आधीचा भाग: संगणक घेताना (भाग-१)
ह्या आधीच्या भागांमधे आपण संगणकाचे वेगवेगळे भाग काय असतात, ते कसे निवडावेत, एकमेकांशी ते संलग्न (कंपॅटिबल) आहेत ह्याची खात्री कशी करुन घ्यायची हे पाहिलं. ह्या भागामधे आपण संगणकाची जुळणी कशी करायची, जुळणी करत असताना काय काळजी घ्यायची ह्याची सचित्र माहिती घेउ.
*पुर्वतयारी* :
संगणकाची जुळणी करणं हा अतिशय सोप्पा प्रकार आहे. थोडीशी काळजी घेतली तर अगदी ८-१० वर्षाचं लहान मुलंही संगणकाची जुळणी करु शकतं. त्यासाठी थोडी पुर्वतयारी आवश्यक आहे. संगणकाची जुळणी करताना आधी काही गोष्टींची खात्री करुन घ्या. एक म्हणजे आपल्याला हव्या असणार्या कॉन्फिगरेशनचे सगळे भाग उपलब्ध आहेत ह्याची खात्री करुन घ्या. चक्क कागदावर एक यादी करा आणि त्यावर आपले भाग उपलब्ध आहेत ह्याच्या खुणा करुन घ्या. तसचं सगळे भाग सिलबंद पॅकिंग मधे आहेत ह्याचीही खात्री करुन घ्या. त्याच वेळी बॉक्स आणि पॅकिंग वरच्या स्पेसिफिकेशन्स परत एकदा वाचुन ते सगळे भाग एकमेकांशी कंपॅटिबल आहेत ह्याचीही खात्री करुन घ्या (मदरबोर्डवरचं प्रोसेसर सॉकेट नंबर आणि सीपीयु चा सॉकेट नंबर एक असलाचं पाहिजे. मदरबोर्ड वर ज्या पद्धतीचा रॅम स्लॉट आहे त्याचं पद्धतीचा रॅम उपलब्ध आहे की नाही ते. एसएमपीएस चं वॅटेज वगैरे वगैरे) जुळणी करण्यासाठी स्टार पद्धतीचा छोटा स्क्रु-ड्रायव्हर हाताशी ठेवा. तो मॅग्नेटिक असेल तर अतिउत्तम म्हणजे कॅबिनेटच्या कोपर्यामधे वगैरे गेलेले स्क्रु पटकन उचलता येतील. तसचं तुम्ही ग्राउंडेड आहात ह्याचीही खात्री करा, अंगातल्या स्टॅटीक चार्ज मुळे इलेक्ट्रॉनिक कंपोनंट्स खराब होउ शकतात.
ही झाली पुर्वतयारी. आता जुळणीची पद्धत पाहु.
आउट ऑफ बॉक्स जुळणी :
आउट ऑफ बॉक्स जुळणी म्हणजे संगणकाचे सगळे भाग कॅबिनेटमधे बसवायच्या आधी ते नीट आहेत ह्याची खात्री करुन घ्यायसाठी केलेली तात्पुरती जुळणी होय. कॅबिनेटमधे पार्टस बसवणे हा थोडासा वेळखाउ प्रकार आहे. त्यातुन एखादा भाग खराब असेल तर तो परत काढण्यामधे वेळं जातो. तो वाचवण्यासाठी ही पद्धत वापरतात. सगळ्या स्टेप मधे तुम्ही व्यवस्थित ग्राउंडेड आहात ह्याची खात्री करुन घ्या. एका लाकडाच्या स्वच्छ फळीवर हे उपद्व्याप करा.
*इथे मी माझ्या संगणकामधल्या भागांचं नावं घेउन सांगत आहे. आपल्या कॉनिफिगरेशनप्रमाणे ते नाव बदलुन घ्या.
पद्धत :
१. सुरुवातीला मदरबोर्ड त्याच्या पॅकिंगमधुन बाहेर काढुन घ्या. त्यावर कुठल्याही प्रकारच्या फिजिकल डॅमेजच्या खुणा नाहीत ह्याची खात्री करुन घ्या. सी.पी.यु. सॉकेट सील आहे ह्याची खात्री करुन घ्या. आणि नंतर ते सील सॉकेटपासुन विलग करा.
