तटबंदी

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
8 Jun 2015 - 2:21 am

पुढे त्यांच्या कामाला निघालेल्या बाबांनी चिन्मयला त्याच्या कंपनीच्या गेटपाशी सोडलं. आज सकाळीच त्याची गाडी दोन दिवसांसाठी सर्व्हिसिंगला दिलेली असल्याने त्याने बाबांना राईड मागितली होती.

"संध्याकाळी किती वाजता pick up करू?" बाबांनी विचारलं.

"सव्वा सहापर्यंत आलात तरी चालेल"

"मग असं करतो, आईला बिग बझार मध्ये जायचंय, मी घरी जाऊन तिला घेऊन साडेसहा पर्यंत इथे येतो, आपण तिघेही मग पुढे जाऊयात, चालेल तुला?"

"हो, चालेल." म्हणत चिन्मय उतरला. तो दिसल्यावर शेजारच्याच कॅफे कॉफी डे च्या बाहेरच्या बाजूने बसलेल्या तरुण मुला-मुलींच्या ग्रूपने त्याला हातांनी 'हाय' केलं ,आणि त्यांतली काही मंडळी उठून उभी राहिली.

"तुमचा ग्रूप का?" बाबांनी विचारलं.

"हो, ही सगळी माझी टीम."

'टीम लीड' असलेल्या आणि "माझी टीम' म्हणणाऱ्या गोऱ्या, उंच चिन्मय कडे बाबांनी अभिमानाने पाहिलं, चिन्मय त्याच्या सहकाऱ्यांकडे चालत गेला तशी बाबांनी गाडी रस्त्याकडे वळवली. तशात ग्रुपमधल्या अद्याप कॉफी संपवत बसून असलेल्यांपैकी एका अप्रतिम सुंदर मुलीने त्यांचं लक्ष वेधून घेतलं, नक्कीच worthy of a second look अशी होती. बाबांनी ट्रॅफिककडे पहात गाडी पुढे घेतली.

संध्याकाळी आई-बाबा दोघेही आले तेंव्हा चिन्मयचा ग्रूप त्याच्या सोबतीसाठी थांबलेला होता. सकाळची मुलगी तिच्या Nanoच्या driving seat मध्ये बसलेली होती, आणि इतर सर्व जण आसपास बोलत उभे होते. चिन्मय आई-बाबांच्या गाडीकडे आला तसे सर्व जण आपापल्या वाहनांच्या दिशेने निघाले.

बाबांनी आईला त्या मुलीविषयी सांगितलं असणार, कारण आई म्हणाली, "चिन्मय, ती गाडीतली मुलगी कोण रे? सुंदर आहे!"

"सुंदर आहे ना? मी तिला म्हंटलं, तू राजा रविवर्म्याच्या चित्रातल्यासारखी दिसतेस म्हणून!" चिन्मय मिष्कील हसत म्हणाला.

बाबांनी चमकून त्याच्याकडे आणि मग आईकडे पाहिलं, "तिला म्हणालास? आईसाहेब, युवराजांचा बुरूज ढासळायला लागलेला दिसतोय! सगळी तटबंदी नावाचीच! म्हणे सून तुम्हीच शोधायची! सून जर आम्ही शोधायची तर सुंदर मुलींकडे पाहतोस कशाला रे?"

"अरे वा! पहायला काय हरकत आहे? कोणी डाएटवर असेल म्हणून मेन्यू पहायला थोडीच बंदी असते? आणि बुरूज वगैरे काही ढासळत नाहीये, कुणात काही चांगलं दिसलं की जरूर कौतुक करावं असं तुम्हीच शिकवलंय ना? आणि शिवाय ते 'सत्यं वदेत प्रियं वदेत' वगैरे…"

"गप रे, शहाण्या!" आई म्हणाली, "'प्रियं वदेत' म्हणे! अरे पण तिला आवडलं का तू तसं म्हंटलेलं? "

"नावडल्याचं काही म्हणाली नाही, म्हणजे आवडलं असावं!" पुन्हा मिश्कील हसत चिन्मय म्हणाला.

