सध्या शाळांमध्ये वार्षिक परीक्षांचे निकाल लागण्याचा मौसम सुरु आहे. ओळखीतल्या शाळकरी मुलांपैकी जवळपास सगळेच पहिल्या नंबरात पास होतायेत. मला प्रश्न पडलाय की सगळेच पहिल्या नंबरात असतील तर दुसरं कोण येतं? की दुसरा नंबर बादच केलाय शिक्षणपद्धतीतून ? शिवाय आजकाल पहिल्या नंबरात येणाऱ्या मुलांचे फारसे कौतुक होत नाही. पहिल्या नंबरात आला तरी अमक्या विषयात मार्क जरा कमीच पडलेत अशी चर्चा जास्त होते. कारण त्या कमी मार्कांमुळे पहिला आणि दुसऱ्यातली तफावत कमी होते. या तफावतीमुळे काय फरक पडतो ते माहिती नाही. कदाचित पालकांना 'अनबीटेबल लीड" हवी असावी असा माझा कयास आहे. अर्ध्या अर्ध्या मार्कांवरून पालकांचे शिक्षकांशी वाद होतात असं ऐकिवात आहे. असो. यावरून शिक्षणप्रवासातल्या काही गमतीजमती मला आठवल्या.
शालेय जीवनात दहावा नंबर हा माझा बेस्ट परफ़ोर्मन्स होता. तोही फक्त एकदाच ! नाहीतर तेरा, सतरा, एकोणीस या नंबरांचा मी आवडता विद्यार्थी होतो. दुर्दैवाने हे नंबर माझ्या आवडीचे नसल्यामुळे यांचे पाढे मला आजही येत नाहीत! थोडक्यात वर्गातला येणारा नंबर हा माझ्या परफ़ोर्मन्स वर अवलंबून नसून इतरांच्या परफ़ोर्मन्स वर जास्त अवलंबून होता. तिथे अनबीटेबल लीड कायम ठेवण्याची जबाबदारी मी स्वत: वर घेतली होती. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे एकाच वयाच्या असलेल्या आम्हा तीन चुलत भावंडांमध्ये मी बहुतांश वेळा समोर असायचो. शिवाय वडिलांच्या आवडत्या गणित आणि इंग्रजीत मार्क बरे मिळत असल्यामुळे घरी कधी ओरडा बसला नाही. तसंही पाचवी ते सातवी दरम्यान आम्हाला असलेल्या इंग्रजी अभ्यासक्रमाचा दर्जा आत्ताच्या नर्सरीत असलेल्या दर्जापेक्षाही खालचा होता. इतिहास विषय माझ्या आवडीचा असला तरी नागरिकशास्त्रात बोंब होती. तेंव्हा त्या मार्कांचा इतिहास सांगण्यासारखा नाही. नागरिकशास्त्र विषय का शिकवतात असा प्रश्न नेहमी पडायचा. माझे आजोबा सांगायचे," अरे लोकशाहीत राहताना हे ज्ञान आवश्यक आहे बाबा. पुढेमागे निवडणूक वगैरे लढवलीस तर कामात येईल". मी निवडणूक अजून लढवलेली नाही पण नागरिकशास्त्राचा अभ्यास केलेला उमेदवार माझ्यातरी पाहण्यात आला नाही. भूगोलात विषुववृत्तीय प्रदेशाचा अभ्यास आवडायचा. बऱ्याचदा घराच्या गच्चीवर उभं राहून विषुववृत्त कुठे दिसते का हे मी शोधायचो. पण आपण विषुववृत्तामध्ये येत नाही हे कळल्यावर माझा उत्साह मावळला. विज्ञानातले बरेचशे शोध एकतर मला कळत नव्हते किंवा निरुपयोगी वाटायचे. म्हणूनच पुढच्या अभ्यासाचा त्रास वाचवण्यासाठी ,"अणूचे विभाजन होऊ शकत नाही" या महर्षी कणादांच्या थेयरीला माझा पाठींबा होता. भूमिती विषय जोपर्यन्त्त मला एखादी थेयरम (सिद्धांत) सिद्ध करायला कोणी सांगत नाही तोपर्यन्त्त आवडायचा. "मी थेयरम शोधली नाही, मी सिद्ध करणार नाही" असं उत्तर देण्याची त्यावेळी सोय नव्हती.( टिळकांचा तो बाणेदारपणा आणि आमचा तो उद्धटपणा ! या मानसिकतेचा मी जाहीर निषेध करायचो.) सगळ्यात आवडता विषय होता तो म्हणजे मराठी. पण त्यातसुद्धा व्याकरण नावाच्या राक्षसाने माझा फडशा पाडला. संस्कृतविषयी आदरयुक्त भीती वाटायची. हुशार विद्यार्थी संस्कृतला स्कोअरिंग वगैरे म्हणायचे पण अश्या मित्रांची वाईट संगत मी नेहमीच टाळली.
