खराब दिवस
परवा सकाळी मी दवाखान्यात गेलो. सकाळी तीन रुग्ण पाहिल्यानंतर एक चार महिने गरोदर असलेली तरुणी सोनोग्राफी करता आली होती. तिची सोनोग्राफी करताना मला असे लक्षात आले कि तिच्या मुलामध्ये मोठ्या प्रमाणावर दोष आहेत. मुलाच्या मानेला सूज होती(cystic hygroma), हृदयाच्या रचनेत मोठ्या प्रमाणावर बिघाड होता. मुलाच्या नाळेत शुद्ध रक्ताची एकच रक्त वाहिनी होती. (साधारणपणे दोन असतात)( single umbilical artery). मेंदूच्या रचनेतही बिघाड वाटत होता. मी बराच वेळ सोनोग्राफी करत होतो त्यावरून त्या जोडप्याला काही तरी गडबड आहे हे जाणवले. सुरुवातीला तिचा नवरा सारखे प्रश्न विचारत होता. मी त्याला सांगितले कि माझी तपासणी पूर्ण झाली कि मी तुम्हाला सविस्तर सांगतो. साधारणपणे ४५ मिनिटांनी जेंव्हा मला खात्री झाली कि या मुलात बर्याच प्रमाणावर दोष आहेत तेंव्हा मी त्या दोघांना तसे सांगितले. त्यांना हे हि सांगितले कि तुम्ही अजून दुसर्या वरिष्ठ डॉक्टरचा सल्ला घ्या(सेकंड ओपिनियन) हे अर्थात मी त्यांच्या रिपोर्टवर लिहूनही देतो. (याचे कारण माझी विचार सरणी अशी आहे कि माझ्या दृष्टीने तो एक रुग्ण असतो पण त्या आईबापांच्या दृष्टीने ते एक त्यांचे मुल असते त्यामुळे त्यांनी दुसर्या वरिष्ठ डॉक्टरना दाखवून घ्यावे.) तुम्ही अजून कायद्याच्या २० आठवड्याच्या मर्यादेत आहात तेंव्हा तुम्हाला गर्भपात करणे शक्य आहे. तो माणूस मला सारखा विचारत होता पण डॉक्टर हे मुल आम्ही ठेवले तर काय होईल? मी त्यांना म्हणालो कि आपण भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका. दुसर्या डॉक्टरना दाखवा आपल्या आई वडीलांशी चर्चा करा. कारण या मुलाच्या मेंदूत, हृदयात दोष आहे कदाचित त्याच्या गुणसूत्रात दोष असू शकेल ज्याचा इलाज करणे फार कठीण आहे. शेवटी भावनिक भरात निर्णय घेणे एक गोष्ट आहे आणि आयुष्यभर तुम्ही मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या अपंग मूल सांभाळणे हि दुसरी गोष्ट आहे. शिवाय आज तुम्ही आईबाप म्हणून सांभाळ कराल परंतु जर तुमच्या नंतर त्याचा भार तुमच्या दुसर्या मुलावर पडेल. त्याने हा भार का घ्यायचा? हा त्याच्यावर अन्याय नाही का? आणि तुमच्या दुसर्या मुलाने काळजी नाही घेतली तर या मुलाचे काय होईल?
अर्थात हे सर्व मी त्यांना समजावून सांगितले तेंव्हा बाहेर पडेपर्यंत त्यांची बर्यापैकी मानसिक तयारी झाली असावी असे मला वाटले.
