भयमुक्त -बंधानुरक्त (एक छोटीशी गोष्ट)

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
27 Aug 2008 - 1:54 pm

तो उठला,पंख झटकले,आपलं घरटं आणि त्या सभोवतालची ती दाट जंगलातली तुटकी-पडकी विहिर बघत बघत ,थोडासा आळस देत तो बाहेर पडला.
सकाळी सकाळी सुंदर सोनेरी कोवळ्या उन्हाची तिरिप अंगावर घेत प्रसन्नतेने तो उडु लागला.
स्वतःच्या लाल चुटुक ओठ, हिरवे गार पंख्,दिमाखदार तोरा आणि एकुणच समग्र सृष्टीत नावाजलं जाणारं रुपडं घेउन,
आपल्याच आनंदात स्वच्छंदात गाणी गुणगुणत तो जंगलातुन आला बाहेर आणि समोरच्या शेतावर झेपावु लागला.
त्याला मोठीच मौज वाटत होती. इतक्या उंचावरुन माणसही मुंगीइतकी छोटिशी दिसत होती.त्या शेकडो माणसांना गिळुन
एकदम उंच भरारी घेणार्‍या त्या पांढर्‍या पक्ष्याइतकीच उंची आज ह्यानही गाठली होती. त्याला वाटलं की
"वेडीच होती माणसं,शिड्या लावुन स्वतःहुनच त्या अजस्त्र धवल्-पक्ष्याच्या पोटात स्वतःहुन शिरत, आणि तो पक्षी मग उड्डाण घेउन निघुन जाइ. अशा कित्येक पक्ष्यांना मी मागं टाकलय म्हणावं.माझ्या वेगाशी स्पर्धा करतात,फडतुस उडता न येणारे मानव!
अरेच्चा,पण हे मागुन, ....
कुणीतरी येतय्.मला वाटलं त्या धवल्-पक्ष्याच्या येण्यानं हलणारी ती हवा असेल. पण...वास तर शिकारी पक्ष्याचा आहे."
त्यानं वळुन पाह्यलं. हा तर खासा ससाणा! ह्याच्याच पिच्छावर असणारा.तो वेगाने इकडेच येत होता.
पण... हा इकडे कसा? ह्या जंगलाच्या परिसरात, आत्-बाहेर, शेतापाशी कोण-कोण आहे कुणाचा नेम आपल्यावर आहे ह्याचा
पोपटाला चांगलाच अंदाज होता.आजवर हा होता कुठे? आला कुठुन? आता आणखी किती दिवस ह्याच एरियात हा र्‍हाणारेय?
ह्या शंका पोपटाच्या मनात क्षणभरात येउन गेल्या.पोपटाला काय बी कळना.
हा ससाणा तो आज प्रथमच ह्या भुभागात पहात होता.
पण आता विचार करत बसुन उपयोग नव्हता.सुटायच होतं.त्यासाठी उडत सुटायचं होतं.वेगानं उडायचं होतं.
त्यानं जीव एकवटुन उडायला सुरुवात केली.वेगानं उडणं सुरु झालं.दिशा बदलुन,चकवा देउन पाह्यलं.
पण हा ससाणाही भलताच चपळ होता.अंतर कमी कमी करत तो अगदी जवळ पोचला, अगदी पंखभर अंतरावर त्याची चोच होती.
पोपटापासुन.आणि एवढ्यात...
एवढ्यात पोपट घुसला जंगलात्.घनदाट , दिन्-काळोखी असणार्‍या जंगलात; निबिड वनात तो शिरला. जंगल त्याच्या ओळखीचं, जणु त्याचं दुसरं,मोठ्या रुपातलं घरटच होतं.
इथल्या दाट वनातल्या वाटा ससाण्याला नव्हत्या माहित.पण पोपट सफाइनं इथनं अंग चोरुन उडु शकत होता.
पोपट शिताफिनं सटकला,झाडातुन, फांद्यातुन मिळणार्‍या फटितुन त्यानं अंग चोरुन वाट काढुन घेतली.
आणि तो ढोला, अवजड, आकारानं फताडा ससाणा मात्र वाट चाचपडत बसला. आणि तशातच एका फांदिवर आपटुन जखमी झाला. पोपट झाला दृष्टी आड. आणि इथं तर उलट परत जायचे वांधे झाले आता वाट शोधत ससाण्याचे.
इकडे पोपट पोचला बरोबर त्या पडक्या विहिरी पासच्या झाडावरल्या आपल्या घरट्यात.
ह्या दगदगीनं थकला होता तो आता, शारिरिक आणि मानसिकही. इतका की स्वतःला डुलकी कधी लागली,
हे ही त्याला कळलं नाही. आणि स्वप्नात होतं त्याच्या एक शेत, हिरवं गार शेत, शिकारी-ससाणारहित शेत,
माणुस नामक अन्नात आडकाठी करणार्‍या फडतुस प्राण्यारहित शेत्.डाळिंबानं भरलेलं शेत्.पेरुनं मढलेलं शेत.
नंतर हळुच कधीतरी त्याचे डोळे उघडले.पोटात अन्नचा कण नाही. भूक अख्खं शरीर जाळु लागलेली.
बहुदा अति थकव्यानं तो दीर्घकाळ झोपुनच होता. दोन्-तीन सुर्य तरी येउन निघुन गेले असावेत झोपेदरम्यनच्या काळात.
विश्रांती झाल्यानं आता किंचित बरं वाटत होतं; भीतीचं दड्पण कमी झालं होतं.अंग हल्कं वाटत होतं.
तो उठला आणि विहीर ओलांडुन पुन्हा शेताच्या दिशेला वळणार इतक्यात............
इतक्यात बाजुलाच त्यानं पाहिलं....तीच्...तीच ती त्या दिवशीची भेदक नजर त्याचा वेध घेत होती.
ह्यानं नुकतच जंगल ओलांडुन शेताच्या हद्दीत प्रवेश केलाच होता; तेव्हढ्यात त्याला हे दिसलं.
ससाण्याला सुगावा लागला असावा ; जंगलात राहणार्‍या पोपटाचा. जंगलाच्या बाहेरच तो लक्ष ठेउन होता.
पुन्हा तेच.....
तीच धावपळ्.....जीवघेणा पाठलाग.......
ससाण्यानं ह्यावेळेस तर जवळ जवळ धरलच होतं त्याला.....
पण पुन्ह एकदा पोपट जंगलात शिरुन, दाट वाटांतुन पसार.
पुन्हा एक लांब झोप.
पुन्हा एक स्वप्न्...सुखाचं स्वप्न्...विनासायास मिळणार्‍या मस्त आयुष्याचं स्वप्न.
पुन्हा दोन्-चार सूर्यांनंतर तो उठला आणी यावेळेस तो विहिबाहेर पडाय्चा अवकाशच होता की...
ससाण्याच्या नजरेने त्याचा वेध घेतला...ससाणा वेआनं त्याच्याकडे झेपावला.
म्हणजे दर दिवसागणिक ससाणा त्या पोपटाच्या निवासाच्या अधिकाधिक जवळ येत होता.
आणि आता तर चक्क त्या विहिरिपर्यंत तो पोचला! पोपटाचं निवास असुर्क्षित झालं.
पण आता? आता काय? पोपट विचार करत होता.
जीवाच्या आकांतानं उडतही होता. इथुन तर आता जावं लागणार.
पण नवीन जागाही हा ससाणा शोधणारच. मग? पुन्हा पाठलाग....
जगायची स्पर्धा....अफाट संघर्ष......तो ह्याला कंटाळत चालला होता...
आणि इतक्यात....
इतक्यात खालुन जाणारा एक माणुस दिसला; हातात काही तरी घेउन....
ह्याआधीही आपले बांधव त्यानं नेलेत त्या पिंजर्‍यात....
हो. पिंजरा होता त्याच्या हातात.....
मोकळा,सताड उघडा आणि रिकामा पिंजरा.
पोपटाला सुटकेचा मार्ग मिळाला. त्यानं झटकन खली जाउन पिं जर्‍याच्या अरुंद दारातुन आत प्रवेश केला.
पाठोपाठ सासाणाही शिरायचा प्रयत्न करु लागला,पण हाय रे दैवा.
ससाणा त्याच्या मोठ्या आकारामुळं शिरु शकेना आणी म्हणुन तत्काळ माघारीही फिरला.
आणि तो पिंजर्‍यातला पोपट सुस्कारा टाकत म्हणाला:-
"हुस्श्...आता किती सुर्क्षित वाटतय नै?"
आता तो ससाण्याच्या भयातुन मुक्त झाला होता...
भयमुक्त झाला होता.आणि अत्यांत सुखात होता................................

