समतेचा संदेश देणारं नाटक : कोण म्हणतं टक्का दिला ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
19 Apr 2015 - 10:26 pm

कला शाखेच्या पदवीच्या वर्गाला अभ्यासक्रमात असलेल्या नाटकावर खूप दिवसापासून लिहायचं ठरलं होतं. अभ्यासक्रम बदलला पण लिहिणं काही होत नव्हतं. आज नाटकावर लिहिलंच पाहिजे असं वाटलं म्हणून कोण म्हणतं टक्का दिला या नाटकाचा हा परिचय.

कोण म्हणतं टक्का दिला ? हे लेखक संजय पवार यांचं नाटक. दलित नाट्यक्षेत्रात न आलेला एक वेगळा विषय नाटककार, दिग्दर्शक संजय पवार यांनी हाताळला आहे. नाटकाचे मूळ उद्दिष्ट समाजातील विषमता समोर आणून समतेचे बीज रोवले जावे. आणि म्हणूनच हे नाटक वेगळे ठरते.

नाटकाच्या पहिल्या अंकाच्या पहिल्या प्रवेशात लेखकाने देव आणि राक्षस यांच्या मनोभूमीतून काही पात्रे रंगविली आहेत. देवलोक म्हणजे उच्च वर्णीय आणि राक्षस लोक म्हणजे दलित समाज असे लेखकाला सांगायचे आहे. दानवांचे गुरु शुक्राचार्य आणि देवांचा राजा बृहस्पती या दोघांच्या नीतीमधून नाटकाचा पहिला प्रवेश सुरू होतो. शुक्राचार्यांना संजीवनी विद्या प्राप्त झालेली असते आणि ते मृतांना जिवंत करू शकतात. शुक्राचार्याची मुलगी देवयानी आणि बृहस्पतीचा मुलगा कच यांच्यातील प्रेमामुळे संघर्षाची ठिणगी पडते.

कच हा देवाचा म्हणजेच देव लोकांचा पुत्र आणि आपला शत्रू असूनही केवळ देवयानीच्या त्याच्यावरील प्रेमामुळे दानवाचे गुरु शुक्राचार्य आपल्या मुलीच्या प्रेमाखातर युद्धात मृत झालेल्या कचाला पुन्हा जिवंत करतात मात्र जिवंत झाल्यावर कच हा देवयानीसोबत विवाहाला तयार नसतो तो देवयानीसोबत विवाहाला नकार देतो संतप्त झालेली देवयानी कचाला शाप देते ती म्हणते, ''दानवाच्या पोरा ! राक्षसांच्या भावनांशी खेळणारा तू विसाव्या शतकाच्या अखेरीस, भूतलावर मागास वर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात वाढावे लागेल आणि तेव्हा तुला या संजीवनीचा मोह धरल्याचा पश्चात्ताप होईल” आणि नाटकाचा पहिला प्रवेश संपतो.

नाटकाचा दुसरा प्रवेश हा आधुनिक काळातला म्हणजेच विसाव्या शतकातला आहे. देवयानीने दिलेला शाप, देव आणि दानव अशी नाटकाच्या सुरुवातीची उभी केलेली पार्श्वभूमी पुढे संपूर्ण नाटकाला कलाटणी देते. कमलाकर आराध्ये यांचं एक सुखवस्तू कुटुंब, त्यांच्या पत्नी विमलाबाई आराध्ये, मुलगी सुकन्या, मुलगा सुदर्शन . असा हा परिवार. कमलाकर आराध्ये यांचा छोटासा व्यवसाय आहे. विमलाबाई गृहिणी, आणि महिला मंडळाच्या कामात सतत व्यस्त असतात. मुलगी सुकन्या नव्या विचारांची तर मुलगा सुदर्शन हा मात्र जुन्या विचारांचा असे हे सुखी कुटुंब.