(एम.एस.आय. ९९० एफ.एक्स. ए.म.३+ मदरबोर्ड)
२. सी.पी.यु. चा बॉक्स उघडुन घ्या. सी.पी.यु. प्लास्टिक सील मधुन बाहेर काढा. ए.एम.डी. चा प्रोसेसर असल्यास प्रोसेसरच्या सगळ्या पिन्स सरळ रेषेमधे उभ्या आहेत ह्याची खात्री करुन घ्या. सगळ्या सी.पी.युंच्या एका कोपर्यामधे एक त्रिकोण असतो तो आपल्या डाव्या बाजुसं खाली येईल अश्या पद्धतीनी सी.पी.यु. धरावा. सी.पी.यु. धरताना त्याच्या पिन्स वाकड्या होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी.
(ए.एम.डी. ८३५० एफ.एक्स. ब्लॅक एडिशन, ४ जी.एच.झेड., डाव्या लाल बाजुमधला त्रिकोण बघा.)
३. मदरबोर्ड वरचा सी.पी.यु. चा क्लँप उघडा. आणि गार्ड फ्लॅप उघडा. मदरबोर्डवरच्या सॉकेटवरसुद्धा सी.पी.यु. सारखाच एक त्रिकोण डाव्या बाजुला खाली दिसेल. सी.पी.यु. चा आणि स्लॉटचा त्रिकोण एकाच बाजुला येईल अश्या पद्धतीनी सी.पी.यु. स्लॉटमधे अलगद ठेवा. कुठल्याही प्रकारचा जोर लावायची गरज नाही. सी.पी.यु. सॉकेटमधे बसला की गार्ड फ्लॅप बंद करायचा आणि क्लँप लाउन टाकायचा. हुश्श्श्श!! संगणकाच्या जुळणीमधला सगळ्यात अवघड भाग तुम्ही पुर्ण केलाय. आता फक्त राहिलं काम म्हणजे ते सी.पी.यु. चं कुलिंग मोड्युल बसवायचं. :)
(सी.पी.यु. मदरबोर्डवर बसवायची पद्धत, ए.एम.डी. फेनॉन II, सी.पी.यु. आणि मदरबोर्ड स्लॉट वरचा त्रिकोण पहा.)
४. सी.पी.यु. बॉक्स मधेचं एक फॅन असतो (शक्यतो एवढ्या अॅड्व्हान्स्ड प्रोसेसरला लिक्वीड कुलिंगचं लागतं, माझ्या स्वतःकडे लिक्वीड कुलिंग आहे. पण त्यासाठी खुप प्रॅक्टीस लागते. त्यामुळे सद्ध्या एअर कुलिंगचचं देतो. चार-पाच दिवसांनी माझा सी.पी.यु साफ करणार आहे त्यावेळी वॉटर कुलिंग कसं बसवतात ह्याचा व्हीडीओ काढीन आणि अपलोड करीन. फॅनचा खालचा भाग अतिशय गुळगुळीत अश्या कॉपर प्लेटनी बनवलेला असतो आणि त्याच्यावर एक थर्मल पेस्टचं पॅड लावलेलं असतं. ते पॅड डिस्टर्ब न होउ देता सी.पी.यु. वरती बसवावं. फॅनचे चारही पाय मदरबोर्डच्या होल्स मधे गेले की फॅनला असणारा क्लँप लॉक करा. आणि चारही स्क्रु लाउन टाका. स्क्रु (असतील तरं) बसवताना नेहेमी डायगोनली बसवावेत म्हणजे काम अजुन सोपं आणि नीट होतं. ह्या फॅनची वायर सी.पी.यु.च्याचं वरच्या भागामधे एक पांधर्या किंवा काळ्या रंगाचा थ्री पिन कनेक्टर असतो त्यावर बसवावा. ही वायर विशिष्ट पद्धतीच्या स्लॉट मुळे उलटी बसु शकत नाही. त्यामुळे चिंता करु नये.
