ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी'......एक लघूकथा. स्पर्धेसाठी नाही.....

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
16 Feb 2015 - 7:18 pm

Human Shadow on Divine Beauty...

या गोष्टीचे नाव इंग्लिशमधे का आहे याचे उत्तर फार सोप्पे आहे. ज्या चित्रामुळे ही गोष्ट घडली त्या तैलचित्राचे नाव ब्रुनो फर्नांडिसने, म्हणजे ज्याने हे चित्र रंगविले होते, इंग्लिशमधे ठेवले होते. जे झाले ते लिहिले आहे त्यामुळे अलंकारिक भाषेला वाव नाही.....असो....

दिल्लीच्या नॅशनल आर्ट गॅलरीमधे देशातील अत्यंत प्रगल्भ अशा चित्रकारांच्या तैलचित्रांचे चित्रांचे प्रदर्शन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात गेली कित्येक वर्षे भरत आहे. या गॅलरीमधे शेवटच्या कोपऱ्यात दुसऱ्या मजल्यावर एका मुख्य इमारतीपासून अलग झालेल्या षटकोनी छोट्या खोलीत या प्रदर्शनाचा एक भाग आयोजकांना ठेवावा लागतो. जरा आडबाजूला असल्यामुळे या खोलीला फार लोक भेट देत नाहीत पण त्यामुळे या खोलीत सर्वोत्कृष्ट अशा पाच चित्रकृती ठेवण्याचा एक पायंडाच पडून गेला आहे. अर्थात जे खरे रसिक आहेत ते या खोलीला भेट देण्याचे टाळत नाहीत किंबहुना अनेक मान्यवर व रसिक ज्यांना चित्रकलेत गती आहे ते फक्त याचे खोलीला भेट देऊन परत जातात. पण क्रिकेट, ज्याचा प्राण अनिश्चितेत असतो त्याप्रमाणे कलेत कोणाला काय आवडेल हे अनिश्चित. त्यामुळे कुठले चित्र श्रेष्ठ हे सांगता येत नाही व सांगूही नये पण ही खोली व त्यातील चित्रे या नियमाला अपवाद असावीत. आजवरच्या इतिहासात या खोलीतील चित्रांना सर्वात जास्त किंमत मिळाली आहे. हुसेनचे जे चित्र दोन कोटीला विकले गेले ते याच खोलीतून असे म्हणतात.

त्यादिवशीही त्या खोलीत ब्रुनो त्या खोलीत आपल्या चार चित्रांच्या खोलीत एका टेबलावर एकटाच बसला होता. त्या छोट्या टेबलावर त्याची अवाढव्य आकृती त्याच्या समोरच्या स्केचबुकवर झुकली होती. चष्मा नाकावर घसरला होता व त्यामागे त्याचे पिंगट डोळे मिचमिचे झाले होते. स्वारी कुठल्यातरी विचारात गढून गेली होती. हातातील पेन्सील त्या कागदावर झरझर फिरत होती.....काय चालले होते कोणास ठाऊक. ब्रुनोला जगाचे भान नव्हते. मधे मधे मानेला रग लागली की तो मान वर उचले व परत त्या कागदावर डोके खुपसे. अशाच एका क्षणी त्याने मान उचलून खोलीत आपली नजर फिरवली. खोलीच्या एका भिंतीला तो बसला होता व उरलेल्या पाचपैकी चारवर त्याची चार चित्रे. एक बाजू पूर्णपणे रिकामी होती. एका भिंतीवर असलेल्या एका चित्रासमोर एक सुंदर स्त्री त्या तैलचित्राचा आस्वाद घेत उभी होती. त्या तैलचित्राचे नाव होते ‘ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी’

तिच्या मागे बाकावर एक उमदा देखणा तरुण बसून त्या चित्राचा व त्या स्त्रीच्या सौंदर्याचा आस्वाद घेत बसला होता.

