छत्रपती शिवरायांच्या मनात राष्ट्रप्रेमाची ज्योत कायम पेटती ठेवणा-या राजमाता जिजाऊंचे पाचाड येथील समाधीस्थळ आजही दुर्लक्षितच आहे. या समाधीस्थळाचे पूजन व्हावे , राजमातांच्या समाधीस्थळी दिवा लावला जावा या उद्देशाने महाड येथील विष्णू केंजळे यांनी जिजामाता समाधी पूजन-मातृशक्ती पूजन हा उपक्रम राबविण्यास सुरूवात केली आहे. प्रत्येक कुटुंबांने अथवा दाम्पत्याने येथे येऊन मनोभावे पूजा करावी हा या मागील उद्देश आहे. यामुळे ३६५ हून अधिक कुटुंबांनी या ठिकाणी येऊन समाधीस्थळाचे पूजन केले आहे.
शिवप्रमी विष्णू केंजळे यांनी सुरू केलेला उपक्रम सर्वांनाच प्रेरणा देणारा आहे. महाडमधील एका फार्मास्युटीकल कंपनीत नोकरीला असलेले विष्णू केंजळे रायगड व पाचाड येथे सातत्याने वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होतात. किल्ल्याच्या पायथ्याशी पाचाड येथे राजमाता जिजाऊंची समाधी आहे. या समाधीस्थळाची दुरावस्थाच आहे. ज्या जिजाऊंनी शिवराय घडविले त्यांचे समाधीस्थळ उपेक्षित राहू नये या उद्देशाने विष्णू केंजळे यांनी स्वखर्चातून तेलाचा डबा देऊन येथे दिवा लावला जावा यासाठी प्रयत्न सुरू केले. परंतु पैसे देऊन आपण जबाबदारीतून मोकळे झालो हे शल्य त्यांना बोचत होते. त्यापेक्षा आपण प्रत्येकाला यात सहभागी करून घेतले तर राजमातेच्या पूजनाचे महत्व, गरज सर्वांना लक्षात येईल. यासाठी त्यांनी समाधीस्थळाच्या पूजनाचा उपक्रम ३१ जानेवारी २०१४ माघ प्रतिपदेपासून सुरू केला. सर्वप्रथम सपत्नीक जाऊन त्यांनी पूजा केली. व त्यानंतर प्रत्येक कुटुंबाने, नवविवाहीत अथवा दाम्पत्यांने एक दिवस येथे येऊन पूजा करावी यासाठी प्रयत्न केले. या निमित्ताने लोक समाधीस्थळी जातील असाही त्यांचा प्रयत्न होता. सुरूवातीला केंजळे यांनी पत्रके छापून ओळखीतील कुटुंबांशी, मित्रांशी संपर्क साधला. विनंती करून पूजनाचे महत्व पटवून त्यांनी हळूहळू हा उपक्रम सुरू ठेवला. महा़डमधील डॉक्टर्स, नगरसेवक, नगराध्यक्ष असे अनेक जण कुटुंबासह येथे जाऊन पूजन करून आले. आत्तापर्यंत ३६५ हून अधिक कुटुंबांनी येथे जाऊन पूजा केली आहे.
पूजेसाठी या कुटुंबांनी हार, फुले, प्रसाद , तेल वात , अगरबत्ती एवढेच साहित्य नेऊन सकाळच्या वेळेत पूजा करायची आहे. यासाठी इतर कोणतेही आर्थिक सहकार्य विष्णू केंजळे घेत नाहीत. त्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाला आता चांगले यश येऊ लागले आहे.
एकदा पूजा करून आलेले अनेकजण पुन्हा पूजेसाठी जाण्याची इच्छा व्यक्त करत असतात. अनेकवेळा काही अडचणींमुळे ठरलेल्या कुटुंबांकडून पूजा होत नाही. अशावेळी स्वतः किंवा पाचाडमधील एखाद्या कुटुंबाकडून पूजा करून घेतली जाते
ज्या कुटुंबाला, दाम्पत्याला जिजाऊंच्या समाधीस्थळाची पूजा करायची असेल त्यांनी विष्णू केंजळे (९४२१२५९६५५) यांच्याशी संपर्क साधून या उपक्रमाला सहकार्य करावे.
प्रतिक्रिया
13 Jan 2015 - 11:34 pm | हाडक्या
वन मोअर दुकान इन मेकींग..
भावनांच्या अस्मिता करून या कृतीला विरोधी आवाज हा शिवरायांचा आणि जिजाऊंचा अपमान म्हणून तुडवायचा आणि दुकान उभे करायचे.. छान .!!
हात जोडून कळकळीची विनंती आहे हो.. जिजाऊ आणि शिवरायांना सोडा या बाजारातून ..
आताशा असं वाटतंय की गड किल्ल्यांवर गवत माजलं तरी चालेल, बुरुज ढासळले तरी चालतील पण त्यांची देवळे करून ठेवू नका हो.
आमच्या प्रिय व्यक्तींचे दैवतीकरण करून हिरावून नका घेवू आमच्यापासून.
14 Jan 2015 - 12:39 am | आदूबाळ
अगदी सहमत आहे. या केंजळयांना कदाचित पैशाचा मोह नसेलही, पण बाजारीकरणापासून ते या उपक्रमाला रोखू शकतील का?
मुळात पूजा कशाला करायची वगैरे प्रश्न वैयक्तिक श्रद्धेच्या प्रांतात येतात म्हणून विचारत नाही.
