काही न जुळलेले गुण!!!

शीतल जोशी's picture
शीतल जोशी in जनातलं, मनातलं
24 Aug 2015 - 1:58 pm

काही न जुळलेले गुण!!!

आमचे काही न जुळलेले गुण, काही म्हणजे केवळ म्हणायला, खरे तर सगळेच गुण-अवगुण न जुळणारेच. गेली काही वर्षे एकत्र घालवल्यावर, आता जर कुठे सगुण-निर्गुणच्या जवळ आहोत आम्ही. म्हणजे फार काही विशेष नाही, न जुळलेल्या गुणांना आम्ही उभयतांनी संमती दिली आहे आणि सोयीस्कररित्या 'काना-डोळा' केला आहे. ऐकून न ऐकल्यासारखे आणि बघून न पाहिल्यासारखे. असेच काही दाखले..

प्रवेश एक : वर्ष पहिले

ती (मनात) : आज मस्त पुस्तक वाचणार, ही कादंबरी आज संपवायचीच आहे, तसेही उद्या सुट्टी आहे, आज रात्रीत वाचून होईल.
तो (मनात) : आज जर लवकर झोपावे, पहाटे लवकर उठून, कॅमेरा घेऊन बाहेर पडता येईल. तळजाई, पाषाण लेक असे कुठे तरी.
ती: हे काय, इतक्या लवकर आवरले आज तुझे, झोपायला रेडी एकदम :)
तो : अगं, उद्या जायचं न पहाटे,!!!! जायचं न फिरायला उद्या?
ती: अरे, पण पुस्तक वाचायचा प्लान होता माझा, नाही गेलो उद्या तर नाही का चालणार? परत जाऊ ना, अगदी पहाटेच बाहेर पडू मग.
तो: ठीक, फिर कभी. :)

प्रवेश तोच : वर्ष दुसरे, तिसरे, चौथे

तो : तू किती वेळ वाचणार अजून?
ती: हा काय प्रश्न आहे का? साहजिकच आहे, पुस्तक संपेपर्यंत.
तो: उजेडात झोप नाही लागत मला.
ती: ?, मी काय करू मग? मला वाचायचे आहे न? मी दुसर्‍या खोलीत जाऊन वाचते मग. अलीकडेच जर उजेडाचा त्रास व्हायला लागला आहे
तो: हे बघ. विषय भलतीकडे नकोय. आणि सकाळी लवकर उठायचे आहे न आपल्याला? मग लवकर झोपायला नको का!!!!
ती: हे कधी ठरलंय?
तो: अग, असे काय, मागच्या रविवारी बोललो की आपण की असे एखाद्या वीकएंडला जाऊ या प्रभातफेरी मारायला.
ती: बरोबर, मान्य, आपण बोललो, पण एखाद्या म्हणजे लगेच पुढच्या, हे कधी ठरले? मनानेच ठरवत नको जाऊस.
तो: तू अशक्य आहेस.
ती: हे बघ, जायचे की नाही हा इश्यू नाहीये, आमच्यात एकट्याने ठरवायची पद्धत नाहीये.
तो: आमच्यात पण, दिलेला शब्द मोडण्याची पद्धत नाहीये.
ती :तूपण अशक्य आहेस. मला वाचू दे आता, मूड लागलाय वाचायला मस्त
तो: मलापण माझा मूड स्पॉइल नाही करायचा आहे, गुड नाईट.
ती: आमच्यात गुड नाईट हसर्‍या चेहर्‍याने म्हणतात.
तो: आमच्यात हसरा चेहरा असाच असतो.
ती: आधी तर (लग्नाच्या) वेगळाच असायचा.
तो: आमच्यात नंतर (लग्नाच्या) असा करायची पद्धत नाहीये, पण सोबतच्या लोकांवर अवलंबून आहे ते.
ती: तुला खरे तर वाचायची आवड आहे, तरीपण तू असा का वागतोस न, "I dont know". जाऊ दे.
तो: हो, मीपण वाचतो. पण, मी एका वेळी एकच पुस्तक जवळ ठेवतो, ४-५ पुस्तके उशाशी ठेवण्यातले लॉजिक, परमेश्वरालाच ठाऊक. पुस्तक वाचणे छान आहे, पण ती पुस्तके छानपण तर ठेवायला पाहिजे न?
ती: मला लहानपणापासून अशीच सवय आहे, कधीपण मूड बदलू शकतो आणि मग पुस्तकही त्याप्रमाणे. मला पुस्तके नसली ४-५ जवळ, तर नाही चालत आणि हे माहीत असून, मग कशाला बोलायचे? काही लोकांना मोबाईल वाजला तरी न उचलण्याची सवय असते की रिप्लायसुद्धा करत नाही, जसे काही बाकीच कामाशिवायच रिंग करत असतात.
तो: कोणता विषय कुठे जातोय?
ती: जिकडे वळवला, तिकडेच वाहतोय..
तो आणि ती (मनात): इतका वेळ भांडण्यापेक्षा झोपलो असतो, तर निम्मेतरी वाचून झाले असते.
तात्पर्य : सकाळी उठायला उशीर, पुस्तक पूर्ण वाचणे आणि फिरायला जाणे दोन्हीचा पोपट!