त्या चित्राच्या समोरच्या भिंतीपाशी एक गोरीपान, दात थोडेसे पुढे असलेली, सरळ व तरतरीत नाकाची आंग्ल तरुणी तिच्या मित्राबरोबर दुरुन पण याच चित्राचा आस्वाद घेत होती. तिच्या व्यक्तिमत्वात एक जादू होती. बहुदा ती तिच्या निळ्याशार डोळ्याची असावी. उजव्या भिंतीपाशी कॉलेजमधील जीन्स घातलेला एक तरुण व तरुणी हातात हात गुंफून, मोठ्या आवाजात बोलत तेथील एकांताची मजा घेत होती. ब्रुनोने त्या सर्वांकडे एक नजर टाकली. तो मनाशीच हसला व त्याने परत कागदावर लक्ष केंद्रीत केलं.

त्यातील त्या सुंदर तरुणीला ब्रुनो ओळखत होता. खरे म्हणाल तर त्या तरुणीला कलाजगतात सर्वजणच ओळखतात. त्या आंग्ल तरुणीबरोबर असलेल्या तरुणालाही तो ओळखत होता. तोही एक धडपडणारा कलाकार होता व परदेशी ग्राहकांना चित्रे खरेदी करण्यासाठी मदत करण्याचा त्याचा धंदा होता. एक नंबरचा गांजेकस !

अरुंधती जगताप एका मोठ्या आंतराष्ट्रीय कंपनीची मॅनेजिंग डायरेक्टर ! कोकणातील एका छोट्या गावातून शहरात येऊन स्वत:च्या हिमतीवर ती आज एका मोठ्या कंपनीत सगळ्यात वरच्या पदावर पोहचली होती. या सगळ्या वाटचालीत बिचारीला स्वत:कडे लक्ष देण्यास तिच्याकडे वेळच उरला नव्हता. नाही म्हणायला तिला चित्रे जमा करण्याचा एक छंदच जडला होता. कधी तरी मुड लागल्यावर ती स्वत: चित्रे काढायला बसत असे पण तिची जवळजवळ सगळीच चित्रे अर्धवट पडली होती. दिल्लीतील एका उच्चभ्रू वसाहतीत शेवटच्या मजल्यावर असलेल्या भल्यामोठ्या फ्लॅटमधे असलेल्या तिच्या स्वत:च्या आर्ट गॅलरीमधील चित्रे पाहण्यास मिळावीत म्हणून भलेभले धपडत असतात. या सगळ्या धडपडीत तिचे लग्नही राहिले होते.

चित्रासमोरुन बाजूला होत ती ब्रुनोबरोबर जरा बोलावे म्हणून मागे वळाली तर ब्रुनो तेथे नव्हता. नंतर बोलू असे मनाशी म्हणून ती बाहेर पडणार तेवढ्यात तो बाकावरचा तरुण घाईघाईने उठला व तिच्या मागे आला.

‘एस्ज्युज मी ! हे माझे कार्ड !’

तिने ते नाखुषीनेच हातात घेत त्याच्याकडे नजर टाकली.

‘प्लीज कॉल मी इफ यु आर इन्टरेस्टेड.’ असे म्हणून तो बाहेर पडला देखील.

