लोकमान्य टिळक एक युगपुरुष !
लोकमान्य टिळक एक युगपुरुष. टिळक मोठे चित्रपट अगदी छोटा.
प्रत्येकाच्या मनात लोकमान्यांची एक प्रतिमा असते. ती अधिक प्रकाशमान करून घेण्यासाठी आपण चित्रपटाला येतो. पण इथे ती अपेक्षा पूरी होत नाही. लोकमान्य टिळक हा विषय आणि चित्रपटाचे माध्यम अशा सोन्यासारख्या गोष्टी रिमिक्स किंवा हिप्पीछाप हाताळणीने वाया घालवलेल्या आहेत. वाया घालवणे कसे परवडते प्रश्नच आहे.
प्रियाताई बापट
आजच्या काळातला कुणी एक तरुण. टिळक त्याच्या मनात घुसतात. त्याच्या डोक्यात केमिकल लोच्या होतो. लगे रहो मुन्नाभाई किंवा मी शिवाजीराजे भोसले बोलतोयप्रमाणे.
चिन्मय माडलेकर हा तो तरुण, त्याची प्रिया बापट मैत्रीण. चिन्मय टिळकांचं पुस्तक हातात घेतो आणि टिळक त्याच्या डोळ्यापुढे यायला सुरुवात होते. आता इथे टिळकच पाहीजेत असेही नाही. इथे टिळक, सावरकर, गांधी, विवेकानंद, सुभाषबाबू कुणीही असते तरी फारसा फरक पडला नसता.
दिग्दर्शक
एखादा चित्रपट केवळ लोकमान्यांवर बनवला आहे म्हणून त्याला चांगलेच म्हटले पाहीजे असे नाही. चित्रपट म्हणून तो कसा आहे हेही पाहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बर्याचदा अशा प्रकारचा विषय निवडणे हेदेखील मोठे धाडस आहे. पण ते शेवटालाही नेले पाहीजे. इथे प्रेक्षकाला सखोल चिंतन सापडत नाही. लोकमान्यांच्या जीवनातल्या ढोबळ घटना इथे मांडलेल्या आहेत. उदा. लोकमान्य आणि विवेकानंद भेट होते त्यामधे विवेकानंदांचा विचार पोचत नाही. तर वेषभूशेवरून ते विवेकानंद आहेत एवढेच आपल्याला समजते. अजित परब यांनी विवेकानंद यांची भूमिका केलेली आहे. दोघेही काही सेकंदात एकमेकांना हाय आणि बाय करतात, भेट संपते. टिळक आगरकर, टिळक आगरकर आणि चिपळूणकर, टिळक आणि ब्रूइन, टिळक आणि चाफेकर, टिळक आणि गांधी, टिळक आणि जोतिबा फुले. अशा अनेक लोकांशी टिळकांच्या भेटी होतात. त्याला स्पर्श केलेला आहे.
लोकमान्य
जोतिबा फुले टिळक आगरकरांचा सत्कार करतात त्या प्रसंगात जोतिबांचे व्यक्तिमत्त्व खूप मोठे दाखवायला हवे होते. या उलट टिळकांच्या सत्कराला आलेला एक सामान्य पुणेकर असे जोतिबा दाखवलेले आहेत. वास्ताविक जोतिबा हाच एका संपूर्ण चित्रपटाचा विषय आहे.
असो.
या चित्रपटाला कथा नाही. सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रेक्षकाला गुंतवून ठेवेल असे कथानक नाही.
चला हवा येऊद्या मधे लोकमान्यचे कलाकार आले होते. दिग्दर्शकही आला होता. त्याला पाहूनच त्यावेळी या दिग्दर्शकाने हाताळणी कशी केली असेल याबद्दल धाकधूक होती. यात संवाद आहेत. पण एक अत्यंत रिमिक्सछापाचा प्रयोग केलेला आहे. संवादाला संगीत दिलेले आहे. धूम धाड ठक ठो धूडूम टग डग टग डग टग डग धूम धडाड असे आवाज तर कधी रामूच्या पिक्चरमधल्यासारखे फायटिंगचे आवाज असे संगीत संवादाला दिलेले आहे.
