टोकियो स्टोरी...

पद्मावति's picture
पद्मावति in जनातलं, मनातलं
8 Jun 2015 - 3:35 am

मागे कधीतरी अमृता सुभाष नि केलेलं टोकियो स्टोरी ह्या चित्रपटाचं परीक्षण वाचलं होतं. बहुतेक लोकसत्ता मधे. ते वाचल्यावर वाटायला लागले की बघावा हा चित्रपट कधीतरी.
साधारणपणे समीक्षकांनी फार कौतुक केलेले पिक्चर्स बघायला मला जरा भीतीच वाटते. एखादे उदास, अंधारलेले घर, कुठेतरी भिंतीवरच्या पालीवर कॅमरा झूम केलेला, मागे घड्याळ तरी टिक टिक करणार नाहीतर आगगाडीची धडधड तरी... आणि दर दोन डायलॉग्स मधील अगदी असह्य वाटणारा तो लांबलचक आकवर्ड पॉज़. काहीच्या काहिच......

असो, पण अमृताच्या लेखावरून तरी वाटत होते की हा चित्रपट तसा नसावा. आणि खरंच, हा चित्रपट बघितल्यावर काहीतरी छान बघितल्याचे समाधान मिळाले.

कथा अगदी साधी. दूसरे महायुद्ध नुकतेच संपले आहे, तो काळ. एक वयस्कर आजी आजोबा आपल्या तरुण मुलीबरोबर छोट्याशा गावात राहात असतात. त्या जोडप्याला पाच अपत्ये. त्यापैकी दोन टोकियो मधे असतात, एक क्योतो मधे. एक मुलगा लढाईमधे मेलेला... त्याची तरुण विधवा सुद्द्धा टोकियोमधेच. आजी आजोबा आपल्या मुलांना भेटायला म्हणून चार दिवस टोकियोला निघाले आहेत. मुलांना भेटायला जाणार म्हणून दोघेही आनंदात. त्यांच्यासाठी तिकडे इतक्या दूर शहरात जाणे म्हणजे परदेशात जाण्यासारखेच.

शहरात पोहोचल्यावर डॉक्टर मुलगा, सून अगदी मनापासून स्वागत करतात. नातवंडं मात्र जरा दूरदुरच कारण आजी-आजोबांचा सहवास त्यांना फारसा कधी मिळालेला नाही आहे. एक दोन दिवस मजेत जातात. डॉक्टर मुलगा इच्छा असूनही आई वडिलांबरोबर वेळ घालवू शकत नाहिये.

नंतर मुलीच्या घरी जातात. मुलगी मात्र किंचित स्वार्थी आहे. आता आई वडील आले आहेत, त्यांना टोकियो फिरवावं लागेल. आपण कशाला सुट्टी घ्या, असा विचार करते आणि नोरिको म्हणजे तिची वाहिनी. तिला फोन करते. ही नोरिको आजी आजोबांच्या गेलेल्या मुलाची बायको.

नोरिको मात्र ह्या आपल्या प्रेमळ सासू-सासर्‍यांची खूप छान काळजी घेते. त्यांना टोकियो फिरवते. एका चाळीत तिची एक खोली असते. त्या इतक्याश्या खोलीत सासू-सासर्‍यांना ती घेऊन जाते. प्रेमाने जेउ-खाउ घालते. त्यांच्याबरोबर वेळ घालवते.

आर्थिक दृष्ट्या ती बाकीच्यांच्या तुलनेत काहीच नसते पण मनाची श्रीमंती तिच्याकडे आहे. छोटीशी नोकरी करून ही मुलगी नवर्‍याच्या मागे काटकसरीने जगत असते पण सासू- सासर्‍यांची सेवा करतांना आपला काही खर्च होतोय किंवा आपल्या एव्हढ्याशा घरात आता अजुन यांना कशाला ठेवून घ्या किंवा आपला दिवसाचा पगार गेलाय याचा ही विचारही करत नाही. जी आपुलकी, जो वेळ आजी आजोबांना त्यांची मुलं देऊ शकली नाही ते सर्व काही ही सून त्या दोन-चार दिवसात त्यांना देते, रक्ताचं काही एक नातं नसतांना सुद्धा.