खाली पार्कींगमधे मर्सिडीसला चावी लावताना अरुंधतीला त्या कार्डाची आठवण झाली. तिने गाडी तशीच चालू ठेऊन पर्समधील ते कार्ड हातात घेतले. त्यावर फक्त त्या तरुणाचे नाव व फोन नंबर होता. नावाखाली बारीक अक्षरात ‘जिगोलो’ असे लिहिलेले वाचल्यावर मात्र हसून तिने ते कार्ड परत पर्समधे टाकून दिले. घरी परत जाताना मात्र तिच्या मनात विचारांचे वादळ उठले. ‘काय हरकत आहे? आज सगळी सुखे आपल्या पायाशी लोळण घेताएत. स्वकष्टार्जित पैशाने सगळे विकत घेतले आहे. आता आपली सगळी कर्तव्ये आपण पार पाडली. घरादाराची सगळी आर्थिक विवंचना आपल्यामुळे मिटली. हे एक सुखही जर पैसे टाकून मिळविले तर काय हरकत आहे? आजवर आपल्या शरिराला पुरुषाचा असा स्पर्ष झालाच नाही.’ कॉलेजमधील काही मित्रांचे ओझरते, कळत नकळत होणारे स्पर्ष आठवून तिच्या शरिरावर रोमांचही उभे राहिले. एका झटक्यात तिने तो विचार बाजूला सारला पण रस्त्यात मधे मधे येणाऱ्या गाड्यांसारखे ते विचार परत परत तिच्या मनात घिरट्या घालू लागले. त्या चक्री वादळाने तिचा चेहरा घामेजून गेला. तिने झटकन गाडी बाजूला घेतली. पर्समधील कोलोनने सुगंधीत केलेल्या वाईप्सने तिने चेहरा खसाखसा पुसला. पण चेहरा पुसला म्हणून विचार पुसता येतात की काय ? त्या विचारांनी तिला पुरते छळले. घरी गेल्यावर त्या विचारांच्या नावाने आंघोळ करण्याचे ठरवून ती शॉवरखाली उभी राहिली पण तेथेच आरशासमोर आपल्या सुंदर शरिराकडे पाहताना त्याला फोन करण्याचा तिचा विचार पक्का झाला. गाऊन लपेटून बाहेर येताच तिने अधिरतेने आपली पर्स उघडली व रामसिंग जडेजाला फोन लावला..........

अरुण जगदाळेला लिस माल्कमचा इ-मेल आला तेव्हा तो खुष झाला. बऱ्याच दिवसात त्याची सेवा कोणीतरी मागितली होती. आणि ती सुद्धा विदेशी कंपनीने. त्याचे नाव त्यांना कोणी सुचवले असले फालतू प्रश्र्न न विचारता त्याने लगेचच होकार भरला होता. पैसे डॉलरमधे मिळणार होते. शिवाय लिसच्या प्रोफाईलवर जाऊन तिची माहिती पाहिल्यावर या प्रस्तावाला नकार द्यायचे काही कारणच उरले नव्हते. लिसबरोबर भारतात काही काळ हिंडण्यासाठी पैसे मिळणार ही कल्पनाच त्याला नितांत भावली. एकतर ती सुंदर होती, तिचे हास्य मोहक आणि डोळे निळेशार होते. तो आणखी एका कारणाने खुष झाला कारण तिची चित्रकलेची उच्च दर्जाची जाण. म्हणूनच मेट म्युझियमने तिची ब्रुनोची चित्रे विकत घेण्यासाठी निवड केली असणार. लिस आदल्या दिवशीच दिल्लीला पोहोचली होती. अरुण तिला घेण्यासाठी विमानतळावर जातीने हजर होता अर्थात तो त्याच्या कर्तव्याचाच भाग होता म्हणा. रात्री तिला हॉटेलवर सोडून सकाळी तिला घेऊन तो आर्ट गॅलरीवर पोहोचला. ब्रुनोला प्रत्यक्ष पाहताच लिस खुष झाली. त्याच्याशी गप्पा मारताना ती अरुण तेथे आहे आहे हे विसरुन गेली. त्याला ब्रुनोची थोडी असुया वाटली खरी पण ब्रुनो होताच तसा. तेही त्या चित्राचा आस्वाद घेऊन झाल्यावर तेथेच थोडावेळ रेंगाळले. इतर तीन तैलचित्रे बघताना त्यांचा ते तैलचित्र कसे मिळवायचे यावरच खल चालला होता. ते ब्रुनोला भेटण्यासाठी मागे वळले तर ब्रुनो जागेवर नव्हता. त्याला उद्या भेटू असे ठरवून ते दोघे बाहेर पडले.

‘लिस आता काय करणार आहेस ? चल कॉफी घेऊ !’ अरुण म्हणाला.

‘नको मी आता हॉटेलवर जाऊन आराम करणार आहे. मी तुला रात्रीच्या जेवणाचे निमंत्रण देते.’