(सी.पी.यु. फॅन बसवताना. हातामधे सी.पी.यु. फॅनची पॉवर पिन. सी.पी.यु. च्या जरा वर जो पांढरा थ्री पिन स्लॉट दिसतोय तिथे बसवण्यासाठी)
(जर का फॅन बॉक्समधुन काढतं असताना हा हिट पॅड चा थर बिघडला असेल तर आफ्टरमार्केट सोल्युशन्स विकत घ्यावी लागतील. त्याचा एक २५ पैश्याच्या नाण्याएवढ्या सपाट थेंब सी.पी.यु. हेडवर टाकायचा आणि क्रेडीट कार्ड नी नीट पसरवुन घ्यायचा. फॅनच्या तळाला असणारा थर अगदी नीटपणे कापसानी/ टिश्यु पेपरनी पुसुन घ्यायचा)
(आफ्टर मार्केट थर्मल पेस्ट सी.पी.यु. हेडवर सोडताना)
(क्रेडिट कार्डच्या सहाय्यानी पेस्ट पसरवताना)
(योग्य पद्धतीनी पसरवलेली थर्मल पेस्ट)
५. रॅम त्याच्या प्लास्टिक पॅकमधुन काढुन घ्यावेत. मदरबोर्डावरच्या रॅमच्या स्लॉटचे दोन्ही क्लँप्स मोकळे करावेत. रॅम वरच्या खाचा आणि मदरबोर्डवरच्या स्लॉटवरच्या खाचा समसमान दिशेला येतील अश्या पद्धतीने जुळ्वुन घ्यावात. रॅम तिरका नं होउ देता एका सरळ रेषेमधे स्लॉटमधे घालावा. रॅम योग्य रितीनी बसल्याची खुण म्हणजे दोन्ही क्लँप्स स्वत:हुन रॅमभोवती लॉक होतात. रॅमच्या दोन स्टिक्स असतील तर मधला एक स्लॉट मोकळा सोडुन तिसर्या स्लॉट मधे बसवावा (DIMM configuration). चार स्टिक्स असतील तर सगळ्या स्लॉट मधे बसवाव्यात.
(मदरबोर्डमधे रॅम बसवताना)
६. एस.एम.पी.एस. बॉक्समधुन काढुन घ्यावा. त्याच्यामधली २० पिनांची एटीएक्स पिनं आणि कुठलीही एक स्क्वेअर फोन पॉवर पिन एकमेकांना जुळवुन घ्याव्या. परत एकदा ही पिन उलटी बसु शकत नाही हे लक्षात घ्या. मदरबोर्डवरच्या २४ पिन स्लॉट मधे ही पिन बसवुन घ्यावी. सी.पी.यु.च्याच. वरच्या बाजुला अजुन एक स्केवर ४ पिनं स्लॉट दिसेल तिथे अजुन एक ४ स्क्वेअर पॉवर पिन बसवुन टाकावी. उलटं बसत नाही.******(जोरजबरदस्ती टाळा)
(२० अधिक ४ पद्धतीची एटीएक्स पॉवर पिन)
(चार पिन्स आणि आठ पिन्स ची एटीएक्स पिन)
(मदरबोर्डवरची पॉवर कनेक्शन्स)
वरच्या फोटोमधे उजव्या बाजुच्या मोठ्या लाल मार्करमधे २० पिनांची एटीएक्स पिन वर बसवा, आणि उरलेल्या ४ पिन मधे कुठलाही एक ४ पिनचा एस.एम.पी.एस. सप्लाय लावा.
प्रोसेसरच्या वरच्या भागामधे एक ८ पिन किंवा ४ पिनचा एटीएक्स सप्लाय असतो तिथे आपल्या मदरबोर्डप्रमाणे ४ किंवा ८ पिनांचा सप्लाय जोडुन घ्या. (बहुतेक सगळ्या आधुनिक मदरबोर्डना ८ पिन सप्लाय लागतो.)
