शाळकरी वयापासून कबड्डी आणि खो-खो हे माझे आवडते खेळ. क्रिकेटची मात्र पराकोटीची नावड. इतकी पराकोटीची की घरात कोणी क्रिकेटची मॅच लावली की नसलेला अभ्यास काढून बसायचे आणि टीव्ही बंद करायला लावायचे.
तेंडुलकरमुळे क्रिकेट आवडू लागलेल्या वर्गात मी होते, आहे. त्याची खेळतानाची देहबोली, शांत स्थिर नजर आणि शब्दाला शब्द न देता कृतीतून प्रत्युत्तर देण्याची पद्धत. मग माझंच वागणं इतकं बदललं की असलेला अभ्यास बाजूला ठेवून, चक्क रात्री जागून मॅच बघू लागले. कधीतरी मी आणि धाकटा भाऊ रात्रीचे जागे राहून मॅच बघत बसलेले असायचो. ती संपता संपता आपली गाडी गडगडायची. भाऊ वैतागून निघून जायचा आणि मी मात्र चिवटपणे ती मॅच पूर्ण बघायचे. खूपदा चमत्कार व्हायचा, आपण जिंकायचो. मग भावाला हाक मारून बोलवायचं आणि दोघांनी मिळून पुन्हा हायलाईट्स बघायच्या.
भारताने टी-ट्वेंटीचा विश्वचषक जिंकला, तो मी पाहिलेला शेवटचा सामना. तेंडुलकरमुळे लागलेली या खेळाची आवड नंतर आटूनच गेली. मग रोजच्या धबडग्यात, संसाराला लागल्यानंतर अशा मॅचेस बघणं मागे पडत गेलं. मात्र दूरदर्शनवर कबड्डी, खो-खो चे सामने लागलेले दिसले की आवर्जून बघितले जायचे.
आता प्रो-कबड्डी सुरू झालंय. हे दुसरं वर्षं. मजा येतेय सामने बघायला. अगदी मोठी लेकही आमच्या बरोबरीने सामने बघते. जास्त गुण दिसतात, ती माझी टिम, अशी निवड करते आणि आनंदाने सामने बघते. तिला हा खेळ आवडतोय, हे बघून आम्हीही सुखावतोय.
हे लिहावंसं का वाटलं... तर काल घरी जाताना लहान मुलांना खेळताना बघून क्षणभर थांबलेच मी. जेमतेम पाच ते आठ वयोगटातली मुलं. इमारतीसमोरच्या मोकळ्या जागेत खेळणारी. मधोमध खडूने पांढरी रेघ आखलेली आणि कबड्डी कबड्डी कबड्डी कबड्डी... मस्त वाटलं. बाजूला एक वयस्कर काका त्या मुलांना काही सूचना करत होते आणि ती मुलं सुद्धा, ए आम्ही यु मुंबा... एकपण मॅच नाय हरलो ... अरे ए... आम्ही दबंग... असं म्हणत मस्त खेळत होती. गल्लोगल्ली खेळलं जाणारं क्रिकेट ओसरत असतानाच हे नवं चित्र बघून खरंच छान वाटलं... आता पुढचे सामने बघताना ते छोटे कबड्डीपटू येत राहतील नजरेसमोर...
प्रतिक्रिया
4 Aug 2015 - 12:19 pm | बाबा योगिराज
सचिन तेंडुलकरनी खेळन सोड्ल्या नन्तर खेळा बघन्यात काही मजा नाही येत.
कबड्डी चे सामने बघायला मस्त मजा येते....
4 Aug 2015 - 12:20 pm | एस
स्टार स्पोर्ट्स पूर्ण ताकदीनिशी उतरलंय प्रो-कबड्डीमध्ये.
4 Aug 2015 - 12:45 pm | सामान्यनागरिक
क्रिकेट नावडणारे असतात हे ऐकुन बरें वाटले . यापेक्षा जास्त कौशल्य आणि शारीरीक क्षमता लागणारे अनेक खेळ आहेत. तसेही आजकाल मैदानात आणि बाहेरही जे काही चालतं त्यात क्रिकेट कुठेही नसतं . इतका पैसा आला आहे की बास ! काही हजारांसाठी लोक खुनसुद्धा करतात. एवढया पैशासाठी काय काय होत असेल याची कल्पनाही करवत नाही. तुमच्या आमच्या सारखे वेडयासारखे धावतात त्यामागे !मी तर जाणुन बुजुन क्रिकेट वाचणे बोलणे ऐकणे बघणे सोडुन दिलेआहे
4 Aug 2015 - 5:40 pm | कैलासवासी सोन्याबापु
ताई आपण स्वतः खो खो खेळल्याचे सांगितले , अतिशय आवडले! :)
खोखो हा जगातला तिसरा सर्वाधिक वेगवान खेळ आहे हे मी एकदा कुठेतरी वाचले होते पहिले २ अनुक्रमे आइस हॉकी अन बास्केटबॉल होत! खो खो चा गेम खेळताना जितकी मजा येते त्याच्या तिप्पट मजा आट्यापाटया किंवा कोल्हापुरी डाव खेळताना येते खो खो च्या मैदानात! कबड्डीचे नीट commercialization केल्यास कबड्डी अन खो खो सुद्धा प्रचंड हिट गेम होऊ शकतात, विशेषतः हे खेळ आवडतात कारण बाबा स्वतः क्रीड़ा शिक्षक होते अन त्यांनी स्वतः पोरांत खेळत खेळत पोरांना गेम शिकवले होते
4 Aug 2015 - 9:12 pm | बहुगुणी
अगदी खरं, भरपूर मैदानी कौशल्याला आणि चपळाईला वाव देणारा खो खो हा खेळ व्यावसायिक दृष्ट्या सहज यशस्वी होण्यासारखा आहे. काही व्हिडिओज यूट्यूबवर आहेत त्यावरून अद्यापही तग धरून असावा असं दिसतंय, शाळेत खूप वर्षे मन लावून खेळायचो त्याची आठवण झाली, डांब मारणं, सूर मारणं, रिंगण, वगैरे झिंग आणणारे प्रकार होते! खो खो चे प्रीमियर लीग सामने पण भरवले जात असावेत. हा खेळ आणखी वाढला पाहिजे, पण अर्थातच त्यासाठी मैदानांची गरज असेल, जे दिवसेंदिवस कठीण होत चाललंय!
6 Aug 2015 - 12:08 pm | माधुरी विनायक
कबड्डीच्या सामन्यांमधलं पदलालित्य बघणं हा आवडता भाग. प्रो कबड्डीचे सामने बघताना कॅमेऱ्याच्या टॉप ॲगलने खेळाडूंचं फूटवर्क बघायला खूप आवडतं.
सोन्याबापु, माझ्या लिखाणात मी कबड्डी खेळत असल्याचं ध्वनित झालं का? पण मी स्वत: फारसं नाही खेळलेली. मला हे खेळ आवडतात, ते बघायला. कबड्डी आणि खो-खो या दोन्ही खेळांमध्ये शक्तीबरोबर चपळता, प्रसंगावधान आणि बुद्धीचा जो वापर केला जातो, तो खरंच लाजवाब.