म्हणजे आधी डायलॉग टाकायचे नंतर ते ऐकू नयेत म्हणून संगीत द्यायचे हा नवीन प्रयोग आहे. त्यामुळे तो मूकपटच समजायला हरकत नाही. वाया घालवायला एवढा पैसा कुठून येतो.
रामगोपाल वर्माच्या सरकारनामा, शिवा या चित्रपटांचा प्रचंड प्रभाव आहे. त्यामुळे दिग्दर्शकाने यात डायलॉग ऐवजी किंवा डायलॉगच्या जोडीला फायटींग, बुक्की, ठोसे यांच्या आवाजाचे रिमिक्स केलेले आहे. दिग्दर्शनाची ही हिप्पीछाप हाताळणी म्हणावी लागेल. याचा परिणाम म्हणून अति अपेक्षेने आलेले ज्येष्ठ नागरीकही अर्धा पाउण तासाने चूळबूळ सुरू करतात आणि बाहेरची वाट धरतात.
रँड म्हणून कवट्या महांकाळछाप कुणीसा घेतला आहे.
टिळकांच्या वाड्यातली एक लहान मुलगी(वय१०, ११) पण लग्न झालेली. माहेरी येते. ती म्हणते नवर्याची भिती वाटते. तर त्यावर तिथली एक आत्या म्हणता येइल अशी तरुणी जी विधवा असते ती सांगते. हिच्या नवर्याला रात्र झाल्यावर काय होते कुणास ठाऊक त्याच्या अंगात राक्षसच संचारतो. मग ती त्या मुलीला समजावते. अगं सुरुवातीला भिती वाटते पण नंतर तेच हवं हवसं वाटायला लागतं. हे एवढे संवाद मात्र कुठल्याही व्यत्ययाविना दिग्दर्शकाने पोचवलेले आहेत. वा ! क्या बात है...
टिळक गांधी भेट होते. गांधी म्हणतात आपण अहिंसेच्या मार्गाने लढू. टिळक म्हणतात हिंसेला पर्याय नाही. गीतारहस्य लिहीणारा माणूस इतक्या चीप पद्धतीने व्यक्त होइल. कदापि शक्य नाही. गांधीजीही इतके अपरिपक्व दाखवण्याचे काहीच कारण नव्हते.
या चित्रपटात जमेच्या बाजू नाहीतच का...
१. सुबोध भावेचे लोकमान्यांप्रमाणे दिसणे. (पण रिमिक्समुळे संवाद नाहीतच)
२. यात दाखवलेले 'सध्याच्या काळातले प्रसंग पाहता' हा दिग्दर्शक फायटिंग, गुंडगिरी, टोळीयुद्ध असे रामगोपाल वर्मा छाप चित्रपट उत्तम करू शकेल. पण रामूच्या चित्रपटातले मागचे आवाज आणि टिळकांचे संवाद असले रिमिक्स मात्र करू नये.
३. चित्रपट पहायला कधीही जा. तिकिटाच्या रांगेत तुमचाच नंबर पहीला...
ashu jog
प्रतिक्रिया
7 Jan 2015 - 12:28 am | आशु जोग
यातला पोवाडा ही आणखी एक जमेची बाजू
7 Jan 2015 - 6:22 am | अत्रन्गि पाउस
हे म्हणजे माल्कम मार्शल चा बाउन्सर सरसरत कानाजवळून गेल्या सारखे वाटले
सिनेमा अजून बघायचाय पण प्रोमोज बघतांना "कितीही संकटे ....." किंवा "स्वराज्य ......" हे बेंबीच्या देठापासून ओरडण्याची वाक्ये नव्हेत असे कधीचे वाटून राहिलंय ...