"अरे, पण खरंच खूप सुंदर आहे मुलगी" आई म्हणाली.

"अगं हो, पण beauty is just skin deep, हो ना?"

"असू दे! नाव नाही सांगितलंस तिचं?"

"पद्मिनी."

"पद्मिनी?" बाबांनी विचारलं, "अरे किती जुनं नाव आहे!"

"जुनं?"

"अरे मग? एकदम डोळ्यांपुढे राणी पद्मिनी किंवा फारतर राजकपूरच्या सिनेमातली पद्मिनी उभी रहाते! तुझ्या वयाच्या मुलींमध्ये हे नाव कधी ऐकलं नाहीये."

"असू देत हो, आडनाव काय रे?"

"रांझणे."

"रांझणे? म्हणजे कोण रे?" बाबांनी विचारलं.

चिन्मय मोठ्याने हसला. बाबांनी त्याच्याकडे प्रश्नार्थक पाहिलं.

"बाबा, मला तुम्ही सांगितलेला २० वर्षांपूर्वीचा अमेरिकेतला अनुभव आठवला, एका गोऱ्याने तुमच्या brown skin कडे पाहून तुम्हाला "What are you?" विचारल्यावर तुम्ही "What if I say a human being?" असं उत्तर दिलं होतंत, तसंच उत्तर द्यावंसं वाटलं मला. Watch out, बाबा, your prejudices are showing! आणि तुम्हीच आजीला सांगायचात ना, की 'नावावरून जात, धर्म वगैरे शोधण्याच्या फ़ंदात पडू नाही, शोधायचंच झालं तर स्वभावात माणूसकी शोधावी' म्हणून?"

बाबा हसले, "Yes Sir! You're right! मेरा अंमळ चुक्याच!"

"आणि आपल्या ऐकिवात असलेलीच नावं अस्तित्वात असतात असंही नाही ना?"

"घ्या! तुमच्याच बुरुजाला खिंडारं पडताहेत!" आई हसत म्हणाली, "आणि ए, मला काही प्रेज्युडिस वगैरे नाहीये हं," आई म्हणाली, "पुढच्या वेळी ओळख करून दे बरं का!"

"तिचीच? का सर्वांची?"

"सर्वांची दे रे, शहाण्या! पण मला तिच्याशी बोलण्यातच स्वारस्य आहे. मराठी बोलते ना?"

"हो ती मराठीच बोलते, आई-वडिल साताऱ्याचे आहेत, दोघांची कसलीतरी mechanical parts factory आहे तिथे. तुम्ही खुशाल ओळख करून घ्या तिच्याशी, but behave yourselves and speak to all, I don't want to start any unnecessary rumours!" चिन्मयने खडसावून सांगितलं.

दुसऱ्याच दिवशी संध्याकाळी आई-बाबा दोघेही गाडी घेऊन चिन्मयला घ्यायला आले. कालच्या सारखाच त्याचा ग्रूप पद्मिनीच्या गाडीच्या आसपास घोळका करून उभा होता, आणि ती driving seat मध्ये बसलेली होती. आई-बाबा गाडीतून उतरल्यावर चिन्मय आणि त्याचा ग्रूप त्यांच्या दिशेने चालत यायला लागला. चिन्मय आई-बाबांजवळ पोहोचला. पद्मिनीनेही गाडीचं दार उघडलं, आणि सुरेख मोरपिशी चुडीदारमधला उजवा पाय रस्त्यावर टेकला. आई-बाबा पुढे झाले तशी ती डावीकडे गाडीत वाकली आणि मग दोन्ही हात बाहेर काढून तिने हातांतल्या कुबड्या जमिनीवर टेकवल्या आणि ती खाली उतरली. डाव्या पायातला चुडीदार हवेत नुसताच तरंगत होता.

आईने चमकून वळून बाबांकडे पाहिलं, बाबांनी आधी गाडीच्या काचेवरच्या 'Handicapped' स्टिकरकडे आणि मग चिन्मयकडे पाहिलं, चिन्मय डोळ्यांत आव्हान घेऊन त्या दोघांच्याचकडे पहात होता, "येताय ना ओळख करून घ्यायला आई-बाबा?"

