काही दिवसांपूर्वी The Real Shine या सुखाचं एक रुप सांगणार्या मुक्तकाचं मराठी रुपांतर इथे केलं होतं. आज मॅक्स एह्र्मान याच्या Desiderata (desired things) या भक्तिकाव्यावर आधारित सुखाची दुसरी एक व्याख्या सांगणारं तसंच एक मुक्तक इथे देतो आहे. मूळ गद्य-काव्य इथे मिळेल.
कोलाहल अन् गर्दी-घाईत
सोडू नकोस संथपणा
विसरू नकोस तुझं हित
शांतता शब्दाविणा
शरण कुणा न जाता
जमेल तिथे जमेल तसे
आदर ठेव सर्वांभूता
जपून कर आपलेसे
तुझं सत्य जरूर मांड, स्पष्ट पण शांतपणे
ऐक मात्र इतरांचंही
तेवढा नक्की मान देणे
अज्ञानींच्या गोष्टीलाही
मनाला जे क्लेश देतील,
आक्रमक ते टाळ नेहेमी
उजवे-डावे करू नको,
उगा कटुता, तू-तू, मी-मी
साऱ्याचा आस्वाद घे - तुझं यश, तुझे इरादे,
साधं असलं तरी तुझ्या ध्येयाकडे लक्ष ठेव
सतत बदलत्या जगामध्ये
तेच खरं तुझं वैभव
काळजी घे व्यवसायात
लबाडीने भरलंय जग
गुणीही काही लोक असतात
त्यांनादेखील शोधून बघ
स्वत्व जप, नाटकी प्रेमाची नको रुजुवात
पण प्रेमाची नको हेटाळणी केंव्हा
निर्मम, शुष्क वास्तवात
प्रेमच आहे खरा ओलावा
वयाचा कर स्वीकार आदराने
आनंदाने निरोप दे तारुण्याला
सामोरा जा समर्थ मनाने
अचानक येणाऱ्या दु:खाला
कष्ट आणि एकटेपण भीतीला घालतात जन्मासी
धाक मनी हवा कशाला कल्पनेतल्या भीतीचा
धीराने वाग, पण कठोर होऊ नकोस स्वत:शी
वृक्ष-ताऱ्याइतकाच आधिकार तुलाही आहे जगण्याचा
विश्व उलगडेलच आपल्या गतीने
तुला समजेल न समजेल तरी
विश्वास ठेव आपल्या मतीने
तुला वाटेल त्या देवावरी
काहीही असोत तुझे कष्ट, आकांक्षा मनातील
जगीच्या कोलाहलात, हृदयात शांतता पहा
फसवणूक, दु:ख, भंगलेली स्वप्ने असतील
तरीही हे जग सुंदरच आहे, आनंदी रहा!
प्रतिक्रिया
24 Mar 2015 - 7:07 am | नरेंद्र गोळे
उच्चारवा भुलू नको, त्यजू नकोस धीरही ।
नकोस सोडु शांतता, हितार्थ घेइ वेधही ॥ १ ॥
अधीन ना कुणास हो, जिवांस आदरे धरी ।
स्पष्ट सत्य अवश्य मांड, ऐक ह्यास त्यासही ॥ २ ॥
अपार क्लेशदायि त्या, नकोस लक्ष देउ तू ।
उणेदुणे करू नको, उगाच काय तू नि मी ॥ ३ ॥
सुखात स्वाद घे पुरा, यशास घे कवेतही ।
उद्दिष्ट साधण्यास तू, अनित्य विश्व जोजवी ॥ ४ ॥
नितांत काळजी करी, जगे हि दंभ भारली ।
गुणांस शोध, दुर्गुणा उपेक्षि, साधना करी ॥ ५ ॥
वयास देइ मान, दे निरोप आदरे सुखा ।
समर्थ हो, खुशाल सोसण्यास दुःख राजसा ॥ ६ ॥
जिवास कष्ट, एकटेपणाच धाक घालती ।
तयाहि जीवनावरी हवाच न्याय्य हक्कही ॥ ७ ॥
कळो तुला न वा कळो, खुलेल विश्व सर्वही ।
तरीहि बाळगी खुशाल धारणा खरीखुरी ॥ ८ ॥
कितीक कष्ट, ईप्सिते, कितीक दुःख, वंचना ।
असून; विश्व मोदमयी, सुखात नांद राजसा ॥ ९ ॥
24 Mar 2015 - 5:40 pm | बहुगुणी
तुम्ही तर माझ्या वीटेला ताजमहालच लावला आहे! अप्रतिम, गेय रचना; प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट!
(आता तुम्हाला आणखी खाद्य आणून द्यायला हवं!)
24 Mar 2015 - 12:34 pm | सस्नेह
दोन्ही काव्ये आणि मुख्य म्हणजे संकल्पना अतिशय सखोल आणि भिडणाऱ्या..!
24 Mar 2015 - 4:57 pm | रायनची आई
धन्यवाद्..अशा सुन्दर कवितेची ओळख करुन दिल्याबद्द्ल...
24 Mar 2015 - 5:58 pm | विशाल कुलकर्णी
वाह...जियो !
दोन्ही काव्ये नितांतसुंदर _/\_