'लुच्चे दिन' आले : नागपुरी तडका
'सच्चे दिन' म्हणता म्हणता 'लुच्चे दिन' आले
अन शेतमालाचे भाव तमाम लंबेलाट झाले ....॥
म्हण काही श्यामराव, पण सत्य एकच हाय
शेतकर्यांच्या नात्यामंधी कोणताच पक्ष नाय
सत्तेमधी गेल्याबरोबर माजावरती येते
पण शेतकर्यांच्या नावाचं कुंकू पुसून घेते
मतं मागासाठी सारे सोंगी-ढोंगी झाले ....॥
ओला पडो, सुका पडो, सारं थ्येच असते
पंजा येवो, फ़ूल येवो, कोणी आपलं नसते
यंदाच्या बाजारात पुरी मंदी आली
शेतकर्यांना स्मशानात थेट घेऊन गेली
कुणास पडलं सुतूक, जरी बदाबदा मेले? ....॥
दुष्काळाच्या वार्यापायी शेंगा नाही झोंबल्या
ज्या काही झोंबल्या त्या भावापायी लोंबल्या
चाळीस रुपये किलोवर कापूस रांगत नाही
सोयाबिनच्या इज्जतीले व्यापार हुंगत नाही
काय करू काय नाही, समजत नाही मले ....॥
कास्तकाराचे हाल भाऊ, कुत्रे पुसत नाही
काय पेरावं यंदा, काही मार्ग सुचत नाही
ना सुलतानाची हमी, ना कायदोबाचे ’अभय’
म्हणत असतो तरी आम्ही, “भारतमाता की जय”
आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥
- गंगाधर मुटे 'अभय'
------------------------------------------------------
प्रतिक्रिया
29 May 2015 - 10:26 am | गणेशा
अप्रतिम ... नेमकी व्यथा ...
वर्षोनवर्षे शेती रीलेटेड कविता लिहिने आणि त्याचे चित्रण करणे खरेच अवघड आहे..
कोणी तरी म्हंटले होते तसे.. या लेखनीतुन उतरलेल्या एका एका वाक्याची हत्यारे झाले पाहिजेत असे वाटते...
29 May 2015 - 11:49 am | प्रसाद गोडबोले
फार म्हणजे फार म्हणजे फारच निराशावादी कविता !!!
मी काय म्हणतो एकदा शेती आम्हा कॉर्पोरेट लोकांच्या हातात चालवायला द्याच ... शेती किती प्रॉफीटेबल असु शकते ते आम्ही दाखवुन देवु !
29 May 2015 - 12:23 pm | काळा पहाड
तुम्हाला काय कळतंय शेतीतलं तेव्हा तुम्ही त्यांच्या धाग्यावर कॉमेंट करताय? शहरातल्या लोकांनी शेतीवर बोलायला विरोध आहे त्यांचा.
29 May 2015 - 12:26 pm | प्रसाद गोडबोले
:D
आम्ही पैशाची शेती करतो :)
सध्या रुअपे लावले आहेत , मागल्या वर्षी डॉलर लावले होते आणि त्या आधी एकदा रियाल लावले होते, भरघोस उत्पन्न आले ,
आता पुढच्या वर्षी पाऊंड किंव्वा युरो लावावेत असा विचार आहे =))
29 May 2015 - 12:34 pm | काळा पहाड
रुपयात काही उत्पन्न मिळत नाही. पाऊंड हे नगदी पीक आहे. पाऊंड लावलेलं शेत ५०-५० टक्क्यानं चालवायला द्यायचं असल्यास कळवा.
30 May 2015 - 5:04 pm | धनावडे
+1
आमची काही फार शेती नाही पण जी आहे ती आईच बघते आणि ती नेहमी म्हणते मनापासून कष्ट(सगळेच करतात) केलेतर शेतसरी कधी उपाशी नाही मारत ,गरजेपुरत देतेच.
29 May 2015 - 11:54 am | मार्मिक गोडसे
हे ही खरेच आहे. एकीचे पिक कोणत्याही आपत्तीला तोंड देण्यास समर्थ असते.
29 May 2015 - 12:35 pm | hitesh
.
29 May 2015 - 12:53 pm | जयंत कुलकर्णी
// म्हणत असतो तरी आम्ही, “भारतमाता की जय” //// याचा अर्थ कोणी सांगू शकेल काय ?
29 May 2015 - 1:52 pm | होबासराव
हे श्यामराव कोण ?
29 May 2015 - 2:05 pm | अत्रुप्त आत्मा
@आमच्यात एकी नाई म्हून, इथं डाकू पैदा झाले ....॥>> हे वळायला लागलं,तरच काहितरी अपेक्षित असं व्यथीतांना प्राप्त होइल.
29 May 2015 - 7:39 pm | जयंत कुलकर्णी
फक्त "इथ''च्या' ऐवजी "आमच्यात" हा शब्द जास्त समर्पक झाला असता.......
30 May 2015 - 8:07 am | अविनाशकुलकर्णी
मुटे कवितांची शेति छान करतात...........
30 May 2015 - 10:42 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
ह्याला उत्तर अजुन आल/ं नाही मुटेसर.
30 May 2015 - 10:59 pm | सतिश गावडे
या प्रश्नांची उत्तर कदाचित Who is killing our farmers? या विदर्भातील शेतकरी कुटुंबातील मुलाने लिहिलेल्या ब्लॉगवर मिळतील.
30 May 2015 - 11:00 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
वेळ मिळाला की वाचुन काढेन.
4 Jun 2015 - 12:23 am | निराकार गाढव
आर् मर्दा.. काय कविता के़लीये! व्वा . ! भले शाबास पठ्ठे !