गाणी : खणखणीत नाणी

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
24 Aug 2008 - 12:27 am

काही गाणी हृदयाचा ठाव घेतात. काही सतत गुणगुणावीशी वाटतात. काही नकळत पाठ होतात. काहींचा ठेका आपल्याला भारून टाकतो. काय असतं त्यामागचं गौडबंगाल? का करतात ही गाणी मनावर गारूड?
पूर्वी नव्या सिनेमांतली गाणी सिनेमा आल्यानंतरच ऐकायला मिळायची. किंवा आकाशवाणीवरून. नंतर "छायागीत' वगैरे प्रकार सुरू झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी "झी'वर "टॉप टेन' आलं. नवीन गाणी ऐकण्यासाठी मी अक्षरशः अशा कार्यक्रमांवर झडप घालायचो. "छायागीत'मध्ये आता कुठलं गाणं लागणार, याची कोण उत्सुकता असायची! "मटा'वगैरे मधल्या जाहिरातींतून "आज या चित्रपटातील गाणे "छायागीत'मध्ये पाहा' असा उल्लेख असायचा. आम्ही त्यासाठी अगदी देव पाण्यात बुडवून तन-मन अर्पून भक्तिभावानं टीव्हीपुढे बसायचो.
आता सिनेमा यायच्या आधीच गाणी त्याच्या चित्रीकरणासह पाठ झालेली असतात. इतकी, की काही वेळा ती ऐकून ऐकून वीट येतो!
एखाद्या गाण्यातले शब्द आपल्याला आवडतात, एखादी उपमा आवडते किंवा एखादा ठेका, नाहीतर तान आवडते. अलीकडच्या काळातही मला आवडलेली कित्येक गाणी आहेत! सगळंच्या सगळं गाणं आवडलं नसेल कदाचित, पण त्यातल्या आवडलेल्या भागाचा प्रभाव एवढा, की बाकीचं गाणं त्यासोबत सहज खपून जावं!
"कहो ना प्यार है'चं शीर्षक गीत पहिल्यांदा ऐकलं, तेव्हाच ते प्रचंड आवडलं. शब्दांत काही विशेष नव्हतं. पण ठेका मस्त होता. त्यानंतर त्याचं चित्रीकरण आणि नृत्यही खूप आवडलं.
"लगान'चं "घनन घनन घन' पहिल्या प्रोमोमध्ये ऐकलं, तेव्हा जबरदस्त आवडलं. पण गाणं सुरुवातीला जरा बोअरिंग वाटलं. त्यापेक्षा मला "राधा कैसे न जले' प्रचंड आवडलं होतं.
"दिल तो पागल है'मधलं "भोली सी सूरत' सर्वाधिक आवडलं. त्यातलं "आए हाए' आणि उदीत नारायणचा आवाज तर लाजवाब!
"कहो ना प्यार है'सारखंच "कोई मिल गया'चं शीर्षकगीत प्रचंड आवडलं. विशेषतः, त्यातलं "ख्वाबों, खयालों, ख्वाइशों को चेहरा मिला' हे वाक्‍य म्हणजे अफाटच! "माझी स्वप्नं, इच्छा आणि विचारांना एक "चेहरा' (रूप) मिळाला' ही कल्पनाच एवढी बेफाट आहे, की बस्स! त्यातून चित्राचा वेगळा आवाज. भन्नाट!
"कभी कभी अदिती'मधला "अदिती' शब्दाचा अनुप्रास अलंकारासारखा वापरही अफाटच होता.
"वेलकम'मधलं "तेरा सरापा ऐसा है हमदम'मधला "सरापा' या एका शब्दासाठी अख्ख्या गाण्याच्या प्रेमात पडावं लागलं. (मला त्या शब्दाचा अर्थ अजूनही माहित नाही!)त्यातून त्याचं सादरीकरण अचाट होतं. मल्लिका शेरावतनंही त्यात उत्तम अभिनय केलाय. अनिल कपूर तर विचारायलाच नको!
"झलक दिखला जा'मधलं हिमेश रेशमियाचं रेकणंही वेगळं म्हणून आवडलं. आणि त्यात तो "झलक' हा शब्द!
तसंच "ओम शांती ओम'मधलं "दिल को बनादे जो पतंग सॉंसे ये तेरी वो हवाएं है' ही रचनाही खूप भावली. मनाचा पतंग होणं, ही कल्पनाच अफाट आहे.
तुमच्या आवडीची आहेत अशी काही गाणी? नेमकी कशासाठी आवडली ती?
----

संगीतप्रकटन

प्रतिक्रिया

देवदत्त's picture

24 Aug 2008 - 1:36 am | देवदत्त

"कहो ना प्यार है'चं शीर्षक गीत पहिल्यांदा ऐकलं, तेव्हाच ते प्रचंड आवडलं. शब्दांत काही विशेष नव्हतं. पण ठेका मस्त होता. त्यानंतर त्याचं चित्रीकरण आणि नृत्यही खूप आवडलं.
हे माझेही आवडते. तसेच 'प्यार की कश्ती में' हे ही फार आवडते त्याच्या शब्दांमुळे.