कथाविचार

प्रतिक्रिया

संदीप डांगे's picture

8 Jun 2015 - 3:10 am | संदीप डांगे

विचारात पाडणारी कथा...

पद्मावति's picture

8 Jun 2015 - 3:53 am | पद्मावति

शेवट अगदी अनपेक्षीत...फारच छान

श्रीरंग_जोशी's picture

8 Jun 2015 - 6:34 am | श्रीरंग_जोशी

ही कथा खूप भावली.

रेवती's picture

8 Jun 2015 - 6:42 am | रेवती

कथा आवडली.

एस's picture

8 Jun 2015 - 7:19 am | एस

धाडकन जमीनदोस्त केलीत की तटबंदी. कथा आवडली हेवेसांनल.

बापरे!! आईबाबांची अवस्था समजू शकते मी चक्क!!
मस्त लिहिलंत बहूगुणी. मस्तच!!

एक एकटा एकटाच's picture

8 Jun 2015 - 10:14 am | एक एकटा एकटाच

मस्त कथा

आवडली.

किसन शिंदे's picture

8 Jun 2015 - 10:29 am | किसन शिंदे

अनपेक्षित शेवट! शेवटाला हे असलं काही वाचायला मिळेल असं वाटलं नव्हतं.

बॅटमॅन's picture

8 Jun 2015 - 10:35 am | बॅटमॅन

एकदम ट्विस्टच की.

वां !! गुगली एंड आहे गोष्टीचा…

टवाळ कार्टा's picture

8 Jun 2015 - 11:39 am | टवाळ कार्टा

भन्नाट आवडली :)

मृत्युन्जय's picture

8 Jun 2015 - 1:31 pm | मृत्युन्जय

कथा आवडली. मस्तच आहे.

आतिवास's picture

8 Jun 2015 - 1:56 pm | आतिवास

अप्रतिम कथा.
तटबंदीला धक्का देणारी!

मदनबाण's picture

8 Jun 2015 - 2:08 pm | मदनबाण

कथा आवडली...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :-
'हसीना' मान जाएगी?
पाकिस्तानी मुहाजीरांचे 'रॉ कनेक्शन'

gogglya's picture

8 Jun 2015 - 2:12 pm | gogglya

कथा आणी अनपेक्षित शेवट!

शशांक कोणो's picture

8 Jun 2015 - 2:38 pm | शशांक कोणो

कथा एकदम आवडली. १० पैकी १० मार्क शेवटला

चिनार's picture

8 Jun 2015 - 2:49 pm | चिनार

सुरेख कथा !
शेवटल्या सिक्सर ची वाट बघत होतो..तुम्ही तर क्लीन बोल्डच केलं आम्हाला ..

विनोद१८'s picture

8 Jun 2015 - 2:56 pm | विनोद१८

उत्तम लिहीलिय, सुरेख मांडणी व नाट्यमय शेवट तर अप्रतिम.
दिर्घकाळ लक्षात राहणारी कथा आहे ही.

नाखु's picture

8 Jun 2015 - 3:28 pm | नाखु

म्हणूनही रोकडा सवाल. विचारलेला आणि न विचारलेलाही.
सुरेख मांडणी.

अजया's picture

8 Jun 2015 - 6:44 pm | अजया

कथा आवडली.

उगा काहितरीच's picture

8 Jun 2015 - 7:54 pm | उगा काहितरीच

पाय नसल्यालर गाडी कशी चालवनार ?

श्रीरंग_जोशी's picture

8 Jun 2015 - 8:08 pm | श्रीरंग_जोशी

कदाचित कृत्रिम पाय (prosthetic leg) असावा. किंवा गाडीच्या रचनेत बदल करून घेतला असावा.

बहुगुणी's picture

9 Jun 2015 - 2:17 am | बहुगुणी
श्रीरंग_जोशी's picture

9 Jun 2015 - 2:40 am | श्रीरंग_जोशी

ही सुविधा अपंग व्यक्तिंसाठी खूपच उपयुक्त आहे.