टिळक / बालगंधर्व ह्या अतिथोर लोकांवर चित्रपट बनताहेत हि चांगली गोष्ट पण ते बनतांना हे असे बनताहेत हे ह्याची खंत आहे ...
7 Jan 2015 - 9:19 am | बोका-ए-आझम
चला हवा येऊद्या मधे लोकमान्यचे कलाकार आले होते. दिग्दर्शकही आला होता. त्याला पाहूनच त्यावेळी या दिग्दर्शकाने हाताळणी कशी केली असेल याबद्दल धाकधूक होती.
>>>>>>>
या एका वाक्यात या परीक्षणाबद्दलचं सगळं आलं. खरं सांगायचं तर तुम्ही परीक्षणही याच वाक्यापासून सुरु करायला हवं होतं. म्हणजे ते पूर्वग्रहदूषित आहे हे आम्हा वाचकांना पहिल्या वाक्यापासून कळलं असतं! असो. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. किमान मिपावर तरी नि:पक्षपाती परीक्षण वाचता येईल असं वाटलं होतं. जाऊ दे!
7 Jan 2015 - 9:28 am | आशु जोग
बोका-ए-आझम
तुम्ही जरूर पहा ना
पण
माझ्या लिखाणातले काय पटले नाही हे पण सांगा
7 Jan 2015 - 10:44 am | बोका-ए-आझम
मी चित्रपट पाहिलाय. मला आवडला. असामान्य कलाकृती वगैरे वाटला नाही पण तरीही एक प्रयत्न म्हणून चांगला आहे. सुबोध भावेचं काम अप्रतिम आहे. काही डीटेलिंग, उदाहरणार्थ रँडचा वध, छान आहे. रंगभूषा आणि वेषभूषा याही जमेच्या बाजू. तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे पोवाडाही चांगला आहे. मला खटकलेली एकच गोष्ट म्हणजे पूर्वग्रह. माझी दिग्दर्शक ओम राऊत यांच्याशी अजिबात ओळख नाही. तुम्ही म्हणालात तो ' चला हवा येऊ द्या ' चा भाग मीही पाहिला होता. पण जेव्हा तुम्ही म्हणता की दिग्दर्शकाला पाहिल्यावर धाकधुक होती की हा चित्रपट कसा असेल - त्यामध्ये पूर्वग्रह येतो असं मला वाटतं. दिग्दर्शकाचं बाह्य व्यक्तिमत्व तुम्हाला एखाद्या हिप्पीसारखं वाटलं, टिळक हा विषय पेलू न शकणारं वाटलं आणि पुढे तुम्ही चित्रपटही त्याच चष्म्यातून पाहिलात. निदान तुमच्या लिखाणातून तोच सूर जाणवला. माझा आक्षेप हा त्याला आहे. तुम्ही चित्रपटाला खुशाल वाईट म्हणा, त्यावर टीका करा. एक प्रेक्षक म्हणून तो तुमचा अधिकार आहे आणि त्याबद्दल काहीच म्हणणं नाही पण पूर्वग्रहदूषित टीका करु नये असं मला वाटतं.
7 Jan 2015 - 11:46 am | आशु जोग
तुम्हाला चित्रपट आवडला. तुमच्या मताचा मी आदर करतो. त्यामुळे आपल्याला आवडलेल्या कलाकृतीवर टिकाही सहन होत नाही हेही नैसर्गिक आहे.
पूर्वग्रह असता तर एवढ्या उत्सुकतेपोटी चित्रपट पहायला गेलो नसतो. चित्रपट पूर्ण पाहिल्यावर 'चला हवा येऊ द्या' वगैरे लिहीले आहे. त्यामुळे चला हवा येऊ द्या वगळून उरलेल्या मुद्यांकडेही पहा. माझ्या लिखाणात काही खटकले असेल तर ते सांगा. एक प्रेक्षक म्हणून कलाकृतीबद्दल काय वाटले तेवढेच सांगण्याची भूमिका असते. त्यामुळे परीक्षण वगैरे शब्दही मी वापरत नाही.
