बिरहा कि रात…

पारा's picture
पारा in जनातलं, मनातलं
14 Feb 2015 - 7:37 pm

काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी तेंव्हा खडकी स्टेशन वरून शनिवारी सक्काळी मुंबईसाठी ट्रेन पकडत असे. शक्यतो सकाळची सिंहगड ठरलेली असायची. शेवटचे दोन डबे आमच्यासारख्या ऐन वेळी आरक्षण नसलेल्यांसाठी ठेवलेले असायचे. आमची कोण पर्वा रेल्वे प्रशासनास. आमच्यासारखे जगात फारच असल्याने दोन डबे, खडकीला उघडत असून पुरेसे पडत नसत. त्यामुळे गाडी फलाटाला लागायच्या आधीच, तिकीट वगैरे काढून आत उडी मारण्याच्या तयारीत राहावे लागे. शनिवारी सकाळी हा व्याप करायला प्रचंड कंटाळा येत असे.

असाच एका शनिवारी मी खडकीला पोहोचलो. सकाळी लवकर म्हणजे ५.४५ झाले होते. फार गर्दी व्हायची होती. त्या दिवशी मे महिन्यातसुद्धा थोडसं गार वातावरण होतं. पूर्ण फलाटावर जाग आली नव्हती. एक कोपऱ्यात रेल आहार चालू झाला होता. सकाळच्या रम्य वेळी, गरम चहाचा सुगंध, थोडसं फटफटू लागलेलं, आणि कहर म्हणजे अतिशय सुंदर असं ‘बलमा जानो मोही प्रीत’ हे गाणं लागलं होतं, बेगम अख्तरांच्या ठेवणीतल्या आवाजात. त्यांचा आवाजही असा अगदी जुन्या ठेवणीतल्या पैठणीसारखा आहे. कधी जुन्या एखाद्या लाकडी कपाटात आत हात घालावा आणि कागदात छान बांधलेली जुनी आजीची पैठणी हळुवार काढावी, त्या तलम वस्त्रावरून हात फिरवताना मऊशार आणि उबदार जाणीवेबरोबर मनही कुठेतरी भूतकाळात हरवून जातं, तसा त्यांचा आवाज. त्या आवाजाला अजून साज चढावा तो जुन्या रेडीओमुळे. हे Bose आणि Sennheiser कालची गोष्ट. तांत्रिकदृष्ट्या उत्तम, पण रेडीओ वरच्या खरखरीची सर त्याला नाही. अशी बेगम अख्तरांच्या आवाजातील एखादी जुनी ग्रामोफोन ची तबकडी ऐकत राहावीशी वाटते.

YouTube : बिरहा कि रात

त्याची आज आठवण होण्याचं कारण एकच. पंडित अजोय चक्रवर्ती ह्यांचं ‘कटे ना बिरहा की रात’. तसाच मनाचा ठाव घेणारा आवाज. लाडिक, नाजूक ठुमरी. अशी कोणी आर्जवं करावीत की पायच निघू नये.

आजकाल आयुष्य फार गतिमान झालेलं आहे. आपली गाणी पण ४-५ मिनिटात आटोपती घेतो आपण. किंबहुना ६-७ मिनिटांपेक्षा मोठं गाण ऐकण्याचा संयम राहिला नाही आपल्यात. थोड्या थोड्या वेळात लक्ष विचलीत करण्यासाठी कैक कारणं समोर वाढून ठेवलेली. अश्या वेळी १२ मिनिटांची ही ठुमरी कोठून ऐकली जाणार? रात्र-रात्र चालणारे महोत्सव काळाच्या पडद्याआड गेले आता. अजून पुढे काय कोणास ठाऊक.

कधी वाटत, रात्री उशीरा किंवा भल्या पहाटे एकट्यानेच कुठेतरी भटकायला जावं. बरोबर अशी कुठली तरी गाणी. मुद्दामूनच इअरफोनची बोंडूकं कानापासून दूर. ग्रामोफोन आणि जुना रेडीओ तर शक्य नाही, मग आपला मोबाइल रास्त. पण तो सुद्धा जरासा लांब ठेवलेला. सोबतच्या नीरव शांततेला भेदून येणारा तो हलकासा स्वर, त्यावर लागलेली अशी एखादी ठुमरी किंवा कबीराच एखादं भजन. कानात आवाज भरणारे इअरफोन आपल्या जागी, आणि मुद्दामून जगाची जाणीव राहून घेतलेले हे अनुभव आपल्या जागी. आपले कान फार तीक्ष्ण असतात. पूर्ण लक्ष गाण्याकडे असलं तरी हलकीशी पानांची सळसळ मधे मधे डोकावून जातेच, तीची मजा घेता आली पाहिजे.