हे झाल्यावर मी माझ्या आईकडे कॉफी पिण्यासाठी गेलो. माझ्या आई वडिलांचे घर दवाखान्याच्या वरच्याच मजल्यावर आहे. तेंव्हा वडिलांच्या घरी एक वरिष्ठ नागरीक आलेले होते.आमचे वडील वरिष्ठ नागरिक संघाचे सेक्रेटरी आहेत. ते गृहस्थ निरोप घेऊन मोठ्या कष्टाने बाहेर पडले तेंव्हा मी वडिलांशी बोलणे सुरु केले तेंव्हा त्यांनी सांगितले कि हे सद्गृहस्थ ८२ वर्षांचे आहेत आणि यांची पत्नी ७७ वर्षांची आहे. यांना एकुलता एक मुलगा आहे पण त्याला उन्माद(स्किझोफ्रेनिया) हा आजार आहे. हा आजार फार बळावल्यामुळे हा मुलगा गेली काही वर्षे पूर्ण गलितगात्र अवस्थेत होता. मुलगा अगोदर चांगला होता तेंव्हा त्याचे लग्नहि झालेले होते पण हा आजार झाला आणि त्याची बायको त्याला सोडून गेली( घटस्फोट मात्र घेतलेला नव्हता. आता या जोडप्याचा प्रश्न असा होता कि दोघेही वृद्ध झालेले होते आणि आपल्यानंतर या मुलाचे कोण पाहिलं याची त्यांना काळजी होती. हे गृहस्थ माझ्या वडिलांना म्हणाले कि खरे साहेब माझ्याकडे पैसे भरपूर आहेत परंतु आमच्या पश्चात याच्या बायकोने हा मानसिक दृष्ट्या दुर्बल आहे तेंव्हा याची संपत्ती मला मिळावी असा अर्ज केला तर कायद्याप्रमाणे संपत्तीचा मालकी हक्क तिच्याकडे जाईल. आम्ही असताना ती याच्याकडे ढुंकून पाहत नाही. मग आम्ही गेल्यावर तिने त्याला रस्त्यावर आणले तर तो दाद कुणाकडे आणि कशी मागणार? याच्या साठी हे गृहस्थ माझ्या वडिलांकडे आले होते कि असा कोणता धर्मादाय न्यास किंवा ट्रस्ट आहे का जेथे मी ती संपत्ती मुलाच्या नावाने ठेवीन ज्याच्या व्याजातून त्याचा प्रतिपाळ ते करतील आणि त्याच्या पश्चात हे पैसे त्या ट्रस्टचे होतील.
वडील सुद्धा त्या गृहस्थान्बद्दल चिंतेत होते आणि मला म्हणाले लोकांचे काय एकेक प्रश्न असतात. मी त्यांना विचारले कि त्या मुलाची जबाबदारी कायद्याने त्याच्या पत्नीवर टाकता येणार नाही का? ते म्हणाले कायदा राहील बाजूला त्याच्या पत्नीने याला रस्त्यावर खरोखरच आणले तर हा कशी दाद मागणार? आज याच्या वडिलांकडे पैसा आहे तो स्वकष्टार्जित आहे म्हणून ते त्याची जीवन्तपणीच सोय लावू शकतील. मी सुन्न झालो. कॉफी पिउन दवाखान्यात आलो.
पुढचे रुग्ण पाहायला सुरुवात केली. काही वेळाने चार लोक मला भेटायला आले होते. त्यांच्या मित्राने माझ्याकडून सोनोग्राफी करून घ्या म्हणून त्यांना माझ्या कडे पाठविले होते. त्यात एक जोडपे नवरा बायको आणि त्यांचे मुलगा आणि सून असे होते. त्यांना २८ आठवड्याला anomaly स्कॅन करायचा होता जो १६ ते २० आठवड्याला करायचा असतो. मी त्यांना विचारले आता एवढ्या उशिरा हा स्कॅन का करत आहात त्यावर त्यांनी सांगितले असा स्कॅन परवाच झाला आहे.