चौथीत असतानाची गोष्ट. वार्षिक उत्सवानिमित्त एक प्रश्नमंजुषा स्पर्धा घेण्याचे ठरले. प्रत्येक वर्गातील काही हुशार विद्यार्थी निवडले गेले. त्यामुळे त्यात माझा समावेश असण्याचा प्रश्नच नव्हता. पण माझ्यासारख्या इतर विद्यार्थांचा सहभाग वाढावा यासाठी प्रमुख स्पर्धेआधी एक अनौपचारिक स्पर्धा घेण्यात आली. त्या स्पर्धेत मी दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली हे आमच्या वर्गशिक्षिकेच्या लक्षात आले. त्यांनी मला प्रमुख स्पर्धेच्या संघात घेतले. त्यानंतर स्पर्धेत मी जो काही परफ़ोर्मन्स दिला त्याला तोड नाही. प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर आपापसात चर्चा करून मग उत्तर द्या अशी स्पष्ट सूचना आम्हाला दिली होती. पण चर्चा करून प्रश्न सुटतात एवढे प्रगल्भ विचार त्यावेळी मी करत नव्हतो.
पहिला प्रश्न : ग्रीष्म ऋतूनंतर कोणता ऋतू येतो ?
क्षणाचाही उशीर न करता मी समोरचा माईक उचलला आणि सांगितलं : पावसाळा !
सगळ्या मित्रांनी रागाने माझ्याकडे बघितलं.
दुसरा प्रश्न : स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण ?
माझा मित्र उत्तर देणार तेव्हढ्यात त्याच्या हातातून माईक हिसकून मी उत्तर दिलं : नरसिंह राव !
यावेळी मी शंभर टक्के बरोबर आहे असा मला विश्वास होता. कारण त्यावेळी तेच पंतप्रधान होते. आणि त्याचं वय बघून स्वातंत्र्य मिळाल्यापासून हेच पंतप्रधान असतील असं वाटणं साहजिक होतं ! पण माझं उत्तर चुकलं होतं. आता मित्रांनी माझ्याजवळचा माईक उचलून पलीकडल्या कोपऱ्यात ठेवला.
तिसरा प्रश्न : स्व. राजीव गांधी यांच्या आईचे नाव काय ?
मला उत्तर येत होते. पण माझ्याजवळ माईक नव्हता म्हणून मी फक्त हात वरती केला. त्या सूत्रसंचालकांनी माझ्या जवळ येउन त्यांचा माईक मला दिला.
मी उत्तर दिलं : सोनिया गांधी !
ते सूत्रसंचालक सर जागच्या जागी हादरले. आणि पूर्ण हॉलमध्ये हास्याचा गडगडाट झाला !
