मुझे तो हैरान कर गया वो...

गवि's picture
गवि in जनातलं, मनातलं
7 Jul 2015 - 5:30 pm

नासिर काजमीने खूप गजला लिहील्या. भारतातल्या अंबाल्यात रचला गेलेला हा कवी पुढे पाकिस्तानात गेला. फाळणीवर त्याने पुष्कळ काही लिहीलं आहेच. पण अगदी "हंगामा", "चुपके चुपके" वगैरे ग्लॅमर लाभलेल्या चार गजलांवरच मैफिलीतून उठलेल्यांनीसुद्धा नासिरची "दिलमें एक लहेरसी उठी है अभी" ऐकलेली असते.

"कुछतो नाजुकमिजाज है हमभी
और ये चोटभी नयी है अभी"

ही अवस्था नासिरच्या काही गजल्स पहिल्यांदाच ऐकल्यावर अन वाचल्यावर झालेली असते. पण ते सर्वांना नाही जाणवणार कदाचित. अशातली एक गजल इथे आज घेतो.

गए दिनोंका सुराग लेकर किधरसे आया किधर गया वो
अजीब मानूस अजनबी था मुझे तो हैरान कर गया वो

गेलेल्या काळाची चाहूल परत घेऊन, त्याची जाणीव देत तो कुठून आला आणि कुठे गेला कोण जाणे..! अनोखा आणि अनोळखी मनुष्य हुरहूर लावून गेला.

.....

माझ्यामते हा दुसरातिसरा कोणी नाही.. कवीचाच एक भाग आहे..

मी हजार चिंतांनी हे डोके खाजवतो
तो कट्ट्यावर बसतो घुमतो शीळ वाजवतो

ही खरेची कविता अगदी यासारखी वाटते. आपल्यातल्या प्रत्येकात एक रुमानी शख्स असतोच असतो. तो दुनियादारीच्या पलीकडे असतो.

.....

बस एक मोतीसी छब दिखाकर बस एक मीठीसी धुन सुनाकर
सितारा ए शाम बनके आया ब रंग ए ख्वाब ए सहर गया वो

निखळ आनंदाचं वर्णन. आपल्याच हातून झालेलं काहीतरी सुंदर असतं आणि ते नेहमीच एकदाच घडलेलं असतं. आपण बहुतांश लोक वन हिट वंडर्स असतो. आपण शाळेत एकाच मॅचमधे एकच सिक्सर मारलेला असतो. आपण एकच कविता कॉलेजात असताना अफलातून सळसळत्या चैतन्याने लिहीलेली असते. आपण एकाच कॅम्पफायरला गळा खोलून मुक्त गायलेले असतो..

तीच ती आठवण असावी का इथे? एक छोटीसी स्वतःच्या नजाकतीची चमकदार झलक, एक हलकीशी गोड शीळ ऐकवली बस्स.. संध्याकाळचा तारा बनून तो आला आणि पहाटेच्या साखरझोपेतल्या स्वप्नाचे रंग लेवून परत गेला..रात्र जागवलीच..?

.........

न अब वो यादोंका चढता दरिया न फुर्सतोंकी उदास बरखा
यूंही जरासी कसक है दिलमें जो जख्म गहरा था भर गया वो

हा गजलेचा हाय पॉईंट भासतो..

काळ दु:खातून सुटका करतो, तो औषध आहे हे तर घिसंपिटं झालं आता सर्वांसाठी. पण आता सगळ्याच्या पलीकडे पोहोचल्यावर या शांत क्षणी काय जाणवतंय नासिरला?

आता ती आठवणींची समुद्रभरती नाही आणि भरपूर मोकळा वेळ असणारा तो डिप्रेसिंग पावसाळी मौसमही नाही..
पण वेदना जाणवते ती याची की साली ती जखम आता भरुन गेली..

खोल जखम भरली की त्या जागी व्रणाचा जाड थर बनतो. नंतर तिथे जास्तच प्रोटेक्टिव्ह जाडी कातडी वाढते. हायपरट्रॉफी..त्याचं नासिरला दु:ख होतंय.

कोणी असंही म्हणेल की "आता खोल घाव भरला, आणि फक्त जरासं दु:ख शिल्लक आहे" असा सरळ अर्थ यात आहे. नजरिया अपना अपना..

याच चालीवरचा नासिरचाच "दयार ए दिलकी रातमें चिरागसा जला गया" या अतिसुंदर गजलेतला हा शेर आठवतो:

जुदाईयोंके जख्म दर्द ए जिंदगीने भर दिये
तुझेभी नींद आगयी मुझेभी सब्र आ गया

....

याच पोस्ट ट्रॉमॅटिक रिकव्हरी मूडमधे नासिर आपल्याला आणखी घोळवत राहतो:

कुछ अब संभलने लगी है जाँ भी, बदल चला दौर ए आसमांभी
जो रात भारी थी टल गई है, जो दिन कडा था गुजर गया वो

.....

