हे असे घडणार काही वाटले नव्हते कधी
पोळले तुज चांदणेही वाटले नव्हते कधी
ठरविले वेडा जगाने ना तयाचे दु:ख पण
तू मला वेडा म्हणावे वाटले नव्हते कधी
बेत काही मी उद्याचे योजिले माझ्या मनी
पण उलट पडतील फासे वाटले नव्हते कधी
भेटण्यासाठी तुला मी आतुर जेवढी इथे
तेवढा आहेस तू ही वाटले नव्हते कधी
चंद्र बघतो नेहमी पण एकदा पाहिन धरा
मीच त्या चंद्रावरुनी वाटले नव्हते कधी
सोबती नुरले कुणीही शेवटी सोडेल ती
सावलीही साथ माझी वाटले नव्हते कधी
प्रतिक्रिया
13 Apr 2015 - 8:12 pm | आदूबाळ
काय जबरी आयडी आहे! "नाहिद"चा अर्थ काय?
13 Apr 2015 - 11:07 pm | खटपट्या
आणि नालबंद चा अर्थ पण सांगा
14 Apr 2015 - 12:29 pm | बॅटमॅन
नालबंद हे मुसलमान समाजातील काहींचे आडनाव म्हणून पाहिले आहे. अर्थ स्पष्ट आहे. घोड्यांच्या पायांमध्ये नाल ठोकून बसवणारे ते नालबंद.
13 Apr 2015 - 8:45 pm | चुकलामाकला
सुंदर ग़ज़ल!
फक्त "भेटण्यासाठी तुला मी आतुर जेवढी इथे"
थोडं म्हणताना खटकतं, त्याच्या ऐवजी
"भेटण्यासाठी तुला मी जेवढी आतुरले"
हे चालेल का?
13 Apr 2015 - 9:04 pm | प्रचेतस
मस्तच.
13 Apr 2015 - 10:17 pm | शब्दबम्बाळ
"पोळेल" तुज चांदणेही वाटले नव्हते कधी… असे असावे का तिथे?
अजून एक मत,
"भेटण्यासाठी तुला मी आतुर जेवढी इथे
तेवढा आहेस तू ही वाटले नव्हते कधी"
हे वाचून असेही वाटते कि तो हि कदाचित तिच्या इतकाच आतुर आहे हे तिला माहित नव्हते… प्रत्यक्षात उलट अर्थ अपेक्षित आहे. (अर्थात हे फक्त माझे मत आहे! )
बाकी हे वाचून सुरेश भटांच्या काही ओळी आठवल्या,
तू नभात तारे माळलेस का तेव्हा?
माझियाच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा?
आज का तुला माझे एवढे रडू आले?
तू चितेवरी अश्रू ढाळलेस का तेव्हा?
13 Apr 2015 - 10:55 pm | अत्रुप्त आत्मा
वृत्तात अजुन खटक्यात बसायला हवि होती. बाकी आशय छान आहे.
13 Apr 2015 - 11:03 pm | प्रदीप साळुंखे
होतय तसं कधीतरी, बर असू दे!
14 Apr 2015 - 9:50 am | सस्नेह
यावरून कवि आहे की कवयित्री हे स्पष्ट होईना
14 Apr 2015 - 9:59 am | कहर
मी हेच म्हणणार होतो … अकारण लिंगबदलाची गरज नव्हती.
"भेटण्यासाठी तुला आतुर मी जितुका इथे
तेवढी आहेस तू ही वाटले नव्हते कधी "
हे चालले असते
17 Dec 2023 - 8:41 pm | राघव
छान आहे. आधी वाचायची राहिली.
हे खास! :-)
15 Apr 2024 - 12:17 pm | कुमार१
सुंदर !