संगणक घेताना (भाग-१)

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture
कॅप्टन जॅक स्पॅरो in तंत्रजगत
7 Apr 2015 - 7:10 pm

संगणक हा आजच्या जगाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. घराघरामधे आता संगणक असणं हे अनिवार्य होतं चाललेलं आहे. बर्याचं जणांना संगणक/ लॅपटॉप आणि त्याच्या अॅक्सेसरीज घेताना नक्की कॉन्फिगरेशन कसं घ्यावं, कुठल्या अॅक्सेसरीज घ्याव्यात, किंमत आणि हार्डवेअरचं गणित कसं जुळवावं हे प्रश्ण पडलेले असतात. मी संगणक क्षेत्रामधला नाही पण संगणकाचं वेडं आणि स्वतः गेमर असल्यानी हार्डवेअर मधली बरीचं माहिती आहे. त्यामुळे संगणक घेताना साधारण काय काय गोष्टी विचारात घ्याव्यात आणि कुठलं हार्डवेअर त्यासाठी उपयुक्त आहे त्याची माहिती मी ह्या लेखाद्वारे द्यायचा प्रयत्न करणार आहे. आपल्या मिपावरच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि संगणक क्षेत्रातील तज्ञ मंडळींनीही अजुन माहिती द्यावी ही विनंती.

संगणक विकत घेताना सर्वप्रथम विचार करावा तो आपल्या नेमक्या गरजेचा. आपल्याला संगणक नेमक्या काय कामासाठी हवाय हे एकदा नीट समजलं की आपल्याला हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर निवडणं सोप्पं जातं. काही नित्यनैमित्तिक गरजा मी खाली देतोय. तसचं जे हौशी लोकं डु ईट युवरसेल्फ अर्थात (DIY) ला प्राधान्य देतात त्यांच्यासाठी असेंब्ली प्रोसेस सुद्धा देईन दुसर्या भागामधे. संगणक दुकानातुन असेंबल करुन घेण्यापेक्षा किंवा ब्रँडेड घेण्यापेक्षा स्वतः असेंबल केलात तर किमान ४ ते ५ हजार रुपयाचा फरक पडु शकतो. (त्यामधे एखादा टीबी हार्डडिस्क वाढवता येते).

१. ऑफीसचं काम (एम.एस.ऑफिस), थोडा फार टाईमपास म्हणुन गाणी, पिक्चर पहाणं (एच.डी. नाही), मिपावर पडीक रहाणं आणि नेट सर्फिंग इत्यादी. (बेसिक)
२. इंजिनिअरिंग सॉफ्टवेअर्स (कॅड-कॅम-सी.ए.ई.) रेंडरिंग सिम्युलेशन वगैरे, एम-एस ऑफिस वगैरे सॉफ्टवेअर्स. (अॅडव्हान्स)
३. अॅनिमेटर्स/ मल्टिमिडीया क्षेत्रातील लोकांसाठी (लै अॅडव्हान्स)
४. कॅजुअल गेमर्स (इंटरमेडिएट)
५. सिरिअस गेमर्स (लै अॅडव्हान्स)

ह्यापैकी २ ते ५ ह्या प्रकारामधील संगणक हे १ क्रमांकाची सगळी कामं करु शकतात.

गरजेप्रमाणे हार्डवेअर कसं निवडावं ह्यासाठी खालची माहिती निवडा.

१. सी.पी.यु
२. रॅम
३. मदरबोर्ड
४. हार्डडिस्क (सद्ध्या साटा रोटरी आणि साटा सॉलीड स्टेट ड्राईव्ह)
५. ऑप्टीकल डिव्हाईसेस
६. एस.एम.पी.एस. (स्वीच मोड पॉवर सप्लाय)
७. ग्राफिक कार्ड्स
८. कॅबिनेट
९. सी.पी.यु. कुलर
१०. कीबोर्ड माउस
११. यु.पी.एस.
१२. मॉनिटर
१३. मोडेम्/राउटर

१. सी.पी.यु. :

सी.पी.यु. अर्थात सेंट्रल प्रोसेसिंग युनिट हा संगणकाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. संगणकाची कार्यक्षमतेमधे सी.पी.यु. हा सिंहाचा वाटा उचलतो. पर्सनल काँप्युटर्स च्या क्षेत्रामधे ए.एम.डी. आणि इंटेल हे दोन महत्त्वाचे उत्पादक आहेत. जगभरातलं मार्केट विचारात घेतलं तर इंटेल जगातील एक नंबरची कंपनी आहे. दोन्ही कंपन्याचे आपले आपले फायदे तोटे आहेत. इंटेलचे प्रोसेसर्स हे जास्त कार्यक्षम आणि महाग आहेत. तर ए.एम.डी. चे प्रोसेसर कार्यक्षमतेमधे नं जाणवण्याएवढ्या फरकानी मागे आहेत. (अपवाद व्हीडीओ एडिटिंग आणि कॅज्युअल गेमिंग; इथे इंटेलचे सीपीयु मार खातात थोड्या फरकानी) इंटेल पेक्षा ए.एम.डी.ची किंमत बर्यापैकी कमी असते. तसचं इंटेलचे सीपीयु पिनलेस प्रकारचे असतात, त्यामुले सी.पी.यु. ला फिजिकल दुखापत होणं टळतं. ए.एम.डी. मधे मात्र अजुनही पिन्स वाले सी.पी.यु. येतात आणि त्यांना अतिशय काळजीपुर्वक हाताळावे लागते.

AMD
ए.एम.डी. एफ.एक्स. ८३५० ब्लॅक एडिशन अनलॉक्ड पिन सीपीयु

Intel
(इंटेल आय७-४७९० पिनलेस सीपीयु

सी.पी.यु. निवडाल तेव्हा आपण तो कशासाठी वापरणार आहात हे आधी निश्चित करा. हापिसची कामं वगैरे साठी ड्युअल कोअर किंवा कोअर टु ड्युओ चिक्कार झाला. पण अॅड्व्हान्स वापरासाठी मात्र क्वाड कोअर पासुन पुढचेचं सी.पी.यु. विचारामधे घ्यावे.