मी त्यांची फाईल मागितली तेंव्हा त्यांनी चार दिवसा पूर्वी (एक घाटकोपर ला) आणि दोन दिवसापूर्वी एक( भांडुपला) अशा दोन सोनोग्राफी केलेल्या होत्या. दोन्ही सोनोग्राफीमध्ये त्या मुलाला मेंदू आणि पाठीच्या कण्याचा गम्भिर आजार झालेला दिसत होता. गर्भारपणाचे दिवस २७ आठवडे होते पण डोक्याचा आकार ३४ आठवड्याचा होता आणि मेंदूत पाणी झालेले होते. पाठीच्या कण्याला बाक आलेला होता आणि पाय हलत नव्हते. दोन्ही तज्ञांनी जवळ जवळ सारखेच मत दिलेले होते. मुलाला अर्नोल्ड चीयारी मालफॉर्मेशन हा आजार दिसत होता. त्यांच्या दुर्दैवाने त्यांनी १६ ते २० आठवड्याची तपासणी केलेली होती आणि त्यावेळेस मेंदूचा आकार नॉर्मल होता परंतु या मुलाचा हा आजार नंतर वाढला असावा (२० ते २७ आठवडे या कालावधीत) मी त्यांना विचारले आता तुही तिसर्यांदा हि तपासणी माझ्याकडून का करवून घेत आहात. तेंव्हा ते सासरे म्हणाले कि आमच्या एका मित्राने तुम्ही तपासणी व्यवस्थित करत असे सांगितले. मी त्यांना परत विचारले कि जर तुम्हाला सेकंद ओपिनियन घ्यायचे असेल तर तुम्ही मुंबईत तीन चार सर्वात अनुभवी असे डॉक्टर आहेत त्यांच्या कडे का जात नाही? म्हणजे एकदा त्यांनी सल्ला दिला कि मुंबईत पुढे कोणीही शंका घेणार नाहीत. मला काय तुमच्याकडून पैसे घेऊन आहे असाच निकाल देणे सोपे आहे परंतु त्याचा फारसा फायदा होईल असे मला वाटत नाही. मी माझे रुग्ण पाहत आहे तोवर तुम्ही नीट परत विचार करा. मी पुढचे रुग्ण पाहत असताना ते माझ्या पत्नीकडे गेले. त्यांची सून माझ्या दवाखान्यात बसली होती. तिचा दवाखाना माझ्या दवाखान्याच्या शेजारीच आहे. ती ते सर्व रिपोर्ट घेऊन माझ्याकडे आली. मग मी उठलो आणि तिच्या दवाखान्यात गेलो. तेथे सासू सासरे आणि त्यांचा मुलगा बसले होते. मी त्यांना नीट समजावून सांगितले कि तुम्ही तिसरे ओपिनियन साठी आलात परंतु त्याला काही अर्थ नाही. तुमची वेडी आशा मी समजू शकतो परंतु आता २७ आठवड्याला आपल्याला काहीही करता येईल असे वाटत नाही. तुमची सून इथे नाही म्हणुन मी बोलतो आहे. २० आठवड्यानंतर कोणीही स्त्रियांचा डॉक्टर गर्भपात करणार नाही. पुढे काय करायचे ते तुम्ही तुमच्या डॉक्टरनाच विचारा. तुम्ही माझ्याकडे आशा बाळगून आला होतात परंतु तुमच्या कडून परत तपासणी करून पैसे घेणे मला पटत नाही. कारण ज्या दोन्ही रेडियोलॉजिस्ट नि तपासणी केली आहे ती व्यवस्थित केलेली आहे आणि मी त्यात फार काही भर घालू शकेन असे मला वाटत नाही. जे आहे ते दुर्दैव म्हणून तुम्हाला स्वीकार करणे आवश्यक आहे. ते तिघे जड अन्तः करणाने उठले आणि हळू हळू पावले टाकीत गेले. मी पत्नीला म्हणालो कि तुम्ही अशा बाबतीत काहीच करू शकत नाही. आजचा दिवसच बहुधा खराब आहे. आम्ही दोघे अर्धा तास अगोदरच दवाखाना बंद करून निघालो.
प्रतिक्रिया
11 May 2015 - 1:21 am | अत्रन्गि पाउस
कितीही अनुभव असला आणि प्रशिक्षण घेतले असले तरी असे प्रसंग किती बेचैन करत असतील !! आपल्यासारखे आपुलकीने, माणुसकीने आणि व्यवहार्य सल्ला देणारे डॉक्टर भेटणे खरोखर एक मोठा आधार असतो ..
देव भले करो आपले आणि त्या पेशंटसचे ...
11 May 2015 - 12:04 pm | एस
याहून जास्त काही बोलता येणार नाही तस्मात् थांबतो.
12 May 2015 - 9:21 am | ब़जरबट्टू
अगदी...
आपल्यासारखे आपुलकीने, माणुसकीने आणि व्यवहार्य सल्ला देणारे डॉक्टर भेटणे खरोखर एक मोठा आधार असतो ..
11 May 2015 - 1:50 am | नंदन
!
