तो वेडा आहे भाग १

चिनार's picture
चिनार in जनातलं, मनातलं
13 Feb 2015 - 4:47 pm

तो वेडा आहे !
आजपर्यन्त जितक्या वेळा मी माझ नाव ऐकलं नसेल त्याहून जास्त वेळा मी हे वाक्य ऐकलं आहे. वेडा! वेडा! वेडा!. कधी कधी वाटतं हेच आपलं नाव आहे का? नाही..नसावं. आईने कधीच मला या नावाने हाक मारल्याच आठवत नाही. कधी कधी बाबा वैतागून म्हणतात.पण लगेच आई त्यांना रागावते. माझा दादा पण नावानेच हाक मारतो. पण मग बाकी सगळे मला वेडा का म्हणतात. लहानपणी वर्गातल्या बाईंनी वेडा म्हणून मला वर्गाबाहेर काढलं. नंतर मुख्याध्यापक बाईंनी शाळेबाहेर काढलं. म्हणाल्या की कोणत्याच विषयात याची प्रगती नाही. खरं म्हणजे चित्रं चांगले काढायचो मी...अजूनही काढतो. तर म्हणाल्या की चित्रकला हा काही विषय नाहीये. मग शाळेत शिकवतात कशाला ? मग चित्रकलेचे सर सुद्धा वेडे आहेत का ? काही कळत नाही. आता मी दिवसभर घरीच असतो. घरात बसून कंटाळा आला की मी आंगणातल्या जिन्यावर जाऊन बसतो. येणारे जाणारे लोक माझ्याकडे विचित्र नजरेने बघतात. त्यांच्या मुलांना सांगतात," ऐ तो वेडा आहे. जवळ जाऊ नको." माझ्या जवळ येण्याने काय होतं? कळत नाही. आई म्हणते तू त्यांना त्रास नको देऊ. म्हणजे ते असा करणार नाहीत. मी रस्त्यावरून जाणाऱ्या सगळ्यांकडे बघून हसतो. हसणं म्हणजे त्रास देणं होतं का ? काही मुले माझ्या दिशेने दगड फेकून मारतात. कधी कधी लागतो मला. कोण कोणाला त्रास देतंय? गल्लीतली मुलं क्रिकेट खेळत असतात. ते मला ब्याटिंग आणि बौलिंग काहीच देत नाहीत. तरीपण सगळे मला 'सचिन' म्हणतात. नालीत वैगेरे चेंडू गेला तर मला काढायला लावतात. मला सचिन म्हटलेलं माझ्या दादाला आवडत नाही. तो त्यांच्यासोबत खेळत नाही. मलापण खेळू नको म्हणतो. पण वेडा म्हणून घेण्यापेक्षा सचिन चांगलंय ना म्हणून मी खेळतो त्यांच्यासोबत.
दादा चांगला आहे. खूप गप्पा मारतो माझ्यासोबत. शाळेतल्या गोष्टी सांगतो.पाणीपुरी खायला घेऊन जातो. मला शाळेत न्यायची त्याची इच्छा असते. पण आई नाही म्हणते न्यायला. आई मला घरीच शिकवते. बेरीज, वजाबाकी करता येते मला. भागाकार,गुणाकार कठीण वाटतात. पण प्रयत्न करतो मी. मागे एकदा आईने साखर आणायला दुकानात पाठवलं मला.
दुकानातले काका म्हणाले," २२ रुपये किलो साखर आहे. चार किलोचे ९० रुपये झाले."
१० रुपये वापस केले १०० ची नोट दिल्यावर. मी गुणाकार केला तर ८८ येत होता.पण त्यांनी ऐकलं नाही.
म्हणाले, " तुला गुणाकार येत नाही."

घरी आल्यावर आईला विचारलं तर म्हणाली तुझा गुणाकार बरोबर आहे. पण मग ते काका असं का म्हणाले? संध्याकाळी दादा रागारागाने त्यांचाकडे गेला.
तर ते म्हणाले ," मी पूर्ण पैसे दिले होते. तुझ्या भावाने २ रुपयांचं काय केलं मला काय माहिती?"
मी कशाला काही करणार २ रुपयांचं ? आईच्या डोळ्यात पाणी आलं हे ऐकून.
मी म्हणालो,"आई रडू नकोस. मी २ रुपये आणून देईल तुला."
आई अजूनच रडायला लागली.
म्हणाली," २ रुपये नको आहेत रे बाळा मला." !!
खरं म्हणजे माझ्यासाठी पुरणपोळी करायलाच आईने साखर आणायला पाठवलं होतं. मी खाल्ली पुरणपोळी. छान झाली होती. पण का कोण जाणे आई ने खाल्लीच नाही !
क्रमश:

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

प्रियाजी's picture

13 Feb 2015 - 5:09 pm | प्रियाजी

सुरवात तर मोठी छान झाली आहे. पण आजून मोठा भाग हवा होता.

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 5:16 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सुरूवात !