अशा या सुखी कुटुंबात शासनाचं एक पत्र येतं आणि नाटकातील मुख्य विषय सुरू होतो. भारत सरकारने एक अध्यादेश काढलेला असतो आणि त्यात असं नमूद केलेलं असतं की,'' नवीन घटनात्मक तरतुदीनुसार पुढील महिन्यापासून केंद्र सरकारने सर्व प्रकारच्या राखीव जागा खास अध्यादेशानुसार रद्द ठरविल्या आहेत गेली पन्नास वर्ष चालू असलेल्या सवलतीमुळे राष्ट्र आता वर्णवर्गविरहित झाले असल्याचे केंद्र शासनाची खात्री आहे परंतु अजूनही संपूर्ण एकात्मता साधण्यासाठी शासनाने काही नवी पावले उचलेली असून त्यातले हे एक पाऊल आहे. दुसरे पाऊल असे आहे की या एकात्म समाजाचे सर्व जगाला दर्शन घडावे म्हणून नव्या कायद्यानुसार प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय स्त्री अथवा पुरुष सामाजिक समतेचा भाग म्हणून कायद्याने ठेवावा लागेल. असा मागासवर्गीय आपल्या कुटुंबात घेतल्याशिवाय रेशनकार्ड, गॅस, लायसन्स, पासपोर्ट इत्यादी बाबी देण्यात येणार नाहीत. सबब अशा कुटुंबानी व मागासवर्गीयांनी त्या संदर्भात योग्य ती कागदपत्रे जवळच्या समता अधिका-यांकडे जमा करावीत. समता विनिमय केंद्रावर उच्चवर्णीय आणि मागासवर्गीय याच्या स्वतंत्र याद्या लावलेल्या असून, त्यातून आपल्या पसंतीचे सवर्ण व मागासवर्गीय निवडता येतील. त्यातूनही निवड न होऊ शकल्यास शासन देईल ती निवड मान्य करावी लागेल. ही समता विनिमय योजना प्रथम दहा वर्षाकरिता राबविण्यात येईल''

सरकारने काढलेल्या या अध्यादेशामुळे आराध्ये कुटुंबात 'कच-या धिवार' नावाचा मागासवर्गीय राहायला येतो. कमलाकर आराध्ये आणि सुकन्या पुरोगामी विचारांचे असल्यामुळे त्या तरुणाला स्वीकारतात विमलबाई आणि सुदर्शन यांना मात्र या गोष्टीचा राग येत असतो. सुदर्शनचे आणि कच-याचे जातीवरुन, संस्कृतीवरुन नेहमीच खटके उडत असतात दरम्यान सुदर्शन न्यायालयात या आदेशाविरुद्ध दावा दाखल करतो.

आराध्य कुटुंबात कच-या चांगला मिसळतो. सुकन्या आणि त्याच्या मैत्रीचे सुर जुळतात त्या दोघात प्रेमाचे संबंध उभे राहतात. पुढे काय काय होतं ते नाटक वाचतांना मजा येते. मी मात्र नाटकाच्या शेवटाकडे येतो. कच-याचं शेवटचं स्वगत मला खुप आवडतं.-

''तू ऐकते आहेस ना देवयानी ? तुझ्या खेळांचा-शापाचा शेवट आलाय . संजीवनीच्या शोधात मी राक्षसाच्या पोटात शिरलो. तिथून तू मला इथल्या राक्षसांच्या पोटात ढकलंलस आणि इथल्या देवांच्या हातात दिलास हा माझा राक्षही देह. हे देव दानव जन्माचं शापित कडं भेदून मी आता जन्माला घालणार आहे माणूस ज्याला फ़क्त माणूस माहिती असेल. जो देवांच्या नावावर राक्षस होणार नाही की, राक्षसांच्या नावावर देव होऊन मिरवणार नाही. हे माणूसपण खूप छान आहे देवयानी. याला अमरत्वाची हाव नाही. देवपणास वाव नाही. चोरी लबाडी न करता, छान जगता येतं आणि सुखानं मरता येतं. इथं संजीवनीसाठी युद्ध नाही. मी तुझा आभारी आहे देवयानी. तुझ्या माणसांना मला दाखवता आले, देव दानवांचे रुसवे फ़ुगवे आणि अंधश्रद्धेचे बुडबुडे. मी त्यांना सांगू शकलो, राक्षसातले अमानवीपण आणि देवत्वातला फोलपणा. मी सुकनेच्या पोटी जोजवेन माणूस, ज्याच्यावर जातिधर्माचे अक्षांश-रेखांश नाही, माणुसकीचा अटळ धृव आणि माणूसपणाचे विषवृत्त असा हा आगळाच भूगोल वाढवेन सुकन्याच्या पोटी ”

आधुनिक काळातही अजूनही स्पृश्य-अस्पृश्य कसं दडलेलं असतं त्याचं उत्तम चित्रण या नाटकातून येतं. नाटकाची भाषा अगदी सहज आणि संवाद अगदी खुशखुशीत असल्याने नाटक केव्हाच वाचून संपवून जाते. उरतो तो फक्त प्रश्न मनात की असं होऊ शकतं ? असं करता येईल ? सामाजिक समतेचा असा प्रयोग राबविता येईल ? की केवळ मागच्या पानावरून पुढे जायचं काहीच न करता ? अशा असंख्य प्रश्नासहित हे नाटक एकदा वाचलंच पाहिजे.