७. ह्या स्टेपला तुम्हाला मदरबोर्डबरोबर आलेली पुस्तिका लागेल. त्यामधे कॅबिनेट कनेक्शन्स चं पानं काढा. पी.सी.ची कॅबिनेट उघडुन घ्या आणि त्याच्या फ्रंट पॅनेलच्या अश्या दिसणार्या पिन्स हलक्या हाताने मदरबोर्डजवळ आणुन ठेवा. कॅबिनेट कनेक्शन्स मधे दाखवल्या प्रमाणे केबल्स जोडुन घ्या. तुमच्या कॅबिनेटला फ्रंट यु.एस.बी. पोर्ट्स असतील तर त्याचीही केबल लगेचं जोडुन घ्या. त्याची आकृती पुस्तकामधे साधारण अशी दिसेल. प्रत्येक मदरबोर्ड उत्पादकाची कनेक्शन्स वेगळ्या पद्धतीची असु शकतात.
(कॅबिनेट फ्रंट पॅनेल कनेक्शन्स)
इथे पिन्स उलट सुलटं बसु शकतात. त्यामुळे ह्या स्टेप ला काळजी घेणं भयानकं आवश्यक आहे. कनेक्शन्स अगदी चार चार वेळा पहा. काही शंका असल्यास नक्की विचारा.
८. तुमचं ग्राफिक्स कार्ड पी.सी.आय. x १६ स्लॉट मधे बसवुन घ्या. कार्डला एक्स्टर्नल सप्लाय लागत असेल तर तो ही बसवुन घ्या. तुमच्या मॉनिटरची एच.डी.एम.आय. किंवा डी.व्ही.आय. पिन कार्डला जोडुन घ्या.
(ग्राफिक कार्ड बसवायची पद्धत)
ह्या स्टेपपर्यंत आलात की संगणकाची टेस्ट बेंच जुळणी झाली. आता परत एकदा सगळ्या वायर्स नीट बसवल्या आहेत ह्याची काळजीपुर्वक तपासणी करा. अजुन हार्ड डिस्क का बसवली नाही असा प्रश्ण बरेचं जण विचारतील. पण सद्ध्या त्याची आवश्यकता नाही. मदरबोर्डला कीबोर्ड आणि माउस जोडुन घ्या. एस.एम.पी.एस.ला पॉवर केबल जोडा. तुमचा संगणक चालु करायसाठी तयार आहे.
९. पी.सी. कॅबिनेटवरचं पॉवरचं बटण दाबा आणि कि-बोर्डवरचं डिलिटचं बटणं दाबतं रहा. तुमच्या पी.सी.ला आत्तापर्यंत जोडलेले सगळे भाग नीट काम करत असतील तर तुमच्या स्क्रीनवर CMOS चा स्क्रीन दिसेल. वेल!!! गुड न्युज. तुमचे सगळे भाग चालु झालेले आहेत आणि फायनल जुळणीसाठी तुमचा पी.सी. तयार आहे. :)
१०. आता ग्राफिक्स कार्ड आणि एस.एम.पी.एस. कडुन मदरबोर्डवर जोडलेल्या सगळ्याकेबल्स काढुन टाका. (सी.पी.यु. फॅनची पिन काढु नका).
११. मदरबोर्डबरोबर एक माउंटिंग ब्रॅकेट मिळालेलं असेल ते कॅबिनेटच्या मागच्या भागात प्रेस करुन बसवा. एक्स्पान्शन पोर्टससमोरच्या सगळ्यात वरच्या दोन पट्ट्या काढुन टाका.
१२. मदरबोर्ड सी.पी.यु. ची बाजु वर आणि कनेक्टर्सची बाजु डावीकडे येईल अश्या पद्धतीने कॅबिनेटमधल्या माउंटींग पॉड्स वर ठेवा. मदरबोर्डवरची सगळी स्क्रु होल्स पॉड्स शी नीट जूळली जातील अश्या पद्धतीने अॅडजस्ट करा. मदरबोर्डबरोबर मिळालेले स्क्रुज फार घट्ट नाही आणि फार लुज नाहीत अश्या पद्धतीने बसवुन घ्या. स्क्रुज जर अति जास्तं घट्ट केलेत तर मदरबोर्ड ला तडा जाउ शकतो. सगळे स्क्रुज बसवलेत की मदरबोर्ड च्या उजव्या वरच्या बाजुला उजवीकडुन डावीकडे असं थोडं जोरात दाबा. म्हणजे मदरबोर्ड नीट बसला की नाही हे समजेल.