२. रॅम :

संगणकाची व्होलाटाईल मेमरी. बिगर द बेटर. प्रक्रिया करायची माहिती हार्डडिस्क मधुन किंवा इनपुट डीव्हाइसेस मधुन आलेली माहिती तात्पुरत्या स्वरुपामधे रॅममधे साठवली जाते. हार्डडिस्क/सी.डी./फ्लॉपी वगैरे पेरिफेरल डिव्हाईसेस मधुन माहिती वाचण्याचा वेग मर्यादीत असतो (एस.एस.डी. ह्याला अपवाद आहेत. त्या रॅमएवढ्या वेगाने डेटा रीड आणि राईट करु शकतात.). रॅममधे एस.डी., डीडीआर १, डीडीआर २, डीडीआर ३, डीडीआर ४ आणि डीडीआर ५ असे प्रकार असतात. सद्ध्या किमान डीडीआर ३ असणारा संगणक असणं ही काळाची गरज आहे. "बिगर द बेटर" ही उक्ती इथे सार्थ होते. जेवढा जास्त रॅम तेवढा जास्तं डेटावर आपण काम करु शकतो. तसचं रॅमची फ्रिक्वेन्सी सुद्धा जेवढी जास्तं तेवढा कामाचा वेग वाढतो. आपला मदरबोर्ड जास्तीत जास्त किती फ्रिक्वेन्सी चा रॅम सपोर्ट करतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

shieldless ram
शिल्डलेस रॅम

मदरबोर्डच्या क्षमतेपेक्षा जास्तं फ्रिक्वेन्सी असणारे रॅम चालतात पण ते उगीचचं फेरारीला सिंहगड रोडच्या ट्रॅफिकमधुन बळजबरीनी हळु वेगात न्यायला लागण्यासारखं आहे. रॅममधे घेताना थोडे पैसे जास्तं द्यायला लागले तरी चालतील पण शक्यतो शिल्डेड रॅम घ्यावेत. त्यामुळे रॅममधे तयार होणारी उष्णता जास्तं सहजपणे हवेमधे सोडली जाते.

shilded ram
जी-स्कील रिपजॉज शिल्डेड गेमिंग रॅम

३. मदरबोर्ड :

संगणकाचे सगळ्या भागांची असेंब्ली ही मदरबोर्डवर केबलिंग किंवा सॉकेटिंग करुन केली जाते. मदरबोर्ड मधे वापरानुसार अनेक प्रकार पडतात. सीपीयु चं सॉकेट आणि मदरबोर्डचं सॉकेट हे एकचं असणं अनिवार्य आहे. (म्हणजे माझा सी.पी.यु. एएम३+ ह्या पिन प्रकाराचा असेल तर माझ्या मदरबोर्डलाही एएम३+ ह्याचं पद्धतीचं सॉकेट असणं अनिवार्य आहे.). सीपीयु आणि मदरबोर्ड निवडताना हा पर्याय अत्यंत काळजीपुर्वकपणे विचारात घेणं गरजेचं आहे. किंबहुना विकत घेताना अगदी चार चार वेळा मदरबोर्ड आणि सी.पी.यु.चा सॉकेट नंबर एकचं आहे ह्याची खात्री करुन घ्यावी. मदरबोर्डवर ऑनबोर्ड ग्राफिक्स, साउंड, लॅन आणि यु.एस.बी. कार्ड्स असतात. एक्स्ट्रीम एंड गेमिंग सिस्टीम्स मधे बहुतेक मदरबोर्ड उत्पादकांनी ऑनबोर्ड ग्राफिक्स हा प्रकार काढुन टाकलेला आहे. मदरबोर्डवर किती आणि कुठला रॅम लावु शकतो ह्याला मर्यादा असतात. डीडीआर २ च्या रॅम स्लॉट मधे डी.डी.आर. ३ रॅम बसु शकत नाही आणि वाईस वर्सा.

motherboard
संगणकाचा मदरबोर्ड

ज्यांना एकापेक्षा जास्तं ग्राफिक कार्ड्स लागणार आहेत त्यांनी मदरबोर्डला तेवढे जास्तं एक्स्पांशन स्लॉट्स आहेत ह्याची खात्री करुन घ्यावी.

४. हार्डडिस्क :

हार्डडिस्क चा वापर डेटा साठवण्यासाठी होतो. हार्डडिस्क मधे सद्ध्या साधी रोटरी पद्धतीची हार्ड डिस्क आणि एस.एस.डी. अर्थात सॉलिड स्टेट ड्राईव्ह हे दोन प्रकार उपलब्ध आहेत. दोन्ही पद्धतीच्या हार्डडिस्कला स्वतःचे काही फायदे आणि मर्यादा आहेत. साध्या ड्राईव्ह मधे उच्च स्टोअरिंग कपॅसिटी तुलनेनी कमी किंमतीमधे उपलब्ध असते. ह्या पद्धतीच्या हार्डडिस्क चा वाचन आणि लेखन (रिड अँड स्टोअर) वेग हा त्याच्या आर.पी.एम. वर अवलंबुन असतो. जेवढी उच्च गती तेवढा वेग अधिक असं समिकरणं असतं. ३२००, ५२००, ७२००, १०२००, १२८०० अश्या आर.पी.एम. रेंजेस मधे हार्डडिस्क उपलब्ध असतात. ७२०० आर.पी.एम.ची हार्डडिस्क ही जवळपास सगळ्या अॅप्लिकेशन्स साठी उपयोगी पडते. हार्डडिस्क ला आय.डी.ई. (इंटिग्रेटेड डिव्हाईस इलेक्ट्रॉनिक्स I.D.E.) आणि साटा (सिरिअल अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी अॅटॅचमेंट S.A.T.A.) अश्या दोन पद्धतीच्या डेटा केबल्स आणि सॉकेट्स असतात. ह्यापैकी आय्.डी.ई. आता वापरात नाही. बहुतेक मदरबोर्ड्स उत्पादकांनी आय.डी.ई. स्लॉट्सची संख्या कमी केली आहे किंवा संपुर्णपणे काढुन टाकलेली आहे. त्यामुले जर सेकंड हँड संगणक विकत घेत असाल तर त्यामधे कुठल्या पद्धतीची हार्डडिस्क आहे हे नक्की बघा. रोटरी हार्डडिस्कचे फायदे म्हणजे उच्च साठवण क्षमता, किमान किंमत, तुलनेनी जास्तं स्टोरेज रिलायबिलिटी तर मर्यांदांमधे जास्तं वजन, बराच कमी वाचन आणि लेखन वेग हे होतं.

hdd
रोटरी हार्डडिस्क

एस.एस.डी. ही गेल्या ३ वर्षामधे आलेली आणि अल्पावधीत प्रसिद्ध झालेली नवी टेक्नॉलॉजी आहे. रॅमच्या वेगाने डेटाचं लिखाण आणि वाचन ही ह्याची वैशिष्ट्य आहेत. चक्क ६ जी.बी.पी.एस. एवढ्या वेगाने डेटा वाचता आणि लिहिता येऊ शकतो. डेटा साठवणक्षमतेवर मात्र मर्यादा आहेत (ह्या मर्यादा उत्पादकांनी फायद्यासाठी घातलेल्या आहेत ही गोष्ट तर निश्चित आहे). साधी ६४ जी.बी. क्षमतेच्या एस.एस.डी.च्या किंमतीमधे ५१२ जी.बी.ची साधी हार्डडिस्क येते. सामान्य वापरकर्त्याला एवढ्या वेगवान हार्डडिस्कची गरज नसते. ह्या हार्डडिस्कचे फायदे म्हणजे उच्च वाचन लेखन स्पीड, अत्यंत कमी वजन, रोटरी भागांचा समावेश नसल्यानी कमी झालेला आवाज हे होतं. तर मर्यादा म्हणजे कमी डेटा रिलायबिलिटी, कमी साठवणक्षमता आणि गगनभेदी किंमती.