अमेरिकेत अपंग व्यक्ती कुणाच्याही साहाय्याशिवाय गाड्या सहजपणे चालवताना दिसतात. काही वेळा (थांबलेल्या) मिनिव्हॅन वगैरे गाडीतून व्हील चेअर न उचलता उतरवण्यासाठी प्लॅटफॉर्म बाहेर येताना पाहिला आहे.

अशीच सोय सिटी बसेसमध्ये असते.

अवांतर - व्हिडिओतले गाणे मधुर आहे.

खेडूत's picture

11 Jun 2015 - 9:54 pm | खेडूत

माझा एक वर्गमित्र एका पायाने अधू असल्यने पुण्यात अशी परिवर्तित गाडी गेली पन्धरा वर्षे चालवतोय. खासगी ग्यारेजात त्याने ती बनवून घेतलीय. फक्त हातात क्लच आहे आणि एक पाय चान्गला असल्याने बाकी गाडी नेहमीसारखीच!

बाकी कथा आवडलीच!

सूड's picture

8 Jun 2015 - 8:07 pm | सूड

आवडली.

अमितसांगली's picture

8 Jun 2015 - 8:10 pm | अमितसांगली

भिडली...

NiluMP's picture

8 Jun 2015 - 11:40 pm | NiluMP

मस्त twist.

रुपी's picture

9 Jun 2015 - 12:18 am | रुपी

आवडली!

मनीषा's picture

9 Jun 2015 - 10:02 am | मनीषा

कथा आवडली !

भाग्यश्री कुलकर्णी's picture

9 Jun 2015 - 11:41 pm | भाग्यश्री कुलकर्णी

आवडली.खरच असं घडू शकेल का असा विचार मनात आला.

जुइ's picture

10 Jun 2015 - 1:20 am | जुइ

कहाणी मे ट्विस्ट हे!

प्रभाकर पेठकर's picture

10 Jun 2015 - 2:01 am | प्रभाकर पेठकर

अनपेक्षित शेवटाने माझा स्वतःचा अनुभव आठवला. ऐन तारुण्याच्या बहरात सुंदर तरूणींना न्याहाळणे नैसर्गिक होते. एकदा वरळीहून १६५ क्रमांकच्या बसने येत असताना सर्वात पहिल्या सीटवर एक अतिसुंदर ललना बसली होती. किंचीत मोठ्या फ्रेमचा स्टायलीश गॉगल आणि सौंदर्यवतींचे बाकी सर्व वर्णन लागू होत होते. सारखं सारखं बघणं सभ्यतेच्या कक्षेबाहेर जात आहे हे जाणवूनही राहून राहून नजर तिच्याकडेच जात होती. कंडक्टरने 'आगरबाजाssर' असा आवाज दिला आणि ती उठून उभी राहिली. पर्स मध्ये फोल्ड करून ठेवलेली पांढरी-लाल काठी काढून, ड्रायव्हरला 'धन्यवाद' देत, खाली उतरली. धक्का बसला होता. तिच्या बाबतील, दैवाच्या क्रूरतेने परिसीमा गाठली आहे असाच विचार मनांत आला.

अभय म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 9:11 am | अभय म्हात्रे

खुप सुन्दर कथा आहे.

असंका's picture

10 Jun 2015 - 10:53 am | असंका

छान गोष्ट...
धन्यवाद!!

आता गोष्टीत थोडं इन्व्हॉल्व होऊन म्हणू इच्छितो, की ते 'डोळ्यात आव्हान घेऊन' वगैरे ला काही अर्थ नाही. आपल्या आई बापांना जज करण्याएवढे मोठे आपण झालो आहोत, असं मुलांना कसं काय वाटायला लागतं? माझ्या दृष्टीने तर चार चौघांसमोर आपल्या आईबापांना पूर्ण माहिती न देता त्यांची परीक्षा बघणारा मुलगा इथे चुकला. ही गोष्ट इथनं पुढे गेली तर मुलाला आपली चुक मान्य करावी लागेल.