कोण म्हणतं टक्का दिला. (दुवा बुकगंगा)

समाजसमीक्षा

प्रतिक्रिया

चलत मुसाफिर's picture

19 Apr 2015 - 10:49 pm | चलत मुसाफिर

नाटकाचा विषय अत्यंत रोचक वाटला. महाराष्ट्राबाहेर रहात असल्यामुळे मराठी नाटकांशी अत्यल्प संबंध येतो. संधी मिळताच हे नाटक पहाण्याचा जरूर प्रयत्न करीन

अत्रुप्त आत्मा's picture

19 Apr 2015 - 11:49 pm | अत्रुप्त आत्मा

क्लासिक हो बिरुटे सर.. धन्यवाद हा धागा काढल्याबद्दल.

hitesh's picture

20 Apr 2015 - 5:05 am | hitesh

छान

श्रीरंग_जोशी's picture

20 Apr 2015 - 6:21 am | श्रीरंग_जोशी

नाटकाचा विषय अन त्याची मांडणी खूपच रोचक आहे.

इ-आवृत्ती उपलब्ध असती तर हे पुस्तक लगेच खरेदी केले असते. या लेखाकरिता मनापासून धन्यवाद.

खेडूत's picture

20 Apr 2015 - 9:56 am | खेडूत

छान परिचय!
बावीस वर्षांपूर्वी कॉलेजात असताना हे पुण्यात पहिलं होतं. संवाद एकदम जबरदस्त ! या नाटकाने संजय पवार यांची लेखक म्हणून ओळख झाली. त्यातली उपेंद्र लिमयेची भूमिका अजूनही विसरता येत नाही इतकी छान झाली होती. सोबत मंजुषा दातार होती. अन्य कलाकार आता आठवत नाहीत.

संजय पवार म्हणजे "अधांतर"चे लेखक ना?

खेडूत's picture

20 Apr 2015 - 1:40 pm | खेडूत

नाही .
ते जयंत पवार वेगळे . हे संजय पवार हल्ली लोकसत्तेत लिहून रहायलेत .

प्रचेतस's picture

20 Apr 2015 - 10:24 am | प्रचेतस

उत्कृष्ट परिचय.
नाटकाबद्दल आधी ऐकून होतोच पण त्यातली थीम अजिबात माहिती नव्हती.

पैसा's picture

20 Apr 2015 - 11:02 am | पैसा

नाटकाबद्दल माहीत आहे. मात्र कधी वाचले नव्हते. उत्तम परिचय करून दिलात सर. बुकगंगावर आहे का? मागवून वाचेन म्हणते.

"असं होऊ शकतं का?" या प्रश्नाचं उत्तर मात्र दुर्दैवाने अजून नकारार्थीच आहे असे म्हणावे लागेल. परवाच गावाला गेले तिथे ब्राह्मणांच्या अडीच घरांसाठी वेगळी स्मशानभूमी पाहिजे यावर तावातावाने चर्चा करणारे दोघेजण पुराणपुरुष पाहिले. मेल्यावर आपल्याला जाळले की पुरले, आणि तेही कुठे, याने काय फरक पडणार आहे? या माझ्या प्रश्नाला कोणीही उत्तर द्यायचे कष्ट घेतले नाहीत. आपल्याकडची चिरेबंदी जातीव्यवथा ढासळणे खूपच कठीण दिसते आहे. :(

सुंदर, आटोपशीर आणि समयोचित लेख! हे नाटक जबरदस्त आहे ह्यात शंकाच नाही. मुख्य म्हणजे जातिव्यवस्थेच्या निर्मूलनासाठी शासकीय पातळीवरून होणार्‍या 'हाफ्-हार्टेड' प्रयत्नांना चांगलीच चपराक लगावली आहे.

अशाच 'जात्याधारित आयडेंटिटी क्रायसिस' वर मागे एक सिनेमा येऊन गेला - 'जोशी की कांबळे'. त्याची आठवण झाली.

स्पंदना's picture

20 Apr 2015 - 1:49 pm | स्पंदना

सिंपली ग्रेट!
हे नाटक शिकवताना किती अँगल्स येत असतील त्या शिकवण्यात!
देवयानी कचाचा पूराण कथेचा आधार तर अतिशय सुरेख!
एका विचार प्रवृत्त करणार्‍या नाटकाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद!

पिंपातला उंदीर's picture

20 Apr 2015 - 3:46 pm | पिंपातला उंदीर

सुरेख!

अनुप ढेरे's picture

20 Apr 2015 - 4:06 pm | अनुप ढेरे

आवडली ओळख. यातल्या 'टक्का दिला' याचा अर्थ काय? आरक्षणाशी संबंधित आहे का हे?

