एकोणीसशे नव्वदच्या सुमाराची गोष्ट आहे. नविन लुथरा आणि त्यांचे मित्र दीपक मोहन लोणावळयाच्या डोंगराळ घनदाट वनपरिसरातून लुथरा यांच्या मारुती जिप्सी मधून मुळशीकडे निघाले होते. नविन लुथरा म्हणजे कस्टम क्लियरन्स मधले एक उभरते यशस्वी व्यावसायिक. वय जेमतेम तिशीच्या आसपास. अन दीपक मोहन म्हणजे एका तेल-जहाजाचे मालक. धनाढ्य असामी !
नविन लुथरा स्वत:ची कहाणी सांगत होते.
“हा प्रवास माझ्या साठी बहुधा अतिशय महत्वाचा ठरायचा होता “
कॅप्टन दीपक मोहन यांनी तेल-वाहतुकीच्या धंद्यात बक्कळ पैसा कमावला होता अन तो पैसा त्यांना इथे भारतामध्ये जमीनीत गुंतवायचा होता.
मुळशीला पोहोचल्यावर दोघांनी जमीन खरेदी साठी जमीनमालक शेतकरयांशी बोलणी सुरु केली.
कॅप्टन साहेबांना जमीन खूपच महाग वाटली. खरेदीचा विचार सोडून देवून ते परत त्यांच्या तेल-वाहतुक धंद्यात व्यग्र झाले. दुर्दैवाने दोनच वर्षात त्यांचे निधन झाले. मला मात्र त्या जमीन खरेदीचा विचार स्वस्थ बसु देईना. मला जागाही छान वाटली होती. रिटायरमेंट नंतर स्थायिक व्हायला बरी म्हणुन मग मी ती १०० एकर जागा विकत घेवून टाकली.
नंतर पाच-सात वर्षांनी लुथरांनी एका पावसाळ्यात परत मुळशीला चक्कर मारली अन तिथल्या निसर्गाच्या प्रेमात पडून पुढील काही वर्षात आणखी जमीन विकत घेण्याचा सपाटा लावला.
“ सध्या माझ्या मालकीची १५०० एकर पेक्षाही जास्त जमीन आहे. सुरुवातीला रू. ५०० एकर या दराने मी जागा घेतली. नंतर या आणखी खरेदीच्या काळात त्याचा सरसरी दर रू. १०००० (दहा हजार) प्रति एकर इतका होता. त्यावेळच्या मानाने महागच की !
इथे आता पर्यटन व्यवसायतले काही तरी करावे ही कल्पना माझ्या डोक्यात मूळ धरु लागली अन मी भन्नाट असा "केव्ह हॉटेल" प्रकल्प करायला घेतला. स्वतःसाठी बंगलाही बांधायला घेतला. आता या साठी पाणी कुठून आणायचं याचा काही विचारच मी केला नव्हता.
मला जाणवलं की याला, विशेषतः हॉटेल प्रकल्पाला भरपूर पाणी लागणार. मी पाण्यासाठी धावाधाव सुरू केली. अगदी टाटांकडे सुद्धा गेलो. टाटा ग्रुप त्यावेळी मुळशी धरण-जलाशय लीझ वर चालवत होते व पाण्याचे वितरण-व्यवस्थापन करत होते. त्यांनी माझ्या पाणी-विनंतीला नकार दिला ! बोअर खणणं माझ्यासाठी आतबट्ट्याचा व्यवहार ठरला असता कारण मला रोज तीन लाख लिटर पाण्याची गरज होती.
अश्या किती बोअर-विहरी खणणार होतो मी ? खुप अस्वथ झालो होतो मी !
असाच एके दिवशी बसलो असताना, जवळच राहणारा एक परिचत गावकरी माझ्याकडे आला. बोलता बोलता म्हणाला" इथे या जमीनीत जिवंत झरे आहेत, तुमची पाण्याची चिंता मिटून जाईल" हे ऐकून उत्साहित झालेले लुथरा लगेचच कामाला लागले. साधारण किती पाणी मिळेल याचा अंदाज घेण्यासाठी दोन पंप बसवून घेतले.
