माझ्या या मराठी सुनीताच्यापुढे त्याचा इंग्रजी अनुवाद दिला आहे. तिथे उपक्रमावर अनुवादाविषयी चर्चा चालू आहे, त्याचे उदाहरण माना पाहिजे असल्यास. हा परायत्त भावानुवाद आहे.
*****
उद्या सकाळी
गर् गर् से छती फिरति ते नृत्यांगणाचे दिवे
भूमी हादरे गदगदा ढोल्के जसे आदळे
तालाला तरी मज कुणाच्या मी असे बांधले?
बेकाबू मना तनुवरी स्वामित्व ना जाणवे.
जाता रात्र ती क्रम-क्रमे आस्तेच तूझ्या सवे
हाता हात मी शिवुनि ओठा ओठ ही लावले -
तो स्फुल्लिंग ठिणकता अंगांग रोमांचले!
वाटे जो रुबाब मजला, आता न काही हवे...
नव्हे सत्य ते! ठिणगिचा अग्नी असा चेतता
स्वाहा काम हो झडकरी, माझा, तसाही तुझा.
भागे ती रती, निवळल्या भस्मातुनी जागतो
तेव्हा रे उषा उजळता पाहू उशाशी दुजा -
चिंते मी - पुन्हा स्मित करू का त्या जणा देखता
प्रत्येका सदैव प्रिय तो एकांत जो भेदतो?
*****
Tomorrow morning
The disco lights did blink, and crazed revolve,
The floor did quake and shudder with the beat;
But who was it that then controlled my feet?
Who locked my gaze and made reserve dissolve
To naught? The night progressed and did evolve.
The arms enmeshed, and when the lips did meet
(Or brushed), I swelled with heat. And my conceit
Was flattered, much. What else did it involve?
The friction of the lips can only spark
The nether flames. And gladly they’ll consume
Themselves and me, and him. They’re but prelude:
And worth being burned, if only we resume
On embers spent, the morning after dark –
And smile to greet trespass of solitude.
*****
(मराठी आणि इंग्रजी दोन्ही सुनितांत यमके पेत्रार्क च्या नियमाप्रमाणे आहेत आणि ८+६ ओळींची कडवी आहेत. कलाटणी शेवटच्या ६ ओळींत आहे, दोनच ओळींत नव्हे.)
प्रतिक्रिया
17 Nov 2007 - 8:01 am | विसोबा खेचर
बापरे! अहो जिथे मराठीतलीच कविता समजायला अतिशय कठीण आहे, तिथे आम्हाला विंग्रजीतली कुठून समजणार?
अहो धन्याशेठ, जरा आमच्याकरताही समजायला सहज सोप्या कविता लिहा की!
मी तुलना करत नाहीये, परंतु आता उदाहरणार्थ ह्या ओळी पाहा,
शुभ्र तुरे माळून आल्या
निळ्या निळ्या लाटा
रानफुले लेवून सजल्या
या हिरव्या वाटा
किती सहज, सोप्या अन सुरेख ओळी आहेत! च्यामारी तुम्ही मंडळी असं साधंसुधं का लिहीत नाही हो? :)
असो..
तात्या.
17 Nov 2007 - 10:36 am | धनंजय
आधी येथे अष्टाक्षरी, पानगळीचे वर्णन वगैरे मी लिहिलेच आहे.
सुनीताची अन्य कवींची शैली बघितली तर वरील कविता विशेष कठिण वाटू नये. उदाहरणादाखल बालकवींचे एक सुनीत देत आहे (त्याच्या तुलनेने सोपे/कठिण पारखावे.)
---
मेघाचें करिं भूर्जपत्र धरुनी अस्ताचलीं प्रत्यहीं
स्वर्गींचे नव लेख कुंकुमरसें ती सांध्यदेवी लिही;
रात्रीं शांत गभीर अंबुनिधिच्या आनील पृष्ठावरी
लज्जालेख लिही विकंपित करें ती तारकासुंदरी;
श्यामा निर्झरिणी पुनःपुनरपी सारीत नीलांचलां
मुग्धालेख सुरम्य सैकतिं लिही मंदोर्मिमालाकुला;
वेलींचे स्वकरें कराग्र धरुनी त्या मंदमंदानिलें
क्रीडालेख वनस्थलीहि लिहिती कांहींतरी आपुले.