विवेकपटाईत's picture

20 Apr 2015 - 8:17 pm | विवेकपटाईत

देवलोक म्हणजे उच्च वर्णीय आणि राक्षस - हा समज म्हणजे आंग्ल लोकांनी आपल्या डोक्यात घातलेले मूर्खतापूर्ण विचार. एकदा जरीपौराणिक ग्रंथ वाचले असते तरी लेखकाला सत्य कळले असते. स सर्व राक्षस मग ते रावण असो वा वृत्रासुर, बळी सर्व ब्राह्मण होते. पण पौराणिक ग्रंथ न वाचताच आंग्ल इतिहासकारांनी मनावर बिंबवलेल्या इतिहासाच्या आधारावर निष्कर्ष काढणे यालाच म्हणतात.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

20 Apr 2015 - 8:59 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

नाटकाची थीम आवडली की नाही ?

-दिलीप बिरुटे

अत्रुप्त आत्मा's picture

21 Apr 2015 - 12:07 am | अत्रुप्त आत्मा

+++१११

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

21 Apr 2015 - 11:07 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सर्व प्रतिसादा देणा-याचे मन:पूर्वक आभार....!!!

-दिलीप बिरुटे

स्रुजा's picture

22 Apr 2015 - 2:07 am | स्रुजा

वाह वाह ! सूंदर परिचय. याचं पुस्तक आहे हे माहिती नव्हतं. आणि पुराणातल्या कथेशी जुळवलेला सांधा तर मास्टर-स्ट्रोक.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

22 Apr 2015 - 3:36 am | निनाद मुक्काम प...

आपल्याकडे विज्ञान व वाणिज्य शाखेत जाण्याचा ओढा शहरी भागात जास्त आढळून येतो त्यामुळे कला शाखेतील शिक्षणाच्या निमित्ताने अश्या प्रयोगशील साहित्याकडे नव्या पिढीचे दुर्लक्ष होते ,तुमचे आवडते पुस्तकांची नावे मृत्युंजय व पानिपत सारखी ठरावीक राहतात.
डॉ मुळे आज ह्या नाटकाची ओळख झाली ,
भारतीय हे रेसिस्ट असतात असे माझ्या परदेशी मैत्रिणीचे
आफ्रिकन मला सुरवातीला धक्कादायक वाटले , पण तिला दक्षिण आफ्रिकेत तेथील भारतीयांचा आलेला अनुभव सांगितल्यावर मी निरुत्तर झालो.
जाती बाहेर लग्न न खपवून घेणारे अनेक जण परदेशात गेल्यावर
तेथे आपणास एखादा रेसिस्ट अनुभव कसा आला हे रंगवून सांगतात. तेव्हा ऐकतांना मौज वाटते.
गांधींना दक्षिण आफ्रिकेत डब्यातून काढले तर तो अपमान वाटला मात्र त्या घटनेच्या अनेक वर्षाच्या नंतर उच्चविद्याविभूषित आंबेडकरांना परदेशातून आल्यावर भारतात पदोपदी अपमानित व्हावे लागले त्या बद्दल खेद नव्हता:
इंग्रजाची लढण्याआधी आधी भारतीय समाजातील ह्या असमानतेच्या विरुद्ध लढणे आवश्यक होते:
टिळकांवर सिनेमा आला आता आगरकरांच्या वर सिनेमा आला पाहिजे

सिरुसेरि's picture

23 Apr 2015 - 4:14 pm | सिरुसेरि

टिळक - आगरकर यांचे कार्य , मैत्री , मतभेद यांवर आधारीत 'मर्मबंध' ही मराठी मालिका पुर्वी सह्याद्रीवर सादर झाली होती . त्यामध्ये प्रमोद पवार व विलास उजवणे यांनी टिळक , आगरकर यांची भुमिका केली होती .
प्रमोद पवार यांचीच मुख्य भुमिका असलेला , वर्णव्यवस्थेतील प्रश्नांवर आधारीत 'आघात' हा मराठी सिनेमाही गाजला होता .

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

23 Apr 2015 - 9:22 pm | निनाद मुक्काम प...

थोडे विषयांतर होईल पण गेल्या १५ वर्षात आपण सर्वांनी सह्याद्री वाहिनीला वाळीत टाकले आहे , सुरवातीला आभाळमाया व प्रपंच सारख्या मालिका देण्यारी झी आता पांचट मालिकांचा रतीब लावते , हीच परिस्थिती इतर खाजगी वाहिन्यांची आहे मात्र त्यातल्या त्यात काही दर्जेदार मालिका देऊन सह्याद्री वाहिनीच्या नशिबी प्रेक्षकांच्या कडून एवढी उपेक्षा का
मूळ मुद्याकडे वळायचे तर सावरकरांचे ह्याविषयी कार्य असो किंवा आझाद हिंद सेनेत हिंदू मुस्लिम व दलित शीख एकत्र आले ह्या गोष्टींना फारशी प्रसिद्धी दिली जात नाही
त्याउलट अभक्ष भक्षण करणाऱ्या लोकांना आपल्या आश्रमात थारा न देऊन त्यांना आपल्यापासून दूर लोटण्यार्याचे महात्म्य गात राहतो
हे राम