कथाविचार

प्रतिक्रिया

ऋषिकेश's picture

27 Aug 2008 - 2:06 pm | ऋषिकेश

मनोबा,
अतिशय मस्त लेखन
अश्या उत्तम लेखनाला माझा सलाम!

-('मिसळ'लेला) ऋषिकेश

आनंदयात्री's picture

27 Aug 2008 - 2:18 pm | आनंदयात्री

वा मनोबा !! सहीच लिहले आहेस. बंधनाचा हा दुसरा व्ह्यु आवडला.

सुनील's picture

27 Aug 2008 - 2:26 pm | सुनील

सहीव लिहिलं आहेस!! आवडलं

(बंदिवान - पण कशात ते नाय सांगणार...) सुनील

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

भडकमकर मास्तर's picture

27 Aug 2008 - 2:27 pm | भडकमकर मास्तर

मस्त लेखन...
हा वेगळा व्ह्यू आपल्याला फ़ार आवडला...

निसर्गात स्वच्छंद भरार्‍या, स्वातंत्र्य जाणीव, पारतंत्र्यातल्या पोपटाचे दु:ख, वगैरे वगैरे तेच्त्येच वाचून वैताग आलेला असताना असलं काहीतरी वेगळं वाचलं की धमाल येते...

______________________________
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

प्रभाकर पेठकर's picture

27 Aug 2008 - 2:40 pm | प्रभाकर पेठकर

असह्य तारुण्याने बेजार तरूण/तरूणीने झटपट लग्न करून 'मोकळे' होण्यासारखे वाटते हे.

