असा विचार मनात जन्म-अखेरीही नाही!

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
5 Feb 2015 - 4:58 am

याआधी मी वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं या टॉम प्रॅक्स्टन-लिखित गाण्याचं रुपांतर केलं होतं. आज आंतर्जालावर भटकतांना त्याचंच आणखी एक गाणं आवडलं.

The Last Thing on my Mind या Tom Paxton लिखित गाण्याचं हे मुक्त रुपांतरः

जाण उशीराने आली
गेली निसटून रेती
राणी दृष्टीआड गेली,
माझा जीव तिच्या हाती

साधा निरोपही नाही
काही ठेवली ना खूण
खोट प्रेमात माझ्याही
कसे कठोर हे मन

तुला माहिती ना राणी
माझ्या मनाची विराणी?
कसा सांगू मी कानात,
दुखवेन कशापाई?
असा विचार मनात
जन्म-अखेरीही नाही!

झाली बरीच कारणे
आता जाणवते मना
कशी शेवाळली मने
थांब, परतुनी ये ना!

वाट सरता पायाशी
किती विचार मनात
किती गिरक्या स्वतःशी
मार्ग हरवे वनात

शेज एकटी सकाळी
तुझी चाहूलही नाही
गीत संपे जन्मकाळी
तुला जाणीवही नाही

तुला माहिती ना राणी
माझ्या मनाची विराणी?
कसा सांगू मी कानात,
दुखवेन कशापाई?
असा विचार मनात
जन्म-अखेरीही नाही!
आता जाणवते मना
थांब, परतुनी ये ना!

हे गाणं खूप जणांनी म्हंटलेलं आहे, नील सायमन, जोन बाएझ, जॉन डेन्व्हर, वगैरे.
तरूण पणी टॉम प्रॅक्स्टन ने म्हंटलेलं हे गाणं नंतर खूप वर्षांनी त्याने लियाम क्लॅन्सी आणि कोरसच्या साथीत म्हंटलं:

मूळ गीताचे शब्द इथे आहेत. त्यात असलेली (आणि गाताना चांगली वाटणारी) शब्दांची द्विरुक्ती मी इथे रुपांतरात टाळली, कारण मराठीत आणतांना ते मला योग्य वाटलं.

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

यशोधरा's picture

5 Feb 2015 - 6:39 am | यशोधरा

क्या बात. मस्त :)

इन्दुसुता's picture

5 Feb 2015 - 6:49 am | इन्दुसुता

मुक्त रूपांतर आवडले.. काही ठिकाणीतर ओरिजिनल पेक्षाही!!!