SSD
सॅमसंग सॉलिड स्टेट ड्राईव्ह

निवडताना बजेट असेल तर एखादी ६४ जी.बी.ची एस.एस.डी. घ्यायला हरकत नाही. ऑपरेटिंग सिस्टीम, नेहेमी वापरली जाणारी सॉफ्टवेअर्स तसचं मोठ्या फाईल्स ह्या हार्डडिस्क वर साठवाव्यात. तुम्ही स्टार्टचं बटणं दाबल्यावर सीमॉस बुट सिक्वेन्स झाल्यावर जेमतेम ८-१० सेकंदांमधे तुमचा संगणक वापरायला तयार. माझं स्वत:चं बजेट असतानाही मी एस.एस.डी. घेणं टाळलं कारणं मला १० सेकंदांच्या फरकासाठी जास्तीचे ८९०० रुपये घालवायचे नव्हते.

५. ऑप्टिकल डिव्हाईसेसः

ऑप्टिकल डिव्हाईसेस मधे सी.डी. रॉम/ रायटर, डी.व्ही.डी. रॉम/ रायटर आणि ब्लु रे ड्राईव्ह. ई.ई. चा समावेष होतो. आता यु.एस.बी. च्या वापरामुळे सी.डी. रॉम/ रायटर जवळपास वापराबाहेर गेलेले आहेत. डी.व्ही.डी. रॉम/ रायटर मात्र अजुन टिकुन आहेत. सामान्य वापरकर्त्यासाठी एखादा डी.व्ही.डी. रिडर/ रायटर खुप होतो. मिडिया अॅप्लिकेशन्स साठी मात्र ब्लु रे विकत घ्यावा. किंमत हा घटक लक्षात घेता ४-५ जणांनी मिळुन एखाद्याकडे ब्लु रे ड्राईव्ह घेणं हा पर्याय योग्य ठरतो. तसाही ब्लु-रेच्या वापराला मर्यादा आहेत. डीव्हीडी-सी.डी एवढा तो प्रचलित नाही.

a
एक्स्टर्नल ब्लु रे ड्राईव्ह
६. एस.एम.पी.एस. अर्थात स्वीच मोड पॉवर सप्लाय :

संगणकाची कार्य ही डी.सी. पद्धतीच्या विद्युतप्रभारावर चालतात. स्वीच मोड पॉवर सप्लायमधे व्होल्टेज ट्रान्स्फॉर्मर कॉईल्स, तसचं ए.सी. टु डी.सी. कन्व्हरटर्स वापरलेले असतात. एस.एम.पी.एस. मधुन +३.३ व्होल्ट, +१२ व्होल्ट, -१२ व्होल्ट, +५ व्होल्ट असे सप्लाय मिळतात. (इथल्या इलेक्ट्रॉनिक्स पार्श्वभुमी असणार्यांनी कृपया ह्याच्यावर अधिक प्रकाश टाकावा). संगणकाच्या इतर भागांचं पॉवर कंझम्प्शन किती आहे हे विचारात घेउन एस.एम.पी.एस. निवडावा लागतो. साधारणपणे आपल्या कंझम्प्शन पेक्षा ३०% जास्त क्षमतेचा एस.एम.पी.एस. घ्यावा. तुमची पीसी च्या कॅबिनेटमधे केबल मॅनेजमेंटसाठी कशी सोय आहे हे विचारात घेउन मोड्युलर किंवा साधा अश्या पर्यायांमधुन योग्य एस.एम.पी.एस. निवडावा. मोड्युलर केबलिंगमधे जेवढ्या हव्या तेवढ्याचं वायर काढता आणि लावता येत असल्यानी अनावश्यक वायर्सची गुंतागुंत कमी होते आणि केसमधे अधिक चांगला एअर फ्लो होउ शकतो. अधिक माहितीसाठी व्यनि करावा. केबल मॅनेजमेंट इज ट्रिकी आर्ट. ;)

http://www.extreme.outervision.com/PSUEngine

वरच्या दुव्यावर आपल्याला अपेक्षित असणारे हार्डवेअर सिलेक्ट करुन ९०% सिस्टीम लोड वर किती पॉवर कंझम्प्शन लागेल ह्याचा आकडा मिळेल. ह्या आकड्याच्या ३०% जास्त क्षमतेचा एस.एम.पी.एस. घ्यावा.

smps
कोर्सेअर मोड्युलर एस.एम.पी.एस. १२०० वॅट, ह्यामधुन एकही वायर डोकवत नाहिये. डाव्या हाताला आवश्यक तेवढ्या वायर्स ऐन वेळी लावायसाठी पोर्टस देण्यात आलेली आहेत

७. ग्राफिक कार्ड्सः

एक्स्ट्रीम गेमिंग मदरबोर्ड सोडले तर जवळपास प्रत्येक मदरबोर्डला ऑनबोर्ड ग्राफिक्स चा पर्याय उपलब्ध असतो. पण ऑनबोर्ड ग्राफिक्स ला मर्यादा असतात. नव्या गेम्स म्हणा किंवा फुल एच.डी. मुव्ही म्हणा किंवा उच्च रेझोल्युशन म्हणा हे ऑनबोर्ड ग्राफिक्स वर शक्य नसतं. त्यासाठी आपल्याला विचारात घ्यावी लागतात ती एक्स्टर्नल ग्राफिक्स कार्ड्स. ग्राफिक कार्ड्सचं काम म्हणजे फक्त आणि फक्त ग्राफिक्स प्रोसेसिंग साठी वेगळा व्ही-रॅम आणि प्रोसेसर पुरवणे जो संगणकाच्या मुख्य प्रोसेसरशी ताळमेळ राखुन उच्च प्रतीचे ग्राफिक्स किंवा रेझोल्युशन मॉनिटरवर दाखवु शकेल. ग्राफिक कार्ड्समधेही दोन प्रकार असतात गेमिंग ग्राफिक कार्ड्स आणि पोस्ट-प्रोसेसिंग ग्राफिक कार्ड्स. ह्यापैकी पोस्ट प्रोसेसिंग ग्राफिक कार्ड्स ही प्रामुख्याने अॅनिमेशन इंडस्ट्रिमधे वापरली जातात. ग्राफिक कार्ड बनवणारे दादा लोकं म्हणरे ए.एम.डी. आणि एनव्हीडिया हे होत. त्यांची डिझाईन रॉयल्टी देउन ओईम द्वारे ग्राहकांना पुरवली जातात. त्यामधे एम.एस.आय., गिगाबाईट, कोर्सेअर वगैरे कंपन्या आघाडीवर आहेत.
gcard
माझं ग्राफिक्स कार्ड ७७९० चिपसेट