साधा सरळ हा सिनेमा. काहीही मेलोड्रामा नसलेला हा अत्यंत सुरेख चित्रपट यासूजरो ओझु या महान दिग्दर्शकाने बनविला आहे. एखादा दिग्दर्शक जेव्हा चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला एखादी गोष्ट सांगतो तेव्हा ती गोष्ट पहिल्या प्रथम त्या दिग्दर्शकाला स्वतःलाच भावली पाहिजे, पटली पाहिजे, तरच तो चित्रपट सच्चा वाटतो. हा चित्रपट असा अगदी खरा वाटतो.
कधी कधी दिग्दर्शक स्वता:च्या कलाकृतीच्या किंवा त्यातल्या काही पात्रांच्या इतक्या प्रेमात पडतो की तो कथेला योग्य न्याय देऊ शकत नाही. पण इथे मात्र फार तटस्थपणे चित्रपटाचं कथानक आपल्यासमोर मांडल्या जातं. कोणाला फार काही खलनायक बनवून मुख्य पात्रांना सहानुभूती मिळवण्याचा अजिबात प्रयत्न नाही. अगदी सहजपणे सांगितलेली ही कथा आहे.

कलाकार- यांच्याबदद्ल काय बोलणार. आजी आजोबांच्या भूमिकेत मधे चिशु रियू आणि चीएको हिगाशीयामा या जेष्ठ कलाकारांनी जीव ओतला आहे. खरं म्हणजे फार सुंदर अभिनय केला आहे असहि म्हणवत नाही कारण इथे अभिनय मुळी नाहीच आहे. हे दोघं फक्त हिरायामा आजी आजोबाच वाटू शकतात दुसरे कोणीही नाही. चेहृयावरचे अगदी गोड, प्रेमळ भाव. स्वभावानी साधे, शांत. बरं साधे गरीब पण त्यांना उगाच केविलवाणं वगैरे नाही दाखविलेले. छान आहेत हे दोघं. अतिशय अलिप्त तरीही आनंदी जोडपं आहे. मुलाला वेळ नाही आपल्यासाठी तर हे म्हणतील अरे बिझी डॉक्टर आहे आपला मुलगा, बिझी आहे याचा अर्थ उत्तम डॉक्टर आहे.... असा समाधानी स्वभाव. आपण भगवदगीता वाचतो. ही मंडळी गीता जगणारी!

कशाचा मोह नाही, अपेक्षा नाही. अपेक्षा नाही म्हणून राग नाही कोणाचा. मुलांविषयी काहीही तक्रार नाही- त्यांच्या तोंडावर तर नाहीच पण अगदी एकमेकांशी बोलतांना पण नाही. उलट बाकीच्या कित्येक मुलांहून आपली मुलं कितीतरी छान निघाली याचंच कौतुक.

.
जालावरून साभार

डॉक्टर मुलाचा रोल करणारा अभिनेता ही चांगला आहे. याने आपल्या भूमिकेला व्यवस्थित न्याय दिला आहे. हा मुलगा एक सरळमार्गी संसारी गृहस्थ आहे. कर्तव्य निष्ठ डॉक्टर आहे. पण आई वडिलांसाठी वेळ काढू शकत नाहीये. हा मुलगा स्वार्थी नाही आहे. पण प्रेम, भावना वगैरे न दाखविता येणारा टिपिकल जपानी पुरूष आहे.
मुलगी मात्र मी आधी म्हटलं तशी थोडी स्वार्थी असते. मी, माझा नवरा आणि माझा व्यवसाय याच्यामधे तिला कोणीही नको आहे मग ते आई वडील का होईना. आपली जबबदारी दुसर्या कोणावर कशी ढकलावी याची उत्तम जाण या बाईला आहे. मनाची संकुचित मनोवृत्ती तिच्या चेहरयवरही स्पष्ट दिसते आहे. सुगीमारा हारुको ही अभिनेत्री तर या भूमिकेसाठी अगदी फिट बसली आहे.