‘लिस त्यापेक्षा मीच तुला माझ्या घरी जेवण्याचे आमंत्रण देतो. माझी काही पेन्टींग्ज तुला दाखवायची माझी इच्छा आहे..अर्थात ती घेण्याचा तू विचार करावास असे माझे मुळीच म्हणणे नाही’

लिसने विचार केला. ‘हॉटेलवर नुसते जेवण्यापेक्षा चित्रांचा अभ्यास करणे बरे. काय सांगावे एखादे चांगले चित्र स्वत:साठी स्वस्तात हाती लागून जाईल. पुढेमागे त्या चित्राला चांगली किंमतही येऊ शकेल.’ ‘पण या वेळी मागच्यावेळी केला तसा मूर्खपणा नको. त्याची सही व इतर माहिती त्याच्या मागेच लिहून घ्यावी व त्यावरही त्याची सही घ्यावी.’

थोडेसे आढेवेढे घेऊन तिने होकार दिला.

‘ठीक आहे ! हा माझा पत्ता हॉटेलच्या टॅक्सी ड्रायव्हरला हे कार्ड दाखव. तो तुला बरोबर घेऊन येईल......

राहूल व नीना त्या दिवशी कॉलेजला दंडी मारुन सरळ आर्टगॅलरीवर भेटले. निवांत अशी जागा याहून दुसरी कुठे मिळणार ? परत कॉलेजच्या जवळ. दोघेही इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला शिकत होते. श्रीमंत बापाची श्रीमंत पोरं! घरच्यांना ते लग्न करणार याची कुणकुण होतीच पण यांच्या धाडसात विघ्न कशाला म्हणून त्यांनी यांना त्यांचे प्रकरण त्यांना माहीत आहे हे कळून दिले नव्हते. त्यांच्या आईवडिलांनी लग्नासाठी कुठले हॉटेल बूक करायचे हेही ठरविले होते म्हणजे बघा. त्या ब्रुनोच्या खोलीत वर्दळ नसल्यामुळे गेले आठवडाभर ते याच चित्रांचा आस्वाद घेत होते. त्यांची व ब्रुनोची आता चांगलीच ओळख झाली होती. त्या वेळात ब्रुनो त्यांना बाहेर कॉफी व पाईप ओढण्यासाठी घेऊन जाई.....त्याच्याशी बोलून त्यांना चित्रकलेत थोडाफार रस निर्माण झाला होता खरा पण एकमेकांना भेटण्याच्या ओढीपेक्षा त्याला जास्त किंमत नव्हती. त्यादिवशीही ते तेथेच हातात हात घालून त्या चित्राचा आस्वाद (?) घेत बसले होते. तेवढ्यात ब्रुनोला कॉफी पिण्याची हुक्की आल्यावर तो त्या दोघांना घेऊन बाहेर पडला. कॉफी घेऊन झाल्यावर त्यांनी ब्रुनोचा निरोप घेतला. सकाळी ११ वाजता आर्ट गॅलरीच्या बगिच्यात भेटण्याच्या आणाभाका घेऊन ते पसार झाले......

सगळे गेल्यावर ब्रुनो परत जागेवर आला.... आता त्या खोलीत फक्त फाटक्या अंगाचा, गचाळ कपडे घातलेला एक माणूस त्याच चित्राकडे एकटक पहात उभा होता..... तो एकदम ब्रुनोकडे धावत आला व त्याला ते चित्र त्याला विकण्यासाठी गळ घालू लागला. ब्रुनोने त्याला झिडकारले मात्र त्याने एकदम त्या चित्राविषयी बोलायलाच सुरुवात केली. प्रथम ब्रुनोने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले पण थोड्यावेळाने त्याला त्याच्या बोलण्यात सुसंगती आढळू लागली व तो त्याच्या बोलण्याकडे लक्ष देऊ लागला...... त्याचे बोलणे थांबेचना. इकडे ब्रुनो कागदावर त्याचे बोलणे ऐकत टीपा काढत होता. तेवढ्यात तो बडबडत नाहीसा झाला...... संध्याकाळची गर्दी वाढल्यामुळे ब्रुनोही प्रेक्षकांबरोबर गप्पा मारु लागला.....पण तो माणूस त्यांच्या मनातून जात नव्हता.....सर तर नव्हते ना ते.....उद्या शोध घ्यायलाच पाहिजे तो मनाशी म्हणाला....