आपण स्वतः आणि "तो" यांच्यात भयंकर फरक आहे हे नासिरला पूर्ण माहीत आहे. म्हणूनच तो ही गजल लिहीत असावा.

बस एक मंजिल है बुल हवसकी, हजार रस्ते है अहल ए दिलके
यही तो है फर्क मुझमें उसमें, गुजर गया मैं ठहर गया वो

शारीर पशुपातळीच्या प्रेमात वाईट असं काही नाही, पण जे त्याचे गुलाम झालेत त्याचं एकच सरळसोट ध्येय आहे.. आणि तिथे ते संपतं.
हृदयापासून प्रेम करणार्‍यांना मात्र हजारो निरनिराळे अनोखे रस्ते घ्यायचे असतात..

हाच फरक आहे माझ्यात आणि त्याच्यात.. मी कुठच्याकुठे गडप झालो आणि तो मात्र मागे उरला..

............................

वो रातका बे नवा मुसाफिर, वो तेरा शायर वो तेरा "नासिर"
तेरी गलीतक तो हमने देखा था फिर न जाने किधर गया वो

तो रात्री भटकणारा भणंग, तुझाच शायर, तुझाच मी..
तुझ्या गल्लीच्या तोंडापर्यंत गेलेला दिसला खरा.. पण नंतर कुठे गेला कोण जाणे..

वाह नासिरसाब.. वाह..

दुभंगलेलं व्यक्तिमत्व असावं तर असं दिलदार...!!! बहोत शुक्रिया, बडी मेहरबानी इस गजल से हमारी शामें भर देने के लिये..

कलाप्रकटन

प्रतिक्रिया

पैसा's picture

7 Jul 2015 - 10:40 pm | पैसा

छान ओळख करून दिलीत. ही गझल आशाताई आणि गुलाम अलीच्या आवाजात खूप छान वाटली.

गज़ल आवडली. छान परिचय करून देत आहात. : )

वेल्लाभट's picture

8 Jul 2015 - 10:51 am | वेल्लाभट

एक नंबर आहे तुमचं विवेचन. क्या बात है. नासिर काज़मी का फन तो लाजवाब है ही.

या ग़ज़लशी खूप जोडता आलं स्वतःला. शोधता आलं प्रत्येक शेरात स्वतःच अस्तित्व. खूपच छान.

जुदाईयोंके जख्म दर्द ए जिंदगीने भर दिये
तुझेभी नींद आगयी मुझेभी सब्र आ गया

जियो यार! आहा! ......आहा ! काय लिहीलंय!

न अब वो यादोंका चढता दरिया न फुर्सतोंकी उदास बरखा
यूंही जरासी कसक है दिलमें जो जख्म गहरा था भर गया वो

नि:शब्द !

अनेक अनेक धन्यवाद गविशेट या ग़ज़लबद्दल लिहिल्याबद्दल....

चुकलामाकला's picture

8 Jul 2015 - 11:14 am | चुकलामाकला

क्या बात!

दाते प्रसाद's picture

8 Jul 2015 - 12:03 pm | दाते प्रसाद

खूप छान विवेचन !!! धन्यवाद

"मिराज - ए -ग़ज़ल" मध्ये हे पहिल्यांदा ऐकलं. तेंव्हापासुन All Time Favorite. आणि आता अजून एकदा ऐकणं आलं

मी-सौरभ's picture

13 Aug 2015 - 7:21 pm | मी-सौरभ

गवि: परत लिहीते व्हा

बहुगुणी's picture

14 Aug 2015 - 1:26 am | बहुगुणी

खास या धाग्याची वाचनखूण साठवता यावी म्हणून लॉगिन करावंसं वाटलं, अप्रतिम विवेचनाबद्दल धन्यवाद!
यही तो है फर्क मुझमें उसमें, गुजर गया मैं ठहर गया वो
काय ओळी आहेत!

दमामि's picture

14 Aug 2015 - 4:02 am | दमामि

वा! क्या बात है!!!!

रमेश आठवले's picture

14 Aug 2015 - 7:21 am | रमेश आठवले

+१

कहर's picture

17 Aug 2015 - 11:00 am | कहर

बरेच दिवस झाले हा धागा वाचून पण गझल ऐकण्याची संधी काल मिळाली. खूप सुंदर गझल आहे. विवेचनात नसलेली खालची ओळ

वो हिज्र की रात का सितारा वो हम नफ़स हम सुखन हमारा
सदा रहे उसका नाम प्यारा सुना है कल रात मर गया वो

थोड्याशा विनोदी अंगाने जाउन शेवटी मनाला एक हुरहूर लाऊन जाते.

अतिशय सुंदर गझल आणि त्यावरचं लिखाण.
"बस एक मंजिल है बुल हवसकी, हजार रस्ते है अहल ए दिलके
यही तो है फर्क मुझमें उसमें, गुजर गया मैं ठहर गया वो"
क्या बात है!मान गये उस्ताद!