अकारण टिका मी करीत नाही. त्यामुळे माझ्या मुद्यांमधे काय चूकीचे वाटले हे जरूर सांगा.
रमा-माधव
प्रेमाची गोष्ट
7 Jan 2015 - 2:26 pm | बोका-ए-आझम
तुमच्या लिखाणावरुन टीका पूर्वग्रहदूषित वाटली असं मी म्हटलेलं आहे. तुमचा किंवा कोणत्याही प्रेक्षकाचा टीका करायचा अधिकार हा वादातीत आहे. त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही. आणि तुमच्या मनात पूर्वग्रह नसेलही. लेख वाचून तसं वाटलं. त्यामुळे मी माझा आक्षेप नोंदवला.
7 Jan 2015 - 12:40 pm | क्लिंटन
हो बरोबर. असामान्य कलाकृती नक्कीच नाही.पण हा चित्रपट इतकाही टाकाऊ वाटला नाही.
11 Jan 2015 - 1:58 pm | आशु जोग
पण काही गोष्टी मला जाणवल्या त्या मी सांगेन. सचिन तेंडूलकरने हॉकीच्या वाटेला जाऊ नये आणि साईनाताईने कब्बड्डीच्या वाटेला जाऊ नये.
तसेच
ओम भाऊने
मराठीमधे सरकार, शिवा यांचा रीमेक काढावा. यश निश्चित. त्यांनाही बागडायला त्यांचं स्वतःचं आंगण मिळेल.
7 Jan 2015 - 1:30 pm | प्रसाद१९७१
अहो "हवा येऊ द्या" बघुन दिग्दर्शकाबद्दल मत बनवायचे काय कारण आहे?
तो दिग्दर्शक कोण तर भा.कु. राउत ह्यांचा मुलगा. "खाण तशी माती" आणि "आडात नाही तर पोहर्यात कुठुन येणार?" ह्या दोन मराठी म्हणी तुम्हाला माहीती नाहीत का?
बाळाची सिनेमा काढुन द्यायची हौस कोण पुर्ण करणार तर आईच.
ही वस्तुस्थिती बघुन भरुन आले आणि म्हणावेसे वाटले की "अशीच आमची आई असती तर गेला बाजार २-३ सिनेमा तर नक्कीच पाडले असते"
7 Jan 2015 - 11:06 pm | खटपट्या
हे अजुन एक पूर्वग्रहदूषीत मत असू शकते :)
7 Jan 2015 - 12:27 pm | बॅटमॅन
बहुतांश सहमत. इम्मॅच्युअर वाटतो कैक ठिकाणी. लोकमान्यांचे व्यक्तिमत्त्व दाखवायला अजून बरीच मॅच्युरिटी पाहिजे.
7 Jan 2015 - 12:36 pm | आशु जोग
संवादाला संगीत देण्याची काय गरज होती
संवाद कुठेच ऐकू येत नाही...
7 Jan 2015 - 12:39 pm | क्लिंटन
पत्रकार दाखविलेल्या मकरंद (चिन्मय मांडलेकर) च्या डेस्कवर चे गव्हेराचा फोटो कशाकरता हे कळायला मार्ग नाही. चे गव्हेराचे फोटो असलेले टी शर्ट घालून लोक नरेंद्र मोदींच्या सभेलाही गेल्याचे फोटो फेसबुकवर बघितले होते. ती लागण चित्रपट दिग्दर्शकालाही झाली का? :)
7 Jan 2015 - 12:48 pm | बॅटमॅन
आयला, म्हणजे चे गव्हेराचा फोटो असला तर मोदी सभेला येऊ देणार नाही की काय =))
7 Jan 2015 - 11:32 pm | नगरीनिरंजन
उलट असे टी-शर्ट घालून जाणे फारच उचित आहे. चे गव्हेराचे चित्र असलेले टी-शर्ट्स विकणे हा क्यापिट्यालिझमचा निर्विवाद विजय आहे!