बॅटमॅन's picture

10 Jun 2015 - 12:56 pm | बॅटमॅन

आपल्या आई बापांना जज करण्याएवढे मोठे आपण झालो आहोत, असं मुलांना कसं काय वाटायला लागतं?

बरोबरे, आईबाबा म्हणजे केवळ संत, त्यांची कधी चूक असूच शकत नाही.

असंका's picture

10 Jun 2015 - 1:13 pm | असंका

छे छे..काय बोलता? अहो उलट येता जाता त्यांना दगड मारून तपासत रहायचं असतं की ते किती घट्ट आहेत!

(बाल की खाल काढायला एका पायावर तयार ..)

बॅटमॅन's picture

10 Jun 2015 - 2:31 pm | बॅटमॅन

अच्च जालं का? उगी.

असंका's picture

10 Jun 2015 - 5:32 pm | असंका

बस एवढंच????

:-)

चिगो's picture

11 Jun 2015 - 10:00 pm | चिगो

माफ करा, पण कळलं नाही..

आपल्या आई बापांना जज करण्याएवढे मोठे आपण झालो आहोत, असं मुलांना कसं काय वाटायला लागतं?

काय चुकीचं आहे त्यात? आपल्याला देण्यात आलेले संस्कार-विचार आई-वडील खरंच मानतात का की नुसतीच 'बोलाचीच कढी, बोलाचाच भात' आहे हे जर एखाद्या स्वतःची स्वतंत्र वैचारीक बैठक असलेल्या तरुणाला तपासून पहावंसं वाटलं तर त्यात चुक काय?

माझ्या दृष्टीने तर चार चौघांसमोर आपल्या आईबापांना पूर्ण माहिती न देता त्यांची परीक्षा बघणारा मुलगा इथे चुकला.

त्याने कुठेही आपल्या आई-वडीलांना एम्बॅरेस / शरमिंधं केलं नाही, का चारचौघात 'तुम्ही किती कोत्या विचाराचे आहात' वगैरे मुक्ताफळं उधळली नाहीत. त्याला त्यांची रिअ‍ॅक्शन आणि त्यानंतर ते काय करतात हे बघायचं असेल, तर मलातरी त्यात गैर काहीच वाटत नाही..

माझं ते वरचं पहिलं वाक्य चूक आहे. आपलं बरोबर आहे. पण ते संदर्भ सोडून घेतलं तर चूक आहे. मी ते चारचौघांच्या देखत त्यांच्याशी गेम खेळण्याच्या संदर्भात म्हणालो होतो.

एखादी चमत्कारीक परीस्थिती निर्माण होण्यापासून टाळणे शक्य असताना, ती न टाळता उलट ती चमत्कारीक परीस्थिती नक्कीच कशी तयार होइल इकडे हा मुलगा इथे लक्ष देत आहे. हा विश्वासाचा प्रश्न आहे. आपण ज्यांना अगदी आपले समजतो, ते आपल्यावर अशी परीस्थिती आणतील तर परस्पर विश्वासावर परीणाम होणं शक्य आहे. त्या मुलाचं उद्दीष्ट एवढं महत्वाचं आहे का, की ज्याची ही एवढी किंमत द्यावी लागू शकते?

शिवाय, आपले आई वडील आपण निवडू शकत नाही. ते जसे आहेत तसे स्विकारावे लागतात. समजा त्याच्या परीक्षेत आई वडील नापास झाले, तर पुढे काय?

चिगो's picture

12 Jun 2015 - 7:08 pm | चिगो

शिवाय, आपले आई वडील आपण निवडू शकत नाही. ते जसे आहेत तसे स्विकारावे लागतात. समजा त्याच्या परीक्षेत आई वडील नापास झाले, तर पुढे काय?