11 May 2015 - 3:08 am | श्रीरंग_जोशी
अशी परिस्थिती हाताळणे किती कठीण असू शकते याची पुन्हा एकदा कल्पना आली. मी कठीण हे विशेषण वापरत आहे पण ते आव्हान शब्दात व्यक्त करणे शक्यच नाही. रुग्णांना त्यांच्यासोबत होत असणारी दुर्दैवी पण कटु गोष्ट सांगणे खरंच आव्हानात्मक आहे.
यावरून आठवले - मी बारावीला असताना अंतिम परिक्षेच्या तीन आठवडे आधी मला टायफॉइड झाला अन तो उलटला. वर्षभर कसाही अभ्यास केला असो शेवटचे आठवडे सर्वाधिक महत्वाचे असतात. तत्कालिन परिस्थिती पाहून मी व माझ्या कुटूंबियांनी एक वर्ष ड्रॉप घेऊन पुढच्या वर्षी बारावीची परिक्षा द्यायचे जवळजवळ निश्चित केले होते.
माझे वडील मेडीकल सर्टीफिकेट घेण्यासाठी आमच्या फॅमिली डॉक्टरांकडे गेले. त्यांचेच उपचार मला तेव्हा सुरू होते. माझ्या वडिलांनी आमचा परिक्षेतून माघार घेण्याचा निर्णय सांगताच त्यांनी माझ्या वडिलांना सल्ला दिला. निकालाची चिंता न करता तुमच्या मुलाला परिक्षा द्यायला लावा. एक वर्ष वाया जाणार की नाही ते एकतर निकालात ठरेल किंवा निकाल पाहून तुम्ही ते ठरवू शकाल. पण यदाकदाचित निकाल मनासारखा लागला तर वर्ष वाया जाणार नाही.
डॉक्टरांच्या पेशंट्सबाबत पूर्वीही अशी परिस्थिती उद्भवली असावी. त्या अनुभवाचा लाभ सहजपणे त्यांनी आमच्यापर्यंत पोचवला. यथावकाश मी बाराबाची परिक्षा दिली. तेव्हा इंजिनिअरींगला फ्री सीट मिळण्यासारखे मार्क नाहीच मिळाले. पण इंजिनिअरींगच्या मागे धावण्यापेक्षा मिळेल तो अभ्यासक्रम स्वीकारून शिक्षणात खंड न पडता चालू ठेवण्याची मनाची तयारी तोवर झाली होती.
पुढे मी बीएस्सीला प्रवेश घेतला अन त्यानंतर एमसीए केले. बारावी नंतर ४ वर्षांनी नोकरी लागण्याऐवजी ६ वर्षांनी लागली. पण मॅनेजमेंट स्ट्रीमचे एमसीए केल्यामुळे संगणकशास्त्राखेरीज व्यवस्थापनाचेही विषय शिकलो. त्याचा उपयोग नोकरीत आजही होत आहे. या चांगल्या घडामोडींचे निर्णायक श्रेय आमच्या फॅमिली डॉक्टरांचेच आहे.
11 May 2015 - 10:17 pm | उगा काहितरीच
वा MCA चे सिनीयर पाहून आनंद झाला ! मी पण MCA करतोय.
11 May 2015 - 3:58 am | रेवती
हम्म...........अवघड आहे. खूप पूर्वी सोनोग्राफीची सोयच नव्हती तेंव्हा हे चित्र कसे होते असा प्रश्न पडला. आजकाल नवनव्या सुधारणांमुळे मनाची तयारी करायला त्या मातापित्यांना वेळ मिळतोय असे म्हणायचे.
11 May 2015 - 4:30 am | नेत्रेश
पण अशावेळी (२० आठवड्यांनंतर) असा डीफेक्टीव गर्भ वाढवणे याशीवाय काही पर्याय नाही?
11 May 2015 - 7:19 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
डॉक्टर साहेब, अनुभव वाचतोय. काय प्रतिक्रिया दिली पाहिजे काही समजत नाही. पण, आपल्या सारखे एक डॉक्टर सर्वांना लाभले पाहिजेत.