8 Jan 2015 - 12:26 am | आशु जोग
चे गव्हेराविषयक सर्व कमेंटससाठी लाइकचे बटन शोधतो आहे.
8 Jan 2015 - 10:27 am | क्लिंटन
आहेच आणि माझ्यासारख्यांना त्याचा अगदी परमानंद आहे :)
(मिसळपाववरील इतर कोणाही सदस्यापेक्षा डाव्या कल्टला पराकोटीचा विरोध असणारा आणि त्याचा अभिमान बाळगणारा) क्लिंटन
9 Jan 2015 - 1:51 pm | नगरीनिरंजन
:) डोपॅमाईन मिळतंय म्हटल्यावर आनंद होणारच.
बादवे, त्याच्या नावाचा उच्चार "शे गव्हेरा" असा करतात म्हणे.
9 Jan 2015 - 2:29 pm | क्लिंटन
डोपॅमाईन ही काय भानगड आहे? :)
करूदेत की. चे म्हणा की शे म्हणा. माझ्यासाठी तो डावाच की :)
7 Jan 2015 - 1:39 pm | धर्मराजमुटके
चे गव्हेराचे टी शर्ट घालणारे मुंबईत ढिगाने सापडतील. सुरुवाती सुरुवातीला मला ह्या लोकांबद्द्ल प्रचंड आदर वाटे. हा एवढा सामान्य माणूस दिसतोय पण याची जाणीव आंतरराष्ट्रिय दिसतेय असे वाटायचे. नंतर एक दोघा टी शर्ट घालणार्यांकडे याबद्द्ल विचार केल्यावर कोण "चे गव्हेरा ?" असे मलाच विचारले. टी शर्टकडे बोट दाखविले तर म्ह्णाले आम्हाला काही माहित नाही. फोटो अगदी RAMBO सारखा दिसतोय म्हणून आम्हाला आवडला असे उत्तर मिळाले आणि मग माझा भ्रमाचा भोपळा फुटला.
7 Jan 2015 - 1:43 pm | प्रसाद१९७१
तो दिग्दर्शक कोण तर भा.कु. राउत ह्यांचा मुलगा. "खाण तशी माती" आणि "आडात नाही तर पोहर्यात कुठुन येणार?" ह्या दोन मराठी म्हणी तुम्हाला माहीती नाहीत का?
बाळाची सिनेमा काढुन द्यायची हौस कोण पुर्ण करणार तर आईच.
ही वस्तुस्थिती बघुन भरुन आले आणि म्हणावेसे वाटले की "अशीच आमची आई असती तर गेला बाजार २-३ सिनेमा तर नक्कीच पाडले असते"
9 Jan 2015 - 1:05 pm | कपिलमुनी
मुलगा असण्याचा काय संबंध ?
अमिताभचा मुलगा , सुनिल गावस्करचा मुलगा , आशा भोसलेंची मुलगी , प्रमोद महाजनांचा मुलगा ( दिवटा)
यावर "खाण तशी माती" आणि "आडात नाही तर पोहर्यात कुठुन येणार?" म्हणायचे का ?
आडात असेल तर पोहर्यात येतेच असे नाही .
कोणाचा तरी मुलगा हे चित्रपट वाईट असण्याचा , दिग्दर्शित करण्याचा निमित्त ठरवायचा म्हणजे लैच !
7 Jan 2015 - 2:26 pm | वेल्लाभट
मी तरी परीक्षणं चांगली/खूप चांगली ऐकली आहेत. त्यामुळे जाणं होईलच. बघूच मग.
7 Jan 2015 - 6:18 pm | शोधा म्हन्जे सापडेल
आत्ताच लोकमान्य – एक युग पुरुष, हा चित्रपट पाहून आलो. चित्रपट आवडला नाही. बरीच कारणे आहेत.