प्रवेश तोच: जुने झाल्यावर ५ वर्षे व नंतर

तो: नवीन पुस्तक आणले आहेस काही वाचायला?
ती : नाही, जे हवय ते नाही मिळाले.
तो: जर मिळाले तर
ती ; बहार येईल
ती ; वाह, गिफ्ट माझ्यासाठी?
तो : म्हणजे काय आणि कुणासाठी?
ती: काय सांगता येत नाही आजकाल, खात्री केलेली बरी
........................आणि ती गिफ्ट आहे : टेबल लॅम्प, बुक शेल्फ आणि जे हवे आहे ते बुक :)
भांडण सुरू होण्यास स्कोपच नाही.
ती: मस्त आहे, एक नंबर. मला आठवतंय, तू मला दिलेले पहिले गिफ्ट 'पुस्तक संच- बोक्या सातबंडे'. त्याच दिवशी वाटले अरे हाच तो, याच्याबरोबर आयुष्य काढता येईल.
तो : आणि भांडतापण येईल ....मनसोक्त
ती : अशक्य आहेस तू!!!
तो : मग पुढचा रविवार पक्का न?
ती : येस, पक्का, अगदी तुझ्या पहाटे नको, माझ्या पहाटे जाऊ या. तू मागच्या वेळी काढलेले तिथले फोटो इतके मस्त आलेत की मला आवडेल प्रत्यक्ष पाहायला.

तात्पर्य: ही केवळ 'adjustment' नाही, हे मुरायला लागलेले प्रेम आहे बहुधा!!!! सवयींचीसुद्धा सवय होते, काही सवयी आवडतात, काही बदलतात, काही आवडत नाहीत आणि बदलतही नाहीत, कारण त्या केवळ सवयी नाही, तर व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो अविभाज्य. आपल्याला तो काढून नाही टाकता येत, पण आपण एक तर तो दुर्लक्षित करू शकतो किंवा आपल्या पद्धतीने थोडा वळवू शकतो. खरे तर हेच संभाषण दोन भावंडातही होते, पण त्या निरागस वयात ते नात्यांच्या बांधत, मायेत विरघळून जाते. पण हेच तो आणि ती मध्ये मात्र नक्कीच भांडण होऊ शकते...:)
पण नाते बळकट व्हायचे, तर थोडी भांडणे हवीतच, नाही का? आणि त्याला भांडणच म्हणावे, उगाच मतभेद वगैरे नको, म्हणजे मन कसे मोकळे होते, आरश्यासारखे स्वच्छ.
म्हणजे मग कसे आपण निखळ प्रेम करायला आणि आनंद घ्यायला रिकामे :)

भांडणं सारखी प्रेमामध्ये सजा नाही
पण भांडणाशिवाय नात्यामध्ये काहीसुद्धा मजा नाही
भांडणाशिवाय, नात्यांच्या दोन टाकामध्ये
कुणीसुद्धा तिजा नाही
आणि म्हणूनच भांडणाशिवाय प्रेमामध्ये काहीसुद्धा मजा नाही

-- शीतल जोशी

वाङ्मयविरंगुळा

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

24 Aug 2015 - 2:21 pm | पद्मावति

खूप छान लिहिलय.

शीतल जोशी's picture

24 Aug 2015 - 5:45 pm | शीतल जोशी

धन्यवाद :)

असा लेख. खुप साधेपणाने यशस्वी सहजीवनाची गुरुकिल्ली सांगीतली आहे.

शीतल जोशी's picture

24 Aug 2015 - 5:45 pm | शीतल जोशी

धन्यवाद :)

काव्यान्जलि's picture

24 Aug 2015 - 6:46 pm | काव्यान्जलि

खूपच छान लिहिलंय.... आवडेश
एकदम सोप्या भाषेत सगळ्या संसारच सर... :P

खरच छान लिहिला आहे लेख.

एक एकटा एकटाच's picture

24 Aug 2015 - 7:15 pm | एक एकटा एकटाच

मस्त लिहिलय

अगदी मस्त...........