(कॅबिनेटमधे मदरबोर्ड बसवताना, मी मदरबोर्डवरचे सगळे कंपोनंट्स आधी बसवुन मग कॅबिनेटमधे बसवतो. तसं सोप्पं पडतं. तसचं ही जुन्या पद्धतीची कॅबिनेट आहे तिच्यामधे प्रिइन्स्टॉल्ड एस.एम.पी.एस. येतो. हल्ली नवीन डिझाईन प्रमाणे एस.एम.पी.एस. खालच्या बाजुला बसवतात.)
१३. एस.एम.पी.एस. ची पंख्याची बाजु कॅबिनेटच्या बाहेरच्या बाजुला येईल अश्या बेताने कॅबिनेटमधे बसवा. बाहेरच्या बाजुनी कॅबिनेटची चार होल्स आणि एस.एम.पी.एस. ची चार होल्स एक दिसतील अश्या बेताने बसवा. चारही स्क्रुज घट्ट पणे बसवुन घ्या
१४. आधी जशी फ्रंट पॅनेल्सची कनेक्शन्स जोडलेली होती त्या पद्धतीने परत जोडुन घ्या. आणि चार-चार वेळा सगळ्या पिन्स तपासा. मदरबोर्डवर तिन्ही पॉवर पिन्स बसवलेल्या होत्यात त्याही परत तश्याचं पद्धतीने बसवुन घ्या.
१५. हार्ड डिस्क ३.५" च्या हार्ड डिस्क बे मधे सरकवुन घ्या. आणि अलाईनमेंट स्क्रुज हलके बसवुन घ्या. एस.एम.पी.एस. कडुन येणारी SATA पॉवर केवल हार्डडिस्कच्या मागच्या बाजुला बसवुन घ्या. हार्ड डिस्क च्याचं बॉक्समधे SATA डेटा केबल मिळेल तिचं एक टोकं हार्ड डिस्कच्या डेटा पोर्टला बसवुन घ्या आणि दुसरं टोकं मदरबोर्डवरच्या SATA पोर्ट ला जोडा. तुमच्याकडे जेवढ्या हार्डडिस्क असतील तेवढ्या सगळ्या अश्याचं पद्धतीने बसवुन घ्या.
(हार्डडिस्क्स ची कनेक्शन्स)
१६. १५ व्या पायरीमधे दिल्याप्रमाणेचं तुमचा डी.व्ही.डी. रॉम ५.२५" च्या बे मधे बसवुन घ्या, बाकी सगळी कनेक्शन्स हार्डडिस्क प्रमाणेचं करुन घ्या.
१७. परत एकदा तुमचं ग्राफिक्स कार्ड पी.सी.आय. x १६ स्लॉट मधे बसवुन घ्या. कार्डला एक्स्टर्नल सप्लाय लागत असेल तर तो ही बसवुन घ्या. कार्डला कॅबिनेटशी जोडण्यासाठी असणारे सगळे स्क्रुज बसवुन घ्या.
१८. कॅबिनेटला जर अजुन फॅन्स असतील तर तेही एस.एम.पी.एस. किंवा मदरबोर्डवरच्या पोर्ट्स्ला जोडुन घ्या.
१९. तुमच्या संगणकाची जुळणी पुर्ण झालेली आहे. सद्ध्यातरी कव्हर्स बंद करु नका. आता परत एकदा पी.सी. बुट करा. आणि डीलीटचं बटणं दाबतं राहुन CMOS मेनु मधे जा. तुम्चा संगणक ऑपरेटींग सिस्टीम इन्स्टॉल करायसाठी तयार आहे. ह्याचं वेळी ग्राफिक्स कार्डचा पंखा आणि सी.पी.यु.चा पंखा फिरतो आहे ह्याचीही खात्री करुन घ्या.