१. पूर्ण चित्रपट कर्ण-कर्कश्य आहे. कुठल्याही सीनमध्ये शांतता नाही. आणि अत्यंत वरच्या पट्टीत बॅंकग्राउंड स्कोअर आहे. त्यामुळे काही वेळानंतर चित्रपट ऐकण्यास असह्य होतो.
२. चित्रपटात मारामारीचे २-३ सीन्स आहेत. ते सिंघममधील मारामारीच्या वळणावर जातात. त्यातील मारामारीची स्टाईल, कॅमेरा अँगल्स, मारणार्यांच्या आणि मार खाणार्यांच्या प्रतिक्रिया ह्या सिंघममधून उचलल्यासारख्या वाटतात.
३. चित्रपटात आपण सतत १८९६-१९२ आणि २०१४ हा टाईम ट्रॅव्हल करत असतो. म्हणजे १८९६-१९२० हा टिळकांचा काळ आणि २०१४ हा चिन्मय मांडलेकर-प्रिया बापट ह्यांचा काळ. पहिल्या काही वेळानंतर मला ह्या तळ्यात-मळ्यात चा भयंकर कंटाळा आला. मला कधीतरी, चिन्मय ला आधुनिक टिळक करतायत कि काय अशी शंका आली. म्हणजे, त्या काळचा प्लेगच्या प्रसंगातील सरकारचे वागणे आणि आत्ताच्या काळातील शेतकऱ्यांच्या आत्महत्त्येबाबतचे सरकारचे वागणे हे कम्पेअर केले आहे.
४. महात्मा फुले, विवेकानंद, गांधी, आणि बहुतेक लाला लजपत राय, ह्यांना काही सेकंदांची स्क्रीनस्पेस आणि २-३ डायलॉग्ज देऊन माती केली आहे. चाफेकर बंधूंना जास्त वेळ आणि चांगली ट्रीटमेंट दिली आहे, पण आता मला असं वाटत कि त्यांच्या सीनमध्ये ऍक्शन आहे म्हणून का, असं वाटत.
५. टिळकांच्या पत्नीच्या तोंडी तर अक्षरश: एकही वाक्य नाही. मी त्यांच्याबद्दल फारसं वाचलेलं नाही. पण टिळकांच्या अतिभव्य व्यक्तीमत्वापुढे त्या अगदीच झाकोळून गेल्यासारखं वाटतं.
६. मांडलेकर-बापट ह्यांच्या चित्रपटातील सहभागाबाबत मी साशंक आहे. फक्त आणि फक्त टिळकांवर चित्रपट नसता काढता आला का ?
७. “स्वराज्य हा माझा............ तो मी मिळवणारच” आणि “सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?” ह्या दोन्ही डायलॉग्जची प्लेसमेंट चुकल्यासारखी वाटते. ऐतिहासिक दृष्ट्या त्या त्या प्रसंगान्मध्येच ते बोलले गेले असतील पण ज्या प्रकारे ते ह्या चित्रपटात बोलले गेले ते नक्कीच पटत नाही.
अजून एक गोष्ट मला विचारायची आहे. हे जे आजकाल “लार्जर than लाईफ” व्यक्तीमत्वांवर चित्रपट काढले जातात, जसे कि डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, लोकमान्य टिळक, (गांधींवरचा चित्रपट मी अजून पाहिला नाही) ह्यांच्या आयुष्यावर चित्रपट काढताना, पूर्ण आयुष्य दाखवण्याऐवजी २-३ मोजकेच प्रसंग दाखवून चित्रपट फुलवता येणार नाही का? म्हणजे त्या-त्या प्रसंगानुसार सर्वच व्यक्तीरेखांना न्याय दिल्यासारखा होईल.
8 Jan 2015 - 12:27 am | आशु जोग
शोधा म्हन्जे सापडेल
आपली कमेंट आवडली. खूप बारकाईने पाहीलेला दिसतोय चित्रपट.