हे सारे मधुलेख घेउनि जगीं नाचोत वेडे कवी,
गावों गीतशतें तयांस, मजही त्यांची कळे थोरवी.
लज्जामुग्ध परी शिरःकमल तें ठेवून माझ्या उरीं
श्वासांच्या कवनीं लिही प्रियतमा ही प्रेमलेखावली.
सारे ते मग लेख तुच्छ गमती चित्ताचिया लोचनीं,
तीचा अक्षय लेख एकच, उभा मी मग्न पारायणीं!
---
बालकवींनी सुद्धा विषयास योग्य असल्यास "हिरवे हिरवे गार गालिचे" लिहिले, आणि विषयास योग्य होती म्हणून ही वरील गुंतागुंतीची शैली निवडली. जर विषय गुंतागुंतीचा असेल तर सोपेच शब्द, सोपेच वृत्त वापरण्याचा अट्टाहास ठीक आहे काय? मराठी भाषा समर्थ आहे, मराठी वाचक-लेखक कमकुवत पडू नये. कारण वाचकाने क्लिष्ट म्हणून वाचायची थांबवली, लेखकाने गुंतागुंतीचे जे ते लिहायचे थांबवले तर जो उरेल तो भाषाप्रयोग एकांगी होईल, आणि इतक्या लांब इतिहासाची ही समृद्ध भाषा गहन अर्थ वाहाण्याच्या दृष्टीने अपंग होईल.
(इथे माझी भाषा उच्च कोटीची आहे असे म्हणणे मुळीच नाही, पण विषयानुसारच सोपे-सुटे लिहितो, असे स्पष्टीकरण द्यायचे होते.)
धनंजय
17 Nov 2007 - 10:57 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
समजायला जरा अवघड कविता आहे. अष्टाक्षरी रचना आहे, त्याच बरोबर कवितेचा रचना बंधही वयक्तिक आम्हाला मान्य आहे. पण कवितेतून आनंद घेता येत नाही असे वाटते !!!
सोपे वृत्त आणि सोपे शब्द कविता वाचनातला आनंद वाढवतात. मात्र शब्दबंधन, क्लिष्ट शब्दरचना वाचकांनी वाचायला हवी असे म्हणत असाल तर ते सुद्धा मान्यच आहे . मग पुन्हा प्रश्न पडतोच वाचकांची अभिरुचीचे काय ?
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Nov 2007 - 11:02 am | विसोबा खेचर
पण कवितेतून आनंद घेता येत नाही असे वाटते !!!
सोपे वृत्त आणि सोपे शब्द कविता वाचनातला आनंद वाढवतात.
हेच म्हणतो! धनंजयरावांच्या विद्वत्तेबद्दल वादच नाही. प्रश्न आहे तो आमच्यासारख्या सामान्य वकुबाच्या मंडळींना काव्य समजण्याचा, त्यातून आनंद घेण्याचा!
तो मात्र मुळीच मिळाला नाही. उलट ते कठीण काव्य वाचतांना त्रास मात्र झाला! :)
असो, हे आमचं प्रामाणिक मत. चूक धनंजयरावांची नाही, तर आमच्या सामान्य अभिरुचीची आणि आकलनशक्तिची आहे! :)
तात्या.
17 Nov 2007 - 11:24 am | धनंजय
अनोळखी व्यक्तीशी लगट, लग्नपूर्व सेक्सवर आजकाल बंधने राहिली नाहीत. (डिस्को, रेव्ह पार्ट्यांमुळे मोठ्या शहरांत तरी. आणि लहान गावांतही व्यभिचारास पूर्वीच्या काळापासून संधी आहे. वेश्याबाजारात व्यापाराची तत्त्वे आहेत - तो प्रकार वेगळा...)
शरीर उद्दीपित होणे तर नैसर्गिक आहे. मग आपल्या शरीरसुलभ प्रवृत्तीला आळा का घालावा, का घालू नये, हे डोक्याला त्रास देणारे विचार आहेत. या कवितेतून काही प्रकारच्या वखवखलेल्या संभोगाबाबत विराग निर्माण व्हावा, पण प्रेमाबाबत, कमीतकमी वखवख नसलेल्या संभोगसुखाबाबत, मात्र आशेचा किरण दडपू नये.