काहीच नाही.. वास्तव आणि आदर्श ह्यात आपले आई-वडीलपण वास्तवच निवडत्तात हे सत्य कळेल.. आणि जे वास्तव आहे, ते स्विकारावंच लागतं. माझ्यामते 'आदर्श' हे जोपर्यंत 'वास्तव' आपल्या अंगावर शेकत नाही, तोपर्यंत इतरांवर (अगदी आपल्या मुलांवरही) संस्कार म्हणून शिकवायला बरे असतात. दुनियादारी फार वेगळी असते. खरंतर लहान मुलं 'इन्स्टिंक्ट्स'वरच जगतात. वेळ निभावून नेण्यासाठी खोटं बोलतात. मतलबीपणानं वागतात. आपण संस्कारांच्या नावाखाली त्यांना आपण जसे वागणार नाहीत, तसं वागायला सांगतो आणि मग मोठं झाल्यावर 'व्यवहारी बण' वगैरे शिकवतो. सगळाच झोल आहे.. एक सुंदर वाक्य आहे. Kids don't follow what you teach, but what they see..

त्यामुळे कथानायकाने आपल्या आईवडीलांचे पायपण मातीचेच आहेत, हे आणि आपल्या आईवडीलांची 'फॉलसी' समजून घेतली तरच तो 'मॅचुअर' ठरेल. सच का सामना..

म्हणजे पहिला टोकाचा पर्याय- त्याचे पालक त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण होतील. ते अत्यंत समंजस आहेत.
या केस मध्ये वर वर तरी ऑल इज वेल. पण आतून आई वडिलांच्या लक्षात येइल की आपल्या मुलाने आपली परीक्षा घेतली. आता हे तर त्यांच्या स्वभावावर अवलंबून आहे की याचा त्यांच्या भविष्यातील संबंधांवर परीणाम होइल का नाही, कितपत होइल वगैरे... कारण शेवटी पोटचा पोरगा आहे, आणि आई वडिल मुळात समंजस आहेत - मुलाची चूक समजून घेतील.

आणि दुसर्‍या टोकाचा पर्याय? ते काहीतरी गोंधळ घालून ठेवतील. यात किती लोक नाराज होऊ शकतात कल्पना करून बघा.

म्हणून मी एवढंच म्हणालो, की तो मुलगा चुकला.

त्याने एक असा प्रसंग निर्माण केला आहे, ज्याचे परीणाम चांगल्यात चांगले अगदी मामूली आहेत. आणि वाईटात वाईट मात्र अगदी भलतेच त्रासदायक आहेत. असे प्रसंग टाळावे, असं मला वाटतं.

चिगो's picture

12 Jun 2015 - 11:49 pm | चिगो

मला व्यक्तीशः माझ्या जवळच्या व्यक्ती, ज्यांच्याशी मी मोकळेपणाने बोलू शकतो, सल्ला-मसलत करतो त्या प्रामाणिक असलेल्या आवडतात, आवडतील. इथे मला अभिप्रेत असलेला 'प्रामाणिक'चा अर्थपण सांगायला हवा. प्रामाणिक म्हणजे जो आतबाहेर सारखा आहे तो. जो एखाद्या विषयावर आपल्या मनात खरं काय आहे हे सांगतो, बोकबोभा न करता.. टोकाचा भ्रष्टाचारी असलेला माणूस, जो आपल्या भ्रष्टाचाराचं कुठलंच फालतू समर्थन करणार नाही. तो कसा मजबुरीत भ्रष्ट्राचारी झाला हे न सांगता, 'मला पटतंय म्हणून मी करतोय, आणि त्याच्या परीणामांना समोर जायची माझी तयारी आहे' हे मान्य करेल, तोपण प्रामाणिक..
कसं आहे ना, आपल्या जवळच्या लोकांनीच आपल्यासोबत आत-बाहेर सारखं रहायची गरज असते.. बाकी अलम दुनिया तर बसलीच आहे आपल्याला फसवायला.. त्यात ही भर कशाला..
वर कथानायकाला आपल्या आई-वडीलांची कसोटी पहायची गरज पडावी, हाच प्रॉब्लम आहे. You think that it may be tragic henceforth.. I think that it is already tragic.
असो.

श्रीरंग_जोशी's picture

12 Jun 2015 - 11:57 pm | श्रीरंग_जोशी

कुठल्याही प्रेमविवाह करणार्‍यांना विचारून बघा की आई वडिलांना त्याबाबत सांगणे कसे होते? बहुतेक लोक अवघड होते असेच सांगतील.