-दिलीप बिरुटे
11 May 2015 - 8:59 am | स्वीत स्वाति
सह्मत
11 May 2015 - 9:38 am | राही
लेख वाचून एव्हढी विषण्णता वाटली. मग एकापाठोपाठ एक अशा केसेस हाताळताना मनाची काय अवस्था झाली असेल?
सुंदर लेख.
11 May 2015 - 11:16 am | एक एकटा एकटाच
जन्मत: मानसिक रित्या अपंग असलेल्या मुलांचे आणि पर्यायाने त्यांच्या पालकांचे होणारे हाल पहावत नाहीत.
11 May 2015 - 11:19 am | मृत्युन्जय
असे अनुभव खरेच खुप व्यथित करुन जात असतील. कितीही तटस्थपणे आणि कोरडेपणाने विचार केला तरी अश्या केसेस आल्यावर कडकड होतच असणार. अर्थात जेव्हा एखाद्या केसमध्ये उत्तम आणि वेळेवर निदान होउन तोडगा निघण्याजोगा पर्याय निघाला तर आनंदही होतच असणार.
एक अवांतर शंका: किती आठवड्याचा गर्भ म्हणजे एक "जीवन / आयुष्य" मानता येइल? की केवळ जन्मल्यानंतरच?
11 May 2015 - 11:36 am | मदनबाण
डॉक, तुमचे अनुभव कथन वाचुन फार वाईट वाटले... :(
असे भोग भोगणारे लोक पाहिले की आपण फारच सुखी आहोत याची जाणीव मात्र प्रकर्षाने होते.
मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- 50% of Rafale deal value will be invested in India: Defence Minister Manohar Parrikar
11 May 2015 - 12:48 pm | काळा पहाड
ते गाणं आहे ना: दुनिया में कितना गम है, मेरा गम कितना कम है, लोगों का गम देखा तो, मैं अपना गम भूल गया.
11 May 2015 - 12:09 pm | नाखु
हा सर्वात प्रथम "माणूस" असतोच त्यांचे विलक्षण प्रत्ययकारी (माणुसकी) लिखाण.
आपल्या प्रसंग हाताळणीबद्दल आदर आहे.
सरधोपट नसलेला
नाखु
11 May 2015 - 12:59 pm | जेपी
+११
(सरसकटीकरण न करणारा ) जेपी
11 May 2015 - 12:56 pm | काळा पहाड
आम्हाला हे एकदा ऐकून विषण्ण व्हायला होतं. तुम्हाला तर हे रोजचं काम असणार. बाकी अशा बाबतीत वैद्यक शास्त्र असं कधी प्रगत होईल की कुठलाही रोग / डिफॉर्मिटी असेल तर ती त्याला सोडवता येईल? म्हणजे अगदी जेनेटीक डिफॉर्मिटीज सुद्धा?
11 May 2015 - 1:18 pm | द-बाहुबली
आपला दिवस खराब गेला हे मान्य आहे...
पण आपल्याला हे इथे शेअर करावेसे वाटले यातच बरचं काही आले. धन्यवाद.
11 May 2015 - 1:54 pm | llपुण्याचे पेशवेll
खरंच आव्हानात्मक परिस्थिती. अवघड आहे.
11 May 2015 - 2:10 pm | बॅटमॅन
किमान इथे लिहून थोडे तरी बरे वाटले हेच लै झाले....असो.
11 May 2015 - 2:20 pm | अभिरुप
वैयक्तिक स्वार्थासाठी आर्थिक फायदा न पाहता रुग्णांना पारदर्शक मत सांगणार्या आपल्यासारख्या डॉक्टरना सलाम....अर्थात खूप कठीणही आहे हे.
बाकी लेखानुभव नेहमीप्रमाणेच सुंदर.
लिहिते रहा असेच....
11 May 2015 - 2:29 pm | पैसा
एखादी घटना ऐकली तर आम्ही कित्येक दिवस अस्वस्थ होतो. असे तीन तीन अनुभव एकाच दिवसात, आणि त्यातही वाईट बातमी देण्याचे काम दुर्दैवाने तुमच्यावर आले..... :(
11 May 2015 - 2:51 pm | लॉर्ड फॉकलन्ड
डॉ़क्टरसाहेब्,तुमचे क्लिनिक कोणत्या शहरात आहे?