परीक्षेच्या काळात तर आणखी मजा यायची. भूगोलाच्या पेपरमध्ये नकाशावाचनाचा प्रश्न असायचा. एकदा नकाशात अरबी समुद्र कुठे आहे हे दाखवायचे होते. अरबी समुद्र पश्चिम दिशेकडे आहे हे मला पक्कं ठाऊक होतं. पण अमरावतीकडून पश्चिमेकडे बघताना माझी मजल जास्तीत जास्त मराठवाड्यापर्यन्त गेली. आणि तिथेच मी अरबी समुद्र दाखवला ! या भौगोलिक पराक्रमाबद्दल आमच्या वर्गशिक्षिकेने पूर्ण वर्गासमोर माझा सत्कार केला होता. अरबी समुद्राचं मराठवाड्यातला स्थान मान्य केला असतं तर आज तिथे दुष्काळाची परिस्थिती नसती. पण एवढी दूरदृष्टी आमच्या शिक्षकांकडे नव्हती ! विज्ञानाच्या पेपर मध्ये एकदा "चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेच्या दिवशीच का होते ?" असा प्रश्न विचारला होता. त्यावर एका मित्राने लिहिले," पौर्णिमेच्या रात्री भरपूर प्रकाश असल्यामुळे पृथ्वीला चंद्र लवकर सापडतो आणि ग्रहण सुरु होते !".दुसऱ्या एका मित्राने तर कहर केला होता. वजाबाकी करताना लहान आकड्यातून मोठा आकडा वजा करायचा असेल तर बाजूच्या आकड्यातून दशक उसनं घ्यावं असा नियम आहे. (उदा. ६२-५८ , दोनातून आठ वजा करताना दशक उसनं घेऊन बारातून आठ वजा करणे) तो उसनं घ्यायच्या भानगडीत न पडता ,दोनातून आठ वजा होत नसतील तर आठातून दोन वजा करायचा !
शाळेच्या आठवणी लिहिताना एक व्यक्ती मला राहून राहून आठवते. त्यांच्या उल्लेखाशिवाय हे लेखन पूर्ण होऊच शकत नाही. सहावीत असताना गणितातल्या x (एक्स) नावाच्या सतत बेपत्ता असलेल्या मुलाशी ओळख झाली. बरं त्याला शोधायला जावं तर तो कायम अपूर्णांकातच सापडायचा. x =१०० असं उत्तर कधी आलंच नाही. ह्या एक्सला शोधता शोधता नववीत गेल्यावर एक ऋषीतुल्य व्यक्तीमत्व गुरु म्हणून गवसलं. दुर्गे सर ! आपल्या पेश्याविषयी त्यांच्याएवढी तन्मयता असलेला शिक्षक मी पाहिलेला नाही. आज आम्ही जे काही आहोत ते त्यांच्यामुळेच हे माझ्यासहित त्यांचे सगळे विद्यार्थी मान्य करतील. आमच्यातला "एक्स" शोधायला त्यांनीच आम्हाला दिशा दाखवली. आणि त्याहीपेक्षा महत्वाचा एक संदेश नकळतपणे आम्हाला दिला.
"एक्सला जरूर शोधा, पण सापडला म्हणून थांबू नका. कारण ज्याक्षणी एक्स सापडेल त्याक्षणी तुमचे शिक्षण संपेल. आणि पर्यायाने तुम्हीसुद्धा !!"
-- चिनार
http://chinarsjoshi.blogspot.in/
प्रतिक्रिया
23 Apr 2015 - 2:55 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
शाळेत मी नेहेमी पहिल्या पाचात असायचो. पण त्याचा मार्कांशी संबंध नाही. रोल नंबर कायम ३,४ किंवा ५ पैकी एक असे. ;)
23 Apr 2015 - 7:59 pm | NiluMP
;-)
23 Apr 2015 - 3:07 pm | उगा काहितरीच
वा ! मस्त !!
23 Apr 2015 - 3:15 pm | खेडूत
धमाल लिहीलंय !
लवकर आटोपलत असं वाटलं .
असे असंख्य प्रश्न त्या वयात पडतात आणि शाळेत ते शिकवतच नाहीत!
23 Apr 2015 - 3:27 pm | चौथा कोनाडा
झकास शाळा भरवली ! मस्त लेखन ! आमच्याही बालपणातील आठवणीना उजाळा मिळाला !
23 Apr 2015 - 3:28 pm | चिनार
धन्यवाद !
