द्दावं,द्दावं आणि द्दावं

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
19 Aug 2008 - 7:35 am

"हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे"

माणसांची आयुष्ये खरोखरंच गोष्टींचा "एनसायक्लोपीडाया" आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होईल असं मला वाटत नाही.
प्रत्येक व्यक्तिची आयुष्यातली कथा दुसर्‍या व्यक्तिपासून निराळीच असते.घटना जवळ पास तशाच घडत असतील,पण अनुभव नक्कीच वेगळे असणार.आणि त्या त्या घटनेकडे बघण्याचा दृष्टीकोन प्रत्येकाचा निराळाच असणार.
मंजूचे अनुभव ऐकून मला वाटलं ही पण एक ऐकण्यासारखी कथा आहे.त्यामुळे ती कायसांगत होती ते मी निमुटपणे ऐकून घेत होतो.फक्त तिची ती दुःखी कहाणी ऐकून थोडा मायुस झालो.पण त्यातुनही काही शिकण्यासारखं तिच्या तोंडून ऐकून काही तरी कमविल्यासारखं वाटलं.

मंजू म्हणाली,
मी आयुष्य जगले भावनावश राहून आणि नेहमीच घाईगर्दीत राहून.आणि असं करताना मी बर्‍याच गोष्टी साध्य व्हाव्यात ह्याचा प्रयत्न करून.माझ्या मनात ज्या काही श्रद्धा होत्या त्याचा विचार करायला पण मला समय नव्हता.आणि ह्याला खंड आला जेव्हा माझी अठ्ठावीस वर्षाची मुलगी प्रिया आजारी पडे पर्यंत.ती जवळ जवळ एक वर्ष कोमात होती आणि मी तिची घरीच सेवा केली.आणि शेवटी ती माझ्या मांडीवर डोकं ठेऊन निर्वतली.ते अख्खं वर्ष माझं दुःखात आणि काळजीत गेलं.माझं सर्व जगच स्थीर झालं होतं.दुसरं काहीच करायला नव्हतं,फक्त आठवण आल्यावर मुसमुसून रडणं आणि पुन्हा आठवण काढणं.तरीपण मला बांधून ठेवणारी माझी श्रद्धा आणि माझी धारणा ह्याचा विचार करायला मला संधी मिळाली.

माझ्या लक्षात आलं की मी तीच पन्नास वर्षापूर्वीचीच अजून आहे.प्रिया एका संस्थेत काम करायची.अपंग मुलांच्या शाळेत ती विना मुल्य काम करायची.दिवसाचे आठ तास आणि आठवड्याचे सहा दिवस.तिच्या गरजाही कमीच असायच्या.ज्यावेळी ती गेली त्यावेळी तिच्या जवळ काही नव्हतं आणि तिला कशाचीही जरूरीपण नव्हती.तिच्या आजारपणात मी तिचं हंसणं, तिचा आवाज,तिचं औदार्य,आणि सौंदर्य हे मी गमावून बसले होते.आणि शेवटी तिची जवळीक आणि तिचा आत्मा पण.ती ज्यावेळी गेली त्यावेळी मी सर्वस्व गमावून बसले.पण नंतर माझ्या लक्षात आलं की तिला जे मी प्रेम दिलं होतं ते अजून माझ्या जवळ आहे.मी तिला दिलेलं प्रेम खरंच तिने माझ्याकडून घेतलं होतं का ह्याचा मला संभ्रम होत आहे.तिच्याकडून प्रतिसाद मिळाला नव्हता.तिचे डोळे निस्तेज होते.पण मी तिला भरून भरून प्रेम दिलं आणि तेच प्रेम माझ्याजवळ राहून दामदुपटीने वाढत आहे.

माझ्या मुलीला गमावण्यात झालेल्या दुःखाने मला एक प्रकारचं वैराग्य आलं होतं.जरूर नसलेल्या ओझ्याचा त्याग करून मला आवश्यक तेच मी संभाळत होते.प्रिया गेल्यामुळे मी आता कशाचाच हव्यास करत नव्हते. आता मला घेण्यापेक्षा देण्यात स्वारस्य राहिलं होतं.मी प्रेम करून घेण्यापेक्षा प्रेम करण्यात जास्त मन रमवित होते.माझ्या पतीवर,माझ्या मुलावर, माझ्या नातवंडावर जास्त जीव टाकू लागले आहे.आणि खरंच मला माहित नाही की मी त्या सर्वाना खरोखरंच आवडत असेन की नाही.मला त्याची फिकीर नाही.त्यांच्यावर प्रेम करणं ह्यातच मल आनंद मिळतो.

द्दावं,द्दावं,आणि द्दावं -माझं ज्ञान,माझा अनुभव,माझ्या अंगातली कला ह्यांचा मला काय उपयोग, जर का मी ते देण्यात सुख मानलं नाहीतर.?गोष्टी माहित असून नातवंडाना न सांगता ठेवल्यातर?पैशाची माया जमवून ती दुसर्‍याशी शेअर केली नाही तर? मला काही ते डोक्यावर घेऊन स्वर्गात जायचं नाही.हे दातृत्वच मला दुसर्‍यांशी,जगाशी आणि देवाशी दुवा जोडायला मदतीचं होणार आहे.

"परिस्थिती माणसाला कसा विचार करायला लावते.आणि त्या विचारातून इतरानी काय धडा शिकावा हे मंजूच्या उदाहरणावरून शिकण्यासारखं आहे" पण व्यक्ति तशा प्रकृती हे पण तितकंच खरं आहे.म्हणून म्हणतो,
"आयुष्ये खरोखरंच गोष्टींचा "एनसायक्लोपीडाया" आहे"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख