पहिले शेतकरी साहित्य संमेलन : दुसरा दिवस - वृत्तांत
शेती साहित्य आणि पत्रकारिता – परिसंवादाचा वृत्तांत
(वृत्तसंस्थांच्या सौजन्याने)
महात्मा फ़ुले साहित्य नगरी, वर्धा दिनांक ०१/०३/२०१५
बहुजन समाजाच्या लेखणीतून वेदना झळकायला लागल्यामुळेच शेतीसाहित्याचे प्रतिबिंब सर्वदूर पोहचले आहे. त्यामुळे खर्या जाणिवेचे साहित्य जगापुढे येऊ लागले आहे. आजपर्यंत उपेक्षित राहिलेल्या घटकाला आता या साहित्यप्रेरणेमुळेच न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे, असा सूर “शेती साहित्य आणि पत्रकारिता” या विषयावरील पहिल्या अ.भा.शेतकरी मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या दुसर्या दिवशीच्या पहिल्या सत्रात झालेल्या परिसंवादात मान्यवरांनी व्यक्त केला.
संमेलनाच्या स्वागताध्यक्षा सरोज काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, परिसंवादाचे अध्यक्ष अनिल महात्मे, ’महाराष्ट्र टाइम्स’चे निवासी संपादक श्रीपाद अपराजित, देशोन्नतीचे संपादक राजेश राजोरे, विजय विल्हेकर व्यासपीठावर उपस्थित होते.
या साहित्य संमेलानाच्या आयोजनामागची भूमिका विषद करताना कार्याध्यक्ष गंगाधर मुटे म्हणाले, या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तीशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा व्यक्त करून ते पुढे म्हणाले की पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. शेती विषयातील जटील प्रश्न ऐरणीवर आणून शेतीची दुरावस्था बदलायची असेल तर आता शेतकर्यांनी सुद्धा एका हातात नांगर आणि दुसर्या हातात लेखनी धरली पाहिजे. हा संदेश देण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन आहे. ते पुढे म्हणाले की शेतकरी आत्महत्यांच्या बाबतीत शासन उदासिन आहे, साहित्यिक निष्क्रिय आहे, केवळ पत्रकारिता व प्रसारमाध्यमेच जागृत आहेत म्हणून “शेतकरी आत्महत्त्यांचा” प्रश्न ऐरणीवर आहे. नाही तर शेतकरी आत्महत्या हा विषय चव्हाट्यावर आलाच नसता असे सांगून सर्व पत्रकार व पत्रकारितेचे त्यांनी आभार मानले.
श्रीपाद अपराजित म्हणाले, विविध चळवळींचा प्रभाव असल्याने साहित्यातून शेतकरी नायकांना फ़ारसा न्याय मिळाला नाही. म. फ़ुले यांच्या ‘आसूड’ मधून शेतकरी वेदनांचा प्रत्यकारी अनुभव सर्वप्रथम आला. मराठीतील साहित्य मोटेवरच्या गाण्यात रंगले असताना हिंदी साहित्यात प्रेमचंद यांच्या ’गोदान’ने शेतकर्यांच्या कळा प्रखरपणे पुढे आणल्या. सिनेमातूनही विमल रॉय यांच्या ’दो बिघा जमीन’ने याच दु:खाचा जागर केला. नेमाडेंची ’कोसला’, आनंद यादव यांची ’झोंबी’ने तसेच शंकर पाटील, डॉ. विट्ठल वाघ, सदानंद बोरकर, इंद्रजित भालेराव यांनी शेतीसाहित्याला न्याय दिला. आत्महत्याग्रस्त शेतकर्यांचे दु:ख वृत्तपत्रांनीच आकडेवारीनिशी पुढे आणले.
वर्धा जिल्ह्यातील साहेबराव पाटील या आत्महत्या करणार्या शेतकर्यावरील डॉ.विट्ठल वाघ यांची कविता प्रसिद्ध करून वृत्तपत्राने १९८६ च्या दरम्यान पहिले मंथन घडवून आणले, या कडेही अपराजित यांनी लक्ष वेधले. आस्था, व्यवस्था व अवस्था या तीन घटकांचा विचार केल्याशिवाय पत्रकार शेती-शेतकरी यांना न्याय देवू शकत नाही, असे मत राजोरे यांनी व्यक्त केले. पत्रकारितेत क्रिकेट, क्राईम,सिने आणि सेलिब्रिटी या चार ’सी” ला अधिक महत्व दिले जाते. कृषि व शेतकर्यांना गांभीर्याने घेतले जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
अध्यक्षीय मत व्यक्त करताना अनिल महात्मे म्हणाले, कृषि पत्रकारितेला आज प्रतिष्ठा मिळाली आहे. पण, शेती व शेतकर्यांना ती मिळाली नाही. जोपर्यंत शेतमालाला भाव मिळणार नाही तो पर्यंत शेतकर्याला प्रतिष्ठा मिळणार नाही. कारण यामागे शेतीचे अर्थकारण दडलेले आहे. सरकार किंवा राजकीय पक्ष शेतकर्यांचे प्रश्न तोंडी लावण्यापुरते किंवा सत्तेसाठी वापरतात, असा आरोपही त्यांनी केला. आगामी काळात अन्नधान्याचे संकट उभे राहणार आहे. त्यावेळी शेती आणि शेतकरी यांचे महत्व सर्वांना कळेल, असेही ते म्हणाले.
परिसंवादाचे बहारदार संचालन विजय विल्हेकर यांनी केले.
प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव यांची प्रकट मुलाखत अनंतर नांदुरकर यांनी घेतली.
या नंतर शेतकरी कवी संमेलन झाले.
या प्रसंगी अ. भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनानिमित्त “सारस्वतांचा एल्गार” या स्मरणिकेचे प्रसिद्ध कवी इंद्रजित भालेराव याचे हस्ते विमोचन करण्यात आले.
पहिल्या अ.भा. शेतकरी साहित्य संमेलनाचा समारोप रविवारी सायंकाळी मातोश्री सभागृहात झाला. शेतकर्यांना बोलण्याकरिता या संमेलनाचा उपयोग व्हावा, असे मत काही विचारवंतांनी व्यक्त केले तर काहींनी आम्हाला दिशा दाखविण्याची गरज नाही, आम्ही लढणारे आहोत, हे संमेलन आमच्या गंजलेल्या तलवारींना धार देण्याकरिता उपयोगी ठरेल, असे विचार व्यक्त केले.
समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते अँड. वामनराव चटप उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून सनदी लेखापाल संजय पानसे, संजय कोल्हे, स्वागताध्यक्ष सरोजताई काशीकर, कार्याध्यक्ष गंगाधर मुटे, संजय इंगळे तिगावकर उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना अँड. चटप म्हणाले, आम्ही मुळचे शेतकरी संघटनेचे आंदोलक आहोत. लढणे हा आमचा धर्म आहे. आजवर आम्ही अबोल होतो. या संमेलनाने आम्ही बोलू लागल्यास संमेलनाचे यश दिसून येईल. लढा, पुन्हा सज्ज व्हा! व्यक्ती स्वातंत्र्यासोबत बाजार स्वातंत्र्यांचा पुरस्कार आणि रास्त भावासाठी संघर्ष हे तीन मत या संमेलनात व्यक्त झाले. शेतकरी संघटना या तीन मुद्दांचे युद्ध शेवटच्या घटकांना सोबत सोबत घेवून लढणार आहे. त्याशिवाय आपण डोळे मिटणार नाही, असा इरादा शरद जोशी यांनी केल्याची माहिती चटप यांनी दिली.
सांगलीचे संजय कोले म्हणाले, आम्हाला 'अबू मियाच्या भेंडी' इतके तरी स्वातंत्र्य मिळावे एवढेच मागणे आहे. आमच्या नांगराच्या भाराने ते येत नाही. तुमच्या लेखणीने येऊ द्या. पारतंत्र्यातून आम्हाला काढा, भावांचे कर्जाचे मुक्तीचे स्वातंत्र्य मांडा, त्यासाठी शरद जोशी पहिल्यांदा समजून घ्या, असे आवाहनही त्यांनी केले.
अमरावतीचे संजय कोल्हे यांनी याविरूद्ध भूमिका मांडली. ते म्हणाले, साहित्यिकांनी आम्हाला दिशा दाखविण्याची गरज नाही, आम्ही मुळचे आंदोलकच आहोत. हे संमेलन एक प्रयोग म्हणून यशस्वी झाले आहे. थोड्या गंजलेल्या आमच्या तलवारी घासण्यासाठी हा संमेलनाचा 'खरप' कामी पडणार आहे. संजय पानसे म्हणाले, शरद जोशी ज्या व्यक्तीस्वातंत्र्याचा पुरस्कार करतात, त्याचे प्रतिबिंब या संमेलनात पडले नाही. काही गोष्टी गांभीर्याने घ्यायच्या असतात तशी चर्चा न होता, वरवरची चर्चा झाली. या संमेलनात झालेली स्वतंत्र अर्थसंकल्पाची मागणी हास्यास्पद आहे. कारण अर्थसंकल्पाच्या उत्पन्न आणि खर्च या दोन बाजू असतात. यात शेती-कृषी ही केवळ खर्चाची बाजूच आहे. उत्पन्नाची नव्हे! त्यामुळे अर्थसंकल्पाची बाब गैरलागू ठरते. शेती सोडून इतर गोष्टींकडे शेतकर्यांनी मोर्चा वळवावा, सन्मानाने दुसर्या क्षेत्रात जावे, याचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
या समारोप्रसंगी मंमेलनानिमित्त आयोजित आंतरजालस्तरीय गझज, गीतरचना, छंदमुक्त कविता, पद्यकविता, ललित लेख, वैचारिक लेख, शेतीविषयक लेख कथा स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देण्यात आले. संचालन प्रा. राजेंद्र मुंढे यांनी केले.
----------------------------------------------------------
*********
*********
*********
*********
* * * * * *
प्रतिक्रिया
23 Mar 2015 - 8:08 pm | गंगाधर मुटे
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : प्रास्ताविक भाषण
कल्पनाविश्वात रमणार्या आभासी शेतीसाहित्याचा प्रत्यक्ष शेतीक्षेत्राशी काही संबंध उरला आहे किंवा नाही याचा आढावा घेण्यासाठी, मराठी साहित्यविश्व व शेतीमधली वास्तविकता याचा उहापोह करण्यासाठी, नवसाहित्यिकांना सशक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतीक्षेत्राला मराठी साहित्यक्षेत्राप्रती असलेल्या अपेक्षांची जाणीव करून देण्यासाठी आयोजित पहिल्या अ.भा. मराठी शेतकरी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजपर्यंत मराठी साहित्य चळवळ, प्रादेशिक भाषा साहित्य चळवळ, ग्रामीण साहित्य चळवळ, कामगार साहित्य चळवळ, दलित साहित्य चळवळ अशा अनेक व नानाविध साहित्य चळवळी निर्माण झाल्या, अ.भा. स्तरावर साहित्य संमेलने झालीत पण या देशाचा ’कणा’ असलेल्या शेतीची अ.भा. शेतकरी साहित्य चळवळ मात्र कधी उभी राहिली नाही. ज्या देशात बहुतांश जनतेचे उदरनिर्वाहाचे आणि उपजीविकेचे साधन शेती हेच आहे, त्याच देशात सर्वात जास्त उपेक्षा शेतीचीच व्हावी, हा दुर्दैवविलास आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक या क्षेत्राबरोबरच साहित्य क्षेत्रातही शेती क्षेत्राची पीछेहाट झाल्यामुळे निकोप शेतीविषयक मानसिक मनोभूमी तयार होण्यास व शेती व्यवसायाविषयी समाजमनाची सकारात्मक मानसिकतेची जडणघडण होण्यास मारक ठरलेले आहे. साहित्यातून समाजाच्या सामुहिकमनाचे वास्तव प्रतिबिंबित व्हायला हवे; पण मागील काही वर्षाचा शेतीसंबंधित साहित्यिक आढावा घेतला तर ते सुद्धा झालेले दिसत नाही.
“साहित्य हा समाजाचा आरसा असतो” असे म्हणतात. ते जर खरे असेल तर साहित्यात समाजातील वास्तवतेचं, वास्तवतेच्या दाहकतेचं प्रतिबिंब उमटायलाच हवं ना? पण गेल्या १५-२० वर्षांमध्ये देशात ६ लाखापेक्षा जास्त शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत; पण त्याची दखल साहित्यक्षेत्राने गांभीर्याने घेतलेली दिसत नाही किंवा त्याचे प्रतिबिंब साहित्यात प्रभावीपणे उमटलेले सुद्धा आढळत नाही. शेतीतील गरिबीचे, ग्रामीण भारतातील दुर्दशेचे खरेखुरे कारण सांगणारे आणि तशी अभ्यासपूर्ण मांडणी करून योग्य मूल्यमापन करणारे पुस्तक एक शरद जोशी सोडले तर साहित्यक्षेत्रात उपलब्ध नाही. विदर्भप्रदेश गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्यांमध्ये होरपळत आहे पण शेतकरी आत्महत्यांवर सर्वंकश प्रकाश टाकणारे, खोलवर अभ्यासपूर्ण मांडणी करून शेतकरी आत्महत्यांच्या कारणांचा शोध आणि मागोवा घेणारे आज एकही पुस्तक उपलब्ध नसणे ही बाब साहित्यक्षेत्रासाठी शोभादायक नाही. साहित्यक्षेत्रातील ही शेतीसाहित्याची उणीव भरून काढण्यासाठी शेतीशी प्रामाणिक व कटिबद्ध असणार्या लेखक-कवी-गझलकारांनी आता सर्व बंधने झुगारून, स्वत:चा अहंकार बाजूला सारून, वास्तवनिष्ठ, शास्त्रशुद्ध व तर्कसंगत विचाराची अत्युच्च पातळी गाठण्यासाठी प्रथम अभ्यासाला लागले पाहिजे. अभ्यासाला अनुभवाची जोड दिली पाहिजे. आपल्याला जे लिहायचे आहे ते लिहिण्यापूर्वी शेतीअर्थशास्त्राच्या कसोटीवर तपासले पाहिजे. आपण जे लिहिणार असू ते शेतीची बिकट समस्या सोडवण्यासाठी उपयोगी की उपद्रवी याचेही मंथन केले पाहिजे आणि नंतरच लेखनाला सुरुवात केली पाहिजे. काळ्या मातीशी इमान राखणारे लेखन करायचे असेल तर सृजनशीलतेला पहिल्यांदा भ्रामक कल्पनांतून बाहेर काढले पाहिजे. लेखनशैलीचा उपजतपणा, स्फूर्ती, प्रतिभा व परकाया प्रवेश वगैरे कल्पनांना टाळून कृत्रिम का होईना पण वास्तवाला चितारणारी अभ्यासपूर्ण लेखनशैली जाणीवपूर्वक विकसित करण्यासाठी सज्ज झाले पाहिजे.
साहित्यक्षेत्रात आजपर्यंत झालेले लेखन बहुतांशी “शेतीच्या शोषणाला पोषक” असेच लिहिल्या गेलेले आहे आणि “मला जे स्फुरले ते मी लिहिले” हाच दृष्टिकोन त्याला मुख्यत्वे कारणीभूत आहे. साहित्य म्हणजे केवळ वाचकांच्या करमणुकीसाठी लिहायचे नसते, स्वत:ला महानतेकडे पोचविण्यासाठी व स्वत:चे लेखन साम्राज्य वाढविण्यासाठी तर अजिबातच लिहायचे नसते. वाचकाची दिशाभूल करण्याऐवजी त्याला विषयाची योग्य जाणीव करून देण्यासाठी लिहायचे असते, याचा विसर पडल्याने दमदार शेतीसंबंधित साहित्यकृती निर्माण झालेली नसावी, असे समजायला बराच वाव आहे.
केवळ आरशासारखी मर्यादित भूमिका सुद्धा साहित्याची असू नये. समाजमनाच्या सामूहिक जडणघडणीचे व मानवीमूल्यांच्या उत्क्रांतीचे उगमस्थान साहित्य हेच असते कारण मनुष्य जन्माला घालण्यापूर्वी माणसाला एखाद्या विषयात पारंगत करायची देवाकडे अथवा निसर्गाकडे कुठलीही व्यवस्था नाही. त्यामुळे जन्माला आल्यानंतर कुठल्याही माणसाला कुठलाही विषय ज्ञात करून घ्यायचा असेल तर त्याच्यासमोर “साहित्य” हाच एकमेव पर्याय आहे. अनेकजण मानवीमूल्यांच्या जडणघडणीसाठी ’संस्कार’ महत्त्वाचा मानतात. पण ते सत्य नाही कारण संस्कार देणार्याची मानसिक व वैचारिक जडणघडण सुद्धा साहित्यातून झालेली असते. संस्कार देणार्या व्यक्तीचीच जर साहित्याने दिशाभूल केली असेल तर दिले जाणारे संस्कार हे निर्दोष सुसंस्कार नसून सदोष कुसंस्कारच असणार हे उघड आहे. निकोप मानसिकतेचा समाज घडविण्याचे काम मुळात साहित्याचे आहे. म्हणून लेखनी हाती घेऊन खरडणारांना सामाजिक वास्तविकतेचे भान असणे ही मूलभूत गरज साहित्यिकांसाठी अनिवार्य मानली गेली पाहिजे.
बदाबदा पिले प्रसवण्याची रानडुकरांची क्षमता जशी वादातीत असते तद्वतच बदाबदा पुस्तके प्रसवण्याची साहित्यिकांची प्रजनन क्षमता असणे ही काही साहित्यिकाच्या सृजनशीलतेची, सृजनाच्या प्रगल्भतेची कसोटी होऊ शकत नाही. आजपर्यंत हजारो, कदाचित लक्षावधी पुस्तके लिहिली गेलीत पण “शेतीमालाला रास्त भाव मिळत नाही म्हणून शेतीत गरिबी आहे, शेतमाल स्वस्तात लुटून नेला जातो म्हणून गावगाडा भकास आहे” एवढे एक वाक्य लिहिण्याइतपत सुद्धा अभ्यास, वास्तविकतेची जाण आणि भान एकाही साहित्यिकाला असू नये? शेतकर्याच्या पोटी जन्म न घेता, शेतीशी दूरान्वयानेही संबंध नसणार्या शरद जोशींना जे कळले ते शेतकर्याच्या रक्ताच्या, हाडामांसाच्या शेतकरी पुत्र साहित्यिकाला का कळले नाही? याचा निदान शेतकरीपुत्र असलेले साहित्यिक तरी विचार करणार आहेत की नाही? आत्मचिंतन करणार आहेत की नाही? भाकड साहित्यनिर्मितीमुळेच शेतीचे प्रश्न सुटण्याऐवजी आणखी किचकट झालेत, शेतीच्या लुटीच्या व्यवस्थेला आणखी बळ मिळाले, हा दोष साहित्याने व साहित्यिकांनी स्वीकारला पाहिजे.
वास्तवतेशी प्रतारणा करून आभासी विश्वात रमणार्या व कल्पनाविलासाचे मनोरे रचून केवळ पुरस्कार, पारितोषिकांकडे टक लावून बसलेल्या बाजारी साहित्यिकांकडून शेतीला न्याय मिळण्याची शक्यता नसेल तर आता प्रत्यक्ष शेतकर्यांनीच समोर आलं पाहिजे. आमचं आयुष्य जगलो आम्ही, आमचं आयुष्य भोगलं आम्ही. रक्ताचं पाणी करून राबलो आम्ही, हाडाची काडं करून झिजलो आम्ही..... अनुभूती आमची आणि आम्ही म्हणतो आम्ही लिहिणार नाही. दुसर्याने कुणीतरी लिहावं! पिढ्यानपिढ्या उलटून गेल्या पण आमचा शेतकरी बोलायला तयार नाही. मुळात भारतातील शेतकरी मुकाच आहे. तो बोलत नाही, लिहीत नाही आणि वाचतही नाही. हे चित्र बदलायचं असेल तर शेतकर्यांनी एका हातात नांगर आणि दुसर्या हातात लेखनी धरली पाहिजे. हा संदेश देण्यासाठीच या संमेलनाचे प्रयोजन आहे.
या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाचे स्वरूप आपापल्या कौशल्यगुणांचं, प्रतिभेचं प्रदर्शन मांडून वाहवा मिळवणार्या हौशा-गौशा-नवश्यांचा जमाव एवढेच केवळ मर्यादित न राहता साहित्यिकांना कल्पनाविस्ताराठी बौद्धिक मेजवानी देणारे प्रशिक्षण शिबीर ठरावे आणि यातून लेखणीच्या माध्यमातून शेतीची दुर्दशा थांबवून शेतकर्याच्या आयुष्यात सुखाचे व सन्मानाचे दिवस खेचून आणण्याइतपत शक्तीशाली सृजनशील साहित्यिकांची नवी पिढी जन्माला यावी, अशी अपेक्षा आहे.
समाजाची मानसिक जडणघडण व वैचारिक उत्क्रांतीची दिशा बदलण्याची ताकद साहित्यात आहे आणि साहित्याला बदलण्याची ताकद शेतकर्यांच्या मनगटात .....!
म्हणून.... काळ्याआईच्या कष्टकर्यांनो, उपेक्षितांच्या सहकार्यांनो, हक्कासाठी लढणार्यांनो, लोकशाहीच्या पहारेकर्यांनो, स्वप्नं उद्याचे बघणार्यांनो, नव्या युगाच्या निर्मात्यांनो, चला जरासे खरडू काही.....!!
काळ्याआईविषयी बोलू काही......!!!
- गंगाधर मुटे
(दि.२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे संपन्न झालेल्या पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनात कार्याध्यक्ष गंगाधर मुटे यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाचा संपादीत भाग)
-------------------------------------------------------------------------------------------------
23 Mar 2015 - 8:10 pm | गंगाधर मुटे
पहिले शेतकरी साहित्य संमेलन : स्वागताध्यक्षांचे भाषण
अ. भा. शेतकरी मराठी साहित्य संमेलानाच्या या शेतीसाहित्य प्रवाहात सामील झालेल्या सर्वांचे मी मन:पूर्वक स्वागत करते. विचारमंथनावर भर देणारे व व्यापक स्वरुपात आयोजित झालेले हे ऐतिहासिक संमेलन आहे. या निमित्ताने शेती आणि शेतकरी जीवनावर आजपर्यंत लिहिले गेलेले साहित्य हा विषय ऐरणीवर आला आहे. आजपर्यंत अनेक साहित्यिकांनी शेतकर्यांविषयी लिहिण्याचा, कविता करण्याचा प्रयत्न केला नाही असे नाही. पण त्या सर्व कविता, सर्व कथा शेतकरी या देशाचा एक बाशिंदा म्हणूनच लिहिल्या गेल्याचे दिसते. शेतकरी हा अभ्यासाचा विषय आहे, हा विचार त्यात आढळून येत नाही. शेतकरी केवळ बाशिंदा नव्हे तर पोशिंदा आहे. शेतकरी हा या समाज घटकातला सर्वात महत्त्वाचा घटक आहे, या दृष्टिकोनातून मात्र लिखाण झालेच नाही. आयुष्याचे रहाटगाडगे ओढताना व देश जगवताना त्याला काही आयुष्य असेल, त्याची काही स्वप्न असतील, त्यालाही जीवनात कुठे निवांतपणा हवा असेल, असा विचार कोणत्याही साहित्यात उमटला नाही. त्याच्या बद्दलची कणव शिवाजी राजे, ज्योतिबा फुले, गाडगे बाबा यांच्या विचारातून दिसून येते; पण त्याचा खोलवर विचार पुढच्या साहित्यात दिसून आला नाही. आमच्या सारख्या सुशिक्षित म्हणविणार्यांच्या तर गावीही शेतकर्यांच्या गहन आयुष्याची जाण नव्हती. हे साहित्य वाचून शेती म्हणजे मौज मजा, हिरवळीत मन हरवून जाणारे दृश्य, मोटेचे पाणी, खिल्लारी बैलजोडी, गडी माणसांचा राबता, परसदारावरची ताजी भाजी, दूध-दुभतं, दही, लोणी आणि वर मस्त पैकी हुरडा पार्टी या सगळ्या गोष्टींचा बाजच काही वेगळा असावा असा भास होत असे. हीच सगळी वर्णने शेती विषयक काव्यातून, कदंबर्यामधून वाचायला मिळत होती.
१९८० साल उजाडलं. शेती शेतकरी यांच्या समस्यांवर भाषणं होऊ लागली, आंदोलनं होऊ लागली आणि पूर्वी डोळ्याच्या ऑपरेशन नंतर बांधलेली हिरवी पट्टी काढली की पुन्हा स्पष्ट दिसत असे, तसेच शेतीच्या हिरवळी आडचे प्रश्न आम्हाला लख्खपणे दिसू लागले. “चार झोपड्यांचे खेडे मला लखलाभ” यातला फोलपणा जाणवयला लागला. पुन्हा पुन्हा शेतीशी संबंधित साहित्य उलगडण्याचा प्रयत्न केला पण त्यात खरी शेती, खरा शेतकरी, त्याचे प्रश्न याचा मागमूस ही नव्हता. एखाद्या रम्य नाटकाचे चित्रण व कथन जसे मुंबई पुण्यात बसून लिहिल्या जात असत तोच फोलपणा यात दिसून आला, शेतीचे सुंदर चित्रण चौपसी चिरेबंदी वाड्यातच हे सत्य गाडून राहिले असते जर शरद जोशींचे शेती विषयक खरे साहित्य दर्शन झाले नसते तर.
शरद जोशींच्या शेती विषयक साहित्यातून शेतकर्यांचे खरेखुरे प्रश्न पुढे आले. कारण हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी टिपले, एक एक गाव, खेडे, मोठे शेतकरी, छोटे शेतकरी, शेतमजूर जे या मानव जातीच्या उत्कर्षाचा पाया होते, तेच या जमिनीत गाडले गेले होते. गावातल्या पाटलांकडे गेल्यावर फक्त समोरचा तक्तपोस, त्यावरची चादर आणि बैठक सोडली तर आत नुसताच अंधार. जर ५० एकर जमिनीच्या मालकाकडे अंधार असेल तर ज्यांच्याकडे १०, १५ एकर किंवा भूदानाची २ एकर असेल तर त्यांचं काय? घरची शेती वाहून चार दिवस दुसरीकडे मजुरीला जाणे हीच त्यांची जीवनशैली.. पाटलीन शेतात कामात गढलेली, म्हातारा बाप कुठंतरी दोरखंड वळत, आजी फाटकी गोदडी शिवत, छोटी मुलं शेण गोळा करत किंवा छोटी भावंडं सांभाळत आहे, हेच चित्र सर्वदूर खेड्यात दिसत असे. हे दु:ख, विदारक चित्र बघायला कोण येणार? कारण गावात जायला रस्ता नाही. एखादी बस किंवा गाडी चुकून-माकून गेली तर धुळीने अभ्यंग स्नान होत असे. गावाच्या बाहेर येऊन दु:ख सांगायचे कोणाला? जो गावातून नोकरीला गेला तो फक्त शेतीतील पीक मागायलाच आला. बदल्यात “तुला शेतीच करता येत नाही” असा सल्ला देऊन गेला. खूपच कणव वाटली तर आपले जुनेरं कापड ठेवून गेला. पुढार्यांचे तर बरेच बरे होते. पाच वर्षातून एकदा यायचे. शेती विरोधी कायदे करताना मूग गिळून बसायचे. मत घेताना गोडगोड बोलायचे. मग तो शेतकरी कोणाकडे व्यथा मांडणार?