फकत एकच गोष्ट खटकली : पुरणपोळी बनवताना गूळ वापरतात... साखर नाही.

चिनार's picture

13 Feb 2015 - 5:23 pm | चिनार

विदर्भाकडे साखर वापरून पुरणपोळी करतात. गुळापेक्षा छान लागते (विदर्भ-पुणे-मुंबई वाद सुरु करण्याचा उद्देश नाही )

रामपुरी's picture

13 Feb 2015 - 7:31 pm | रामपुरी

आमच्याकडे गुळ वापरून पुरणपोळी करतात. साखरेपेक्षा छान लागते (विदर्भ-पुणे-मुंबई वाद सुरु करण्याचा उद्देश नाही )
आम्ही मुळात साखर घालून केलेल्या पोळीला पुरणपोळी मानतच नाही :)

पी. के.'s picture

20 Jan 2017 - 3:14 pm | पी. के.

आमच्याकडे पुरण वापरून पुरणपोळी करतात. छान लागते (विदर्भ-पुणे-मुंबई वाद सुरु करण्याचा उद्देश नाही )
आम्ही मुळात पुरण न घालता केलेल्या पोळीला पुरणपोळी मानतच नाही :)

सांरा's picture

13 Feb 2015 - 6:21 pm | सांरा

मी कधी गुळाची पुरणपोळी नाही खाल्ली...

डॉ सुहास म्हात्रे's picture

13 Feb 2015 - 7:19 pm | डॉ सुहास म्हात्रे

आणि मी कधीच साखरेची पुरणपोळी खाललेली नाही... आता प्रयोग करून बघायलाच पाहिजे :)

सुबोध खरे's picture

13 Feb 2015 - 7:04 pm | सुबोध खरे

चिनार साहेब
मनोरुग्णांकडे पाहण्याची समाजाची दृष्टी अतिशय वाईट आहे. ( मनोरुग्णच काय मनोविकार तज्ञान्ची पण तीच परिस्थिती आहे). समाजप्रबोधन फार आवश्यक आहे. साहित्याच्या माध्यमातून एका महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष वळविल्याबद्दल धन्यवाद.

कपिलमुनी's picture

16 Feb 2015 - 1:24 pm | कपिलमुनी

>>मनोरुग्णच काय मनोविकार तज्ञाकडे पाहण्याची समाजाची दृष्टी अतिशय वाईट आहे

+१००

माझ्या एका डॉक्टर मित्राचा लग्न ठरायला खूप प्रोब्लेम आहे . सर्वजण वेड्यांचा डॉक्टर म्हणायचे !
मनोविकार हा खूप मोठा काकूचा विषय आहे .

मराठी कथालेखक's picture

20 Jan 2017 - 5:03 pm | मराठी कथालेखक

पण काय मस्त कमवतात हो ते.
एका कन्सल्टिंगचे ५०० ते १००० बरं एका रुग्णाच्या दोन चार बैठकी म्हणजे कुठे फक्त सुरुवात.. :)

खटपट्या's picture

13 Feb 2015 - 11:03 pm | खटपट्या

खूप छान आणी भावस्पर्शी.. कधी कधी त्यांचा निरागसपणा पाहून वाटते की तीच खरी शहाणी माणसं. मला आवडतं अशा "स्पेशल" माणसांशी बोलायला.
आमच्या सोसायटीत एक असेच स्पेशल ग्रुहस्थ आहेत. त्यांचे म्हणणे आहे की सचीन तेंडूलकर म्ह्णजे त्यांचा हरवलेला मुलगा. त्यांना दोन जुळे मुलगे आहेत त्यातला एक सचीन आणी दुसरा त्यांच्या बरोबर राहतो. लहानपणी सचीनच्या बाबांनी त्याला हॉस्पीटलातुन पळवुन नेला आणि वाढवला. आता कधी कधी सचीन त्यांना फोन करतो. आणी विचारतो काही हवे आहे का वगैरे. हे सर्व सांगत असताना माझ्या बाजुला बसलेले दोघे (शहाणे) कुत्सीत हसुन निघुन गेले. मी मात्र त्यांची कहाणी १५ मिनिटे ऐकली. त्यांना बरे वाटले. मला म्हणाले तुम्ही बसून ऐकलेत. बाकी कोणी ऐकत नाही माझे. त्यांचे ऐकून घेतल्याने माझी १५ मिनिटे गेली. बाकी काही नुकसान झाले नाही. नंतर कधीही येता जाता मला ते हात दाखवत असत. त्यांच्या मुलालाही खूप बरे वाटले. तो (सचीनचा जुळा भाउ) मला भेटून धन्यवाद देउन गेला.

सांगण्याचा मुद्दा हाच की त्यांच्याशी बोलल्याने आपली फक्त १५ मिनिटे जाणार असतील आणी त्यांना जर खूप बरे वाटणार असेल तर काय हरकत आहे.