त्यादिवशी रात्री अरुंधती रात्री आठ वाजता मंद प्रकाशात पलंगावर अस्वस्थ हो़ऊन पडली. तिच्या अंगावरचा झिरझिरीत पारदर्शक गाऊन तिच्या नितळ कांतीवर पडदा घालत तिचे सौंदर्य खुलवत होता. ती जडेजाची अधिरतेने वाट पहात होती. इतक्या वर्ष न घेतलेला अनुभव घेण्यास ती अतूर झाली. बरोबर साडेआठ वाजता तिच्या सेलफोनची रिंग वाजली. दरवानाला त्याला आत सोडण्याची सुचना देऊन ती पलंगावर पसरली. दरवाजावर बेल न वाजता टकटक झाल्यावर तिने ‘कम इन प्लिज’ अशी साद घातली. उंचापुरा, तगडा, देखणा जडेजा आत आला. त्याच्या अंगावर भारी पण उंची म्हणता येणार नाही असा सूट. त्याला पाहताच अरुंधतीचे हात आपोआप फैलावले गेले. तो दमदार पावले टाकत तिच्या पलंगाकडे आला. अरुंधतीने एक हात लांब करुन दिव्याचे बटन दाबले. त्या प्रखर प्रकाशात त्याची सावली तिच्या स्वर्गीय सौंदर्यावर पडली. त्या काळ्या सावलीने तिला सकाळचे तैल चित्र आठवले व ती किंचाळली,

‘टेक युअर मनी अँड लिव्ह.....तेथे आहेत त्या टेबलावर !’ त्या युवकाने शांतपणे ते पैशाचे पाकीट उचलले व अरुंधतीकडे पाहून एक स्मितहास्य केले.

‘दरवाजा आतून लावून घ्या ! ’ असे म्हणून शांतपणे त्याने तो लोटला.....

तो गेल्यावर अरुंधतीने सुटकेचा निश्र्वास सोडला तो उद्या ते चित्र पडेल त्या किमतीत विकत घेण्याचा निश्र्चय करूनच....

त्याच रात्री अरुण घरी लिसची वाट बघत बेचैन झाला. त्याने टेबल जेवणासाठी सजवले. टेबलावर उंची वाईनची बाटली दोन ग्लासासहीत तयार होती. किचनमधे मायक्रोव्हेवमधे हॉटेलमधून मागवलेले जेवण गरम करायला ठेवले. बरोबर रात्री साडेआठवाजता बेल वाजल्यावर त्याने घाईघाईने दार उघडले. लिसने ‘हाय‘ करत आत पाऊल टाकले आणि अरुणला काय करु आणि काय नको असे होऊन गेले. कोचावर बसल्यावर त्याने तिला त्याच्या चित्रांची माहिती देण्यास सुरुवात केली. जरा जास्तच बडबडत होता तो... पण लिसला त्याची सवय होती...रात्री साडेदहाला त्याने लिसला ती सुंदर दिसते इत्यादीची टेप ऐकवली. एल अस डीचे दोन तीन कश ओढल्यावर तिची पावले अडखळायला लागली त्याने तिला हळूच त्याच्या बेडवर नेले व तेथे झोपवले. तिच्या सौदर्याने घायाळ होत तो तिच्यावर वाकणार तेवढ्यात त्याची सावली तिच्या अंगावर पडली व तो दचकून भानावर आला. त्याला सकाळी पाहिलेले चित्र आठवले व तो बाजूला झाला. खजील होत त्याने तिच्या नावाने एक चिठ्ठी खरडली व तो हळूच बेडरुमच्या बाहेर आला.... व एका मित्राला फोन लावला.

‘काय यार मजा ना ?’