या कवितेने थोडेसे अस्वस्थ करावे, विचारमग्न करावे - "प्रेमकवितेसारखा" आनंद मात्र मिळणार नाही.
17 Nov 2007 - 11:32 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रेम कवितेतला आनंद इथे नाही हे खालील ओळीतून आम्हाला समजलेच आहे !!!
जाता रात्र ती क्रम-क्रमे आस्तेच तूझ्या सवे
हाता हात मी शिवुनि ओठा ओठ ही लावले -
तो स्फुल्लिंग ठिणकता अंगांग रोमांचले!
वाटे जो रुबाब मजला, आता न काही हवे...
आता या अनुभवावर आम्ही लिहावे, बोलावे का ? ;)
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Nov 2007 - 12:11 pm | विसोबा खेचर
या कवितेने थोडेसे अस्वस्थ करावे, विचारमग्न करावे - "प्रेमकवितेसारखा" आनंद मात्र मिळणार नाही.
हम्म्म! खरं आहे बाबा तुझं...:)
आपला,
(स्खलनशील प्राणिमात्र!) तात्या.
17 Nov 2007 - 10:22 am | सहज
नाही आवडले, म्हणजे तुम्ही बहुतेक आवडी-निवडी साठी नसेलच इथे उतरवलेत, काय ते "परायत्त भावानुवाद " उदाहरण म्हणून असेल. :-) आम्हा सामान्यांना हीट किंवा फ्लॉप किंवा ठीक इतकेच कळते :-)
सगळेच भांषातर तसेच्या तसे उतरते ह्यावर माझा विश्वास नाही. काव्यातल्या मानवी भावना तर कवी ने ज्या भाषेत केल्या त्यातच चांगल्या शोभतात.
अगदी तुम्ही म्हणता तश्या प्रकारची कित्येक गाणी M-TV रोज येत जात असतात.
तरी ठेका धरायला लावणारे जेनिफरबाईंचे (जे-लो) हे गाणे बरे आहे की.
कदाचित काहींना जास्त आवडेल , कारण एक जबरी शिवी पण आहे शेवटी त्या गाण्यात. ;-)
17 Nov 2007 - 11:06 am | प्रमोद देव
भाषांतर म्हणूनच नव्हे तर एक स्वतंत्र काव्य म्हणूनही हा प्रकार आवडला. बाकी त्यातले व्याकरण वगैरे मी केव्हाच विसरलोय. त्यामुळे त्याबद्दल प्रतिक्रिया देण्यास पात्र नाही.जियो धनंजय!
अवांतरः
धनंजय हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे ह्याची साक्ष त्यांच्या विविध विषयांवरील भाष्याने नेहमी येतच असते. अष्टपैलू असूनही त्यांना त्या त्या विषयात खूपच चांगली गती आहे हेही लक्षात येते. त्यासाठी लागणारा व्यासंगही त्यांचा दांडगा( हा नेहमी दांडगाच का ?इति पुलं.) दिसतोय.
17 Nov 2007 - 11:16 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
धनंजय हे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे या बद्दल कोणाचे दुमत नाही. कवीमहोदय, आमची सामान्य माणसाची आवड सांभाळीत नसले म्हणून काय झाले. आपल्यासारख्या अनुभवी आस्वादकांना कविता आवडतात हेही नसे थोडके. खरे तर त्यांची कविता आणि लेखन कवी ग्रेस प्रमाणे वाटते. अहो, त्यांनी लिहिलेला प्रतिसाद दोन-दोनदा वाचावा लागतो तेव्हा थोडेफार समजते.
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
17 Nov 2007 - 7:14 pm | चित्रा
मराठीपेक्षा मला तुमची इंग्रजी कविता आधी केल्यासारखी वाटली. मराठी हा अनुवाद वाटला, पण तुम्ही म्हटल्याप्रमाणे नेमके उलटे आहे. आणि का कोण जाणे पण मराठी कवितेचा अर्थ नीट लागला नाही. इंग्रजी कळल्याप्रमाणे वाटली. आणि मराठीचा आणि इंग्रजीचा अर्थ शेवटच्या ६ ओळींत काहीसा वेगळा वाटला. इंग्रजी कविता जास्त सहज वाटली (कदाचित नृत्यांगणाचा संदर्भ असल्याने असेल).
मला तुमच्या प्रतिभेचे कौतुक वाटते, पण कविता वाचणे हा एक जास्त करून बुद्धीचा अनुभव ठरतो.
19 Nov 2007 - 7:48 pm | सुवर्णमयी
दोन्ही कविता आवडल्या. इंग्रजी कविता जास्त सहज वाटते आहे. त्याच भावनांकरता मराठीची शैली जरा क्लिष्ट वाटली. अशाप्रकारचा विषय हाताळणार्या मराठी कविता अनेक असाव्यात. पण मुद्दाम अशी शैली निवडण्यामागे सुनीत हे कारण असावे. तुमचे सुनीत चांगलेच झाले आहे . भावानुवादात शेवटच्या दोन ओळी नेमक्या आल्या असे वाटले नाही, त्याकरता इंग्रजी कविता अधिक प्रभावी वाटली..
एकंदरीत सुनीत हा काव्यप्रकार हाताळायला अवघड आहे असे मला वाटले आणि शैली कृत्रिम होण्याची शक्यता माझी समज आणि बोलीभाषेपासून वा आजच्या मराठी कवितांपासून ते दूर असल्याने असावे. मनोगतावर काही सहजरित्या हाताळलेली सुनीताची उदाहरणे आहेत. त्याचे वृत्त आणि मांडणी वेगळी आहे. -शार्दुलविक्रिडीत ,कलाटणी शेवटी दोन ओळी (माझी मात्र या काव्यप्रकाराने पूर्ण विकेट घेतली आहे.)
20 Nov 2007 - 1:02 am | सर्किट (not verified)
ाझी मात्र या काव्यप्रकाराने पूर्ण विकेट घेतली आहे.
अशा विकेट घेणार्या रचानांना पद्य म्हणावे, काव्य म्हणू नये, असे मला फार पुरातनकाळापासून वाटत आले आहे.
- (काव्यरसिक) सर्किट
20 Nov 2007 - 1:39 am | सुवर्णमयी
अशा विकेट घेणार्या रचानांना पद्य म्हणावे, काव्य म्हणू नये, असे मला फार पुरातनकाळापासून वाटत आले आहे.
अधेमधे सहित्यिकांच्या मुलाखती , तीन चार आढावे आणि काही समीक्षणे वाचल्याचा हा परिणाम असावा. कोठला साहित्य प्रकारे असे काही म्हणण्याची सवय झाली:० ) त्यामुळे काव्यप्रकार हा शब्द डोक्यात शिरला.
तुमचे ऑबजेक्शन बरोबर आहे. सगळे काव्य करायला लागले तर फार पंचाईत होईल.:०)
तसे आजकाल चार ओळीचे विडंबन खरडून स्वतःला कवी म्हणवून घ्यायची फार वाईट सवय लागली आहे त्यातून काहीबाही घडत असावे.
20 Nov 2007 - 9:59 am | प्राजु
अवघड असली तरी खूप वेगळी आहे कविता. मराठीपेक्षा इंग्रजी सोपी वाटते.
सुनित वगैरे मला नाही समजत. पण अतिशय विचार करून लिहीलेली आहे तुम्ही कविता.
तुमच्या अफाट प्रतिभेला प्रणाम...!
- प्राजु.
20 Nov 2007 - 10:49 am | तात्या विंचू
अरे बापरे...धनन्जयराव तुमचि कविता वाचुन मला शाळेतल्या ८-९-१० विच्या मराठि विषयाची आठवण झाली.
५-६-७ वी पर्यन्त मराठी ठीक होता..पण नन्तर मला मराठीविषयाची भिती वाटु लागली होती...कवितान्चा अर्थच समजत नसे...
मराठीच्या पेपरच्या आदल्या दिवशी जाम टेन्शन......मग काय गाइड मधुन घोकम्पट्टी...... :(