12 May 2015 - 10:06 am | सुबोध खरे
मुलुंड पूर्व मुंबई
12 May 2015 - 1:06 pm | लॉर्ड फॉकलन्ड
थॅन्क्स.तुमचे क्लिनिक पुण्यात आहे असे वाटत होते.
11 May 2015 - 2:55 pm | सुबोध खरे
साधारण पणे २८ आठवडे ( ७ महिने नव्हे) पूर्ण केलेला गर्भ प्रसुतीनंतर फुप्फुसांची पूर्ण वाढ झाली असल्याने जगू शकतो. या साठी भारतीय कायदा २० आठवड्याच्या आत गर्भपाताला संमती देतो. दहा आठवडे पर्यंत एका आणि १० ते २० आठवडे पर्यंत दोन स्त्री रोग तज्ञांच्या संमतीने हा गर्भपात करता येतो. जेंव्हा हा गर्भपाताचा कायदा आला त्यावेळी (१९७१) गर्भाचे वय किती हे नक्की ठरवता येत नसे त्यामुळे जर २८ आठवड्याच्या मुलाचा गर्भपात केला तर मूल जगेल पण कमी दिवसांचे असल्याने फार काळजी घ्यावी लागेल या भीतीने जास्त काळजी घेत २० आठवड्यापर्यंतच गर्भपाताला परवानगी दिली होती.
दुर्दैवाने काही गंभीर दोष २० आठवड्यापर्यंत दिसून येत नाहीत. उदा. हृदयातील दोष. हे दोष जसे जसे हृदय विकसित होत जाते तसे २४-२६ आठवडे पर्यंत दिसून येतात. (या मुळे आमच्या सारख्या सर्व लोकांना --ज्यांनी २० आठवड्याला सोनोग्राफी केली त्यांना -- शिव्या खाव्या लागतात. उदा. वरील केस जेथे मेंदूत पाणी होऊन डोके मोठे होणे हे नंतर झाले तरी त्या लोकांनी त्या रेडियोलॉजिस्टला माझ्या समोर शिव्या दिल्या नित्य डॉक्टरची अक्कल काढली. त्यांना मी समजावून सांगितले कि प्रत्येक दोष हा २० आठवड्याला दिसत नाही आणि त्या रेडियोलॉजिस्टने कोणतीही चूक केलेली नाही) आता कायदा बदलून हि मर्यादा २४ आठवड्यावर आणली जात आहे त्यामुळे आणखी बर्याच अशा जोडप्यांना दिलासा मिळू शकेल. आजकाल गर्भलिंग चाचणी कायद्यामुळे २० आठवड्यावर एक दिवस जरी झाला तरी स्त्रीरोग तज्ञ गर्भपाताला सरळ नकार देतात. हेच पूर्वी थोडेसे आत बाहेर असले तरी डॉक्टर गर्भपात करून त्या जोडप्याची सुटका करीत असत. माझ्या लश्कराच्या नोकरीत दोन रुग्णांच्या बाबतीत असे झाले कि दिवसांप्रमाणे गर्भ २० आठवड्याच्या वर होता पण सोनोग्राफीच्या रिपोर्ट प्रमाणे( मुलाची वाढ कमी असल्याने) तो गर्भ १८ आठवडे होता. हा रिपोर्ट प्रमाण मानून त्या स्त्रीरोग तज्ञाने गर्भपात केला. अर्थात दोन्ही केसेस मध्ये जन्मलेले बाळ सदोष आहे हे मुलाच्या वडिलांना दाखविले गेले. त्यांनी पण दुःखात असताना हि सुटकेचा सुस्कारा सोडला.
जाता जाता -- १९९७ साली मी एका मुसलमान स्त्रीची सोनोग्राफी करताना मला असे आढळले कि गर्भाला दोन्ही डोळे नाहीत (anophthalmia) मी तसा रिपोर्ट दिला सुदैवाने त्या स्त्रीला दोन मुले असल्याने तिने गर्भपाताला संमती दिली, परंतु तिचा गर्भपात करेपर्यंतचे दोन दिवस मी फार तणावाखाली काढले होते. कारण जर त्या मुलाचे डोळे ठीक असते तर त्या जोडप्याने आयुष्यभर मला माफ केले नसते. शिवाय मला टोचणी लागून राहिली असती (कि माझ्या चुकीमुळे एका अश्राप बालकाचा जीव गेला असता) ते वेगळेच. आजच्या मानाने त्यावेळची सोनोग्राफी यंत्रे फारच अविकसित होती आणि मला पण अनुभव फक्त ६ वर्षाचा होता. सुदैवाने(?) गर्भपात केलेल्या बालकाला दोन्ही डोळे नव्हते.
