना. आन उशीर झालाय . अंधार पडायला लागलाय . ये बघू ."
पण कमळी काय गाडीत बसली नाय . आरं काय न्हाय होत . येते मी चालत .
"अश्या एकट्या पोरीला बघून कुणी आडवलं तर ? ह्या रानात जंगली जनावरं बी येत्यात अंधार पडल्यावर ".
कमळी थोडी घाबरली . पण ती म्हणाली .
"तू हायस नव्ह . तू हळूहळू गाडी चालव कि. मी चालते गाडी बरुबर "
"बरं" म्हणून गण्या तिच्या स्पीडनं गाडी हाकू लागला . ५ मिनटान नंतर म्हणाला .
"छान . असं गेल्यावर गेल्यावर सकाळी कोंबड अरवायच्या येळंला पोचू . तुला यायचं नसलं तर जातो म्या . तू ये आपली चालत .अंधारतनं एकटीच . "
कमळीनं विचार केला . हा निघून गेला तर आता अंधारातून एकटीनं जावं लागलं . आन मग खरंच कुणी आडवलं , कोण जनावर आलं तर ?
"बरं बरं . येते . " म्हणून ती गाडीत चढली . गण्या सुखावला .कमळी पाय खाली सोडून एका हातानं गाडीच्या दांड्याला पकडून गाडीच्या कडेला बसली .दोन - चार मिनटानं गण्यांन मागं वळून बघितलं .
"ऑ . आगं अशी काय बसलीस . पार गाडीच्या टोकावर . आत सरक कि . अन पाय वर घिवून बस .आता रातचं साप निघ्त्यात . पाय बिय लागला तर काय घ्या ? "
"व्हय व्हय " म्हणत ती पाय वर घेवून आणि आत सरकून बसली . गण्यानं तिच्याकड हसरा कटाक्ष टाकला . तिनं उगं पदर लपेटून घेतला .
"काय गं . लई येळ केलास आज . अंधार पडला कि . "
"व्हय रं . दराक्ष लई दिवस राहत नाहीत . थोडी उरली होती . म्हणलं संपवूनच जावं . येळेचं भानच नाही राह्यलं बघ . अन तू कसा काय रं आज ह्या रस्त्यांनी ? '
"आबांनी तालुक्याला धाडलं होतं . बियाणं आणि खतं घेतली होती त्यांचं पैसं द्यायचं राह्यलं होतं थोडं . ते दिऊन आलो ".
गण्याची बैलगाडी नेहमीच्या कमळीच्या रस्त्यानं नव्हती चालली . कारण कमळी जायची ती पायवाट होती . आता गाडीनं जायचं म्हणजे गाडी जावू शकेल अश्याच रस्त्यानं जाणं भाग होतं . थोडा वेळ शांततेत गेला . आता अंधार वाढला होता .गण्या मुद्दामच बैलगाडी हळूहळू चालवत होता . त्याने रस्ता दिसण्यासाठी कंदील पेटवून बैलांच्या जू च्या मधोमध लावला .त्या उजेडात सावल्या हलत होत्या .बैलांच्या गळ्यात घुंगरं बिंग्र नव्हती . पण चाकाचा करकर आवाज त्या शांततेला चिरत होता .रातकिड्यांची किरकिर चालली होती . मधूनच रातपारवे उडत होते . दूर कुठूनतरी कुत्राच्या केकाटण्याचा आणि मग विव्हळण्याचा आवाज आला . कमळी तशी घाबरट नव्हती पण आता रात्रीच्या अंधारात , एका पुरुषाबरोबर आन ते बी अश्या रानात . आता मात्र तिला भीती वाटू लागली .
"गण्या हान कि गाडी बिगीबिगी . किती दमानं चालायलास "
"बिगीबिगी हाकायला आता काय दिस हाय व्हय ? आगं रातीची बैल हळूहळू चालत्यात . तू म्हणत अस्चील तर हाणतो जोरात . पण कुठं खड्याबिड्यात बैलं गेली तर दोघांनाबी हतंच राहावं लागल रातीचं . राहशील न्हवं माज्या बरुबर ? " गण्याचा स्वर मिस्किल होता .
"नगं नगं . चालव आपली हळूहळू ".
गाडी आपली हळूहळू चालली होती . थोड्या वेळाने गण्याने चोरटा कटाक्ष तिच्याकडे टाकला . कमळी घाबरली आहे हे त्याच्या लक्षात आलं होतं . तो गालातल्या गालात हसला . मग म्हणाला,
"कमळे काय गं घाबरलीस का ? "
कमळी गप्प .
"आगं एवढ्या लांब का बसलीस ? आता तुझ्याशी बोलायचं तर सारखं मागं वळून बघावं लागतंय . मगाचपासनं सारखं मागं वळून मान दुखायला लागली बघ . हितं यीवून बस कि जरा . हतं शेजारी बस .म्हणजे निट बोलता
यील ".