काही काही अतिउच्च गेमिंग किंवा पोस्ट प्रोसेसिंग मधे एकापेक्षा जास्त ग्राफिक कार्ड्स लागतात. त्यासाठी एकाहुन जास्तं पी.सी.आय.-ई स्लॉट्स असणारे मदरबोर्ड्सही लागतात. एकापेक्षा जास्त ग्राफिक कार्ड्स लावायच्या दोन पद्धती आहेत, त्या म्हणजे क्रॉसफायर आणि एस.एल.आय. तुमचं ग्राफिक कार्ड कुठल्या कंपनीचं आहे ह्यावरुन ही पद्धत ठरते. ह्याविषयी अधिक माहिती लागली तर नक्की व्यनि करा, विनाशुल्क मदत केली जाईल. ;)

a
एकापेक्षा जास्त ग्राफिक्स कार्ड्स एकाचं मदरबोर्डवर

८. कॅबिनेटः

संगणकाची कॅबिनेट हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. संगणकाचे विविध भाग योग्य जागी बसवण्यासाठी ह्याच्यामधे वेगवेगळे कप्पे असतात. दुर्दैवानी हा एक महत्त्वाचा घटक असुनही बहुतांश लोक फंक्शनालिटीपेक्षा अॅस्थेटिक्सला महत्त्व देताना दिसतात. कॅबिनेट निवडताना तुम्ही संगणकामधे बाकी कुठलं हार्डवेअर आणि किती प्रमाणामधे वापरताय ह्याचा विचार करायला हवा. संगणकाचे विविध भाग वापरामुळे गरम होतं असतात. कॅबिनेट अशी घ्यावी की त्यामधे हवेचा प्रवाह अगदी पुरेश्या प्रमाणामधे हवा. त्यामधे हवेच्या आवागमनासाठी पुश-पुल पद्धतीनी पंखे बसवायची सोय हवी. जर का तापमान नियंत्रणामधे राहिलं तरचं तुमचा संगणक नीट काम करेल. संगणकाचं तापमान जेवढं २२- ५० डिग्री सेल्सियस मधे राहिल तेवढा सिलिकॉन डिग्रेडेशन रेट कमी होईल आणि तुमच्या संगणकाच्या भागांचं आयुष्य आणि रिलायबलिटी वाढेल. तसचं जर का लिक्वीड कुलिंग करणार असाल तर त्याचे रेडिएटर बसवायसाठी पुरेशी जागा आहे का हा विचार नक्की करावा.

a
एन.झेड.एक्स.टी. ओरिजीनल फँटम पी.सी. कॅबिनेट (माझं स्वतःचं कॅबिनेट असं आहे काळ्या रंगात. प्रचंड मोठी आणि जड कॅबिनेट आहे ही

९. सी.पी.यु. कुलर्स:
संगणक वापरामधे असताना सी.पी.यु. मधल्या सेमीकंडक्टर्स मधुन वीजेचा प्रवाह जात असतो. त्यामुळे सी.पी.यु. गरम होतं असतो. ही अनावश्यक असणारी उष्णता सी.पी.यु. मधुन काढुन टाकणं गरजेचं असतं. ह्यासाठी सी.पी.यु. कुलर्स चा वापर केला जातो. सी.पी.यु. च्या पिन्सचा विरुद्ध भाग अतिशय चकचकीत आणि गुळगुळीत केलेला असतो. ह्या भागावर थर्मल पेस्ट समसमान प्रमाणामधे पसरवुन बसवतात. त्यावरती सी.पी.यु. कुलर बसवला जातो. थर्मोडायनामिक्स च्या तत्वाप्रमाणे उष्णतेचं वहन हे उष्ण भागाकडुन थंड भागाकडे होतं असतं. ह्या तत्त्वाचा वापर करुन सी.पी.यु. मधली उष्णता कुलरच्या फिन्सकडे आणली जाते आणि सी.पी.यु. फॅनमुळे ही उष्णता हवेमधे फेकली जाते. सगळ्या सी.पी.यु. बरोबर एक स्टॉक एअर कुलिंग मोड्युल मिळतं. आणि मध्यम वापरासाठी ही बदलायची आवश्यकता नसते.

a
सायलेंट प्रो कंपनीचं सीपीयु कुलिंग मोड्युल

सीपीयु कुलिंगमधला दुसरा प्रकार म्हणजे लिक्वीड कुलिंग. हल्लीचे प्रोसेसर्स आणि त्यातल्या त्यात जर का ए.एम.डी. चे प्रोसेसर्स वापरत असाल तर लिक्वीड कुलिंग चा पर्यायही विचारात घ्यावा. तसचं सी.पी.यु. ओव्हरक्लॉक केलेला असेल तर लिक्वीडकुलिंग नक्की करावं. थोडं महागात पडतं पण सी.पी.यु. चं तापमान मात्र अगदी खात्रीनी कमी होतं. ह्यामधे क्लोज लुप आणि ओपन लुप असे दोन भाग पडतात. ह्यापैकी क्लोज लुप चा पर्याय सामान्य वापरकर्त्यासाठी योग्य ठरतो. ओपन लुपमधे लिक्वीड गळती होउन इलेक्ट्रोनिक भाग खराब व्हायचा धोका जास्तं प्रमाणामधे असतो. त्यासाठी डिस्टील्ड नॉन-कंडक्टींग वॉटर चा वापर काही अॅडीटीव्ह्ज घालुन केला जातो.

a
कोर्सेअर एच१०० आय हे क्लोज लुप लिक्वीड कुलर

१०. कीबोर्ड-माउसः

किबोर्ड आणि माउस निवडताना त्याचं पोर्ट आणि काय कामासाठी वापरणार आहात हा विचार करुन घ्यावा. ह्याच्या पोर्ट्स मधे पी.एस/२ आणि यु.एस.बी. असे दोन प्रकार प्रामुख्याने उपलब्ध आहेत. तुमच्या संगणकाच्या मदरबोर्डला कुठली पोर्टस आहेत ह्याचा विचार करुन की-बोर्ड आणि माउस निवडावे. एक गंमतीची गोष्ट सांगतो. पी.एस./२ हे तुलनेनी जुनं तंत्रज्ञान आहे. पण जर का मदरबोर्डला दोन पी.एस./२ पोर्ट्स असतील तर बिनदिक्कत पी.एस./२ वाले की-बोर्ड माउस निवडावेत, जास्तं व्यवस्थित काम करतात. यु.एस.बी.चं आणि ऑपरेटिंग सिस्टीमचं कधी बिनसेल ह्याचा भरवसा साक्षात गणपतीबाप्पा सुद्धा देउ शकणार नाही.
a
किबोर्ड माउस काँबो