7 Jan 2015 - 6:24 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
मुळातचंं टिळक काय, आगरकर काय किंवा सावरकर काय ही आकाशापेक्षा उत्तुंग माणसे होती. त्यांचं व्यक्तीचित्र रंगवायचे तर असे १०० चित्रपट सुद्धा कमी पडतील. चित्रपट ह्या माध्यमाला वे़ळ आणि दर्जेदार रिसोर्सेस ची कमतरता असतेचं.
7 Jan 2015 - 8:30 pm | vikramaditya
मराठी चित्रपटांचा फारसा अभ्यास नसला तरी भालजी पेंढारकरांनी काढलेल्या काही एतिहासिक चित्रपटांची आठवण येते.
सुश्राव्य संगीत, कलाकारांचा चपखल अभिनय आणि कथानकाला न्याय देणे ही त्यांची वैशिष्ट्ये होती. उगीच काही तरी भव्य दिव्य करण्याचा आव आणत नसत. सुर्यकांत, चंद्रकांत, सुलोचना, जयश्री गडकर ह्यांचा अभिनय
आवडत असे.
ह्या मताचा सध्याच्या चित्रपटांशी काही संबध नाही. त्यांचे काय ते चालु द्या.
7 Jan 2015 - 10:39 pm | सिरुसेरि
ऐतिहासीक चित्रपट वरुन आठवले . १९८० - ८५ साली "बाल शिवाजी" हा मराठी ऐतिहासीक चित्रपट खुप गाजला होता . पुण्यात प्रभातला या चित्रपटाला लहानथोरांची चांगली गर्दी होत असे . अजुनही कधी कधी होते.
या चित्रपटाची निर्मिती , दिग्दर्शन पेंढारकर मंडळींनीच केले होते ( भालजी / प्रभाकर ). आनंद जोशी या बाल कलाकाराची बालशिवाजी या भुमिकेसाठी खुप प्रशंसा झाली होती.
भालजी पेंढारकरांच्या चित्रपटांमधील सुर्यकांत, चंद्रकांत, सुलोचना, जयश्री गडकर यांच्याबरोबरच राजशेखर यांच्याही भुमिका आवडायच्य . गावच्या पाटलाचा / इनामदाराचा बिघडलेला पोरगा असाच असतो .
7 Jan 2015 - 11:27 pm | सुधीर
काही महिन्यांपूर्वी श्याम बेनेगलच्या भारत एक खोज या मालिकेमध्ये गरम-दल- नरम-दल हा भाग पाहिला होता त्याचे स्क्रीप्ट गोविंद देशपांडेंनी लिहिले होते आणि य. दि. फडक्यांचे त्याला मार्गदर्शन लाभले होते. या एपिसोड मध्ये टिळकांची भूमिका केलेला कलाकार (सुधीर कुलकर्णी) मला खूप आवडला होता. मोहन गोखलेंनी पण गोपाळकृष्ण गोखल्यांची भूमिका खूप सुंदर केली आहे. ५० मिनिटांच्या एपिसोडमध्ये एज ऑफ कन्सेंट बीलावरचे मतभेद, प्लेगच्या काळातली टिळकांची कविता, रँडचा खून, टिळकांची मागे न हटण्याची कणखर भूमिका तर गोखलेंचा माफिनामा, टिळकांची विदेशी वस्तूंच्या होळीची हाक, गोखलेंची इंग्लडमधली मॉर्ले बरोबरची बातचीत, १९०५ मधलं काँग्रेसच अधिवेशन त्यातली गोखल्यांची भूमिका, त्यानंतरच्या सुरत अधिवेशनातलं दोन गटांचे मतभेद आणि टिळकांची स्वराज्याची हाक वगैरे येते. हा एपिसोड गोखले आणि टिळकांच्या भूमिकेतल्या दोन प्रवाहांना योग्य न्याय देतो असे मला वाटते.
https://www.youtube.com/watch?v=hVjJ4UQZJcc
8 Jan 2015 - 2:07 am | आशु जोग
७५ * ७५ = ५६२५ यासाठी वैदिक गणित.