आनंदयात्री's picture

27 Aug 2008 - 2:41 pm | आनंदयात्री

=))

आयला कायपण बेक्कार टाकला राव काका !!

सखाराम_गटणे™'s picture

27 Aug 2008 - 2:58 pm | सखाराम_गटणे™

जबरा, फार्म मद्ये रे

सखाराम गटणे
हल्ली मी गंभीर झालोय, वात्रट लिखाण पण गंभीरपणे करतो.

मनिष's picture

27 Aug 2008 - 3:07 pm | मनिष

असह्य तारुण्याने बेजार तरूण/तरूणीने झटपट लग्न करून 'मोकळे' होण्यासारखे वाटते हे.

काका युवराज सारखे एकामागून एक सिक्सर मारत सुटलेत.... आपण नाही जाणार बॉलिंगला! ;)

मूळ लेखाविषयी...वेगळाच व्ह्यू आहे हा....पण नाही पटला. बेंजामिन फ्रँकलिनचे

People who are willing to give up freedom for the sake of short term security, deserve neither freedom nor security.

ह्या अर्थाचे वाक्य आवडले.

मनिष's picture

27 Aug 2008 - 3:14 pm | मनिष

हे 'बिकट वाट वहिवाट नको तू धोपट मार्गा सोडू नको' सारखे उपरोधाने घ्यायचे आहे का????
मन -- कहितरी खुलासा करा बा....

मन's picture

27 Aug 2008 - 3:41 pm | मन

नाही नाही.........
थेट उपरोधिक स्वरही म्हणावस वाटत नाही.
पण हे ही खरय की "सिक्युरिटि सिक्युरिटी" म्हणत म्हणत (किंवा त्याचा अतिरेक करत) किंवा संघर्ष टाळण्यासाठी,संघर्षाला
घाबरुन किंवा पलायन्वाद म्हणुन आपण "सुरक्षित" आणि "मर्यादीत" मार्गच चोखाळतो.
थोडक्यात "धाडसाचा किंवा लढाउ वृत्तीचा" अभाव दिसला इथं; आणि मांडावासा वाटला.
हिंदित "घी देखा लेकिन बडगा नही देखा" म्हणतात तसं. सुरक्षितता जेव्हा दिसते तेव्हा होणार्‍या परावलंबनाचा किंवा
पारतंत्र्याचा किंवा येणार्‍या बंधनांचाही विचार करावा. अन्यथा ते पिंजर्‍यातील पोपटानं आनंदित राहण्यासारखं होइल.
कित्येकदा व्यवसाय उघडुन यशाची प्रचंड शक्यता असताना आणि पुरेशी अनुकूल परिस्थिती असतानाही आपण "सुरक्षित" नोकरीचा पर्याय स्वीकरतो. कारण बहुतांशी हेच की "संघर्ष नको","धाडसाचा अभाव"
ह्ये एक उदाहरण झालं. हेच प्रिन्सिपल आणखी कित्येक ठिकाणी लावता येइल(पेठकर काकांनी लावल्याप्रमाणे.)
आनेकानेक उदाहरणं दाखवता येतील.
इथं मांडलय ते फक्त त्याचं जनरलाइज्ड रूप.

बाकी सर्व वाचकांचे पुन्हा एकदा मनःपुर्वक आभार.
त्रिवार आभार.
आपलाच,
मनोबा
ऋषिकेश खोपटिकर.

विसोबा खेचर's picture

27 Aug 2008 - 5:57 pm | विसोबा खेचर

मनोबा,

उत्तम लिहिले आहेस...!

मनोबा,
तु कथा छान मांडली आहेस.
पण मनिषशी सहमत.
स्वातंत्र गमावल्यावर जीव जगवुन काय ते जगायचे मेल्यासारखे. :) (माझे वैयक्तीक मत )

रेवती's picture

28 Aug 2008 - 9:38 am | रेवती

स्वातंत्र्य असणं ही लाखमोलाची गोष्टं पण ते नाही म्हणून मरण हा एकमेव मार्गही असू शकत नाही. नाहीतर पारतंत्र्यात सर्वांनी मरण जवळ केलं असतं. कसं का असेना जगायची ओढ असतेच.
मन,
तुमचा लेख फार आवडला. वेगळे मार्ग आहेत का याची खातरजमा करून घ्यायलाच हवी (पण प्रत्येकवेळी ते शक्य असतच असं नाही).

रेवती

प्रकाश घाटपांडे's picture

28 Aug 2008 - 9:49 am | प्रकाश घाटपांडे

भय इथले संपत नाही मग तुझी आठवण होते. मी संध्या काळी गा/पि तो.......
प्रकाश घाटपांडे

धनंजय's picture

28 Aug 2008 - 7:53 pm | धनंजय

"शुकान्योक्ती" म्हणून एक मराठी कवितेच्या विषयाची आठवण झाली. (पण मूळ कविता मुळीच आठवत नाही :-( )

मस्त लिहिली आहे वैचारिक लघुकथा.