कीबोर्ड माउस अगदी ३९९ पासुन ३०,००० च्या किंमतीच्या रेंजमधे उपलब्ध असतात. (विश्वास बसत नैये ना? फ्लिपकार्टवर किंवा स्नॅपडिल्स वर रोक्कु, रेझर वगैरे च्या किबोर्ड माउस च्या किंमती बघा, साधा माउस १०,८०० वगैरे रुपयाला असु शकतो :) )

११. यु.पी.एस. :

यु.पी.एस. अर्थात अनइंटरप्टेड पॉवर सप्लाय हा प्रामुख्यानं दोनं कामं पार पाडतं असतो. एक म्हणजे व्होल्टेज रेग्युलेशन आणि दुसरं म्हणजे वीजप्रवाह बंद झाला तर किमान चालु असणारं सगळं काम सेव्ह करुन पी.सी. शट डाउन व्हायच्या वेळापुरता बॅकअप देणं. हा निवडायसाठी सुद्धा एस.एम.पी.एस.चचं गणित वापरावं. आणि त्याच्यामधे मॉनिटर आणि एक्स्टर्नल मेमरी डिव्हाईसचं पॉवर कंझंप्शन अॅडवावेत. साधारण ४०० वॅट चा एस.एम.पी.एस. असणार्या संगणकाला ७००-७५० वॅटचा युपीएस घ्यावा.

१२. मॉनिटरः

मॉनिटर निवडताना त्याच्यामधे सी.आर.टी. (ऑब्सोलेट येट नीडेड्)/एल्.सी.डी./एल.ई.डी./एल.ई.डी. स्मार्ट एवढे पर्याय उपलब्ध आहेत. त्यापैकी बेस्ट म्हणजे एल.ई.डी. मॉनिटर घेणे. त्यामधे सुद्धा "बडा है तो बेहतर है" चा फॉर्म्युला वापरावा. शामसंग, फेलजी, मोनी वगैरे ब्रँडचे मॉनिटर उग्गीचं कारणाशिवाय महाग असतात. बेन-क्यु चे मॉनिटर जास्तं चांगला अॅस्पेक्ट रेशो असुनही अगदी योग्य किंमतीमधे मिळतात. स्वत: सॅमसंग आणि बेन-क्यु असे दोन्ही मॉनिटर वापरलेले आहेत. त्यामधे मला कॉस्ट टु परफॉर्मन्स मधे बेन-क्यु सरस वाटला. बाकी ब्रँड म्हणुन घेणार असाल तर मग शामसंग निवडा. स्क्रीनचं रिझोल्युशन जेवढं जास्तं तेवढा सरस व्हिज्युअल एक्स्पेरिअन्स होय. मॉनिटरलाही दोन पद्धतीची पोर्ट्स असतात. डी.व्ही.आय. आणि एच.डी.एम.आय. अशी. बहुतेक सगळ्या ग्राफिक्स कार्डला दोन्ही पोर्टस असतात. तरीही एकदा ग्राफिक्स कार्डला कुठलं पोर्ट आहे ह्याची चार वेळा खात्री करुन घेउन मग घ्यावं. हा.का.ना.का. मॉनिटर जर का गेमिंग कन्सोलला (क्ष-पेटी ३६०, क्ष-पेटी एक, पी.एस.३, पी.एस.४, वी आणि वी.यु. वगैरे) तर एच.डी.एम.आय. घ्या.

a
बेन-क्यु एलईडी मॉनिटर

१३. मोडेम/ राउटरः

जमाना विंटरनेट का है भाई. घरगुती ब्रॉडबँड असेल तर चक्क वायफाय मोडेम+ राउटर घेउन टाकावा. किंमतीमधे फार फरक नाही.

a
डी-लिंक २७५० एन-३०० राउटर

आता झैरातीची वेळ आली.

माझा स्वतःचं कॅज्यउअल गेमिंग प्ल्स सिरिअस इंजिनिअरिंग सिम्युलेशन अँड रेंडरिंग पी.सी.चं कॉन्फिगरेशन असं आहे.

१. सी.पी.यु.= ए.एम.डी. एफ.एक्स. ८३५० ब्लॅक एडीशन अनलॉक्ड, ८ कोअर ४.० जी.एच.झेड., १६ एम.बी. L3 cache मेमरी
२. सी.पी.यु. कुलर= कोर्सेअर एच १००आय २४० एम.एम. लिक्वीड कुल्ड सी.पी.यु. कुलर.
३. रॅम= १६ जी.बी.(४ जी.बी.x ४ स्टिक्स) २३३३, विथ हिट शिल्ड्स
४. हार्ड डिस्क= २ टी.बी. (१ टी.बी. x २) वेस्टर्न डिजीटल (सद्ध्या एक हार्डडिस्क गंडल्यामुळे रिप्लेसमेंटला गेली आहे :( )
५. ग्राफिक कार्ड= ए.एम.डी. एम.एस.आय. ७७९० २ जी.बी. डीडीआर ५
६. कॅबिनेट= एन.झेड.एक्स.टी. ओरिजिनल फँटम एकुण ७ पंखे २०० लिटर पर मिनिट एवढ्या प्रमाणामधे केसमधे थंड हवा घेतात आणि गरम हवा बाहेर टाकतात. शिवाय अतिशय शांत आहेत. जास्तं आवाज करत नाहीत. (खुप मोठी केस आहे, नुसत्या केसचं वजन २३ किलो आहे अॅल्युमिनिअम असुन)
७. एस.एम.पी.एस.= सिसनिक ७५० वॅट्स
८. यु.पी.एस.= आयबॉल उर्जा ९५० वॅट
९. किबोर्ड-माउस= साधे पी.एस/२ मल्टीमिडीया किबोर्ड माउस काँबो
१०. गेम कंट्रोलर्स= (२x) पी.एस.३ यु.एस.बी. रेप्लिका
११. मॉनिटर= बेन-क्यु २३" 4k रेझोल्युशन सपोर्ट (ग्राफिक कार्ड गरिब असल्यानी 2k वरचं आहे :( )
१२. राउटर= डी-लिंक २७५० एन-३००

a

माझा संगणक आतुन असा दिसतो. फक्त हार्डवेअर अजुन जास्तं आहे

काही शंका असल्यास नक्की विचारा. पुढच्या भागात असेंबली ची पद्धत लिहिन.

प्रतिक्रिया

जेपी's picture

7 Apr 2015 - 7:27 pm | जेपी

उत्तम लेख..
मी सध्या जुना संगणक मोडीत काढलाय.नवा संगणक नेटसर्फींग आणी गेमसाठी पायजे.
काही सुचवण्या...
बजेट कमीतकमी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Apr 2015 - 9:57 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

बजेट व्यनि करा ना. सुचवतो हार्डवेअर.