___________________ पुढच्या भागामधे पाहु ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करायच्या दोन्ही पद्धती______________
मी ह्या भागातल्या माझ्या लिखाणावर विशेष खुश नाही. मला सतत काही माहिती कमी पडली आहे किंवा काही माहिती द्यायची राहुन गेली आहे असं वाटतं आहे. कोणाला काही शंका असेल तर जरुर विचारा. मी माझी कॅबिनेट उघडीन तेव्हा एक व्हीडीओ बनवुन इथे देईनचं. कदाचित तेव्हा माझं समाधान होईल. धन्यवाद.
प्रतिक्रिया
16 Apr 2015 - 8:25 pm | लॉरी टांगटूंगकर
झकास, हे सगळं हवंच होतं.
16 Apr 2015 - 9:27 pm | टवाळ कार्टा
झकास पण बर्याच जेतकिंग मधुन शिकलेल्यांची रोजीरोटी बंद करु शकतोस
16 Apr 2015 - 9:57 pm | आजानुकर्ण
हार्डडिस्क आणि रॅम वगळता इतर वस्तू बदलण्याचे धाडस केले नव्हते. हा लेख वाचून बराच आत्मविश्वास आला.
16 Apr 2015 - 10:58 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सुरुवातीला वाटते भिती. एकदा सवय झाली एकदम मेकॅनाईझ होते आख्खी प्रोसेस.
16 Apr 2015 - 11:12 pm | छोटा चेतन-२०१५
खुप सुंदर. खरंच लेख वाचून खुप आत्मविश्वास आलाय.
16 Apr 2015 - 11:29 pm | सतिश गावडे
छान लेख. या प्रकाराची भीती बरीच कमी झाली. :)
17 Apr 2015 - 8:11 am | जेपी
लेखाची प्रिंट मी काढुन ठेवतो..
तेवढ पायाची जरा पाठवुन द्या.._/\_
17 Apr 2015 - 8:12 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
सगळी बटणं चालणारा नवा की-बोर्ड घ्यायचाय का? अधिक माहितीसाठी कृपया व्यनि करा.
17 Apr 2015 - 10:36 am | प्रचेतस
एकदम तपशीलवार माहिती.
प्रोसेसर बसवण्यापेक्षा त्यावरचा पंखा बसवणे हे जास्त किचकटीचं आणि वेळखाउ काम आहे असा माझा अनुभव आहे.
17 Apr 2015 - 10:42 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हिट कंपोसिशन जेल एकसारखी पसरणं जास्तं डोकेदुखीचं आहे. बाकी इंटेलचा पंखा बसवणं खुप डोकेदुखीचं आहे. जरा जास्तं जोरं लावला गेला तर त्याचे पॉड्स मोडतात. सरळ नवा आफ्टरमार्केट फॅन घ्यावा लागतो.
17 Apr 2015 - 10:47 am | प्रचेतस
अगदी.
17 Apr 2015 - 10:52 am | अत्रुप्त आत्मा
ग्रेट!
17 Apr 2015 - 2:06 pm | वेल्लाभट
कसलं लोकोद्धाराचं कार्य करताय तुम्ही कॅप्टन....
जाम आवडलं.
वाह.
आमचे अनेक धन्यवाद तुम्हाला या मालिकेबद्दल. जियो!
19 Apr 2015 - 7:58 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
19 Apr 2015 - 11:07 am | मुक्त विहारि
वाखूसा...
21 Apr 2015 - 8:41 am | प्रमोद देर्देकर
या लेखमालेचा मला खुपच फायदा होतोय. मी माझा २ महिने बंद असलेला संगणक कॅ.जॅ.स्पॅ. यांच्या मदतीने काल चालु करु शकलो. लाख लाख धन्यवाद कॅप्टन. अजुन माहितीपुर्ण लेख येवुद्या. आमच्या शुभेच्छा.