‘अरे कसली मजा ! त्या चित्राने माझा अवसानघात केला ना यार... मी तुझ्याकडे झोपायला येऊ का हे विचारण्यासाठी फोन केलाय ! बोल येऊ का ? नाहीतर मला हॉटेलमधे रुम घ्यावी लागेल..’

‘कसले चित्र ?’

‘आल्यावर सांगतो ना यार......’ असे म्हणून त्याने जिना उतरण्यास सुरुवात केली.....

रात्री मधेच जाग आल्यावर लिसने ती चिठ्ठी वाचल्यावर रात्री काय होणार होते याची कल्पना येऊन तिच्या अंगावर शहारा आला. पण आता धोका नव्हता. उद्या सकाळी ते चित्र पडेल त्या किंमतीत विकत घेण्याचा निश्चय करुन....... तिने झोपण्यासाठी डोळे मिटले....

रात्री साडेदहाला निनाने राहूलला सकाळच्या भेटीची आठवण देण्यासाठी फोन केला. सकाळी आर्टगॅलरीच्या बागेत भेटण्याचे वचन देत दोघांनीही झोपण्याची तयारी केली.......

दुसऱ्या दिवशी ब्रुनो त्याच्या गॅलरीत पोहोचला तेव्हा त्याला ती जागा एकदम ओळखीची वाटू लागली......कारण सरळ होते त्याच्या ओळखीची माणसे त्याची वाट बघत होती. त्या चित्रासमोर अरुंधती त्याचा आस्वाद घेत उभी होती...त्याच्याच मागे तो तरुण नवीन सावजाची वाट पहात बसला होता. अरुण व लिस काहीच झालेले नसल्यासारखे त्याची वाट बघत होते तर राहूल व निना कॉफी पिण्यासाठी त्याची वाट बघत होते.....

त्याला बघताच सगळे त्याच्याकडे धावले.... अरुंधतीने प्रथम जागा पटकावली. ते पाहिल्यावर उरलेले थांबले... त्यांचे बोलणे झाल्यावर अरुंधती चहऱ्यावरील निराशा लपवू शकली नाही.... ती उठली व पटकन बाहेर पडली.

अरुण व लिस ब्रुनोसमोर बसले. बऱ्याचवेळ वादावादीसारखे बोलणे झाल्यावर तेही उठले...व बाहेर पडले. ब्रुनो चिडक्या स्वरात स्वत:शीच पुटपुटत म्हणत होता, ‘एकदा सांगितलेले या लोकांना कळत नाही.....’

आता या माणसाशी बोलावे की नाही हे न कळून राहूल व निना तेथेच घुटमळत उभे राहिले. त्याना पाहताच ब्रुनोच्या चेहऱ्यावर हास्य पसरले. ‘कमॉन गाईज लेट अस हॅव्ह कॉफी’ तो म्हणाला. पण एक मिनीट हां ! ही पाटी लावतो जरा तेथे. म्हणून त्याने हातातील पाटी त्या चित्राच्या खाली ठेवली.... ‘सोल्ड आऊट’.. ती ठेवताना त्याची लांबट सावली निनावर पसरली....

खिदळत राहूल निनाला म्हणाला, ’ह्युमन शॅडो ऑन डिव्हाईन ब्युटी’....
त्या वाक्यावर (त्याला मी तरी आता विनोद म्हणणार नाही !) खिदळत ब्रुनो, राहूल व निना कॉफीसाठी बाहेर पडले.......

जयंत कुलकर्णी.
या लिखाणातली सर्व पात्रे आणि प्रसंग काल्पनिक आहेत. कुणाला इतर हयात वा मृत व्यक्तिशी साधर्म्य आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा. सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन. मी रानी की बावमधे एक फोटो काढला होता व त्याला हे नाव दिले. त्यावरुन मालवणला परवा जाताना गाडीत सुचलेली एक कथा.

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

ज्योति अळवणी's picture

16 Feb 2015 - 7:48 pm | ज्योति अळवणी

कथा खूप आवडली.