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2015 - 10:53 am | टवाळ कार्टा

ल्यापटोप घेउन टाक नैतर सरळ ट्याब....(म्हाळसा ब्रँडचा असेल तर तितकेच जिवाला ठंड वाटेल ;) )

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 10:57 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

टॅब एक घेउन चालत नै रे...दोन लागतात व्ही कॉन्फ साठी =)) परत म्हाळसा टॅब फोडणार =))

त्यापेक्षा पी.सी. घेतलेला काय वैट? इन्व्हेस्टिंग इन गेमिंग लॅपटॉप इज वेस्ट ऑफ मनी, अनलेस इट्स एलिअनवेअर, विच कॉस्ट यु थ्री किडनीज अँड वन ब्रेन.

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2015 - 11:11 am | टवाळ कार्टा

अर्रे पण जेपीचा गेम वेग्ळा है ना ;)
आणि जेपीच्या म्हाळसाकडे आधीच ट्याब असेल तर? :)

बापू नारू's picture

13 Apr 2015 - 12:47 pm | बापू नारू

"परत म्हाळसा टॅब फोडणार"
तुम्हीपण आहात वाटत पिडीतांपैकी एक ....

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

13 Apr 2015 - 12:56 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

अजुन नाही. अजुन म्हाळसा नाही त्यामुळे सुखी आहे सद्ध्या. ;)

खटपट्या's picture

7 Apr 2015 - 7:42 pm | खटपट्या

चांगला लेख !!

अद्द्या's picture

7 Apr 2015 - 7:54 pm | अद्द्या

ह्यो आला "आपला" विषय :D

अद्द्या's picture

7 Apr 2015 - 7:58 pm | अद्द्या

चांगला विषय , कॅप्टन . . मी सुद्धा गेमर आहे (होतो) .
त्यामुळे यात भर घालत जैन .

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Apr 2015 - 11:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

(होतो) .

वन्स अ गेमर ऑलवेज अ गेमर :)

श्रीरंग_जोशी's picture

8 Apr 2015 - 12:19 am | श्रीरंग_जोशी

एका तपापूर्वी होस्टेलच्या नेटवर्कवर रात्र रात्र मल्टिप्लेयर अनरिअल टुर्नामेंट खेळलो आहे.

तीन वर्षापूर्वी खेळून पाहिलं. अजिबात जमलं नाही :-( .

स्वतंत्र धागा ! स्वतंत्र धागा !

हा विषय प्रचंड व्यापक आहे आणि जिव्हाळ्याचा आहे. नक्कीच तो अनेकांच्या जिव्हाळ्याचा असेल इथे.

अद्द्या's picture

8 Apr 2015 - 3:23 pm | अद्द्या

येस येस

सध्या फक्त रोज २ म्याच (डोटा ) असं हिशोबी गेमिंग चाललंय

अनिरुद्ध.वैद्य's picture

15 Apr 2015 - 12:36 pm | अनिरुद्ध.वैद्य

एज ऑफ एम्पायर वाले आहेत का कोणी? लई मिस करतो मल्टीप्लेयर मोड.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

15 Apr 2015 - 12:38 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

एज ऑफ एंपायर मल्टिप्लेयर खेळुन दोन-चार एजेस उलटुन गेल्या. बहुतेक २००७ नंतर नाहीचं खेळली मल्टिप्लेअर.

एज ऑफ एम्पायर्स सगळे व्हर्जन खेळून झालेत. एज ऑफ एम्पायर्स थ्री जबराट आहे. पण माझा आवडता म्हणाजे एज ऑफ मिथोलॉजी.

हाडक्या's picture

15 Apr 2015 - 8:50 pm | हाडक्या

येस्स येस्स.. आहे.! एओई-२ चा नवीन एचडी वर्जन आलंय पहा. मस्तय.. :)
सध्या ऑनलाईन कम्युनिटीज पण परत जोर धरु लागल्यात त्याच्या. ही एक पहा, आमची फेवरीट.. :))

पगला गजोधर's picture

17 Apr 2015 - 3:11 pm | पगला गजोधर

नका हो …त्या गेमचे नाव घेऊन… काळजाला हात घालू ! नॉस्टाल्जीक होतो…।

एओई मुळे १२ वी नंतर डिप्लोमा करून मग डिग्री करावी लागली. अजुनही कानात आवाज घुमतो आहे शत्रू ने हल्ला केल्याचा. १० वर्षे झालीत.

कपिलमुनी's picture

8 Apr 2015 - 6:46 pm | कपिलमुनी

गेमर = गेमाडपंथीय

अत्रुप्त आत्मा's picture

7 Apr 2015 - 7:58 pm | अत्रुप्त आत्मा

माहितीपूर्ण आणि उपयुक्त धागा!

श्रीरंग_जोशी's picture

7 Apr 2015 - 8:00 pm | श्रीरंग_जोशी

विषयाची मांडणी चांगली केलेली दिसत आहे. सादरीकरण आवडले.

निवांतपणे वाचणे अजून बाकी आहे.

भाते's picture

7 Apr 2015 - 8:24 pm | भाते

संगणकांच्या अंतर्गत भागांविषयी सुमारे दहा वर्षांपुर्वी (पुस्तक प्रदर्शनातल्या पुस्तकात) माहिती वाचली होती. त्याची आठवण झाली.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

7 Apr 2015 - 8:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

धागा माहितीपूर्ण आहे आणि आवडला. आता बेन-क्यु चे मॉनिटर शोधणं आलं.
पूर्वीच्या मॉनिटरचा (साला लै जागा व्यापून टाकतो) टीव्ही वैगरे असा काही उपयोग करता येतो का ?

-दिलीप बिरुटे

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Apr 2015 - 9:13 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

सी.आर.टी. असेल तर चक्क बायबॅक करुन टाका.

सुबोध खरे's picture

7 Apr 2015 - 8:51 pm | सुबोध खरे

एक जरा वेगळा प्रश्न विचारतो आहे.
माझ्या दवाखान्यातील संगणक कोअर २ ड्यूओ E ७५०० @ २.९३ GHZ आहे आणि RAM २ GB आहे. विंडोज XP २००२ वर्जन २ आहे
सध्या हा थोडा हळू झाला आहे याचे काय कारण असू शकेल? माझ्याकडे एका वेळेस फार तर ३ विंडो उघडलेल्या असतात ३२० GB ची हार्ड डिस्क आहे यात सी ड्राईव्ह मध्ये ३२ पैकी ८ GB रिकामे आहेत. बहुसंख्य प्रोग्रामच त्यात आहेत बाकी सर्व डाटा डी इ किंवा एफ ड्राईव्ह मध्येच आहे मग असे का होते? सी क्लीनर वापरून पाहिला पण फार फरक पडत नाही.
XP बदलून विंडोज ७ किंवा ८ किंवा ८. १ घ्यावे लागेल का?