कमळीला ते पटलं ती त्याच्या शेजारी जर अवघडून बसली . गण्या आता लई खुष झाला . परत इकडच्या तिकडच्या काहीतरी गप्पा झाल्या . मग पुन्हा थोडा वेळ शांततेत गेला . गण्याला आता कमळीला अजून थोडं आपल्याकड खेचायची हुक्की आली . त्यानं तिची गंमत करायची ठरवली .
"काय गं कमळे तुला ठावं हाय का ? "
"काय रं ?"
" पुढं जखीनीचा माळ हाय. "
"जखीनीचा माळ? " कमळीनं चमकून विचारलं
"व्हय .लई वर्सांपुर्वी सुंदरा नावाची म्हातारी होती . तिला म्हनं कसला रोग झाला होता .तिचं करायला बी कोनी नव्हतं . विधवा होती . पोर नव्हतं तिला . मग गावकर्यांनी हाकलून दिली तिला गावाबाहेर . ती तिथं रानात भलंमोठं वडाचं झाड हाय ना, त्याच्या खाली बसून राहायची . मग तिथंच मेली बघ . बिचारी .पण ती जखिन
हून लोकांना धरती बघ . "
कमळीचा चेहरा भीतीनं पांढराफटक पडला . अन नि मागचा पुढचा विचार न करता सरळ जावून गाण्याला धरून त्याला खेटून बसली .
प्रतिक्रिया
4 Sep 2015 - 6:12 pm | आनन्दा
एक होतं गाव. त्यात होतं पोष्ट, झाली माझी गोष्ट.
क्रमशः राहिलय का?
4 Sep 2015 - 6:25 pm | मांत्रिक
;) मजेशीर आहे. भयकथेपेक्षा ग्रामीण रोमॅण्टिक कथा वाटते.
पण छान आहे. एक अनुभव म्हणा पाहिजे तर!
4 Sep 2015 - 6:59 pm | एक एकटा एकटाच
जखिणीचा माळ
पुढचा भाग लवकर टाका
मज्जा येईल
4 Sep 2015 - 7:08 pm | चांदणे संदीप
लय आवडली गोष्ट!
खरं कंसात भयगूढ लिहून गम्मत केली का??
घाबरत घाबरत धागा उघडलेला
Sandy
4 Sep 2015 - 7:41 pm | द-बाहुबली
उगाच्च गाडितली कमळीच कशी जखीण असते असा शेवट असावा असा अंदाज बांधत कथा शेवट पर्यंत वाचली अन...
असो, अतिशय सुरेख शुध्द लिखाणातली जिवनकथा असेच म्हणूया.
4 Sep 2015 - 9:57 pm | प्यारे१
दोन फुलं तरी आनायची एकमेकाला चिटकून पाट्या पडायला लागल्यावर.....
शंकर पाटलांची का कुणाची अशी एक गोष्ट वाचलेली आठवते. फक्त त्यातल्या कथानायिकेचा नवरा शहरात कामाला असल्यानं ही एकटी तालुक्याच्या गावी जाऊन भाजी विकत असते असं काही. पिवळ्या पुस्तकात याच्या पुढचे आवश्यक कार्यक्रम संगतवार दिलेले असतात, ते मुळातून वाचावेत. ;)
4 Sep 2015 - 9:59 pm | मांत्रिक
चित्रा थेटरला लैच सौदिंडियन पिच्चर बगितलेत जनू ;)
4 Sep 2015 - 10:03 pm | प्यारे१
नाय. पैला 'हेन्रीज रोमान्स' म्हणून बघलो होतो 97 साली. हौस. त्यानंतर तिथं नाय. नंतर कृष्णा थेटर ला बघलो काही. नावं आठवत नैत.
4 Sep 2015 - 10:05 pm | मांत्रिक
गेलं ते सर्व रे! मातीमोल झाला तो इतिहास! :(
पार बाजार उठला सातारचा!
4 Sep 2015 - 10:11 pm | प्यारे१
असो!
5 Sep 2015 - 1:24 am | उगा काहितरीच
९० च्या दशकातला मराठी चित्रपट !
7 Sep 2015 - 12:13 pm | तुडतुडी
क्रमश: लिहायचं राहिलं . थोडी भय थोडी गूढ कथा आहे . पुढच्या भागात येईल ते .
द-बाहुबली . असं अजिबात करायचं नसतं वो .कथेतलं गूढ माहित असलं तरी सांगायचं नसतं . त्याने दुसर्यांचा मूड ऑफ होतो . आणि तुम्ही म्हणताय तसं काही नाही घडत कथेत