प्रियाजी's picture

16 Feb 2015 - 8:06 pm | प्रियाजी

कथा छानच आहे पण त्यातलं रहस्य नाही कळलं.

अत्रन्गि पाउस's picture

16 Feb 2015 - 8:48 pm | अत्रन्गि पाउस

काहीच कळले नाही ...

मलाही.

कृपया सावली टाकावी.

डॉ सुहास म्हात्रे's picture

16 Feb 2015 - 11:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

हैला, तुमी डिव्हाईन ब्युटी हाय व्हय !?! ;)

आदूबाळ's picture

17 Feb 2015 - 12:10 am | आदूबाळ

माझ्यावर नाय. कथेवर.

स्पंदना's picture

17 Feb 2015 - 4:14 am | स्पंदना

:))

पगला गजोधर's picture

17 Feb 2015 - 2:18 pm | पगला गजोधर

रहस्य

एस's picture

17 Feb 2015 - 4:03 am | एस

कथा आवडली.

जयंत कुलकर्णी's picture

17 Feb 2015 - 7:19 am | जयंत कुलकर्णी

ज्यांनी आवडली असे लिहिले आहे त्यांना धन्यवाद ! अनेकांना आवडणार नाही हे अपक्षित होते....
:-)

विनिता००२'s picture

17 Feb 2015 - 11:00 am | विनिता००२

चित्र काय होते ते कळले नाही. कळले तर रहस्य उलगडेल.
कथा छान आहे

काहीतरी गुढरम्य म्हणतात तसंय...

सुरेखच.

धन्यवाद.

जयंत कुलकर्णी's picture

17 Feb 2015 - 11:35 am | जयंत कुलकर्णी

मी काढलेला फोटो हा आहे........
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

जयंत कुलकर्णी's picture

17 Feb 2015 - 2:57 pm | जयंत कुलकर्णी

मी ही कथा काय आहे ते आता सांगतो....अर्थात ही कथा चांगली आहे हे पटविण्यासाठी नसून कदाचित ही कथा वाचकांना कळेल अशी आशा आहे... भावेल का ते सांगता येत नाही....
० प्रथम त्या स्त्रीला पुरुषाचा उपभोग घ्यायचा असतो, दुसर्‍या प्रसंगात एका पुरुषाला स्त्रीचा आणि तिसर्‍या प्रसंगात दोघांनाही एकमेकांच्या सहवासाची ओढ असते....
१ चांगल्या/वाईट संस्कारापासून स्वातंत्र्य मिळणे किंवा मिळवणे फार अवघड आहे.
२ वाईट गोष्टींची छाया सर्वांवरच कधी ना कधी पडत असते....पण त्यातून सुटका होऊ शकते.....
३ शरीरसूख हे प्रेम असले तरच भावते...नाहीतर उरतो तो फक्त व्यवहार...म्हणूनच ते तरुण तरुणी त्या चित्राच्या फक्त नावाचीही मनापासून मजा घेतात....त्याचा अर्थ त्यांच्यापुरता चांगला असतो तेच इतर दोन घटनांमधे नसतो....
४ हे चित्र त्या दोघांनाही मिळत नाही...पण बहुदा त्या कलाकाराच्या सरांना मिळाले असावे....कलेची खरी किंमत त्या दोघांनाच माहीत...
५ सर्व घटनांमधे ते तैलचित्र आहेच म्हणून याचे नाव तेच ठेवले आहे....
६ माणसाचे मन अगाध आहे. त्यात काय उलथापालथ होईल सांगता येत नाही....
हे प्राथमिक आहे...अजून अर्थ आहे पण ते आता वाचकांवर सोडतो.
तर असा हा प्रयत्न आहे......अजूनही बरेच लिहिता येईल पण उरलेलेही आता वाचकांवर सोडतो....

:-)

अनुप ढेरे's picture

18 Feb 2015 - 10:24 am | अनुप ढेरे

आवडली कथा...

पैसा's picture

1 Mar 2015 - 9:52 pm | पैसा

सुरेख कथा!