वैश्विक खाज नाही
शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही
भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही
निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की
मोफत लढ़ावयाचा, यांना रिवाज नाही
त्यांच्या कपटनितीला, चिरडून टाकतो मी
धर्मास जागणारा, मी धर्मराज नाही
खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही
गावे बकाल आणिक, शहरे सुजून आली
आम्हांस मात्र त्याची, अजिबात लाज नाही
शालेय पुस्तकांनी, मेंदू बधीर केला
बुद्धी भ्रमिष्टतेवर, उरला इलाज नाही
स्वातंत्र्य देवते तू, ये भारतात थोड़ी
जेथे 'अभय' कुणाला, कुठलेच आज़ नाही
- गंगाधर मुटे ’अभय’
=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=^=0=
प्रतिक्रिया
19 Apr 2015 - 2:29 am | खटपट्या
आवडली..
19 Apr 2015 - 7:13 am | चुकलामाकला
सुंदर!!!
19 Apr 2015 - 9:56 am | विवेकपटाईत
खाणार काय घंटा? सोने पितळ कि तांबे?
शेतीमधे उद्या जर पिकले अनाज नाही
विचार करावा लागेल.
बाकी पप्पू शेतकर्यांची रैली करतो आहे. हरवलेला वोट बॅंक शोधतो आहे.
20 Apr 2015 - 5:07 am | hitesh
छान.
मोदी सगळी जमीन अदानी अंबानीना अदा करेल असे वाटते... मग काय खाणार ?
20 Apr 2015 - 5:29 pm | वेल्लाभट
काही शेर आवडले...
शालेय पुस्तकांनी..... छान जमलंय
पण हिंदी/उर्दू शब्द खटकले.
मराठी काव्यात हिंदी किंवा उर्दू शब्दांची सरमिसळ मला व्यक्तिशः आवडत नाही.
21 Apr 2015 - 4:03 pm | गंगाधर मुटे
प्रतिसादाबदल सर्वांचा आभारी आहे.
@ वेल्लाभटजी, आपण रिवाज या शब्दाबद्दल बोलताय का? हा शब्द आमच्याकडे मराठीमध्ये पूर्णपणे एकजीव झाला आहे.
21 Apr 2015 - 6:05 pm | कानडाऊ योगेशु
बहुदा ते "अनाज" ह्या शब्दाबाबत बोलत असावेत. रिवाज हा शब्द तसा रुळलेला आहे पण मलाही अनाज हा शब्द खटकला.
बाकी गझल नेहेमीप्रमाणेच उत्तम!
21 Apr 2015 - 11:44 pm | गंगाधर मुटे
आमच्या बोलीभाषेवर हिंदीचा प्रभाव असल्याने मराठी शब्द नेमकेपणाने ओळखने आम्हाला कठीण जाते. त्यामुळे असे होते. अनाज हा मराठी शब्द नाही, हे आता कळले.
खाज, बकाल, रिवाज हे शब्दसुद्धा शुद्ध मराठी आहेत की नाही, हे मला ठरवणे कठीण आहे.