(कथा आणि पात्र काल्पनिक आहे)
काल दुपारी कार्यालयात एक विशिष्ट फाईल वाचत होतो. फाईल वाचत असताना आपली दाढ दुखते आहे ही जाणीव होऊ लागली. काही वेळातच दाढेचे दुखणे वाढू लागले आणि त्या बरोबर वेदनाही. डोक्यात गरगर सुरु झाली. अखेर वैतागून मी फाईल वाचणे थांबविले. ती फाईल लाल फितीत व्यवस्थित बांधून अलमारीत ठेऊन दिली. संध्याकाळी घरी आलो, दाढेच्या दुखण्यामुळे रात्री व्यवस्थित जेवता ही आले नाही. गरम पाण्यात मीठ टाकून गुळणे केले, लवंग ही तोंडात ठेवली. पण काही फायदा झाला नाही. सारी रात्र दाढेच्या दुखण्यामुळे तळमळत काढली.
आज सकाळी ओळखीच्या दातांच्या डॉक्टरांकडे गेलो. पेशंटसाठी असलेल्या खुर्ची वर बसलो. डॉक्टरांनी दात तपासले आणि लगेच निर्णय ही सुनावला. दाढेला किडा लागला आहे, दाढ काढावी लागेल. मी विचारले, डॉक्टर, दाढ न काढता, किड्याचा इलाज करता येईल का? डॉक्टर मिस्कील हसले आणि म्हणाले, तुमच्या दाढेला साधा-सुद्धा नाही, जीवघेऊ अकलेचा किडा लागला आहे. त्वरित नाही काढला तर हा किडा मेंदूत शिरेल. तिथे जाऊन अकलेचे तारे तोडेल. त्याच्या परिणाम तुम्हाला भोगावा लागेल. तुमच्या पांढर्या शुभ्र वस्त्रांवर चिखलाचे डाग दिसू लागतील, काही दिवसांतच तुमचा चेहरा ही काळाठिक्कर पडेल. अवेळी सरकारी सेवेतून निवृत्त व्हावे लागेल. पेन्शन ही मिळणार नाही. पोंर ही तुम्हाला बाहेरचा रस्ता दाखवतील. आपल्या सौभाग्यवतीला घेऊन, भिक्षा मागत दारी-दारी फिरावे लागेल. माझ्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, खरोखरंच असेल घडले तर? ओम भिक्षां देही शब्द कानात घुमू लागले. घाबरून मी जवळपास ओरडलोच, डॉक्टर, काढून टाका ती दाढ, अकलेच्या किड्या सकट. डॉक्टरांनी दाढेला सुन्न करण्यासाठी इंजेक्शन दिले आणि पकडीने एका झटक्यात दाढ उपटली. दाढ निघाल्यावर दुखणे ही थांबले. शरीर आणि मन शांत झाले. घरी जाऊन मस्त पैकी थंडगार पाण्याने स्नान केले. पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून, आरश्यासमोर उभा राहिलो. आरश्यात मला माझा चेहरा काळाठिक्कर पडलेला का दिसत होता, हे मात्र मला समजले नाही.
दात तोड डॉक्टर मित्रांकडून प्रतिसाद अपेक्षित
प्रतिक्रिया
28 May 2015 - 8:00 pm | भाते
या, इथे तुमची गरज आहे. लवकर ऊत्तर द्या.
बाकी, मी पहिला!
28 May 2015 - 8:24 pm | अजया
अकलेचा किडा काढुन टाकलात!बरं केलंत!
28 May 2015 - 8:32 pm | खटपट्या
कोणते डॉक्टर आहेत हे ?
28 May 2015 - 9:22 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
मीही ब-याच ठिकाणी जडीबुटीवाले पाहिले आहेत. काही तरी औषध देऊन बारीक अळ्या काढतात.
च्यायला, कसं काय जादु करतात काय माहिती.
बाकी, दाढ दुखणे लै बेक्कार. :(
-दिलीप बिरुटे
(दात काडीने टोकरु टोकरु रुट कॅनॉलकडे चाललेला)
28 May 2015 - 8:33 pm | डॉ सुहास म्हात्रे
हे दिल्ली सेक्रेटरिएटमध्ये जो गोंधळ चालू आहे यावरून सुचले असावे असा दाट संशय येतोय ! :)
28 May 2015 - 11:38 pm | श्रीरंग_जोशी
तुमचा प्रतिसाद वाचल्यानंतर कथा कळली :-) .
काय करणार माझी ट्युब उशिरा पेटते.
राजकीय घडामोडींवर समयोचित अन मार्मिक भाष्य.
__/\__.
28 May 2015 - 9:34 pm | विवेकपटाईत
कथेत काही ठळक बाबी दिलेल्या आहेत १. फाईल, लाल फिती अकलेचा किडा. डॉक्टर म्हणजे कोण?
28 May 2015 - 11:31 pm | डॉ सुहास म्हात्रे
डॉक्टर म्हणजे वरिष्ठ अधिकारी * किंवा अनुभवी सहकर्मचारी *, जो परिस्थितीची जाणीव देऊन "जास्त अक्कल चालवून सिस्टीमच्या विरुद्ध जाऊ नकोस" असा सल्ला देतो ! :(
(* खरे तर या लोकांनी आपले कर्तृत्व (टॅलंट) वापरून सिस्टीम सतत सुधारत राहणे अपेक्षित आहे.)
29 May 2015 - 8:02 pm | विवेकपटाईत
मी= कनिष्ठ सरकारी कर्मचारी
अकलेचा किडा = अंतरात्मा = फाईल वाचून त्यात दडलेले सत्य पाहून अंतरात्म्याची तळमळ होत होती. काय करावे त्याला सुचत न्हवते.
डॉक्टर = अनुभवी सहकर्मी (इस्पिकचा एक्का यांनी बरोबर ओळखले) - यांचा सल्ला घेतला. सत्य बाहेर आणले तर त्याचे फळ काय मिळेल, हे त्याला कळले. फाईल नेहमी करता बंद करून टाकली. अंतरात्म्याला मारून. त्याच मुळे त्याला दर्पणात स्वत:चा चेहरा काळाठिक्कर पडलेला दिसला.