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

7 Apr 2015 - 9:15 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्या कॉन्फिगरेशनला ८.१ इन्सटॉल करण्यात काहीच अर्थ नाही. एकतर व्हायरस असावा किंवा फ्रॅगमेंटेड डेटा. एकदा पॉवर डिफ्रॅगमेंटर नावाचा प्रोग्राम वापरुन सगळे ड्राईव्ह्ज डीफ्रॅग करुन घ्या.

पॉइंट ब्लँक's picture

7 Apr 2015 - 9:21 pm | पॉइंट ब्लँक

डॉ साहेब तीन गोष्टी सुचतात, बाकी इतर लोक सुचवतीलच.
१. हार्ड डिस्क डीफ्रॅग करून बघा एकदा.
२. कुठल्या सर्व्हीसेस चालु आहेत एकदा बघून घ्या, नको असलेल्या बंद करून टाका.
३. एक चांगला अँटी व्हायरस (लेटेस्ट) वापरून एकदा काँम्प्युटर स्कॅन करून घ्या.

अनन्त अवधुत's picture

8 Apr 2015 - 1:48 am | अनन्त अवधुत

XP बदलून विंडोज ७ किंवा ८ किंवा ८. १ घेण्याचा विचार असेल तर हार्डवेअर पण बदला (थोडक्यात नवीन संगणक घ्या)
XPचा सपोर्ट बंद झालाय. तो संगणक आंतर्जालाशी जोडला असेल तर व्हायरस असण्याची शक्यता खूप जास्त आहे.
पॉइंट ब्लँक यांनी सांगितलेल्या तिन्ही गोष्टी कामाच्या आहेत.
अजून एक, संगणकाची कॅबिनेट खूप दिवस बंद असेल तर एकदा कॅबिनेट उघडून आतली धूळ साफ करून घ्या. RAM पण स्वच्छ करा नक्की फरक पडतो. (महाविद्यालयात असताना केलेला प्रयोग आहे आणि तो अजूनही कामात येतो)

जाता जाता: या संगणकाशिवाय तुम्ही एखादा नवा संगणक पण वापरता का? तसे असेल तर तुमचा सध्याचा संगणक हळू वाटणे शक्य आहे.

टवाळ कार्टा's picture

8 Apr 2015 - 10:55 am | टवाळ कार्टा

बरेच पर्याय सुचवले जातील इथे...त्यातले स्वतःला जमले नै तर मला फोनवा...मी येतो (फुकट मध्ये :D ) ...असली कामे घरच्या घरी बर्याचदा केली आहेत कालीजात असताना...

कपिलमुनी's picture

8 Apr 2015 - 6:48 pm | कपिलमुनी

डॉक्टर तुझ्याकडून फी घेणार नाहीत ना :) याची चौकशी कर रे टका !
नाहीतर काढा २०० रु.

( हघ्या)

jinendra's picture

31 Jul 2020 - 10:38 am | jinendra

डॉक्टर साहेब,
माझ्याकडे सुद्धा याच configuration चा pc होता, स्लो झाला होता. हार्डवेअर वाल्यास विचारले असता, अरे याचे काही होणार नाही असा reply आला.

मग इंटरनेट वर थोडी शोधाशोध केली, आणि याला wd ची SSD drive आणि 2 gb extra ram add केली फक्त जुनी हार्ड डिस्क काढून टाकली कारण जर दोन्ही harddisk लावल्या असता थोडा performance slow झाला त्यामुळे पण फॉरमॅट करून जूनी hard-disk वापरता येईल.

आता PC खरंच छान चालतो आहे अगदी फोटोशॉप large files around 300 ते 500 mb साईज् असलेल्या पटकन ओपन होतात. साधारण खर्च रुपये 4500 आला पण PC जवळ जवळ नवीनच झाला फक्त wd ची SSD drive आणि 2 gb extra ram add केली. जरी तुम्ही wd ची SSD drive फक्त जोडली आणि 2 gb extra ram add केली तरी तुमचा पीसी एकदम मस्त चालेल असे वाटते.

शिवाय आता windows 7 टाकले आहे ते पण छान चालते.

कविता१९७८'s picture

7 Apr 2015 - 9:21 pm | कविता१९७८

छान माहीती

जयन्त बा शिम्पि's picture

8 Apr 2015 - 12:12 am | जयन्त बा शिम्पि

खरं म्हणजे अशाच माहितीच्या शोधात होतो. सन्गणक वापरीत आहेच , पण सखोल माहिती आजच मिळाली. धन्यवाद.

अनन्त अवधुत's picture

8 Apr 2015 - 1:29 am | अनन्त अवधुत

कॅप्टन जॅक स्पॅरो, लेख छान आहे. थोडक्यात चांगली माहिती.
तुमचा संगणक आतून फार स्वच्छ आहे. बहुधा एकदम नवा असावा.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 7:23 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तो माझा संगणक नाही. पण जवळपास एवढाचं स्वच्छ असतो :)
रादर लिक्वीड कुलिंग मुळे महिन्यामधुन एकदातरी रेडिएटर साफ करावाचं लागतो.

हे असे लेख येतात आणि परत मिपाच्या जंजाळात ओढून नेतात.

आणि ह्या अशा लेखाला वाखूसा पण नसते.

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 7:20 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

तंत्रजगतच्या लेखांना सद्ध्या वाखु साठवायची सोय नाही. बाकी संन्यास कधी संपवताय ;)

मदनबाण's picture

8 Apr 2015 - 6:40 am | मदनबाण

माझं स्वत:चं बजेट असतानाही मी एस.एस.डी. घेणं टाळलं कारणं मला १० सेकंदांच्या फरकासाठी जास्तीचे ८९०० रुपये घालवायचे नव्हते.
बजेट असतानाही एसएसडी न घेण हे याच नवल वाटल ! एसएसडीचा परफॉर्मन्स अफलातुन आहे ! मी माझा पीसी बदलताना फक्त एसएसडीसाठीच माझे बजेट स्ट्रेच केले. कारण पीसी काही आपण दरवर्षी अपग्रेड करत नाही किंवा बदलत नाही, त्यामुळे नविन घेताना ज्यापण लेटेस्ट हार्डवेअर गोष्टी आहेत त्या घेण्याचा नक्कीच प्रयत्न करावा.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 7:19 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

नुसता १० सेकंदांचा फरक नाही. डेटा रिलायबलिटी माझ्यासाठी जास्तं महत्त्वाची आहे. एस.एस.डी. ची रिलायबिलिटी तुलनेनी खुप कमी आहे. पुढे मागे घेइनही पण त्याच्यावर कुठलाच क्रिटिकल डेटा नसेल. फक्त एंटरटेनमेंट साठी असेल. मी हा पी.सी. बनवला त्यावेळी एस.एस.डी. भयानक महाग होत्या. सद्ध्या बर्‍यापैकी किंमती खाली आल्यात.