23 Apr 2015 - 3:52 pm | कहर
लहानपणी x धड सापडला नव्हता म्हणून बीजगणित या विषयाशी कायमचे शत्रुत्व निर्माण झाले आणि त्यावेळच्या अपयशाची परतफेड म्हणून कि काय मोठे झाल्यावर याच नावाच्या तीन तीन च्या ग्रुपने रहाणाऱ्या व्यक्ती असतील तेथून शोधून काढू लागलो… एकीचे बळ म्हणतात ते असे (कृपया 'या' एकीचा संबंध 'त्या' सूर्या वहिनींशी लावू नये )
23 Apr 2015 - 3:56 pm | होबासराव
दुर्गे सर मला सुद्धा होते पण भारत विद्यालय अकोला,तुम्हि अमरावति चा उल्लेख केलाय कदाचित हे सर वेगळे असतिल. पण आम्हाला असलेले दुर्गे सर सुद्धा ऋषीतुल्य व्यक्तीमत्व होते.. ते वर्गात आल्या बरोबर खुर्चि कोपर्यात नेउन ठेवायचे.. आम्हि त्याना वर्गात कधिच खुर्चित बसताना पहिले नहि.
23 Apr 2015 - 3:59 pm | चिनार
होबास राव
हे अकोल्याचेच दुर्गे सर आहेत. तीन वर्ष मी अकोल्यात शिकलो .भारत विद्यालय !२००१ दहावी पास !
23 Apr 2015 - 4:02 pm | आदूबाळ
=))
मलाही ६८%-७२% या रेंजमध्ये मार्क मिळायचे. आणि नंबर कितवा ते इतरांच्या परफॉर्मन्सवर ठरायचं. अश्या प्रकारे अॅव्हरेज तेच ठेवून स्टँडर्ड डीव्हियेशनही कमीत कमी ठेवणारा आदर्श विद्यार्थी होतो मी!व
23 Apr 2015 - 5:04 pm | पॉइंट ब्लँक
झकास! वाचून लहानपनीच्या आठवणी जाग्या झाल्या. पहिली असताना "हंसवाहिनी सरस्वतीच्या पदकमली मन रमते" अशी काहीतरी प्रार्थना होती. बरेच महिने आमच्या मित्रमंडिळींचा ते "हौसावैनी सरस्वती" असल्याचा समज होता. :)
23 Apr 2015 - 5:11 pm | बॅटमॅन
रच्याकने, तुमची शाळा कहीं "विद्यामंदिर प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय, मिरज" तो नहीं?
23 Apr 2015 - 5:45 pm | पिलीयन रायडर
छान लिहीलय... मजा आली वाचताना..
पण शेवट जरा आटोपता घेतलाय..
23 Apr 2015 - 5:51 pm | बबन ताम्बे
शाळेच्या आठवणी जाग्या केल्या.मस्त लिहिलेय.
23 Apr 2015 - 5:59 pm | सौंदाळा
मस्त लिहिले आहे.
xy^2 आणि x^2Y^2 मला सारखाच वाटल्यामुळे खुप गणिते चुकली होती.
सोडीयम बाय-कार्बोनेटचा उच्चार मी सोडीयम बायका बोर्नेट केला होता तेव्हा हशा उसळला होता वर्गात
23 Apr 2015 - 6:38 pm | अनामिक२४१०
मस्त ….
आपण कुठले . विदर्भाचे का ?
अमरावतीचा उल्लेख केलाय म्हणून विचारतोय ..
23 Apr 2015 - 7:08 pm | चिनार
हो..अमारावती चा !
23 Apr 2015 - 7:29 pm | सौन्दर्य
चिनार, फार मस्त वर्णन. अगदी शाळाच डोळ्यासमोर उभी केलीस. काही काही शिक्षक मनावर कायमचा ठसा उमटवून ठेवतात, मला देखील माझ्या सहावितले पाटील गुरुजी आठवले. लवकरच त्यांच्यावर लिहीन म्हणतो.
23 Apr 2015 - 8:21 pm | प्रदीप
खुसखुशीत लेख आवडला.
23 Apr 2015 - 8:21 pm | NiluMP
मस्त. २ Para Zakas.