![1](http://www.apneareamein.com/GujarMastani/images/mastani.jpg)
आणि हो आमच्या तर्फे तुम्हाला एक मस्तानी लागु. आम्ही मुंबईकर आहोत दिलेला शब्द पाळतो. नाहीतर काही पुणेरी लोक मस्तानीतला मस्त हा शब्द घेवुन त्यांना मस्त कात्रजचा घाट दाखवतात.
(लेख वाचुन संगणक दुरुस्ती शिकणारा पम्या)
21 Apr 2015 - 2:41 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मस्तानी पिवानु....मज्जानु लैफ....धन्यवाद. पुण्यास आलात की वसुल केली जाईल.
21 Apr 2015 - 12:23 pm | अद्द्या
अगदी ब्येष्ट लेख . डिटेल्ड अगदी
21 Apr 2015 - 2:13 pm | सौंदाळा
अतिशय उपयुक्त लेखमाला
तपशिलवार फोटोंमुळे खुपच सोपे वाटत आहे
21 Apr 2015 - 9:58 pm | पैसा
अगदी डिट्टेल लिहिलंय! एक संगणक तयार करायला हरकत नाही! :)
21 Apr 2015 - 10:02 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
करा करा. काही अडचणं आली तर व्यनि करा.
-संगणखित- :P
22 Apr 2015 - 10:47 am | सस्नेह
एकदम डीट्टेल पाकृ ! करून बघणार !
22 Apr 2015 - 10:56 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
नक्की करा आणि रेसिपीचे फोटो येउद्यात. ही पाककृती अंडं नं घालता केलीत तरचं होईल बादवे.
22 Apr 2015 - 10:57 am | अद्द्या
आणि अगदीच इच्छा झाली अंडं घालायची तर हिट सिंक काढून प्रोसेसर वर घाला .
मस्त ओमलेट मिळेल
22 Apr 2015 - 11:01 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
लोकांनी हा प्रयोग केलेला आहे. हा बघा.
22 Apr 2015 - 11:08 am | अद्द्या
=))
हाहाहा . . पंख्यामुळे मस्त फेटून निघालं ते . .
पण जुना AMD K3 घेतला असता तर अजून लवकर झालं असतं :P
22 Apr 2015 - 11:11 am | कॅप्टन जॅक स्पॅरो
हा ना. त्यापेक्षा ६३०० एफ.एक्स. वर खरपुस निघालं असतं. माझ्या सद्ध्याच्या ८३५० एफ.एक्स. वर मी छोटा केक करु शकतो ह्याची खात्री आहे. लिक्वीड कुलिंग मुळे नीट राहातो.
22 Apr 2015 - 11:20 am | अद्द्या
माझा तोच आहे . एफ एक्स ६३०० .
आणि लिक्विड कुलिंग नाहीये . आरामात चालतो सिस्टम . अगदी हाय रेसोल्युशन गेमिंग ला पण
म्हणून मी मुद्दाम के ३ म्हणालो . त्यानंतर ए एम डी ने बरीच प्रगती केली आहे प्रोसेसर थंड ठेवण्यात .
22 Apr 2015 - 12:50 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
यप. ए.एम.डी. वाले सी.पी.यु. च्या किंमती नियंत्रणात ठेवण्यासाठी अजुनही 32 nm चा डाय वापरतात. इंटेल वाले २२ चा. त्यामुळे ओव्हरहिटींग चा इशु इंटेलच्या तुलनेनी येणारचं :)
पण तरीही तो फारसा गंभीर मुद्दा नाही कारण दर्जाच्या बाबतीत कुठही तडजोड नाही.
22 Apr 2015 - 11:19 am | सस्नेह
अंड्याचं म्हैत नै , पण केक करून बघायला हरकत नै..
30 Apr 2015 - 3:20 pm | gogglya
ची साधारण किम्मत किति असते?
2 May 2015 - 5:22 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
४५०० पासुन काही लाखांपर्यंत.
2 May 2015 - 5:41 pm | पैसा
सध्या सिंगल बोर्ड कॉम्प्युटरकडे लक्ष गेलंय. बनाना पाय. कोणी वापरलाय का?