तुझ्याकडे दोन एस.एस.डी. असतील तर रेड-० करुन परफॉर्मन्स कसा आहे ते सांग ना. बेंचमार्क स्क्रीनशॉट व्यनि करशिल का?

नुसता १० सेकंदांचा फरक नाही. डेटा रिलायबलिटी माझ्यासाठी जास्तं महत्त्वाची आहे. एस.एस.डी. ची रिलायबिलिटी तुलनेनी खुप कमी आहे. पुढे मागे घेइनही पण त्याच्यावर कुठलाच क्रिटिकल डेटा नसेल.
एसएसडी ड्राइव्ह हा नॉर्मल हार्ड-डिस्क पेक्षा जवळपास ३० % फास्ट आहे. नो वेटिंग फॉर पिसी स्टार्ट अप अ‍ॅन्ड शट डाउन.
Failure Rate { नॉर्मल हार्ड डिस्क } :- Mean time between failure rate of 1.5 million hours
Failure Rate { एसएसडी ड्राइव्ह } :- Mean time between failure rate of 2.0 million hours
शिवाय डिस्क डिफ्र्गॅमेंट करण्याची भानगड एसएसडी मधे नाही...ट्रीम कंमांडमुळे रिड-राईट सायकल डायनॅमिकली ऑप्टिमाइझ होते... शिवाय व्हेंडर प्रोव्हाडेड सॉफ्टवेअर असेल तर चिंता नाही ! पिसी स्लो होणे हा प्रकार जवळपास नाहीच जो नॉर्मल हार्डडिस्कवाल्यांना कधी तरी फेस करावाच लागतो.

डेटा रिलायबलिटी म्हणशील तर हा विषय डेटा सेंटरवाल्यांसाठी जास्त विचार करण्याचा आहे, जश्या एसएसडी ड्राइव्ह अधिक अधिक अ‍ॅडव्हान्स होतील ही चिंता देखील कमी होइल.... होम युझर्ससाठी तरी हा चिंतेचा विषय वाटत नाही.
मी प्रायमरी एसएसडी ठेवली आहे आणि सेकंडरी जुन्या पिसीचीच एचडीडी वापरली आहे.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 10:27 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

ह्म्म्म!! परत एकदा विचार करीन. तु दिलेला डेटा फिजिकल फेल्युअर चा आहे का ऑपरेशन फेल्युअरचा?

मदनबाण's picture

8 Apr 2015 - 11:24 am | मदनबाण

तु दिलेला डेटा फिजिकल फेल्युअर चा आहे का ऑपरेशन फेल्युअरचा?
बहुतेक ऑपरेशन फेल्युअरचाच असावा... तसेही एचडीडी मॅन्यूफॅक्चर करणारे अंडर वॉरटी डिस्क रिप्लेसमेंटचे { किंवा ARR :– annualized rates of return } चे आकडे दर वर्षी जाहीर करतातच असं नाही. हा आकडा ०.५% पासुन १३.५ % पर्यंत जातो.

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- Bhare Naina... :- { Ra One }

नाखु's picture

8 Apr 2015 - 9:10 am | नाखु

आमच्या युवराजांसाठी संगणक घेणे थोडेसे अनिवार्य झाले आहे.आणि डाग्तर "कॅप्टन जॅक " ला विचारायची सोयपण आहे!!!
जियो मिपा जियो !!!
स्वगत अन्या दातारला लगोलग कॅप्टन जॅकचे अपहरणाची तयारी करण्याची सुपारी द्यावी का पूर्ण लेखमाला होइपर्यंत बेत पुढे ढकलावा ??

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 10:30 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

त्याला किडनॅप करायला नका लावु तो वैतागुन परत घरी आणुन सोडेल मला =))
गरज लागेल तेव्हा फोन करा. माहिती देइनचं. लेखमाला पुर्ण व्हायची वाट पाहु नका मला मुड येतो तेव्हाच लिहिलं जातं. वाहनविश्व त्यामु़ळेचं खोळंबली आहे.

मराठी_माणूस's picture

8 Apr 2015 - 10:59 am | मराठी_माणूस

उपयुक्त आणि छान माहीती.

स्वतः असेंबल केलात तर किमान ४ ते ५ हजार रुपयाचा फरक पडु शकतो

स्वतः असेंबल करण्या एव्हढे ज्ञान नाही शिवाय हे पार्ट खात्रिशीर कुठे मिळतात हे सुध्दा माहीत नाही तेंव्हा ब्रँडेड शिवाय पर्याय नाही. चांगला ब्रँड सुचवु शकाल का ? डेस्कटॉप आणि लॅपटॉप दोन्ही साठी

कॅप्टन जॅक स्पॅरो's picture

8 Apr 2015 - 11:03 am | कॅप्टन जॅक स्पॅरो

मी पार्ट्स अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरुन घेणं पसंत करतो. पी.सी. ची जुळणी करणं अजिबात अवघड नाही. पुढचा भाग वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल किती सोप्पं काम आहे ते. :)
ब्रँडेड डेस्कटॉप्स मधे एच.पी आणि लॅपटॉप मधे डेल किंवा एच.पी. बजेट लॅपटॉप हवा असेल तर लेनोव्हो. पण ब्रँडेड डेस्कटॉप शक्यतो टाळा. मेंटेंनन्स च्या कटकटी असतात. कॅबिनेटला सील असल्याने साधी साफसफाई पण करता येत नाही. आणि शिवाय कस्टमायझेशन्स कमी मिळतात.

मराठी_माणूस's picture

8 Apr 2015 - 11:25 am | मराठी_माणूस

धन्यवाद

पुढचा भाग वाचाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल किती सोप्पं काम आहे ते

निश्चित विचार करतो.

अनन्त अवधुत's picture

9 Apr 2015 - 1:01 am | अनन्त अवधुत

"डु इट युवरसेल्फ" या प्रकारात संगणकाचे भाग मिळतात. एका कीट मध्ये आपल्याला हवे असलेले एकमेकांना जोडल्या जातील अश्या प्रकारचे भाग असतात. जोडावे मात्र स्वत:लाच लागतात. उदा. http://www.newegg.com/Store/MasterComboStore.aspx?StoreID=7.
तुम्ही amazon आणि फ्लिपकार्ट म्हणताय म्हणून अजून एक नाव सुचवतो http://www.newegg.com/global/in/ कधी वापरून पहा. (माझा यात वैयक्तिक काही फायदा नाही :) मी न्यू एग (US) वरून काही संगणकाचे भाग घेतले, माझा अनुभव चांगला होता, म्हणून तुम्हाला सुचवतो आहे. ) त्यांच्याकडे भरपूर पर्याय आहेत