तु खरी होतीस किंवा ते तुझे आभास होते
वा तुझे प्रतिबिंब तेथे वाहत्या पाण्यात होते
गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी
स्वप्न माझे नभ होवुनी पैलतीरी जात होते
वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका
सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते
हासले हे जग मला नव्हतीस तु ही वेगळी
हास्य होवोनी कट्यारी चांदणे कापीत होते
पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला
साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते
प्रतिक्रिया
19 Aug 2008 - 6:55 pm | II राजे II (not verified)
तु खरी होतीस किंवा ते तुझे आभास होते
वा तुझे प्रतिबिंब तेथे वाहत्या पाण्यात होते
गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी
स्वप्न माझे नभ होवुनी पैलतीरी जात होते
वा , वा !
छान कविता.. खास करुन शेवटच्या दोन ओळी !
मस्त मनातील विचार व्यक्त होत आहेत !
राज जैन
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
19 Aug 2008 - 7:00 pm | शितल
फुलवा,
संपुर्ण कविताच सुंदर. :)
तुमच्या कविता अप्रतिम असतात.
मी तर पंखा आहे तुमच्या कवितांची . :)
19 Aug 2008 - 7:20 pm | आनंदयात्री
मी परत एकदा पंखा झालो.
19 Aug 2008 - 7:03 pm | प्राजु
अतिशय सुंदर शब्द.. उत्तम रचना.
कवितेची भाषा जबरदस्त आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
19 Aug 2008 - 7:09 pm | मनस्वी
वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका
सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते
पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला
साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते
>संपुर्ण कविताच सुंदर.
अक्षरशः!
मनस्वी
* केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
19 Aug 2008 - 7:06 pm | आनंदयात्री
काय लिहलं आहेस फुलवा .. अप्रतिम वैगेरे शब्द काय वापरु ?
वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका
सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते
काय उतरवली आहेस वेदना !! काय मुर्त स्वरुप दिले आहेस !! व्वा !
20 Aug 2008 - 6:46 am | नंदन
म्हणतो, कविता आवडली.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
19 Aug 2008 - 7:52 pm | यशोधरा
आई गं!! कसलं लिहितेस गं तू!! _/\_
20 Aug 2008 - 6:42 am | बेसनलाडू
वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका
सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते
हे विशेष!
(सोबती)बेसनलाडू
20 Aug 2008 - 7:00 am | वैद्य (not verified)
फुलवा,
कविता छान आहे, पण वजन सांभाळायला हवे. जसे,
तु खरी होतीस किंवा ते तुझे आभास होते
वा तुझे प्रतिबिंब तेथे वाहत्या पाण्यात होते
हे मस्त !
गेलो मी ज्या मागे असा वेड्यापरी रात्रंदिनी
स्वप्न माझे नभ होवुनी पैलतीरी जात होते
इथे वजन खपते.
टाटटाटा टाटटाटा टाटटाटा टाटटाटा
हे पहिल्या दोन ओळींतून वजन दिसते. ते सर्वच ओळीत सांभाळायला हवे. (वृत्त हे वजनापेक्षाही अधिक टाईट, ते सांभाळण्यापेक्षा वजन सांभाळणे अधिक सोपे, म्हणून वजन लिहितोय.)
जात मी ज्याच्या दिशेने वेडसर रात्रंदिनी
स्वप्न हे आकाश माझे पैलतीरी जात होते
असे केले तर मूळ अर्थात बदल न करता, वजनात बसते.
वेदनेचा गाव माझा मी तिथे ही पोरका
सोबतीची भीक तेथे प्राण हे मागीत होते
जियो !!!! (ह्या ओळींमुळेच मला हा प्रतिसाद लिहावासा वाटला. अन्यथा मिसळपावावर येणार्या अधिकांश कवितांना मी इग्नोर्य समजतो.)
हासले हे जग मला नव्हतीस तु ही वेगळी
हास्य होवोनी कट्यारी चांदणे कापीत होते
पहिल्या ओळीतला "तु" दीर्घ" आणि दुसरी ओळ पूर्णच खपली आहे.
दुसरी ओळः
हास्य मोती त्या कट्यारी, चांदणे कापीत होते
अशी केली तर ?
पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला
साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते
पुन्हा तेच !
सूर्य ही क्षुल्लक चूक. आणि दुसरी ओळ पुन्हा खपली.
साद तरि ही मानसातुन चंद्र तारे देत होते
हे कसे वाटते ?
फुलवा, तुझ्यात पोटेन्शियल आहे. अशा क्षुल्लक चुका टाळाव्यात.
(जालकवीसंमेलनासाठी एखादी कविता पाठव.)
पुलेशु.
-- वैद्य
20 Aug 2008 - 11:53 am | मनीषा
... कविता !!
हास्य होवोनी कट्यारी चांदणे कापीत होते... आवडले
पापण्यांच्या आड माझ्या सुर्य मी बन्दिस्त केला
साद तरि ही मनातुन चन्द्र-तारे देत होते ... छान !!!
20 Aug 2008 - 12:36 pm | अजिंक्य
सह्ह्ही!!
अर्थ लक्षात घेतला, तर खूपच छान वाटतं.
सलगतेच्या दृष्टीने मस्त जमलीय.
(एक गोष्ट मात्र आहे - वैद्य साहेबांनी म्हटल्याप्रमाणे, सुरुवात जरी छान झाली असली,
तरी नंतर मात्र छंदात बसत नाही असं वाटतं. सुरुवातीसारखीच जर इतरही कडवी
चालीतली असती, तर जास्त मजा आली असती. हे फक्त माझं मत आहे.
मी काही कवितेच्या प्रांतातला तज्ज्ञ नाही. माझ्या मताचा राग मानू नये.)
-अजिंक्य
www.ajinkyagole1986.blogspot.com.
20 Aug 2008 - 1:25 pm | पद्मश्री चित्रे
मी धन्यवाद चा प्रतिसाद टाळते माझ्या कवितांना, (म्हणावसं वाटतं, पण 'कविता वर आणण्याचा प्रयत्न 'अशी टिका होवु नये म्हणुन देत नाही. :) )
पण या वेळी अगदी रहावलं नाही
धन्यवाद तुम्हा सर्वांचे नि मिपा चे. कारण " कोण वाचेल का? " आणि " काय म्हण्तील लोक?" असं वाटुन आजवर माझ्य कविता मी फक्त माझ्या पुरत्याच ठेवल्या होत्या.. इथेच प्रथम दिल्या आणि हे प्रतिसाद ( यात टीका पण आहेच) पाहुन आत तो न्युनगंड/ भीती कमी झाली..
वैद्य व अजिन्क्य ,
खर आहे.. काही ओळीत मला पण खटकत होतं , पण काय चुकत आहे आणि काय लिहावं ते समजत नव्हतं. ते सांगितल्याबद्दल आभार.