यातून दिग्दर्शकाची समज दिसते.
8 Jan 2015 - 9:57 am | शोधा म्हन्जे सापडेल
आशु जोग, कर्मधर्मसंयोगाने आम्हीदेखील त्याच क्षेत्राशी निगडीत असल्याने काही गोष्टी कळतात असं म्हणायचं.
वैदिक गणिताचा सीन किंवा मंडाले तुरुंगाचा सीन (त्यात केलेले ते गीतेतल्या श्लोकांचे ते भयानक काहीतरी) बघताना बालिशपणा जाणवतो. आणि त्यातून ते कर्णकर्कश्य संगीत.
आणि ज्या सेन्सिटीव्हीटी ने चित्रपट हाताळला जावा असं वाटतं तसं होत नाहीये असं बर्याच सीन मध्ये जाणवत राहतं. दिग्दर्शकाचं वय आणि समज आणि तो दिग्दर्शित करत असलेल्या चित्रपटाचा विषय ह्याचा काही संबंध असावा का ?
आता विचार केला कि असं वाटतं कि, सुमित्रा भावे-संजय सुकथनकर ह्यांना हा चित्रपट देऊन सांगायला हवं होतं कि जास्तीतजास्त कमर्शियल बनवा, तरी सुद्धा एक चांगली चित्रकृती बघायला मिळाली असती.
असो.
8 Jan 2015 - 7:24 pm | आशु जोग
काही वर्षांपूर्वी २००१ असेल लोकमान्य टिळक यांच्यावर दूरदर्शनवर एक मालिका आली होती. ती अत्यंत उत्तम होती. त्यामधे लोकमान्यांचे विभूतीमत्त्व ध्यानात येई. दादाभाई नौरोजी, सुरत काँग्रेस, लखनौ काँग्रेस, रामप्रसाद बिस्मिल या सर्व गोष्टी संयमितपणे हाताळल्या होत्या. टिळक चरित्र माहीत असणार्यांनाही एक वेगळा पैलू समोर आल्याचा आनंद होई. तेच दिग्दर्शक त्यांच्यावर चित्रपटसुद्धा काढणार होते.
8 Jan 2015 - 11:19 am | विअर्ड विक्स
चित्रपट ४ जानेवारीला पाहिला. अपेक्षा भंग झाला.
१. आत्मचरित्र पर वा संदेशात्मक चित्रपट या दुहीत चांगल्या विषयाचा चोथा झाला आहे. जर आजचा काळ घुसवायचा होता तर शीर्षक लोकमान्य का ठेवण्यात आले ?
२. कथा प्रवाही नाही, ठिगळे जोडल्यागत प्रसंग जोडण्यात आले आहेत.
३. यातील अनेक संवाद हे विषयाची खोली न जाणता केवळ टाळ्या मिळवण्यासाठी लिहिले आहेत असे वाटते.
४. सुबोध भावेस १००० गुण. तसेच त्याचे casting करणार्यास १०००० गुण.
५ . मांडलेतील तुरुंगातील गीतारहस्य चा प्रसंग हा तुरुंगाची खोली न दर्शवता animation ची सद्य काळातील खोली दर्शवतो.
६ . तरी ज्यांनी लोकमान्य वाचलेच नाही त्यासाठी स्फूर्ती देणारा चित्रपट नक्कीच ठरू शकतो.
8 Jan 2015 - 10:24 pm | सिरुसेरि
टिळक व आगरकर यांच्या मैत्रीवर , कार्यावर आधारीत मर्मबंध हि मराठी मालिका पूर्वी दुरदर्शनवर लागायची . त्यामध्ये प्रमोद पवार यांनी लो. टिळकांची भुमिका केली होती.
14 Oct 2023 - 3:04 pm | आशु जोग
२०१५ ला लिहीले ते २०२३ ला आदिपुरुष च्या निमित्ताने खरे ठरते आहे