"तो मे महिना होता, अन या ऐन उन्हाळ्यात या झरयातून मुबलक, म्हणजे ३-४ लाख लिटर पाणी आम्ही उपसत होतो, पाण्याची पातळी खाली जायचे नाव घेइना. आमची पुरेपुर खात्री पटली की इथं भरपूर पाणी आहे. मग आम्ही हे पाणी पिण्यायोग्य आहे का याची चाचणी घेतली. एका कडून नाहीतर चार्-चार जणां कडून चाचणी करुन घेतली. हो पाणी नि:संशय पिण्यायोग्य होते. आम्ही खुष झालो. एका मित्राला या पाण्याचे रिपोर्ट दाखवले. हा मित्र पाणी-शुद्धिकरण क्षेत्रात काम करायचा. एक्सपर्ट होता तो त्यातला. म्हणाला " पाणी" बेस्ट आहे, उच्च दर्जाचं आहे. आणि विशेष म्हणजे हे पाणी पेस्टीसाईड-मुक्त होतं !
म्हणजे लुथरांनी जिथं खणलं होतं तो "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” होता ! "बायोलॉजिकल हॉटस्पॉट” म्हणजे "जैविक दृष्ट्या संपन्न अन अतिशय “दुर्मिळ” असं ठिकाण होतं !
ब्रिटीश पर्यावरण शास्त्रज्ञ नॉरमन मायर्स यांनी ही हॉटस्पॉटची संकल्पना रुजवली. त्यांच्या अभ्यासानुसार ज्या ठिकाणी ०.५ टक्के किंवा १५०० विविध प्रकारच्या व्हेस्कुलर वनस्पती आहेत व "पर्यावरण-स्त्रोत" च्या इतर अनेक चाचण्यांत जे ठिकाण उत्तिर्ण होते, तो बायो-हॉटस्पॉट ! भारतात अशी दोनच ठिकाणे आहेत, एक मुळशी व दुसरे गुजरातमधील आवा !
• * * * * * *
लुथरांनी मग पुढील चार वर्षे हे अति-शुद्ध पाणी, त्याचा नैसर्गिकक दर्जा न बिघडवता जसंच्या-तसं बाटलीत कसं भरता येईल यावर बरेच प्रयोग केले अन यात पुर्णपणे यशस्वी झाल्यावर सन २००९ मध्ये "मुळशी स्प्रिंग वॉटर" या नावाने बाजारात आणलं.
लगोलग हे पाणी लुथरा यांचे मित्र ओबेरॉय हॉटेल्सचे चेअरमन बिकी ओबेरॉय यांच्या कडे पोहोचवण्यात आले. हे पाणी त्यांच्या पसंतीस उतरले, जेंव्हा त्यांना समजले की याचा स्त्रोत बायो-हॉटस्पॉट आहे, ते आणखी चकित झाले. उत्सुकते पोटी मुळशीला येऊन बायो-हॉटस्पॉट व बॉटलिंग प्लान्ट बघून गेले. मग काही दिवसातच मुळशी स्प्रिंग वॉटरला ओबेरॉय हॉटेल अन ओ-क्वीला ट्रायडंट हॉटेलची मोठी ऑर्डर मिळाली.
सद्ध्या ओबेरॉय ग्रुप रोज १७,००० "मुळशी स्प्रिंग वॉटर" च्या बाटल्या विकत घेतो आहे. आणि थक्क करणारी गोष्ट म्हणजे पॅरीस इथे "कॉलेट" नावाच्या जगातल्या नामांकित "वॉटर बार" जो अति-दर्जेदार पिण्याच्या पाण्या साठी प्रसिद्ध आहे तिथेही "मुळशी स्प्रिंग वॉटर" विकले जाते.
"आम्ही अतिशय जाणीवपुर्वक "कॉलेट वॉटर बार" कडे ऍप्रोच झालो कारण आम्हाला माहित होतं "कॉलेट"नं शिक्कामोर्तब केलं की "मुळशी” जागितक पातळीवर मान्यता पावणार होतं" लुथरा अभिमानाने सांगत होते.