11 May 2015 - 4:56 pm | स्पंदना
या परिस्थीतुन मी गेले आहे. चार महिन्याची सोनोग्राफी करायला गेलो तिघे मिळून. आधी डॉक्तर नवर्याला, मुलीला हे हृदय, हे पाय अस मजा करत संगत दाखवत होते आणि मग एकदम सावरुन बसले. मझा ठोका चुकला त्प त्याच वेळी. पण नवर्याला जाणवल नाही. मी घरी येइतो बहिणीला(गायअनॅक) फोन गेला होता. असे कोलमडलो की काय सांगू? हायड्रो च्लॉफिक्स की असच काहे तरी.
असो.
पण त्या वेळी तो डॉक्तर किती अस्वस्थ झाला होता, किंवा नजर चुकवत होता ते चांगलेच जाणवले होते.
11 May 2015 - 6:02 pm | मोहनराव
अवघड आहे हे सगळं. डॉक आपल्याला सलाम!
आजकाल ३डी, ४डी स्कॅनींगही आले आहे. ते साधारण कधी करतात व भारतात मर्यादा काय आहेत?
12 May 2015 - 3:42 am | अगोचर
काही प्रमाणात ३मित अल्ट्रासाउंड चित्रांना सुन्दर बनवण्याचे काम केले आहे त्यावरुन सांगतो की ते तंत्रज्ञान अजुन हळुहळू विकसित होते आहे. त्यात दिसणारी चित्रे अचुक महिती दाखविण्या पेक्षा भावी पालकांना आवडतील, आणि त्यासाठी ते पैसे द्यायला तयार होतील अशीच बनवली जातात.
अर्थात मी वैद्यकीय डॉक्टर नाही, आणि ह्या कामालासुद्धा काही वर्षे झाली. आता कदाचित सुधारणा झाली असेल.
12 May 2015 - 10:17 am | सुबोध खरे
मी केलेल्या काही सोनोग्राफीची चित्रे. फक्त रुग्णाचे नाव काढून टाकले आहे बाकी चित्रे यथा तथ्य आहेत.

12 May 2015 - 10:21 am | पैसा
३४ आणि ३७ आहवडे म्हणजे ही ९ व्या महिन्यातल्या बाळाची चित्रं आहेत ना? खूप गोड! किंचित स्मित, अंगठा चोखणे! भारीच एकदम!
11 May 2015 - 6:39 pm | डॉ सुहास म्हात्रे
उत्तम व्यावसायिक वागणूक आणि नीतिमत्ता म्हणतात ती हीच !
वैद्यकीय व्यवसायात असे प्रसंग कितीही वेळा आले तरी त्यांची सवय होऊ शकत नाही, हेच खरे !
11 May 2015 - 9:46 pm | टवाळ कार्टा
:(
13 May 2015 - 1:13 am | अभिजीत अवलिया
जेव्हा जेव्हा अशी जन्मजात मानसिक अपंगत्व असलेली व्यक्ती दिसते तेव्हा तेव्हा मन खूप निराश होते. खूप हाल होत असतात त्या व्यक्तीचे आणी त्याला संभाळणार्या लोकांचे सुद्धा.
14 May 2015 - 2:47 pm | gogglya
आपल्याला शतशः धन्यवाद! इतके सुन्न करणारे अनुभव येउन ही तुम्ही आपले व्रत निश्ठेने चालु ठेउ शकता. तुम्ही अश्या वाइट अनुभवानन्तर स्वतःला कसे सावरता ह्याचे खूप कौतुक वाटते...
15 May 2015 - 11:10 am | गवि
..हृद्य धागा..शेअर केल्याबद्दल खूप धन्यवाद..