पाहून घे महात्म्या

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
21 Apr 2015 - 3:54 pm

पाहून घे महात्म्या
पाहून घे महात्म्या, इथली शिवार राने
केला भकास भारत, शोषून इंडियाने

तुमचे विचार बापू, गाडून पूर्ण केला
तुमचा बघा पराभव, तुमच्याच वारसाने

चाकू - सुऱ्या प्रमाणे, हातात पेन त्यांच्या
जितके लुटायचे ते, लुटतात कायद्याने

संपूर्ण सातबारा, कोरा करू म्हणाले
भुललेत भाड़खाऊ, दिल्लीत पोचल्याने

आसुड उगारणारा, माझा स्वभाव नाही
पण; वेळ आणली या, मग्रूर लांडग्याने

वृद्धाश्रमात आई, गोतावळ्यास झुरते
गायीस मात्र माता, म्हणतात गौरवाने

इतुकेच शोध उत्तर, मातीत राबणार्‍या
बदलेल भाग्य निव्वळ, घाम गाळल्याने?

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने

शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने

लक्ष्मीस आणखी मी, सांगा किती पुजावे?
नांदूच देत नाही, ही अवदसा सुखाने!

डोक्यास ताण दे तू , अन सोड आत्मग्लानी
काही तरी 'अभय' कर; मुक्ती मिळेल ज्याने

                                - गंगाधर मुटे 'अभय'
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=

मराठी गझलवाङ्मयशेतीगझल

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

21 Apr 2015 - 7:17 pm | प्रसाद गोडबोले

वा वा... आनंदकंद वृत्त ! आमच्या बुवांचे फार आवडते वृत्त ! त्यांना कळवतो.... लगेच चाल लावुन देतील ते !

बाकी हे भारी आहे

शेती कसून दाखव, तू विद्याप्रचूर तज्ज्ञा
सुटणार प्रश्न नाही, बुद्धी उगाळण्याने

=))

गंगाधर मुटे's picture

21 Apr 2015 - 11:37 pm | गंगाधर मुटे

तुमच्या बुवांच्या आवाक्यात असेल तर शेतीला बेसूर बनण्यापासून रोखा म्हणावं.
ग्रामीण जीवनाची लय बिघडलेली आहे, त्याला सुंदरशा लयीत आणण्यासाठी शासनकर्ते सरळ येतील अशी चाल सुचवा म्हणावं. अनंत उपकार होतील. :)

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2015 - 11:45 pm | अत्रुप्त आत्मा

सुंदर!

चुकलामाकला's picture

22 Apr 2015 - 9:18 am | चुकलामाकला

आवडली!

आदिजोशी's picture

22 Apr 2015 - 2:47 pm | आदिजोशी

शेवटची ओळः
काही तरी 'अभय' कर;
.
आणि त्या खाली स्वाक्षरी:
गंगाधर मुटे 'अभय'
.
वाचून डोळे भरून आले.

मार्मिक गोडसे's picture

23 Apr 2015 - 10:25 am | मार्मिक गोडसे

मुर्दाड शासकांना, सोयरसुतूक नाही
हकनाक तूच मरशील, गळफास घेतल्याने

काल दिल्लीत असेच काही घडले.
अनधिकृतपणे विजेचे कनेक्शन जोडून देनारे काल एक शेतकरी झाडावर चढून आत्महत्येचा प्रयत्न करत असताना फायर ब्रिगेडला पाचारण करण्याऐवजी पोलिसांना आवाहन करत होते.

गंगाधर मुटे's picture

23 Apr 2015 - 2:32 pm | गंगाधर मुटे

प्रतिसादाबद्दल सर्वांना धन्यवाद.

सद्य परीस्थितले सगळेच विदारक अनुभव तंतोतंत मांडलेत. अभिनंदन.