मग "कॉलेट" कडून ऑर्डर मिळायला फारसा प्रयास करावा लागला नाही. अर्ध्या तासातच बोलणी आटोपली, हे पाणी चक्क भारता मधलं आहे या वर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. हे पटवायलाच त्यातला निम्म्याच्या वर वेळ गेला, कारण भारतातल्या स्वच्छते बाबत जगात काय प्रतिमा आहे हे आपणा सर्वांना माहित आहे. आता हा भारतीय ब्रॅण्ड "कॉलेट" मेनू कार्ड वरचा एक नंबरचा आयटम आहे.
•
ओबेरॉय व्यतिरिक्त लीला ग्रुप हॉटेल व आयटीसीच्या हॉटेल्स मध्येही "मुळशी" उपलब्ध आहे. तुम्हाला जर मुंबईत मुळशी हवं असेल तर बिग सिनेमाज, "हक्कासन, याऊक्ताचा" या अंतरराष्ट्रीय रेस्टॉरंटस इथे ही उपलब्ध आहे. स्पेन्सर रीटेल हेच पाणी वेगळ्या नावने त्यांच्या स्टोअर्स मध्ये उपलब्ध करुन देणार आहे.
आता लुथरा यांनी बॉटलिंग प्लान्ट ची क्षमता भरपूर वाढवलीय.
७५० मिली. ची "मुळशी स्प्रिंग वॉटर" ची बाटली महाराष्ट्रात रु. ५० ला व राज्याबाहेर रु. ५५ ला आहे.
५२ वर्षीय नविन लुथरा खुप खुष आहेत. रु. १०००० (दहा हजार) प्रति एकर दराने घेतलेली जागेत आज रोज रु. ३० लाख इतकी उलाढाल होतेय. इतक्या कमी पैश्यात इतकं भरघोस उत्पन्न, अजून काय पाहिजे ?
ही आहे कहाणी एका पाण्याची, पाणीथेंबातुन खुळखुळणारया नाण्यांची !
* * * * * * * * * * * * * * * * * * * * *
तीनचार वर्षांपुर्वी डी.एन.ए. हे इंग्रजी वृत्तपत्र वाचता वाचता आशिष तिवारी यांनी लिहिलेली एक मुलाखत कम रिपोर्ताज माझ्या वाचनात आला. ही “पाण्याची कहाणी” मला विलक्षण वाटली. आता ही असली सुरस कहाणी वाचल्यावर, मिपाकर मित्रांना सांगितल्या शिवाय थोडंच राहवेल ? मग या कहाणीचे मराठीत रुपांतर केले. कसा वाटला हा माझा हा अल्पसा प्रयत्न
- चौथा कोनाडा
प्रतिक्रिया
4 May 2015 - 12:56 pm | बबन ताम्बे
कारण सोसायटी मेंबरांची "मला काय त्याचे ..." ही व्रुत्ती ! सहा सहा म्हयने पाण्याच्या टाक्याच धुतल्या जात नाही वो. पुणे मनपा कीती का शुद्ध पाणी पुरवेना, आमच्या बिल्डींगच्या टाकीत काय काय असेल नेम नाही.
मी सेक्रेटरी होतो तेंव्हा दर महीन्याला टाक्या धूउन घेत होतो. आता आनंद आहे.
हाय फाय लोक बॉटल विकत आणतात !
5 May 2015 - 12:55 pm | चौथा कोनाडा
सुदैवाने आमच्या सोसायटीच्या पाण्याच्या टा़क्यांची देखभाल व स्वच्छता वेळच्या वेळी होत असल्याने बिनदिक्कत नळाचे पाणी पितो, घरी वॉटर फिल्टर असुन सुद्धा ! हॉटेल अथवा बाहेरचे पाणी जास्त चिकित्सा न करता पितो. आता पर्यन्त कधीही समस्या उदभवलेली नाही.
जे लोक सोसायटीच्या टाक्यांची वेळच्या वेळी स्वच्छता ठेवत नाहीत व विकतच्या बाटलीबंद पाण्याला पैसे बडवतात ते घरपोच किफायतशीर पिण्याच्या पाण्याला मुकत आहेत असेच म्हणावे लागेल.