फॅमिली टाइम
.
जालावरुन साभार

आणि नोरिको--सेटसुको हारा या अभिनेत्री ने नोरिकोच्या भूमिकेला ला शंभर टक्के न्याय दिला आहे. अतिशय गोड दिसणारी ही अभिनेत्री या नोरिको च्या भूमिकेत छान शोभून दिसते. हसरे डोळे, अतिशय सोज्वळ, हसतमुख चेहरा. कायम आनंदी. बरं, या हसण्यामधेही कुठे खोटेपणा नाही. एखाद्याचा चेहरा किंवा डोळे त्या माणसाचा स्वभाव सांगतात. ह्या मुलीकडे बघितलं की असे वाटावे की इतका नितळपणा, समजूतदारपणा या जगात खरंच आहे?

.
जालावरुन साभार
.
जालावरून साभार

१९५३ मधे बनलेला हा सिनेमा ब्लॅक अँड व्हाईट आहे. चित्रपटातील संवाद आपल्या रोजच्या बोलण्यासारखे आहेत. फार काही अलंकारीक भाषा वापरण्याचा अट्टहास नाही. मला थोडी खटकणारी एकच गोष्ट वाटली ती म्हणजे या चित्रपटाची लांबी. कधी कधी चित्रपट थोडाफार रेंगाळल्यासारखा वाटतो, विशेष करून शेवट शेवट.

सिनेमेटॉग्राफी उत्तम आहे. त्यावेळेसच्या जपानचे समाज-जीवन, तिथल्या लोकांची बोलण्याची, वागण्याची पद्धत, त्यांची देहबोली फार छान दाखविली आहे. फक्त या सिनेमाचा मूड थोडासा उदास आहे. त्याला कारणही आहे. दुसरं महायुद्ध संपून काहीच वर्षे झाली आहेत. जवळजवळ प्रत्येक घरातील मुलगा हा युद्धात कामी आला आहे. देश आर्थिकरित्या, मानसिकरित्या पार कोलमडून गेला आहे. त्यावेळच्या जपानचा तो थोडा थकलेला, विझलेला, जरासा वाकलेला असा मूड, टोन दिग्दर्शकाने अचूक पकडला आहे.

शक्य असेल तर हा चित्रपट जरूर पहा. फार काही इंट्रेस्टिंग, एक्साइटिंग बघायला मिळणार आहे अशी अजिबात अपेक्षा न ठेवता पहा.
उत्तम दिग्दर्शन, उत्तम अभिनय आणि साधी सरळ पटकथा आणि संवाद. छान अगदी प्रामाणिक चित्रपट बघितल्याचं समाधान मिळेल.

हे ठिकाणआस्वाद

प्रतिक्रिया

श्रीरंग_जोशी's picture

8 Jun 2015 - 6:02 am | श्रीरंग_जोशी

लेखाचे शीर्षक वाचून वाटले होते की स्पेन अन पॅरिसची सफर घडवल्यावर आज टोकियोचे प्रवासवर्णन वाचायला मिळणार :-) .

ही चित्रपट ओळख वाचून हा चित्रपट पाहण्याची इच्छा निर्माण झाली आहे. संधी मिळताच नक्की बघीन.

छान ऒळख.मीही या चित्रपटाबद्दल अमृता सुभाषने लिहिलेलं वाचलं होतं!तुमच्यामुळे आठवण झाली.आवर्जून बघेन.

बहुगुणी's picture

8 Jun 2015 - 7:51 am | बहुगुणी

चित्रपट 'मस्ट सी' यादीत जातोय, मिळाला की पहाणार, धन्यवाद!

अमृत's picture

8 Jun 2015 - 8:56 am | अमृत

अजुनही काही बिगर भारतीय (इंग्रजी नसलेले) सिनेमे बघण्यात आले अस्तील तर अजून येऊ देत.

इशा१२३'s picture

8 Jun 2015 - 9:03 am | इशा१२३

सुरेख ओळख!मलाहि आधि हि तोक्यो सफर असनार असेच वाटले. सिनेमा जरुर बघेन.