परवा रुहानियत नावाच्या एका संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तीन तासांमध्ये तब्बल ५ कलाकारांनी आपली कला सादर केली, त्याबद्दल सविस्तर लिहीनच पण, इथे आठवण्याचं कारण म्हणजे तिथे जाणवलेली घाई. तासंतास चालणारे विलंबित ख्याल आणि हळू हळू नजाकतीत (मराठी शब्द नाही ह्याला) मूर्त रूपात येणाऱ्या ठुमऱ्या कमी होत आहेत का ह्याची भीती आहे. वसंतोत्सव आणि सवाई मध्ये पण विलंबित पेक्षा द्रुत आणि जुगलबंदीला अधिक टाळ्या पडतात. वरकरणी सोपे आणि सरळ वाटणारे ख्यालासारखे प्रकार प्रभावीपणे सादर करणे हे सोपे काम नाही. सगळे द्रुत मधल्या नैपुण्यावर बेहद्द खूष. सतारीवर आणि तबल्यावर हात असे विजेच्या वेगानी फिरले की नवीन पाहणाऱ्यालासुद्धा त्यातील कामगिरीची दाद द्यावीशी वाटलीच पाहिजे. त्या गोष्टी कठीण आहेतच, आणि त्यातील सफाई नक्कीच उत्कृष्ट हे खरेच पण ख्यालातील मजा शांतपणे अनुभवता आली पाहिजे हे तितकेच खरे. त्या शांत संयत गायकीचा प्रभाव वेगळा आणि तो अनुभव अनोखा असतो हे खरे.

आता हेच गाणं घ्या. शेवटच्या काही मिनिटांमध्ये ते द्रुत लयीत येतात, तबला पेटतो, खणखणीत एक नंबर वाजतो, पण आधीच्या अनुभवाची पातळी थोडी अधिक वाटते. अर्थात ही सगळी माझी मतं झाली. तुम्हालाही हेच सारं आवडावं असा मुळीच आग्रह नाही, पण एकदा अनुभव जरूर घ्यावा ही इच्छा.

सुरुवात बेगम अख्तर आणि अजोय चक्रवर्तींच्या उल्लेखांनी झाली हे एक भाग्य नक्कीच नाही का?

मूळ स्त्रोत : https://medium.com/aural-ecstasy/-4717a382b247

संगीतमत

प्रतिक्रिया

राही's picture

14 Feb 2015 - 10:15 pm | राही

लेख आवडला.
अशीच रसग्रहणे आणखी येउ देत.

पारा's picture

15 Feb 2015 - 12:37 am | पारा

प्रयत्न नक्कीच चालू ठेवेन.

छान लिहिलयत. गाण्यातलं काही कळत नसलं तरी वाचायला चांगलं वाटलं. रोजच्या जगण्यातला शांतपणा जाऊन सगळ्यातच घाईगडबड जाणवतिये हे खरेच!

एस's picture

15 Feb 2015 - 1:15 pm | एस

असेच म्हणतो. अशा विषयांवर तात्यांची मिपाअनुपस्थिती प्रकर्षाने जाणवते.

रमेश आठवले's picture

15 Feb 2015 - 12:11 pm | रमेश आठवले

छान लेख लिहिला आहे. पुढील लेखांची अपेक्षा आहे.
बलमवा तुम क्या जानो प्रीत- हे बेगम अख्तर यांच्या आवाजात सापडले-
https://www.youtube.com/watch?v=QJHrwD_Jyz0
अजोय चक्रबोर्ती हे बडे गुलाम अली यांची नक्कल करतात. मूळ खान साहेबांच्या आवाजातील -कटे ना बिरहा कि रात- येथे ऐका
https://www.youtube.com/watch?v=JXTUTP_z6ck

पारा's picture

15 Feb 2015 - 6:19 pm | पारा

ती ठुमरी सुंदर बांधलेली आहे. मी ह्या दोनही लिंक्स पाहिल्या, खूप आवडल्या पण मूळ शोधाला सुरुवात अजोय चक्रवर्तींच्या गाण्याने झाली होती म्हणून त्यांचेच फक्त ठेवले ह्या पोस्ट मध्ये.

अनुप ढेरे's picture

15 Feb 2015 - 6:51 pm | अनुप ढेरे

छान लिहिलय. आवडलं.

मना सज्जना's picture

16 Feb 2015 - 8:53 pm | मना सज्जना

छान लिहिलयत. गाण्यातलं काही कळत नसलं तरी वाचायला चांगलं वाटलं. रोजच्या जगण्यातला शांतपणा जाऊन सगळ्यातच घाईगडबड जाणवतिये हे खरेच!छान लिहिलयत.

किसन शिंदे's picture

16 Feb 2015 - 8:59 pm | किसन शिंदे

मस्त लिहिलंय !