23 Apr 2015 - 8:27 pm | श्रीरंग_जोशी
एकाहून एक मजेदार किस्से आहेत.
दहावीत असताना फिजिक्सच्या लॅबमध्ये माझ्या एका मित्राने Ammeter चा उच्चार अम्मामिटर असा केला होता :-).
x बाबत माझे आवडते व्यंगचित्र जालावरून साभार...
23 Apr 2015 - 8:57 pm | अजया
मस्त लिहिलंय.आवडलं.
23 Apr 2015 - 9:16 pm | एक एकटा एकटाच
मस्त लिहिलय
24 Apr 2015 - 4:13 am | रुपी
फारच भारी. मजा आली वाचताना.
24 Apr 2015 - 8:37 am | चिनार
सगळ्यांचे मनापासून आभार !
24 Apr 2015 - 8:55 am | पैसा
मस्त! एकदम खुसखुशीत!!
24 Apr 2015 - 9:21 am | तुषार काळभोर
एकदम खुसखुशीत अन् धम्माल लेख!!
माझा एक मित्र ६वीला इंग्रजीच्या तासाला धडा वाचताना "जंटलमन्स लवस्टोरी" म्हणाला होता. (म्हणजे Gentlemen's Lavatory. Gent's चा फुलफॉर्म होता तो.)
मी स्वतः बारावीला केमिस्ट्रीच्या तासाला C2H6O ला "इथेनॉल अल्कोहोल" असं म्हणालो होतो, तेव्हा आमच्या खडूस पाटील सरांनी आख्ख्या वर्गासमोर इज्जत काढली होती. "गाईचं गोमुत्र असं कधी म्हणतात का? ते गो-मुत्र आहे, म्हणजे गाईचंच असणार. एकतर इथेनॉल म्हण नायतर इथाईल अल्कोहोल म्हण." म्हातारा एक नंबर खडूस होता, पण ४ दिवसांनी स्वतःच्या नोट्स मला दिल्या, म्हणाले पुस्तक नको वाचू, ह्याच्या झेरॉक्स काढून अभ्यास कर. आणि खरोखर ऑर्गॅनिक केमिस्ट्री त्याच्यानंतर 'कळायला' लागली.
24 Apr 2015 - 3:13 pm | चिनार
धन्यवाद !
24 Apr 2015 - 10:21 am | चिनार
बारावी आणि इंजीनीयारिंग वर पण एकदा लिहावं म्हणतो..
24 Apr 2015 - 11:00 am | खटपट्या
लीवा लीवा लवकर लीवा...
आमचं मन शाळेच्या अभ्यासात कधी रमलंच नाही. मित्र शाळेत जायचे म्हणून मी शाळेत जायचो. रोजचा फक्त घरचा अभ्यास करायचा. वेगळा अभ्यास करायची गरज लागली नाही. चित्रकला, कार्यानुभव हे आमचे आवडीचे विषय. एकदा कार्यानुभवाच्या तासाला मला शोभेच्या झाडांची छाटणी करायचे काम आले होते. अशी छाटणी केली की पुढची दोन वर्षे कोणालाच छाटणी करायची गरज पडली नाही. आणि मग बाईंनी जी काही तासली ती बघून आखील शाळेमधे आम्ही छाटणीबहाद्दर म्हणून प्रसीद्ध जाहलो. त्यानंतर कार्यानुभवाच्या वर्गात कधीच काही काम मिळाले नाही.
24 Apr 2015 - 11:03 am | नाखु
हा भागच मुळी जिव्हाळी लागणर्या आठवणींचा आणी फजिती-किस्श्याचा!!! विशेष म्हणजे शाळेत केलेली नाटकं दोन्ही अर्थानी लक्षात रहाते पण कॉलेजमधेली शाळा कधी फारसी लक्षात रहात नाही.
===
26 Apr 2015 - 9:18 pm | शिव कन्या
मस्त जमलेय.
27 Apr 2015 - 5:18 pm | चिनार
धन्यवाद !!
21 Dec 2015 - 11:33 am | मार्मिक गोडसे
लिखान परफेक्ट १०