दिल तो पागल है मधील 'अरे रे अरे ये क्या हुआ' मधील भाव तसेच 'देख लो ये दिल जहां था ये वही है क्या?' ह्या ओळींमुळे.
वरील दोन्ही सिनेमांतील सर्वच गाणी आवडतात. त्यासोबत दिलवाले दुल्हनिया ची गाणी. संगीत तर चांगले आहेच. तसेच एकूण एक गाणे कथेशी निगडीत आहे त्यामुळे संदर्भ लागल्यानंतर खूप आवडली.
तसेच नवीन 'उमराव जान' मधील देखा हमें 'कुछ ऐसे की बहका दिया हमें', तसेच 'सलाम' हे पूर्ण गाणे संगीत, मधुरता, शब्द ह्यामुळे फार आवडतात.

'निकम्मा किया इस दिलने' गाणं ऐकता ऐकताच पाय नाचण्याकरीता हलतात :)

आणखी भरपूर आहेत. हिंदी चित्रपट आणि गाणी म्हणजे आपला आवडता विषय. पण आता झोपेची वेळ झालीय, म्हणून सध्या एवढेच.
तसेच काही आठवणी निगडीत असल्या तरीही काही गाणी आवडतात. आमच्या आठवणींबद्दल आधी लिहिलेच आहे. :)

मनीषा's picture

27 Aug 2008 - 3:04 pm | मनीषा

यांना अजुन तरी कोणी पर्याय नाही..
नवीन खूप गाणी येतात पण दूसरी आली कि आधीची विस्मरणात जातात..
' जब वुइ मेट' ची गाणी चांगली आहेत...
इतक्या गाण्यांमधून काही गाणी निवडणे खूप अवघड आहे..
लता चं "माई माई..." मीरा भजन, मीरेच्या काव्यातली आर्तता लताच्या आवाजात पुरेपुर उतरली आहे असे वाटते
लता - "वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलतें है .." चित्रपट जहॉआरा
लता - "सखि रि मेरा मन उलझे.." चित्रपट - चित्रलेखा
लता - "दीवाने तुम दीवाने हम.." चित्रपट माहिती नाही . संगीतकार - सलील चौधरी
लता - "हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पें दम निकले.." गालिब गझल .. संगीत - -हुदयनाथ मंगेशकर
आशा - " आलि रि मेरी नैना --" चित्रपटातील नाहीये.. संगीतकार --माहित नाही
आशा - " रंजीशी सही .. दिल ही जलाने के लिए आ " ... पण मूळ गझल तर फारच सुरेख आहे
रफी तर सदाबहार म्हणावा असा गायक होता...
मै बंबई का बाबु पण त्यानेच म्हणले आणि मन रे काहे न धीर धरें पण त्याचच
आजा आजा म्हणतानाच त्याने मन तरपत हरी दर्शन को आज --म्हणले
रफी -- "दिल का भॅवर करे पुकार" , "पुकारता चला हू मैं.." "मधुबन में राधिका नाचे रे .." आणि कितीतरी
मन्ना डे हा ' in a class of his own ..' असा गायक, त्याचे "ओ मेरी जोहराजबी ..", "लागा चुनरी में दाग ..." अप्रतीम
अशी हजारो गाणी ... मराठी सुद्धा अनेक आहेत..
त्यात सध्य्या नवीन ऐकलेले आणि आवडलेले "राधा ही बावरी.." ... स्वप्नील बांदोडकर

विसोबा खेचर's picture

24 Aug 2008 - 10:58 am | विसोबा खेचर

तुमच्या आवडीची आहेत अशी काही गाणी?

बरीच आहेत....

नेमकी कशासाठी आवडली ती?

हम्म! ह्या उत्तराचा आवाका म्हटलं तर खूप मोठा आहे. त्याबद्दल मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे...

धन्यवाद...

तात्या.