शेतकर्याचे चित्रण योग्य शेती न करणारा, लोकसंख्येत वाढ करणारा, व्यसनी, अडाणी, दारुडा हेच समाजापुढे मांडल्या गेले. योग्य प्रकारे शेती का करता आली नाही, याचा अभ्यास कोणी केला का? लोकसंख्या वाढू नये म्हणून आरोग्याची दखल कोणी घेतली होती का? अडाणी नसावा म्हणून शिक्षण दिल्या गेले काय? व्यसनी व दारुडा होऊ नये म्हणून त्याच्या आयुष्यात, भविष्य-वर्तमानात बर्यापैकी जगण्याची संधी कधी निर्माण केल्या गेली का? हे सर्व प्रश्न ज्यांना दृष्टी आहे, मन आहे त्यांच्या करिता मन हेलावून टाकणारे आहेत. ज्यांना सत्य समजून घ्यायचे नाही त्यांच्या करिता विचार न केलेलाच बरा!
उत्तम शेती ज्याच्या स्वप्नरंजनात आपण १९८०-८५ पर्यंत जगलो (काही आजही जगत आहेत.) ती कनिष्ठ कशी झाली? शेतकरी एकाएकी आळशी कसा ठरला? व्यसनी का झाला? याचं उत्तर जर साहित्याने शोधलं असतं तर शरद जोशींना गेली ३५ वर्षे शेतीचे सत्य साहित्य शोधण्यात व ते जगन्मान्य करण्यात घालवावे लागले नसते आणि शेतकरी चळवळ आणखी पुढे गेली असती. या साहित्य संमेलनाकडून मला शेतकर्यांच्या व्यथा, कथा, काव्य इतक्या पुरत्याच मर्यादित अपेक्षा नाहीत. या सर्व साहित्यिकांनी सत्य शोधन करून शेतकरी विरोधी कायद्यांवर हल्ले चढवणे गरजेचे आहे असे मला वाटते. शेतकर्याला भीक नको आहे. तो पोशिंदा आहे. अठरा पगड समाजाला काम देण्याची त्याची क्षमता कोणी मोडून काढली याचा शोध घेणे आवश्यक आहे.
अन्नदात्याला कर्जबाजारी का व्हावे लागले, याचे उत्तर आजच्या सुशिक्षित समाजापुढे साहित्याच्या माध्यमातून मांडून, आज पर्यंत उपेक्षीत, दुर्लक्षित असलेल्या शेतकरी समाजाचे खरे वर्णन यावे ही अपेक्षा आहे. शेती, शेतकरी, शेती प्रश्न, कायदे, अर्थव्यवस्था या सर्व गोष्टींवर सत्य प्रकाश टाकणारी ग्रंथरचना आदरणीय शरद जोशींनी केलेली दिसून येते. शेतकरी साहित्याची ही वाट चालण्याकरिता पथ प्रदर्शनाचे काम अंगारमळ्यातील साहित्य करू शकेल याची मला खात्री आहे. शेती, शेतकरी जीवनाचा भविष्यवेध घेण्याकरिता हे संमेलन मैलाचा दगड ठरेल अशी म. गांधींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या वर्धा भूमीत भरलेल्या पहिल्या शेतकरी मराठी साहित्य संमेलनाकडून माझी अपेक्षा आहे.
- सौ. सरोज काशीकर
स्वागताध्यक्ष
(दि.२८ फ़ेब्रुवारी व १ मार्च २०१५ ला वर्धा येथे संपन्न झालेल्या पहिल्या शेतकरी साहित्य संमेलनात स्वागताध्यक्ष सौ. सरोज काशीकर यांनी केलेल्या प्रास्ताविक भाषणाचा संपादीत भाग)
---------------------------------------------------------------------------------------