टवाळ कार्टा's picture

13 Feb 2015 - 11:32 pm | टवाळ कार्टा

:)

सविता००१'s picture

14 Feb 2015 - 2:51 pm | सविता००१

सांगण्याचा मुद्दा हाच की त्यांच्याशी बोलल्याने आपली फक्त १५ मिनिटे जाणार असतील आणी त्यांना जर खूप बरे वाटणार असेल तर काय हरकत आहे.
माझंही अगदी हेच मत आहे.
छान आहे हो सुरुवात.

बॅटमॅन's picture

16 Feb 2015 - 6:18 pm | बॅटमॅन

असाच एक स्पेशल मुलगा आमच्या कॉलनीत होता. त्याचे विषय ठरलेले असायचे, पण तेवढेच बोलले की त्याच्याशी मजा यायची.

"कसलं गरम व्हायलंय आजकाल!"
"सायकल जरा पूस की. किती घाण झालीय!"
"सायकलीत हवा कमी आहे मागच्या चाकात."
"इंदर हरामखोर ****%$## आहे." कोण तो इंदर कोण जाणे. पण त्याचा ह्याच्यावर भारी राग.
"परवा मॅच बघितलास काय?"
(मॅच बघताना) "ओऽड!" (आऊट)

असे काही नेहमीचे ड्वायलॉक. घरची परिस्थिती आर्थिकदृष्ट्या कोणीही हेवा करावा अशी, पण कौटुंबिक स्वास्थ्य नाही. त्याच्या बोलण्यातून ते जाणवायचं, त्याच्या मनावर परिणाम झालाय ते कळायचं. तशी त्याला समज होती चांगलीच, कधीमधी बोलायचा घरच्या स्थितीबद्दल. पार वाट लागलेली बिचार्‍याची. आता कुठे असतो काय माहिती. जरा माहिती काढली पाहिजे. ७-८ वर्षे झाली असतील आरामात.

तुमचा प्रतिसाद वाचून त्याचीच आठवण झाली, धन्यवाद.

चाणक्य's picture

14 Feb 2015 - 3:10 am | चाणक्य

लिखाण. पाणी तरारले डोळ्यात वाचताना.

मदनबाण's picture

14 Feb 2015 - 7:54 am | मदनबाण

सुरेख लेखन !
बाकी रामपुरीशी पुरणपोळी बाबतीत सहमत !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मुझसे मुहब्बत का इजहार... ;) { Hum Hain Rahi Pyar Ke }

बहुगुणी's picture

14 Feb 2015 - 8:04 am | बहुगुणी

सुरूवातीलाच घशात आवंढा आणलात, पुढे काय करणार आहात?

राजाभाउ's picture

27 Jan 2017 - 11:27 am | राजाभाउ

+१ असेच म्हणतो.
पुभाप्र.

जेपी's picture

14 Feb 2015 - 1:25 pm | जेपी

भावली कथा..

प्रतिक्रियेसाठी धन्यवाद !

सुंदर आहे कथा. पुढचे भाग सलग येऊ द्या. अंतर नको ही विनंती.

स्वधर्म's picture

16 Feb 2015 - 1:00 pm | स्वधर्म

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

पैसा's picture

20 Jan 2017 - 10:24 am | पैसा

पुढचा भाग कुठे रे? खरं तर इथल्या बाकी आठवणी पण डोळ्यात पाणी आणणार्‍या आहेत. वाचणं कठीण असेल.

ह्या विषयाचा पुढील भाग मनात आहे. पण ते अनुभव आणि आठवणी कागदावर उतरवण्याइतकी मानसिक कणखरता माझ्यात सध्यातरी नाहीये. जमेल तसं लिहिलंच..
क्षमा असावी..

पैसा's picture

20 Jan 2017 - 12:47 pm | पैसा

नको....

पी. के.'s picture

20 Jan 2017 - 3:19 pm | पी. के.

खूपच छान. आवडली.

पद्मावति's picture

20 Jan 2017 - 3:30 pm | पद्मावति

सुरेख कथा. पु.भा.प्र.

मराठी कथालेखक's picture

20 Jan 2017 - 5:07 pm | मराठी कथालेखक

मी गुळाची आणि साखरेची अशा दोन्ही प्रकारच्या पुरणपोळ्या खाल्ल्यात, मला गुळाची जास्त आवडते.
माझी पत्नी विदर्भाकडची आहे, पण ती गुळाचीच पुरणपोळी बनवते.

बबन ताम्बे's picture

20 Jan 2017 - 6:53 pm | बबन ताम्बे

लहानपणी खेडेगावात पाहीलेय. वेडया माणसाला/बाईला गावातली टारगट पोरे प्रचंड त्रास द्यायची.

अमितदादा's picture

21 Jan 2017 - 9:01 pm | अमितदादा

कथा आवडली.... लिहित राहा मनाला भिडतंय.

रातराणी's picture

28 Jan 2017 - 12:13 am | रातराणी

:(