केतकी_२०१५'s picture

8 Jun 2015 - 10:07 pm | केतकी_२०१५

खूप सुन्दर वर्णन लिहिले आहे. तुमची लेखन्शैली खूपच भावली. वाचून सिनेमा बघण्यची ऊत्सुकता निर्माण झाली. मी सिनेमा जरूर बघेन. तुम्हला आवद्लेल्या इतर सिनेमा बद्दल वाचयला नक्किच आवडेल.

चित्रपटाची ओळख आवडली. वेळ मिळताच बघणार. फोटूंवरून थोडा अंदाज येतोय. चांगला असणार हा शिनेमा!

रुपी's picture

9 Jun 2015 - 12:15 am | रुपी

छान ओळख करुन दिलीत. यादीत नाव टाकून ठेवते लगेच, पाहायला मुहूर्त केव्हा लागेल माहित नाही.

बाकी, तुम्ही जे समीक्षकांनी फार कौतुक केलेल्या चित्रपटांबद्दल लिहिलंय त्याच्याशी सहमत! :)

छान ओळख करून दिली आहे. अवश्य बघण्यात येईल. बाकी मध्यंतरी नेटफ्लिक्सवर हा एक नितांत सुंदर चित्रपट पाहण्यात आला. चित्रपटाचे नावः The Prize Winner of Defiance, Ohio सत्यकथेवर आधारीत आहे. एका गृहिणीची कथा आहे जीला १० मुले आहेत. ती कुटुंबाला हातभार लावण्यासाठी छोटे मोठे जींगल्स लिहून स्पर्धांची रक्कम जिंकत असे.

फार च सुंदर लिहिलं आहे. मला असे सिनेमे बघायला फार आवडतात. मोठ मोठ्या नाट्यमय घटना नसताना पण सामान्य माणसाच्या आयुष्यातलं सुक्ष्म नाट्य जास्त भावतं. नक्की मिळवुन पाहिन हा सिनेमा.

किसन शिंदे's picture

9 Jun 2015 - 12:49 am | किसन शिंदे

सुरेख ओळख चित्रपटाची. मिळाल्यास नक्की पाहीला जाईल.

विशाखा पाटील's picture

9 Jun 2015 - 6:43 am | विशाखा पाटील

सुंदर ओळख! बऱ्याचदा कथा कळल्यावर चित्रपट बघण्यातला रस कमी होतो. पण पूर्ण कथा कळूनही बघायला हवा, असा चित्रपट दिसतोय.

मुक्त विहारि's picture

9 Jun 2015 - 8:07 am | मुक्त विहारि

धन्यवाद.....

ज्यांना हा सिनेमा डावूनलोड करून बघायचा असेल, त्यांच्यासाठी लिंक देत आहे....

https://thepiratebay.la/torrent/6242445/Yasujiro_Ozu_-_Tokyo_monogatari_...(1953)

सिनेमाची कथा इंटरेस्टींग वाटते आहे.
सी.डी. मिळवून बघण्याचा प्रयत्नं करीन.

छान लिहिलंय! सिनेमा पाहण्याची उत्सुकता आहे.
टोकियोची सफर घडणार असंच वाटलेलं.

सानिकास्वप्निल's picture

9 Jun 2015 - 2:32 pm | सानिकास्वप्निल

वाह! छान ओळख सिनेमाची.
जरूर बघण्यात येईल.

जुई- तुम्ही रकमेंड केलेला मूवी छान दिसतोय. लवकरच पाहयला जाईल.
विशाखा- मी सांगतलेली चित्रपट-कथा सत्तर टक्के आहे. नंतर अजूनही कथा आहे. शेवटी काय होतं सिनेमात हे मुद्दामच नाही लिहिल. छान आहे-आवडेल तुम्हाला.

चित्रपटाप्रमाणेच सरळ साधे परीक्षण. आवडले.

आतिवास's picture

9 Jun 2015 - 4:22 pm | आतिवास

ओळख आवडली.
नजर ठेवते चित्रपटावर :-)

केतकी_२०१५'s picture

11 Jun 2015 - 8:46 pm | केतकी_२०१५

हा चित्रपट युट्युब वर https://www.youtube.com/watch?v=pCh4WRDVzyY आहे (सबटायटल्स नाहीत :( )
ईग्लीश सब्टायटल्स मिळाल्यास नक्की लिन्क पठ्वीन.