कथानायकाने हा विषय घरी बोलताना काढला असता तर कदाचित त्या तरुणीला प्रत्यक्ष बघण्यापूर्वी बराच वितंडवाद झाला असता.

तिला घरी नेऊन आई वडीलांशी गाठ घालून देणे हा एक वेगळा मार्ग होता. पण मला वाटते नायका हे पण दाखवायचे होते की ती तरुणी अपंग असूनही इतरांसारखीच (स्वतःच्या जोरावर) जगत आहे.

प्रेमविवाह हा अगदी सरळ सरळ या कथेचा विषय नाही. कदाचित पार्श्वभूमीत असेलही. आपण जे उद्दीष्ट असल्याची शक्यता म्हणत आहात ते बरोबर असू शकतं. पण कथालेखकाने तरी त्या पद्धतीने ते सादर केलेलं नाही. (आणि रीडींग बिटवीन लाइन्स हा माझा स्वतःचा कमकुवत दुवा आहे. मला ते जमत नाही. त्यामुळे एखादी गोष्ट जी बोलली गेलेली नाही, समजून घेण्याची आहे, ती कुणीतरी सांगेपर्यंत मला कळत नाही.) आपण असं म्हणत आहात की त्यांना प्रेमविवाह करायचा आहे, त्याची ही पूर्वतयारी चालू आहे. बरोबर?

मुलगा कुठेही गोंधळलेला दाखवलेला नाहिये. त्याच्या मनातली उद्दीष्टे त्याच्या मनात तरी अगदी स्पष्ट आहेत. तो अवघडलेला नाहिये. आणि आई वडिल अवघडणार आहेत ह्याची त्याला कल्पना आहे हेही अगदी स्पष्ट दाखवलेलं आहे.

जर प्रेमविवाहासारखा गंभीर आणि आयुष्यावार परीणाम करणारा विषय असेल, तर मग तर तो मुलगा शंभर टक्के चुकला. इथे तो आई वडिलांच्या मताची पर्वा करणारा आहे, हे गृहित आहे. जर तसा तो नसेल, तर तो या पद्धतीनी वागणार नाही. सरळ काय ते सांगून टाकेल.

आता, ज्या लोकांच्या मताची आपल्याला पर्वा आहे, त्यांना या वागण्यातून काय संदेश मिळतोय? आपला मुलगा आपल्याशी सरळ संवाद न साधता आपल्याशी गेम खेळतोय. आपल्याला अवघड परीस्थितीत टाकताना- स्वतः अगदी निवांत आहे- आणि हे सगळं कशामुळे? तर त्या नवीन मुलीमुळे... अशा परीस्थितीत त्यांची त्या सुनेबद्दल स्विकृती कशी असेल ? शक्यता काय काय असतील?

परत एकदा- चांगल्यात चांगली आणि वाईटात वाईट शक्यता बघता, वाईटात वाईट शक्यतेचे तोटे चांगल्यात चांगल्या शक्यतेच्या फायद्यापेक्षा केव्हाही जास्त परीणामकारक होतील, असं मला वाटतं.

श्रीरंग_जोशी's picture

13 Jun 2015 - 8:38 am | श्रीरंग_जोशी

एवढा विचार मी नाही करू शकत हो.
कथा वाचतानाच काय मी प्रत्यक्ष जीवनातही एवढा विचार अथवा काळजी करत बसत नाही.

असंका's picture

13 Jun 2015 - 8:49 am | असंका

आता बघा....म्हणजे खरं तर तुम्ही स्वतः विचार किंवा पुरेसा विचार न करता, मी जे लिहिलं होतं त्याबद्दल मत प्रदर्शन केलंत. पण मी तसं म्हणलं तर वाईटपणा मात्र मला...

यावेळपुरता जरा विचार कराच- जर हे वरचं वाक्य लिहिलंच नसतंत तर जास्त बरं झालं नसतं का?