संदीप डांगे's picture

24 Aug 2015 - 8:34 pm | संदीप डांगे

लेखिकेचं नाव बघून घाबरत धागा उघडला... पण लौकर आटपलं! मस्त लिहिलंय... आवडलं.

शीतल जोशी's picture

24 Aug 2015 - 9:58 pm | शीतल जोशी

Thnk u everyone :)

मी-सौरभ's picture

24 Aug 2015 - 10:38 pm | मी-सौरभ

आवडेश

उगा काहितरीच's picture

25 Aug 2015 - 1:06 am | उगा काहितरीच

अनुभव नाय ना अजून मला ;-)

जव्हेरगंज's picture

25 Aug 2015 - 1:32 am | जव्हेरगंज

छान लिहिलय...:-)
हे रात्री बेरात्री लाईट चालू करणार्यांचा जाम वैताग येतो .
होस्टेलला अनुभव घेतलाय.
बादवे, वाचण्यापेक्षा फिरायला जाणे कधीही ऊत्तम.

लेखन आवडले. फार मोठे नसल्याने लगेच वाचून झालेही.

भिंगरी's picture

25 Aug 2015 - 3:37 am | भिंगरी

याला 'यशस्वी जीवन' ऐसे नाव.

कंजूस's picture

25 Aug 2015 - 6:20 am | कंजूस

असे काही समजुतदार सौम्य वार्तालाप होतात पृथ्वीतलावर?

शीतल जोशी's picture

27 Aug 2015 - 12:00 pm | शीतल जोशी

होतात कि कधी कधी , चुकूका असे ना!!1

श्रीरंग_जोशी's picture

25 Aug 2015 - 7:45 am | श्रीरंग_जोशी

हलक्या फुलक्या संवादांतून चांगले भाष्य केले आहे.

स्पंदना's picture

25 Aug 2015 - 9:38 am | स्पंदना

फार लवकर भांडण मिटलं बाबा?
आवडले प्रसंग!! हलके फुलके!

तुषार काळभोर's picture

25 Aug 2015 - 9:53 am | तुषार काळभोर

:) पाच वर्षे लागली त्यांना!!

स्मिता.'s picture

25 Aug 2015 - 9:48 am | स्मिता.

हळूहळू मुरत जाणारा संसार...

विजुभाऊ's picture

25 Aug 2015 - 7:39 pm | विजुभाऊ

हे बहुधा स्वप्न रंजन असावे असा संशय आहे.
घरोघरीचे अनुभव वेगळेच सांगतात.
एक खौट शंका : तुमचं लग्न झालंय ना की "लीव्ह इन " आहे. लग्नाच्या अटकेतले दोन जीव जसजसे लग्न मुरत जाईल तसतसा त्यांच्यातला (वि) खार वाढत जातो

नितिन५८८'s picture

25 Aug 2015 - 8:53 pm | नितिन५८८

खरच छान लिहिला आहे लेख

चाणक्य's picture

25 Aug 2015 - 10:29 pm | चाणक्य

हलकंफुलकं लिखाण आवडलं.

अकिलिज's picture

25 Aug 2015 - 11:28 pm | अकिलिज

चांगलेच जमून आले आहे. पुलेशु.

डॉ सुहास म्हात्रे's picture

25 Aug 2015 - 11:46 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त लिहिलंय !

पिलीयन रायडर's picture

26 Aug 2015 - 12:01 am | पिलीयन रायडर

छानच लिहीलय!! आवडलं!

एकच बारिकशी विनंती, संपादकांना सांगुन प्लिज तुमच्या आयडी मध्ये "जोशी" असा बदल करुन घ्याल का? प्लिज प्लिज..

माझ्या मते ते इंग्रजी मध्ये joshi असं लिहीलं जातं त्याचा परिणाम आहे. मराठीमध्ये टाइप होताना जोशि च लिहिलं जाणार की! बहुतेक जोशी इंग्रजीमध्ये joshi च लिहितात ना?

लेख खुसखुशीत ओ 'जोशि' काकू.

भुमन्यु's picture

27 Aug 2015 - 2:51 pm | भुमन्यु

मस्त लेख. आवडला.. लग्नानंतरचे ८ महिने समोर तरळुन गेले. तर हे सगळीकडे असंच होतंय तर, मला वाटलं आमच्याकडे काही वेगळं आहे.

मस्त लेख.खुसखुशीत.आवडला!

जुइ's picture

28 Aug 2015 - 11:07 pm | जुइ

हलका फुलका मार्मिक भाष्य केलेला लेख आवडला.