माझी बाईल माझी खूप लाडकी आहे.
इतकी, की तिच्याशिवाय जगणे देखील अशक्य वाटते!
ती सारखी जवळ हवी असते.
म्हणजे, शक्य असेल तर दिवसाचे चोवीस तास देखील.
अगदी हातात हात धरून ठेवण्याचे शक्य झाले नाही तर
जवळपासच असली पाहिजे,
पाहिजे तेव्हा जवळ करता आली पाहिजे!
तिचा सहवास इतका असून देखील कमीच भासतो!
आणखी आणखी हवा असतो.
त्यामुळे मी तिला लाडाने मो..बाईल,
म्हणजे, गीव मी मोअर मोअर माय बाईल...
किंवा संक्षिप्त मोबाईल पुकारतो.
खरंच, आजकालचा जमानाच असा आहे. माझ्यासारखा.
किंवा मी जमान्यासारखा आहे असे म्हणा!
सगळेच पुरुष, बाया, मुले, मुली, आजी, आजोबां, अगदी लहान बाळे देखील! सगळे मोअर मोअर मोबाईल वेडे झाले आहेत.
बायडीचा किणकिणाट ऐकला, की ह्रदयात घंटी वाजते. मग बाकीची सगळी कामे टाकून तिच्या हाकेला ओ द्यावी लागते. बोलघेवडी बाईल सतत आपल्याशी आणि पूर्ण जगाशी बोलत असते. छान छान पिक्चर्स सुद्धा दाखविते. पाहिजे असल्यास नॉटी देखील! तिचा हात पकडल्यावर आपण तिला खेळवितो आहे, की ती आपल्याला हे कळतच नाही. तोंडाची वाफ देखील न खर्च करता, पूर्ण जगाशी संभाषण करू शकण्याची शक्ती तिच्यात आहे.
ही बायडी खर्चिक मात्र आहे! हिला सतत चरायला लागते. हिला आवडणारे बॅटरी नावाचे चॉकलेट हिच्या तोंडात कोंबलेले हवे. भसाभसा चघळीत बसते. जरा संपत आले की त्यांत नवीन पुरवठा भरावा लागतो. आपल्याला बायडीचे इतके व्यसन लागलेले असते, की कोणाही कडे गेलो, की लाजबिज बाजूला ठेवून आधी ह्या बयोच्या खादाडीची व्यवस्था यजमानांना मागून करावी लागते!
ही बाईल महा भोचक असते! साऱ्या जगात कुठे काय चालले आहे ह्याची बारीक माहिती ठेवते. कोणाचे टाके कुठे जुळलेत, ते बरोब्बर सगळ्या जगाला समजते. अर्थात, हिच्यावर जर कंट्रोल ठेवला नाही, तर आपलीही पोल जगाला जाहीर होतेच म्हणा! डॉक्टरकडे खोटे खोकून मेडिकल लिव घेतली असेल तर हिला मुळीच थारा देऊ नये! तेवढा वेळ तरी हिच्यापासून दूरच रहाणे तुमच्या आरोग्याला हितकारक असते. पण असे काही प्रसंग सोडल्यास, २४ तास लोक हिचा संग करतात. हिच्या आधीच्या मागासलेल्या जगात म्हणे लोक कितीही बिझी असले तरी, केवळ आपला हक्काचा अशी एकच टाईमस्लॉट त्यांना मिळायची. म्हणजे त्या वेळात अगदी सुकून मिळायचा! कोणी डिस्टर्ब करू शकणार नाही असा वेळ! नाही, मी झोपेची गोष्ट नाही करत आहे! तिथे देखील स्वप्ने आणि अलार्म डिस्टर्ब करतात! पण त्याकाळी माणूस ऑफिसमधे टॉयलेटमधे गेला की, आपला आपण राजा असायचा! कोणाची मजाल आहे विघ्न आणण्याची? आता? तिथे देखील ही बाईल सोबतीला पाहिजेच!
पाहिलेला एक मजेदार सीन आठवतोय. खरंच पाहीला होता! ऑफिसमधल्या मुतारीत एका हाताने योजिलेले काम उरकतांना, खांद्यावर हिला थोपटीत हिच्याशी गप्पा करणारे महाभाग तुम्ही देखील पाहिले असतील!
आता सगळ्या जगाला फक्त हिचेच ऐकायाचेय, मग हिच्या बडबडीला सोडून इतरांचे कोण ऐकणार? हा प्रॉब्लेम नाटक, गायन वाल्या कलाकारांनी सोडविला आहे. कारण त्यांच्या पोटावर पाय आणला की हो हिने! आता गाणाऱ्या बावाचे गाणे रंगात आले असतांना बाईडीला तुमच्याशी गप्पा मारायच्या असतात. तुम्ही काय करणार? बाईचे व्यसन लागलेले! बुवा गेला उडत! सगळेच आपापल्या बाईलीशी गुलुगुलू बोलण्यात रंगले, तर बसलेच ना बुवाचे दुकान? म्हणून, नाटक गाणे वाले लोकांचे बाईलीशी वैर. तर त्यांनी काय करावे? फतवाच काढतात प्रोग्राम सुरू होण्या अगोदर! आपापल्या बायड्यांचे मुस्काट दाबून गपगुमान ठेवा म्हणतात. मग आपण काय करावे? आपले तर होत नाही. मग आपण तिचे तोंड दाबून मांडीवर बसवून ठेवतो. पण तिचे थरारक अंग मोकळेच असते? मग काय, तिला उर्मी येईल तेव्हा ती आपल्या मांडीला हळुवार गुदगुल्या करीत आपल्याला खुणावते! कोणाचे लक्ष नाही असे पाहून तिला हळूच गोंजारून आपण तिच्याशी हितगुज करून घेतो! कोणीतरी म्हटले आहे तेच खरे! बायडीच्या लफड्याची मजा चोरीछीपेच जास्त येते!
अर्रर्र, मांडीला गुदगुल्या करते आहे माजी मोबाईल! तिच्या दिमतीला गेले पाहिजे! सॉरी हं!
प्रतिक्रिया
8 Aug 2015 - 11:15 am | एस
हेहेहे! :-)
8 Aug 2015 - 11:22 am | मुक्त विहारि
मस्त लिहिले आहे.
8 Aug 2015 - 4:04 pm | डॉ सुहास म्हात्रे
=))
8 Aug 2015 - 8:40 pm | डॉ सुहास म्हात्रे
माजी बाईलबी आक्षी तशीच हाय ! त्ये म्हंतात ना, घरोघरी मो-बाईलचा फोन :)
8 Aug 2015 - 8:06 pm | उगा काहितरीच
खुसखुशीत !
10 Aug 2015 - 8:57 am | बोका-ए-आझम
म्हणजे या पुढे बाईलवेडा याचा अर्थ सतत मोबाईलला चिकटून बसलेला असाच व्हायला हवा.
29 Sep 2015 - 5:52 pm | हेमंत लाटकर
मजेदार