14 Jan 2015 - 1:11 am | हाडक्या
इथे विचारायलाच हवा आदूभौ. कारण ही पूजा घरी केल्यास एकवेळ दुर्लक्ष करता येईल. ही पूजा पाचाडला जिजाऊंच्या समाधीस्थळावर "मातृशक्ती"पूजन म्हणून होत आहे.
उद्या तिथेच चार दुकाने लागली आणि नवस सुरु झाले तर आश्चर्य वाटायला नको. व्यक्तिगत श्रध्दा या प्रांतात या गोष्टी येत नाहीत कारण इतरांच्या आदरस्थानाचा प्रश्न येतो इथे.
14 Jan 2015 - 10:04 am | टवाळ कार्टा
हे पुढल्या ५०-१०० वर्षांत होईलच...आणि मराठी अस्मिता जागी झाली तर तिथे हॉटेले/हाउसिंग सोसायट्या सुध्धा होतील
14 Jan 2015 - 12:12 pm | अत्रन्गि पाउस
खुद्द शिवबांनी समाधीचे जागी पूजा अर्चा सुरु केले नाही .... आणि माझ्या मते ...समाधीचे 'दर्शन' घेतात ...त्याची पूजा करत नाहीत
असो ...
14 Jan 2015 - 9:21 am | विशाखा पाटील
समाधीस्थळ दुर्लक्षित आहे, हे खरं असलं तरी त्यासाठी पूजा करणे, हा मार्ग होऊ शकतो का? त्यापेक्षा माहितीफलक लावणे, परिसराची देखभाल करणे, असे मार्ग आहेत.
केंजळे यांच्या उपक्रमाने 'देऊळ' चित्रपट तिथे प्रत्यक्षात घडणार...
14 Jan 2015 - 10:02 am | टवाळ कार्टा
+१११११११११११११
14 Jan 2015 - 10:11 am | hitesh
आमची राजमाता ताजमहालात चिरनिद्रा घेत आहे. सगळी दुनिया तिला पहायला येते.
14 Jan 2015 - 10:30 am | काळा पहाड
घरवापसी कधी करताय सांगितलं नाहीत
15 Jan 2015 - 2:26 pm | अबोली२१५
अरे अरे …. किती वाईट प्रकारचा विचार आहे. आपाण बसल्या जागेवरून कमेंट कारण किती वाईट आहे.
अजून लोकांना समावून घेण्यासाठी एकाने काही प्रयन्त सुरु केले आहेत. त्यांचा उद्देश खूप चांगला आहे.
या साठी तुम्ही त्यांना मार्ग सुचवा. परुंतु ते "दुकान उभे करायचे" अशी तिखट कॉमेंट करण चुकीतच आहे.
कारण अशा खूप कमी जण आहेत. जे आपली संस्कृती जपण्याचा उदेशाने पाऊले पुढे टाकत आहेत. त्यांना आपण प्रोसहान देऊ या.
त्यांना नवीन मार्ग सुचऊ आणि आपण त्यात सहभागी होऊ .
15 Jan 2015 - 3:24 pm | हाडक्या
ताई.. आम्ही आमच्या परीने कार्य करतोच हो. त्यामुळे "बसल्या जागेवरून कमेंट कारण किती वाईट आहे" असे काही म्हणू नये.
दुसरी गोष्ट त्यांच्या हेतूबद्दल आम्हाला ठावूक नाही (चांगला असेल, ही नसेल ही) पण अशा "उपक्रमांचे" पुढे काय होते हे चांगलेच ठावूक आहे. वरती आदूबाळ म्हटल्याप्रमाणे,
आणि जी गोष्ट चूक तिला चूक म्हणण्यात काहीही गैर वाटत नाही.
थोडक्यात आणि स्पष्टच सांगायचं तर अशा पूजा अर्चा घरी कराव्यात. सार्वजनिक ठिकाणी दैवतीकरण करून, अस्मिता आणि भावनांचे कारण करून असले प्रकार करू नयेत.
समाधीची रोज पूजा-अर्चा हाच काही फक्त संस्कृती जपण्याचा मार्ग नव्हे. खरेतर "समाधीची पूजा-अर्चा" हा संस्कृती जपण्याचा मार्गच नव्हे. इथे आपले बुवा (अतृप्त आत्मा) हवे तर अजून अचूक सांगू शकतील.
तुम्हीही इथे मुद्देसूद न बोलता प्रतिसाद भावनिक करत आहात, हे अमान्य आहे.
15 Jan 2015 - 4:00 pm | डॉ सुहास म्हात्रे
खरेतर "समाधीची पूजा-अर्चा" हा संस्कृती जपण्याचा मार्गच नव्हे.
तीव्र सहमती.
पूजा-अर्चेच्या खर्चाऐवजी, पूज्य जिजामातेपासून स्फुर्ती घेऊन, एकाने/समुहाने (आधुनिक शिवबा नाही तरी) एक एक सबळ मावळा तयार करण्यासाठी एखाद्या गरजू मुलाच्या शिक्षणाचा खर्च उचलावा... हे आवाहन जास्त आवडले असते.
16 Jan 2015 - 1:34 am | काळा पहाड
+१
आणि ते सार्वजनिक गणपती, दुर्गाष्टमी, तोरण, शिवजयंती, आंबेडकर जयंती, त्याच्या मिरवणुका, ढोल, ताशे, डीजे, स्पीकर, दीवाळीतले प्रदूषण करणारे फटाके सगळं सगळं बंद करायला हवं. फारच फालतू माणसं या सगळ्याचा ताबा घेत चाललेत.