5 May 2015 - 1:57 pm | बबन ताम्बे
तरीच टा़क्यांची देखभाल व स्वच्छता वेळच्या वेळी होतेय.
6 May 2015 - 1:51 am | चौथा कोनाडा
चेरमन शेक्रेट्री, अन आमी ? नाही बुवा !
आम्ही आपले नियमित वर्गणी भरणारे निरुपद्रवी "सहकारी" सभासद ! आमचे विद्यामान चेरमन शेक्रेट्री लैच चांगले हैत. सगळ वेळच्या वेळी करतात. सभासदही त्याना उत्तम सहकार्य करतात.
4 May 2015 - 3:22 pm | स्वाती दिनेश
लेख आणि प्रतिसाद माहितीपूर्ण!
स्वाती
4 May 2015 - 6:07 pm | मोहनराव
लेख आवडला!
5 May 2015 - 12:41 am | स्वप्नांची राणी
थोडा अवांतर प्रश्ण आहे... पाण्याचे शुद्धीकरण होते, तेंव्हा नेमके काय होते?
फील्ट्रॅशन ची ही प्रक्रीया ६ ते ७ तासांची असते आणि यात निरनिराळ्या ट्प्प्यांमधून शुद्धीकरणाची प्रक्रीया केली जाते. नदिच्या किंवा तलावाच्या पाण्याला एक विशीष्ट वास असतो, तो घालवण्यापासून ते पाण्यात असणार्या बॅक्टेरीया, वायरस ई.ई. मंडळींचा नायनाट आणी काही जिवनापयोगी मंडळींचे पुनर्वसन, असे बरेच काही बाही फिल्ट्रेशन प्लाण्ट मधे घडते.
माझा प्रश्न असा आहे कि ईतक्या प्रक्रियांमधुन जाउनही पावसाळ्यात नळाला गढूळ पाणी का येते? डोंबिवली, नागपुर, पुणे, नागोठणे ई.ई. सगळ्या ठीकाणी असच दिसलय. (सिंगापुर, लंडन ह्या ठीकाणी नाही दिसले. सिंगापुरला जवळजवळ रोजच पाऊस पडतो...पण फरगेट इट.. हल्ली परदेशांची नावे घेतली की उगिच राडा होतो म्हणून...:;) )
5 May 2015 - 1:02 pm | चौथा कोनाडा
फिल्टरेशन प्लान्ट मधील अनागोंदी व भ्रष्टाचार, पाईपलाईन्स मधील बिघाड, वेळच्या-वेळी देखभाल करणे, स्पेअर पार्टसच्या चोर्यामार्या इ. दुसरी काय कारणे असणार ?
याचा अनुभव असणार्यानी / जाणकारांनी प्रकाश टाकावा.
7 May 2015 - 3:25 pm | बबन ताम्बे
येऊ द्या अजून एखादी ज्वलंत समस्या ! होऊ दे चर्चा.
16 May 2015 - 11:49 am | द-बाहुबली
धंदा करायला अक्कल लागते अन हे म्राठी माणसाचे काम नाही हेच परत सिध्द झाले.
17 May 2015 - 2:02 pm | नगरीनिरंजन
अत्यंत विचारी व अभ्यासपूर्ण प्रतिक्रिया आहे. प्रजोत्पादनानंतर, धंदा करणे हे मानवाचे दुसरे नैसर्गिक प्रयोजन आहे. लाखाचे कोटी, कोटीचे अब्ज व अब्जाचे दशअब्ज कसे होतील याचा विचार करणे हे नैसर्गिक कार्यही हा काल्पनिक मराठी माणूस धडपणे करु शकत नाही. या अमर्याद, कधीही न संपणार्या नैसर्गिक संपत्तीची पिढ्यानपिढ्या लूट करुन शेकडो घरे, गाड्या व झालंच तर विमाने वगैरे जमा करत राहण्याऐवजी हा काल्पनिक मराठी माणूस साध्या राहणीची भलामण करतो. किती तो मूर्खपणा!
एवढं सगळं एका वाक्यात सांगितलंत! कमाल आहे!