श्रीरंग_जोशी's picture

13 Jun 2015 - 9:02 am | श्रीरंग_जोशी

केवळ एक शक्यता व्यक्त केली होती.
कथानायकाला दोन अवघड पर्यायांपैकी त्याने जो निवडला आहे तो सोपा वाटला असावा असे सहजपणे वाटले म्हणून लिहिले.

तुम्हाला वाईटपणा कुठे दिलाय. प्रत्येक माणसाची विचार करायची तर्‍हा वेगळी असणार.

असंका's picture

13 Jun 2015 - 9:12 am | असंका

कुठले दोन पर्याय?

क्रेझी's picture

10 Jun 2015 - 11:10 am | क्रेझी

मस्त व्टीस्ट! लेखामधल्या बाबांनी गो-या माणसाला दिलेलं उत्तर एक नंबर!

डॉ सुहास म्हात्रे's picture

10 Jun 2015 - 11:26 am | डॉ सुहास म्हात्रे

भयानक आवडली !

शेवटचा बुरुजाला लावलेला सुरुंग केवळ मस्तं !

जेपी's picture

10 Jun 2015 - 1:07 pm | जेपी

आवडली कथा.

मोहनराव's picture

10 Jun 2015 - 4:02 pm | मोहनराव

कथा आवडली.

पैसा's picture

10 Jun 2015 - 9:30 pm | पैसा

केवळ अप्रतिम!!

प्रीत-मोहर's picture

10 Jun 2015 - 10:06 pm | प्रीत-मोहर

अप्रतिम कथा!!!

चिगो's picture

11 Jun 2015 - 9:44 pm | चिगो

जबरदस्त कथा आणि शेवटची कलाटणी मस्तच.. विचार करायला लावणारी कथा..

अनामिक२४१०'s picture

11 Jun 2015 - 10:05 pm | अनामिक२४१०

अनपेक्षित शेवट … !
जबरी ….

बहुगुणी's picture

15 Jun 2015 - 7:49 am | बहुगुणी

सर्व वाचकांना आणि प्रतिसादकांना धन्यवाद! विशेषतः चिगो, कन्फ्यूज्ड अकाऊंटंट आणि श्रीरंग जोशी यांनी केलेल्या मिनी-चर्चेबद्दल त्या तिघांचे विशेष आभार! That is exactly what I hoped to achieve! हे किंचित चर्वित-चर्वण होतं आहे यातच मला वाटतं (माझं नव्हे, पण) कथाविषयाचं यश आहे. मी ही कथा लिहिली तेंव्हा (आणि असं इतरही काही लिखाण केलं तेंव्हा) त्यामागे एक साधा निकष होता (हे घडणं सहज शक्य आहे का?) आणि एक सरळ, किमान अपेक्षा होती (कथावाचनानंतर वाचकांना -कदाचित आतापर्यंत मनातही न आलेल्या - प्रश्नांना निदान सामोरं तरी जावंसं वाटतं का?)

माझ्यापुरतं म्हणाल तर जेंव्हा चिगो "आपल्याला देण्यात आलेले संस्कार-विचार आई-वडील खरंच मानतात का की नुसतीच 'बोलाचीच कढी, बोलाचाच भात' आहे हे जर एखाद्या स्वतःची स्वतंत्र वैचारीक बैठक असलेल्या तरुणाला तपासून पहावंसं वाटलं तर त्यात चुक काय?" असं म्हणतात, तेंव्हा he has hit the nail on head! मला वाटतं we succeed as a society when we keep each other honest. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी स्वत: माझ्या आई-वडिलांना अनेकदा असे प्रश्न विचारले होते, आणि आज आमचा मुलगाही आम्हाला आमचेच संस्कार आम्हाला तपासून पहावेसे वाटतील असे प्रश्न अधून-मधून, संयत, शांतपणे विचारत राहतो, आणि त्यांतून आमची प्रगतीच होते आहे असं मला वाटतं. तेंव्हा इथेही (आणि या संस्थळापलिकडेही) अशी सभ्य, संयत चर्चा चालू राहिली तर उत्तमच!